शीतला देवी मंदिर
हिंदू धर्मात वेगवेगळ्या विचारधारा, पंथ, पूजा पद्धती प्रचलित आहेत. अनेकदा एकाच देवतेला वेगवेगळ्या प्रांतातील किंवा पंथातील भाविक वेगवेगळ्या नावाने पुजतात. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड गावी देवीचे असे एक मंदिर आहे जेथील देवीला तेलंगणा आणि कर्नाटकातील लोक पोचम्मा म्हणून पुजतात तर महाराष्ट्रातील भाविक शीतला देवी म्हणून पुजतात. देवीचे हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध असून येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की सध्याचे हे देवीचे स्थान ३५० वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराबाबत उपलब्ध असलेल्या ताम्रपटात सुमारे १४ गुंठे क्षेत्रावर हे मंदिर उभे असल्याचा उल्लेख आढळतो. येथील देवी चंद्रपूर येथील धुरपत माय देवीची बहीण असल्याची मान्यता आहे. शीतला देवीबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार राजा विराटला देवीने कांजण्या रोगाचा शाप दिला होता. पण राजाने माफी मागितल्यावर देवी प्रसन्न झाली आणि तिने राजासह राज्यातील नागरिकांना रोगमुक्त केले. शीतला देवी यज्ञकुंडातील अग्नीतून प्रकट झाली व ती स्वच्छता आणि आरोग्याची देवी आहे.
येथील देवीला पोचम्मा असेही संबोधले जाते. पोचम्मा देवी महामुनी यांची पत्नी होय. महामुनी हे वनस्पती, पशुपक्षी, कीटक यांचे संरक्षक देव मानले जातात.
मंदिराकडे येणाऱ्या वाटेवर स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चौथरे, त्यावर गोलाकार नक्षीदार स्तंभ व स्तंभांना जोडून महिरप कमान आहे. स्तंभपाद वर्तुळाकार व अधिक रुंद असून त्यावर कमळ फुलाची प्रतिकृती आहे. स्तंभांच्या शीर्षभागी शीर्षकमळ आहे व त्यावरील चौकोनी कणीवर महिरप कमान असे स्वागत कमानीचे स्वरूप आहे. कमानीवर पानेफुले, कमळ, चक्र आदी उठावशैलीतील नक्षी कोरलेली आहेत. येथून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा पूजा साहित्य विक्रीची व विविध वस्तूंची दुकाने आहेत.
मंदिराच्या बाजूला महावृक्ष आहे. त्याच्या विशाल शाखांनी मंदिरावर छत्र धरलेले आहे असे भासते. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराची बांधणी अत्यंत साधी आहे. येथील बांधकाम अलीकडील काळात सिमेंट काँक्रिटने केलेले आहे. सभामंडपास समोर व डाव्या बाजूला अशी दोन प्रवेशद्वारे आहेत.
सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात सभोवती अर्धभिंती आहेत. या भिंतींवर विविध देवतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. अर्धभिंतीस लागून भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात अर्धभिंतीत आठ चौकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांवर असलेल्या तुळईवर मंदिराचे छत आहे. सभामंडपाच्या उजव्या बाजूला अर्धखुल्या स्वरूपाचा देवकक्ष आहे. त्यात उठाव शैलीतील सात मातृका मूर्ती आहेत. ग्रामीण शिल्पशैलीतील या मूर्तीच्या अंगावर बाजूबंदसारखे अलंकार कोरलेले आहेत. मध्यभागी असलेली मूर्ती अधिक उंच व दोन्ही बाजूंच्या मूर्ती लहान आहेत. देव कक्षासमोरील चौथऱ्यावर परड्या ठेवलेल्या असतात. भाविक त्यात पीठ, मिरची, मीठ, धान्य इत्यादी वस्तू अर्पण करतात. गर्भगृहास तिन्ही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. समोरच्या प्रवेशद्वारासमोर मेजावर देवीची उत्सवमूर्ती ठेवलेली आहे. गर्दीच्या वेळी भाविक येथेच दर्शन घेतात. गर्भगृहात चार चौकोनी स्तंभ आणि त्यावर छत आहे. छताला पितळी घंटा लटकवलेल्या आहेत. भिंतीला लागून असलेल्या मखरातील वज्रपीठावर देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. देवीच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन इतर देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. सर्व मूर्तींच्या डोक्यावर चांदीचे मुकुट आहेत. शीतलादेवीच्या माथ्यावर चांदीचे छत्र आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गाला लागून गर्भगृहाच्या मागील बाजूला स्थानिक देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. येथे दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. प्रदक्षिणा मार्गावर तिन्ही बाजूंनी भाविकांनी देवीसाठी घरून तयार केलेला भोजनाचा नैवेद्य ठेवला जातो.
सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ पोहोचता येते. या विहिरीत शीतला देवीचा निवास असल्याचे सांगितले जाते. दगडी बांधणीच्या गोलाकार विहिरीवर पत्र्याचं छत टाकून ही विहीर बंदिस्त करण्यात आलेली आहे. भाविक विहिरीची मनोभावे पूजा करून येथे प्रसाद ठेवतात आणि दिवे प्रज्वलित करतात. विहिरीच्या बाजूला प्राचीन शिवलिंग आहे. पुढे असलेल्या महावृक्षाखाली स्थानिक देवतेची पाषाण मूर्ती आहे. भाविक येथेही भोजन प्रसाद अर्पण करतात. देवीला शीतल पदार्थांची गोडी असल्याने दूध, दही आणि थंड जेवण अर्पण केले जातात. देहिक त्रासात देवीला शरीराचे विविध अवयव वाहण्याचे नवस केले जातात आणि नवस पूर्ण झाल्यावर चांदीचे अवयव वाहण्याची प्रथा आहे. तसेच देवीला जिवंत कोंबडे अर्पण केले जातात.
चैत्र नवरात्री व विशेषतः शीतला षष्ठी हा देवीच्या दर्शनाचा मुख्य दिवस मानला जातो. चैत्र व आषाढ मासात पौर्णिमा ते अमावस्या अशा पंधरा दिवसांच्या येथे मोठ्या यात्रा भरतात. या वेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, जागरण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. चंद्रपूरच्या धुरपत देवीच्या यात्रेला आलेले भाविक या देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. मंदिरात मंगळवार, शुक्रवार व रविवारी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.