शिलाहारकालीन महादेव मंदिर

कसबा बीड, ता. करवीर, जि. कोल्हापूर

‘सोन्याचा पाऊस पडणारे गाव’ अशी ख्याती असलेले कसबा बीड हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. भोगावती व तुळशी या नद्यांच्या पवित्र संगमावर हे गाव वसले आहे. बाराव्या शतकात शिलाहारांच्या कोल्हापूर घराण्यातील राजा भोज याची कसबा बीड ही काही काळ राजधानी होती, असे सांगितले जाते. गावाच्या मध्यभागी कसबा बीडचे ग्रामदैवत असलेल्या महादेवाचे शिलाहारकालीन देवालय आहे. या मंदिराच्या परिसरात प्राचीन वीरगळांचे संग्रहालय आहे. त्यामुळे या मंदिरास धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.

कसबा बीड याचे आधीचे नाव तीरवाडबीड असे होते. शिलाहार राजा भोज (दुसरा) याच्या एका शिलालेखात कसबा बीडचा उल्लेख तीरवाडबीड असा आलेला आहे. कोल्हापूरमध्ये इ.स. १०५५ ते १०७० या कालावधीत राज्य करणारा शिलाहार राजा मारसिंह याला पाच पुत्र होते. त्यातील भोज (पहिला) याचे तीरवाडबीड हे वास्तव्याचे ठिकाण होते. हा भोज राजा १०९५ मध्ये गादीवर आला. तत्पूर्वी त्याने कोल्हापूर या मुख्य राजधानीच्या निकट असलेल्या तीरवाडबीडमध्ये अनेक वास्तू व मंदिरे बांधली. पहिल्या भोजानंतर गादीवर आलेला त्याचा बंधू गण्डरादित्य (कालावधी इ.स. १११० ते ११४०) याच्या सैन्याचे स्थायी शिबिर तीरवाडबीड म्हणजेच कसबा बीड येथे असल्याचेही उल्लेख आहेत. गण्डरादित्य याच्या काळातच येथे महादेवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले. या मंदिराला बीडेश्वर मंदिर असेही म्हणतात.

महादेवाचे हे मंदिर तुळशी नदीच्या तीरावर, मोठ्या प्रांगणात वसलेले आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीमध्ये हे मंदिर उभारलेले आहे. ते पूर्वाभिमुख आहे. सभामंडप (गूढमंडप), अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या भिंतीचा वरचा अर्धा भाग तसेच त्यावरील छत आणि गर्भगृहावरील शिखर हे अलीकडच्या काळात सिमेन्ट काँक्रिटचा वापर करून बांधलेले आहे. मात्र त्याखालील पाषाणातील मंदिराची रचना त्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देते. मंदिर एकूण १८ मोठ्या पाषाणस्तंभांवर उभे आहे.

मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र पेव्हरब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. मंदिरासमोर काही अंतरावर भव्य आणि उंच असा दगडी चौथरा आहे. त्यावर उंच दगडी दीपमाळ आहे. ही दीपमाळ १९ व्या शतकात गावातील गाडवे या लिंगायत समाजातील व्यक्तीने बांधली. मंदिरांत सहसा सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर दीपमाळ वा दीपस्तंभ उभारण्याची पद्धत आहे. येथे मात्र ही दीपमाळ प्रवेशद्वाराच्या दक्षिणेस आहे. याचे कारण या मंदिरात होणारा किरणोत्सव. कोल्हापूरमधील महालक्ष्मी-अंबाबाईच्या मंदिराप्रमाणेच येथे दरवर्षी २ ते १० एप्रिल आणि १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत किरणोत्सव होतो. त्यात अडथळा येऊ नये म्हणून ही दीपमाळ प्रवेशद्वारापासून बाजूला बांधली आहे.

हे मंदिर उंच अशा जगतीवर बांधलेले आहे. सभामंडपात आठ पायऱ्या चढून जावे लागते. मंडपाच्या बाह्य भिंतीवर दगडांत कोरीव काम केलेले आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार अर्धे जुने व अर्धे नवे असे असून, त्याच्या वरच्या भागात कीर्तिमुख आहे. सभामंडपात मोठे कोरीव स्तंभ आहेत. खालच्या बाजूस चौकोनाकार, त्यावर अष्टकोनाकार, मध्यभागी पुन्हा चौकोनाकार, त्यावर गोलाकार, त्यावर तबकडीचा आकार अशा प्रकारची या स्तंभांची रचना आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूस भिंतीलगत स्तंभांना खेटून दोन प्राचीन गणेशमूर्ती आहेत. सभामंडपास डावीकडे आणि उजवीकडेही दोन प्रवेशद्वारे आहेत. जमिनीवर संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत.

