विष्णू आणि शंकर यांच्यातील युद्ध थांबवून विश्वात शांतता प्रस्थापित करणारी देवी म्हणजे शांतादुर्गा. ही जगदंबास्वरूप देवी शांतीची देवता आहे, तशीच रक्षणकर्ती देवताही आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची कुलदेवता असलेल्या शांतादुर्गेची अनेक मंदिरे गोमंतकाच्या भूमीत आहेत. त्यातीलच एक सुप्रसिद्ध मंदिर प्राचीन कपितग्राम (कवळे) येथे वसलेले आहे. येथील देवी जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे माघ शुक्ल पंचमीस होणारा वार्षिक महारथोत्सव हा आजही अनेकांना आकर्षित करतो. या यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात.
शांतादुर्गा देवीची नामस्पष्टिकरणात्मक पौराणिक कथा अशी की प्राचीन काळी शिव आणि विष्णु यांचे घनघोर युद्ध झाले. यावेळी विष्णुचे सुदर्शन आणि शंकराचे पशुपतास्त्र यांच्या खणखणाटाने सर्व भूमंडळ हादरून जात होते. या युद्धात विश्वाचा अंत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. युद्धामुळे या दोन्ही देवतांची पालन-संहाराची कार्ये अडून राहू लागली होती. हे पाहून अखेर ब्रह्मदेवाने आपल्या दिव्य तेजाने आदिशक्ती जगदंबा निर्माण केली. तिला भूतलावर पाठवून या दोन्ही देवांमध्ये सलोखा घडवण्यास सांगितले. त्यानुसार ही देवी समरभूमीवर आली व दोन्ही योद्ध्यांच्या मध्ये उभे राहून तिने त्यांना उपदेश केला. ‘स्कंद पुराणा’तील ‘अंबिका खंडा’नुसार देवीने त्यांना ब्रह्म तोच हरि व महेश्वर आहे, असा उपदेश केला.
अशा प्रकारे देवीने युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित केली, म्हणून तिचे नाव शांतादुर्गा असे पडले. ‘देवीकोश’कार प्रभुदेसाई यांनी असे म्हटले आहे की ‘शैव आणि वैष्णव यांचा जो उभा दावा अद्यापही अनुभवाला येतो, त्यामध्ये समेट घडून यावा यासाठी हे रूपक तयार केले असावे.’ देवीप्रमाणेच पुढे विष्णु व शंकर यांचे मीलन घडवण्याचे कार्य आद्य शंकराचार्यांनी केले. गोव्याप्रमाणेच सर्वत्र दिसणारी पंचायतनपूजा हा याचाच भाग होय. आद्य शंकराचार्यांना शंकराचे अवतार मानले जात असे.
परंतु त्यांनी ‘श्रीविष्णुभुजंग’ स्तोत्र, ‘हरिमीडे’ स्तोत्र रचून विष्णूचा महिमा गायला आहे. गोमंतकातील लोकधारणेनुसार, शांतादुर्गा ही सातेरी देवीचेच एक रूप आहे. गोव्यात वारूळ रूपात पूजली जाणारी सांतेरी/सातेरी ही देवी सप्तमातृकांपैकी एक मानली जाते. भूमका, भूमिका, पूर्वी या नावांनीही ही देवी ओळखली जाते.
ही देवी गोमंतकात कशी आली याची कथा अशी की परशुरामाने गोमंतक वसवल्यानंतर आपल्या दिग्विजयार्थ एक यज्ञ केला. त्याच्या सिद्धीसाठी उत्तरेकडील त्रिहोत्रपूर येथून भारद्वाज, कौशिक, वत्स, कौंडिण्य, कश्यप, वसिष्ठ, जमदग्नी, विश्वामित्र, गौतम आणि अत्री अशा तपस्वी विद्वान सारस्वत ब्राह्मणांना गोमंतकात आणले. मराठी विश्वकोशानुसार, मिथिला देशाची एकूण १२ नावे होती. त्यातील एक नाव तैरभुक्ती असे होते. त्याचा अपभ्रंश तिहोत्र असा झाला. सध्याच्या बिहार राज्यातील गंगेच्या उत्तरेकडील भागास तिरहूत क्षेत्र असे म्हणतात. येथून आलेल्या या ब्राह्मणऋषींची ६६ कुळे होती. त्यांनी आपल्यासमवेत आपली मंगेशी, महालक्ष्मी, महादेव, शांतादुर्गा, नागेश, सप्तकोटेश्वर आणि महालसा ही कुलदैवतेही येथे आणली. गोमंतकात प्रथम केळोशी येथे या देवतेची स्थापना करण्यात आली.
