धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका ऐतिहासिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कल्याणीच्या चालुक्य काळातील परिमंडा अर्थात परांडा हा महत्त्वाचा परगणा होता. प्राचीन काळी या भागाला राजकीय व व्यावसायिक महत्त्व प्राप्त होते. सीना नदीच्या पात्राने समृद्ध असलेल्या परांडा तालुक्यात अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. तालुक्यातील परांडा किल्ला व किल्ल्यावरील शिवमंदिरातील सहा हातांचा नृत्य गणेश, सोनारी येथील कालभैरव मंदिर आदी मंदिरांसोबतच परांडा शहरातील शिव-हनुमान मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे चारशे वर्षे प्राचीन आहे. मंदिराची अख्यायिका अशी की प्राचीन काळी मारुतीरायाचा एक भक्त नित्यनेमाने या ठिकाणी मारुतीच्या भक्तीत तल्लीन होऊन बसत असे. एके दिवशी मारुती त्या भक्तावर प्रसन्न झाला व त्याने त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा आपण कायम येथे वास्तव्य करून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे दुःख दूर करावे, असा त्याने वर मागितला. भक्ताच्या विनवणीनुसार मारुती मूर्तीरूपात येथेच स्थापित झाला. पुढे येथे मंदिर बांधले गेले.
रस्त्यालगत असलेल्या या मंदिरास लोखंडी जाळीची कमान आहे. फरसबंदी प्रांगणात प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत दोन्ही बाजूला सुमारे दोन फूट उंचीचे चौथरे आहेत. दगडी बांधणीच्या या चौथऱ्यांवर उत्सवकाळात विविध धार्मिक कार्यक्रम सादर केले जातात. प्रांगणातून पुढे हनुमान मंदिराचे पर्वत घेऊन उड्डाण करणाऱ्या मारुतीचे चित्र असलेले मंडोवर नजरेस पडते. हनुमान मंदिराच्या समोरील बाजूला प्रांगणाच्या तिन्ही बाजूने दगडी बांधणीच्या प्राचीन अकरा ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांच्या समोरील बाजूस चौकोनी स्तंभांवर त्रिकोणी कमान अशी रचना व मागे भिंत आहे. ओवऱ्यांच्या कमानीत दीपकोष्टके आहेत. ओवऱ्यांचा वापर भक्तनिवास व धर्मशाळा म्हणूनही केला जातो.
उजवीकडील शेवटच्या दोन ओवऱ्यांना भिंती घालून त्याला वेगळे व बंदिस्त केले आहे. यातील एका ओवरीत वज्रपिठावर विठ्ठल-रखुमाईच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींवर विविध वस्त्रे, अलंकार आणि मस्तकी फेटे आहेत. दुसऱ्या बंदिस्त ओवरीत देवस्थानचे कार्यालय आहे. कार्यालयाला लागून बाजूला महादेवाचे मंदिर आहे. महादेव मंदिरास समोरील बाजूस व उजवीकडे चौथऱ्यासमोर अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. उजवीकडील प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर तुलसी वृंदावन आहे. मंदिराच्या समोरील बाजूच्या प्रवेशद्वारासमोर भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. दोन्ही प्रवेशद्वारांना लोखंडी जाळीदार झडपा आहेत. गर्भगृहात मध्यभागी शिवपिंडी व त्यासमोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे.
हनुमान मंदिरासमोर प्रांगणात मध्यभागी महावृक्ष आहे. या वृक्षाच्या पारावरही शिवपिंडी आहे. हनुमान मंदिराचे प्रवेशद्वार अरूंद आहे. मंदिरात वज्रपिठावर मारुतीची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चौकोनी दगडी स्तंभ व स्तंभांवर पाषाणी दिवे (माल्टा) आहेत. मूर्तीवर मागील भिंतीला अर्धचंद्राकार कमान आहे. हनुमान मंदिराच्या छतावर सभोवतीने बाशिंगी कठडा व मध्यभागी चार थरांचे शिखर आहे. शिखरातील पहिला थर चौकोनी, दुसरा षटकोनी, तिसरा अष्टकोनी व चौथा गोलाकार आहे. शिखरावर शीर्षभागी आमलक व कळस आहे.
चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिर परिसरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली जाते. मारूती मंदिरात पाळणा हलवून देवाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या परिसरात देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत शेकडो भाविक देवाच्या पालखी उत्सवात सहभागी होतात. महाशिवरात्री, श्रावण मास व आषाढी कार्तिकी एकादशी या वेळीही भाविकांची दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी गर्दी होते. सर्व सण व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, मंगळवार, शनिवार, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.