शिव-पार्वती मंदिर

वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर

कोल्हापुरातील करवीर नगरी ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. याच करवीर तालुक्यात असलेले वडणगे हे गाव पंचगंगा नदीच्या काठावर आहे. असे सांगितले जाते की या गावात पूर्वी वडाची भरपूर झाडे होती. त्यामुळे त्यास वडणगे हे नाव पडले. करवीर भागात ठिकठिकाणी अनेक शिवालये आहेत; परंतु वडणगे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शंकर आणि पार्वती यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. पार्वतीचे स्वतंत्र असे मंदिर अन्यत्र आढळत नाही. यामुळेच या मंदिराची करवीर काशी अशी ख्याती आहे. या मंदिराचा नामोल्लेख ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथाच्या ३२ व्या अध्यायात आहे.

या मंदिराबाबत अशी लोककथा सांगितली जाते, की करवीर नगरीचे माहात्म्य ऐकून महालक्ष्मीच्या भेटीसाठी शंकर-पार्वती हे काशी सोडून करवीर नगरीस निघाले. त्यांना पहाटेपूर्वी तेथे पोहोचायचे होते. प्रवासात शंकराचा नंदी रंकाळा तलावावर पोहोचला, शंकर वडणगे गावातील तलावाजवळ तर त्याच्या थोडे अलीकडे पार्वती पोहोचली. तेवढ्यात कोंबडा आरवला, पहाट झाली आणि त्यामुळे शंकर स्वयंभू शिवलिंग रूपात तर पार्वती तांदळा स्वरूपात होते तेथेच स्थिर झाले. त्यामुळे वडणगे गावात वेगवेगळ्या ठिकाणी शंकर आणि पार्वतीचे मंदिर आहे, तर नंदीचे मंदिर हे कोल्हापुरात रंकाळा तलावाजवळ आहे. कोंबड्याच्या आरवण्याने शंकर-पार्वतीचे स्थान निर्माण झाले, त्यामुळे गावात एका चौथऱ्यावर कोंबड्याची मूर्ती बसवलेली आहे.

पंडित, कवी आणि ज्योतिषी म्हणून विख्यात असलेल्या कोल्हापूरच्या जोशीराव घराण्यातील दाजीबा जोशीराव यांनी पेशवाईच्या अखेरानंतर इ.स. १८२१ ते १८३७ या कालखंडात रचलेल्या ‘करवीर माहात्म्य’ या मराठी ग्रंथात वडणगेचे स्थानमाहात्म्य वर्णन केलेले आहे. त्यात त्यांनी या क्षेत्राचा उमा त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करून सांगितले आहे की अगस्ती ऋषी व त्यांची पत्नी लोपामुद्रा हे करवीर क्षेत्राची परिक्रमा करीत असताना वडणगे गावी आले होते. येथे आल्यानंतर लोपामुद्रेने अगस्तींना या क्षेत्राचे माहात्म्य विचारले. तेव्हा अगस्तींनी सांगितले की त्र्यंबकेश्वरचे जे महत्त्व आहे तेच या क्षेत्राचे आहे. पूर्वी धर्मशर्मा नावाचा ब्राह्मण होता. तो पंचमहापातकी होता. योगायोगाने तो एकदा वडणगे क्षेत्री आला. एका महाशिवरात्रीला त्याच्याकडून चुकून उपवास घडला, तसेच त्याने महादेवाची बेलपत्र वाहून पूजा केली. त्यामुळे तो सर्व पापांतून मुक्त झाला. महादेवाने त्याला पुष्पक विमानातून कैलासाला नेले.

असे माहात्म्य असलेल्या या गावातील मुख्य चौकात पार्वतीचे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगण्यात येते. १९९५ साली मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. मंदिराच्या आवारास मोठे महाद्वार आहे. स्थानिक बेसाल्ट दगडाचा वापर करून ते बांधलेले आहे. उंच वेशीसारख्या या महाद्वाराच्या बाजूला दोन छोटे दरवाजे आहेत. त्यातील डावीकडील दरवाजा स्त्रियांसाठी आणि उजवीकडील दरवाजा पुरुषांसाठी आहे. या महाद्वाराच्या बाजूला उंच अशी इ.स. १७३२ मध्ये तयार केलेली दगडी समई आहे. तिच्या चौथऱ्यावर ही समई ‘दासदादु केदारी पोवार याने तयार केली असे. शके १६५४’ असे कोरलेले आहे.