पुढे गोमंतकात २८ फेब्रुवारी १५१० रोजी पोर्तुगीज फिरंग्यांचा प्रवेश झाला व इ.स. १५६० साली गोवा बेटांत इन्क्विझिशन म्हणजेच धर्म समीक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर येथील हिंदूंचा क्रूर छळ सुरू झाला. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात येऊ लागली. त्यांना हिंदू देवदेवतांची पूजा करण्यास सक्त मनाई करण्यात आली. त्यांची मंदिरे पाडून, जाळून टाकण्यात येऊ लागली. इतिहासाचार्य पांडुरंगबाब शेणवी पिसुर्लेकर यांनी ‘श्रीशांतादुर्गा चतुःशताब्दि महोत्सव ग्रंथा’त (१९६६) ‘शांतादुर्ग देवालयाचा पूर्वेतिहास’ हा लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘समकालीन पोर्तुगीज कागदपत्रांवरून केळोशीहून ता. १४ जानेवारी १५६६ नंतर व दि. २९ नोव्हेंबर १५६६च्या पूर्वी दैवतांचे स्थलांतर झाले ही गोष्ट निश्चित ठरते.’ मात्र इतिहासाचार्य विनायक नारायण शेणवी धुमे यांनी, हा स्थलांतर काल १ मे १५६०च्या पूर्वीचा असावा, असे मत व्यक्त केले आहे. तर गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने २००४ साली प्रसिद्ध केलेल्या ‘कल्चरल अँड रिलिजियस ट्रॅडिशन्स इन टेम्पल्स ऑफ गोवा’ या कमला माणकेकर यांच्या ग्रंथात केळोशीहून स्थलांतराचे साल १५६४ असे नोंदवले आहे.
या पुस्तकात या स्थलांतराची अशी कथा देण्यात आली आहे की केळोशीहून येथे शांतादुर्गा देवीची मूर्ती आणण्यात आली, तेव्हा ती गावातील दलित समाजाच्या वस्तीत ठेवण्यात आली. येथील जागा मंदिरासाठी सुयोग्य वाटल्याने स्थानिक ब्राह्मणांनी गावातील दलित समाजाकडून ती जागा मागितली. त्यांनी ती आनंदाने दिली, परंतु त्यावेळी त्यांनी एक अट घातली की त्यांना वर्षातून एकदा मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवीची पूजा करण्याची संधी मिळावी. ही अट मान्य करण्यात आली. याबाबत आणखी एक कथा अशी आहे की दलित समाजाच्या लोकांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता केळोशीतील मूळ मंदिरातून देवीची मूर्ती कवळे येथे सुरक्षित आणली. त्यांच्या या सेवेचे फळ म्हणून त्यांना वर्षातून एकदा देवीच्या पुजेची परवानगी देण्यात येते.
मंदिराच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दरवर्षी माघ शुक्ल षष्ठीच्या दिवशी मंदिराचे अधिकारी कवळेममधील हरिजनांना आमंत्रित करतात आणि त्यांना देवीची साडी, चोळीचे कापड, नारळ भेट देऊन त्यांचा सन्मान करतात.
कवळे येथे देवीचे स्थलांतर झाल्यानंतर, पुढे अनेक वर्षे ही मूर्ती एका साध्या झोपडीवजा मंदिरात होती. श्रीशाहू छत्रपती यांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री नारोराम शेणवी हे शांतादुर्गा देवीचे भक्त होते. त्यांनी इ.स. १७३८मध्ये येथे मोठी मंदिरवास्तू उभारली. याच प्रमाणे त्यांच्या प्रयत्नांमुळे पहिले बाजीराव पेशवे यांनी १७३९ साली मंदिरास कवळे हा गाव इनाम दिला. यानंतर वेळोवेळी झालेल्या नूतनीकरण व जीर्णोद्धारानंतर मंदिरास सध्याचे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
शांतादुर्गा देवीच्या पूजेचे साहित्य विकणाऱ्या अनेक दुकानांच्या रांगेतून पुढे आल्यानंतर, एका तलाव लागतो. त्याच्या काठावरून असलेल्या छोट्या मार्गिकेवर असलेल्या नौबतखान्याच्या द्वारातून मंदिराच्या प्रशस्त आवारात प्रवेश होतो. आत डावीकडच्या बाजूस पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेला सात स्तरांचा उंच अष्टकोनी दीपस्तंभ आहे. त्यालगत क्षेत्रपालाचा पाषाण आहे. समोर खास गोमंतकीय स्थापत्यशैलीतील मंदिराची भव्य वास्तू उभी आहे.
मुखमंडप, सभामंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपावर पिरॅमिडच्या आकाराचे कौलारू छप्पर आहे. तर महामंडपावर दोन्ही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. महामंडपाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या प्रवेशद्वारांवरही पिरॅमिडच्या आकाराची कौलारू छप्परे आहेत.