अंतराळात दोन खांबांच्या मधून प्रवेश करावा लागतो. तेथे समोरच कासवमूर्ती आहे. अंतराळात दगडी चौथऱ्यावर पाषाणात कोरलेला, पितळी शिंगे व कान असलेला नंदी आहे. येथे एका कोनाड्यामध्ये गणेशाची दगडी मूर्ती आहे. ही मूर्ती झिजलेली असल्याने तिचा आकार अस्पष्ट दिसतो. येथेच दुसऱ्या कोनाड्यामध्ये दोन स्त्रीप्रतिमा दिसतात. त्यातील एका स्त्रीच्या हातामध्ये तलवार आहे व ती तलवारीने दुसऱ्या स्त्रीस भोसकत असल्याचे दिसते. या प्रतिमांच्या शिळेवर वरच्या बाजूला शिवपिंडीची पूजा करताना स्त्रिया दिसतात. यावरून हे शिल्प एखाद्या वीरगळाचा भाग असावा असे वाटते.

मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार कोरीव स्तंभ, तसेच तोरणाने सुशोभित आहे. दरवाजाच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. आत भिंतींना आणि जमिनीवर संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. त्यामुळे मूळ गाभाऱ्याचे प्राचीनत्व लोपले आहे. गाभाऱ्यात मध्यभागी संगमरवरी देव्हारा उभारलेला आहे. त्यात बीडेश्वर महादेवाची मोठी पिंडी विराजमान आहे. या पिंडीच्या शाळुंकेस चांदीचा नक्षीकाम केलेला पत्रा चढवलेला असून, त्यात मधोमध पाषाणलिंग आहे. या देव्हाऱ्याच्या मागच्या बाजूस भिंतीवरील देवकोष्टकात शंकर-पार्वतीची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. येथे पार्वती शंकराच्या मांडीवर बसलेली आहे. त्याच्या खालच्या बाजूस चौथऱ्यावर महादेवाचे व देवी-देवतांचे पाच पितळी मुखवटे आहेत.

या मंदिरामध्ये महाशिवरात्र, विजयादशमी, दत्त जयंती हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हजारो भाविक त्यात सहभागी होतात. महाशिवरात्र काळात येथे सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह, तसेच महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. या दिवशी तसेच दसऱ्याच्या दिवशी भोगावती-तुळशीच्या पवित्र संगमापर्यंत देवाची पालखी मिरवणुकीने नेली जाते. येथे दर सोमवारी व खासकरून श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

या शिलाहारकालीन महादेव मंदिराप्रमाणेच कसबा बीड हे गाव येथे अकस्मात सापडणाऱ्या सुवर्णमुद्रा आणि अलंकारांमुळेही सुप्रसिद्ध आहे. या गावास प्राचीन सुवर्णभूमी असे म्हणतात. असे सांगण्यात येते की येथे अनेकांना शेतात, अंगणांत, जुन्या घरांच्या कौलांमध्ये अनपेक्षितरीत्या सुवर्णमुद्रा वा अलंकार सापडले आहेत. या मुद्रांचा आकार हरभऱ्याच्या डाळीएवढा आहे. त्यांवर त्रिशूल, ओमकार, बेलपत्र, शिवलिंग अशी चिन्हे आढळतात. काही मुद्रांवर नाग, घोडा, हत्ती यांसारखे प्राणी, तसेच पक्षी, विविध अस्त्रे दिसतात. त्यांवर कन्नड अक्षरे कोरलेली आहेत. काही नाण्यांवर गरुडमुद्रा आढळते. ती शिलाहारांची राजमुद्रा होती. अलंकारांमध्ये नथ, कर्णकुंडले, हार यांचा समावेश आहे. याच प्रमाणे गणपतीची सोन्याची मूर्ती, नागमूर्ती अशा गोष्टीही गावामध्ये सापडल्या आहेत. इतिहासकारांच्या मते, या मुद्रा शिलाहारांच्या वा त्या नंतर यादवांच्या काळात एखाद्या समारंभावेळी उधळलेल्या असाव्यात किंवा एखाद्या युद्धप्रसंगी गावाची हानी झाली त्यावेळी मुद्रा आणि अलंकार विखुरले गेलेले असावेत. कालांतराने ते जमिनीत गाडले गेले. अजूनही शेतीची कामे करताना ते सापडतात. याच बरोबर या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या सतीशिळा आणि वीरगळ.
या गावातील काही इतिहासप्रेमी युवकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महादेव मंदिराच्या परिसरात २०२० मध्ये वीरगळ संग्रहालय उभे राहिले आहे. गावातील परिसरात, शेतांत विखुरलेल्या अवस्थेत पडलेले वीरगळ आणि सतीशिळा येथे व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत. यामध्ये लढाई निदर्शक, गोधन निदर्शक, व्याघ्रगळ निदर्शक असे वीरगळ आहेत. त्यातील अनेक वीरगळ व सतीशिळा उत्तम अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे काही वीरगळांमध्ये स्त्रिया युद्ध करताना दिसत आहेत. या शिवाय त्यात गजलक्ष्मी भैरव, विष्णू आदी देवतांसह काही भग्न मूर्तींचाही समावेश आहे. या शिल्पांच्या माध्यमातून कसबा बीड आणि कोल्हापूरच्या इतिहासावर, तत्कालीन वेशभूषा, केशभूषा, शस्त्रे आदी बाबींवर प्रकाश पडतो. हे संग्रहालय पाहण्यासाठी अनेक अभ्यासक येथे येत असतात.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून १७ किमी अंतरावर
  • कोल्हापूर शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home