महाद्वाराच्या उंबरठ्यानजीक एका चौकोनी दगडी शिळेवर दोन पावले कोरलेली आहेत. उंबरठ्यावर नागफण्यासारख्या फुलाचे उठावशिल्प आहे. तेथून आत मंदिरासमोरील प्रांगणात भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची मोठी शेड बांधलेली आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे पार्वती देवीच्या मूळ मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप मोठा आहे व तो दगडात बांधलेला आहे. सभामंडपास पुढच्या बाजूने तीन मोठ्या प्रवेशकमानी आहेत. मधल्या कमानीतून आत प्रवेश होतो. तेथे समोरच संगमरवरी पाषाणात घडवलेली नंदीची सुबक मूर्ती व कासव आहे.

मंदिराचे अंतराळ गज बसवलेल्या लाकडी चौकटींनी बनवलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर दोन्ही बाजूंना दोन देवळ्या आहेत. डावीकडील देवळीत कमलासनावर बसलेली संगमरवरी गणेशमूर्ती आहे, तर उजवीकडील देवळीत काळ्या पाषाणातील नागदेवता आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार पितळी आहे. आत संगमरवरी अधिष्ठानावर पार्वतीदेवीचा दीड फुटी उंचीचा तांदळा आहे. त्यास मूर्तीरूप देण्यात आले आहे. देवीच्या मस्तकावर मोठा पितळी मुकुट आहे. देवीला साडी-चोळीचा शृंगार केलेला आहे. सण-उत्सवांच्या वेळी येथे देवीच्या धातूच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक काढली जाते.

मंदिराच्या बाहेरील भिंतीमध्ये तयार करण्यात आलेल्या देवकोष्टकांत देवीची नऊ रूपे विराजमान आहेत. ‘देवी सप्तशती’नुसार शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, कुष्मांडा, कात्यायनी, स्कंदमाता, चंद्रघंटा, कालरात्री, महागौरी, दुर्गामाता अशी ही देवीची रूपे आहेत. त्यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती येथे बसवण्यात आलेल्या आहेत. मंदिराचा कळस चार स्तरीय आहे व खालचा भाग चौकोनी, त्यावर कमलदलाची नक्षी, त्यावर मधल्या भागात देवकोष्टके, त्यावर नागरांग व वरच्या भागात आमलक आहे. दगडांमध्ये बांधलेले हे सुंदर मंदिर वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आवारात चार ओवऱ्या बांधलेल्या दिसतात. आवारात देवीच्या परंपरागत पुजाऱ्याची समाधीही आहे.

या मंदिरात नित्यपूजेबरोबरच नवरात्रीत मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी देवीची पालखी काढली जाते. या मंदिरापासून काही अंतरावर त्र्यंबकेश्वर तलावानजीक महादेवाचे मंदिर आहे. ग्रामदैवत असलेले हे मंदिर प्राचीन दगडांत बांधलेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी दोन्ही मंदिरे फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात येतात. महादेव मंदिरात रात्री १२ वाजता गावातील मान्यवर आणि देवस्थान समिती यांच्यामार्फत महाअभिषेक करण्यात येतो. त्यानंतर पार्वतीला अभिषेक घालण्यात येतो. दुपारी पालखी सोहळा असतो. संपूर्ण वडणगे गावाची प्रदक्षिणा घातली जाते. महादेव मंदिरापर्य़ंत गेल्यावर ती पालखी परत पार्वतीमातेच्या मंदिरात येते. गावात पार्वती मंदिर आणि महादेव मंदिर यांच्या मध्ये एका चौथऱ्यावर कोंबड्याची एक शिळा आहे, त्यावर कोंबड्याची मूर्ती आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचीही पूजा करण्यात येते.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून ६.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून कोल्हापूरसाठी थेट एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९१३०२५१२००
Back To Home