मंदिर उंच अधिष्ठानावर उभे आहे. दहा पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. मंदिराचा सभामंडप, तसेच महामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील काष्ठशिल्पे. भिंतींच्या वरच्या बाजूला लावलेल्या लाकडी पट्ट्यांवरील विविध देव-देवतांची कोरीव रंगीत शिल्पे तसेच पौराणिक प्रसंगांची शिल्पे हे अनेक गोमंतकीय मंदिरांचे वैशिष्ट्य. येथे अशी असंख्य काष्ठशिल्पे पाहावयास मिळतात. याशिवाय काचेच्या हंड्या, आकर्षक बिलोरी झुंबरे, प्रवेशद्वारांवर त्याच प्रमाणे भिंतींवर जडवलेले चांदीचे पत्रे, त्यातील बारीक नक्षीकाम, जमिनीवरील संगमरवरी फरशा, मोठमोठे स्तंभ यांनी मंदिरांतील मंडप शोभायमान झालेले आहेत. मंदिराच्या महामंडपात प्रदक्षिणा मार्ग आहे. महामंडपातील एका स्तंभास मंत्री स्तंभ असे नाव देण्यात आले आहे. या मंदिराची उभारणी करण्यात पेशव्यांचे मंत्री नारोराम शेणवी यांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांना तसेच त्यांच्या वंशजांना मंदिरात धर्मगुरूंच्या शेजारी आदराचे स्थान दिले जाते. तसेच मंदिरातील पूजा आणि आरतीच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांना बसण्यासाठी या स्तंभाजवळ राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यास मंत्री स्तंभ असे म्हणतात.
मंदिराच्या अंतराळाच्या दर्शनीभिंतीस दोन्ही बाजूंनी जालवातायने असून त्यात द्वारपालांच्या मोठ्या मूर्ती आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारासही चांदीच्या पत्र्याने सुशोभित करण्यात आले आहे. मंदिराच्या अंतराळात डाव्या बाजूस देवीचे शयनगृह आहे. त्यात चांदीचा पलंग आणि त्यावर देवीच्या दोन मूर्ती विराजमान आहेत. गर्भागारात शांतादुर्गेची मुख्य मूर्ती ही लिंगस्वरूपात आहे.
त्यामागे चांदीच्या मखरात देवीची पंचधातूची अभयमुद्रेतील पारंपारिक रेशमी वस्त्रे व मंगळसूत्रादी अलंकारांनी शृंगारलेली मूर्ती विराजमान आहे. देवीच्या अलंकारांमध्ये मंगळसूत्र, गलश्री, मोहनमाळ, बांगड्या, पैंजण यांचा समावेश आहे. देवीच्या मस्तकी सोन्याचा मुकूट आहे. देवीच्या आसनाच्या बाजूला दोन सेविकांच्या मूर्ती आहेत. मागील प्रभावळही नक्षीकामाने सुशोभित आहे. या शिवाय गर्भगृहात देवीच्या उत्सवमूर्तीही ठेवलेल्या आहेत. गर्भगृहावर अष्टकोनी मनोरा, त्यावर घुमट, त्यावर छोट्या मेघडंबरीसारखी रचना आणि त्यावर कलश अशा रचनेचे उंच व भव्य असे शिखर आहे.
शांतादुर्गा मंदिराच्या उजवीकडे विहिर व यज्ञशाला आहे. तेथून काही अंतरावर लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. विशेष म्हणजे येथे केवळ नारायणाची मूर्ती असून लक्ष्मी अदृश्य मानली जाते. येथे चांदीच्या मोठ्या देव्हाऱ्यात काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती आहे.
या मंदिरात सकाळी, दुपारी व सायंकाळी आरती, पूजा, अभिषेकादी नैमित्तिक धर्मकार्ये केली जातात. दुपारच्या आरतीला देवीस भोग नैवेद्य दाखविला जातो. त्यात डाळ, भात, चपाती, दही, तूप आणि मिठाई असे खाद्यपदार्थ असतात. रात्रीच्या वेळी देवीस केवळ फळे आणि कोकम कढी असा नैवेद्य दाखविला जातो. ‘श्री शांतादुर्गा जगदंबे उदयस्ते’च्या त्रिवार गजरानंतर देवी शयनमग्न होते. या मंदिरात दुपारच्या भोगापूर्वी सूर्यस्नानाचा कार्यक्रम असतो. त्यात देवीच्या मूर्तीवर एका आरशाद्वारे सूर्यकिरणे पाडली जातात. येथे माघ शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी या काळात वार्षित जत्रोत्सव होतो. माघ शुद्ध प्रतिपदेला सामुदायिक गाऱ्हाणे घातले जाते. नंतर देवीची खांद्यावरील शिबिकेतून मिरवणूक काढली जाते. दुसऱ्या दिवशी लालखीतून (पालखीचा एक प्रकार), तर तिसऱ्या दिवशी विजयरथातून मिरवणूक काढली जाते. जत्रेच्या चौथ्या दिवशी मंदिराबाहेरील तळ्यात होणारे देवीचे नौकारोहण पाहण्यासाठी येथे हजारो भाविकांची गर्दी जमते. अष्टमीला रात्री देवीची विजयरथातून मिरवणूक काढली जाते. या आठ दिवसांत येथे पुराणकथन, कीर्तन, तसेच नाटकांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जत्रोत्सवाप्रमाणेच येथे नवरात्रही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. नवरात्रोत्सव जत्रोत्सवाच्या काळात सर्वांना न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे भोजन मोफत दिले जाते. शांतादुर्गा देवीचे येथील स्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे अनेक जण आपल्या मनोकामनापूर्तीकरीता देवीस कौल लावतात. याशिवाय येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण पंचमीला लक्ष्मीनारायणाचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो.