शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिर

फातर्पा, ता. केपे, जि. दक्षिण गोवा

फातर्पा गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शांतादुर्गा दोन नावांनी विराजमान आहे. यातील एका मंदिरात मूळ कुंकळ्ळीची असलेली शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण वसलेली आहे, तर या देवस्थानापासून काही अंतरावर असलेल्या मंदिरात शांतादुर्गा फातर्पेकरीण देवीचे स्थान आहे. गोमंतकातील देवीउपासकांतील ती एक लोकप्रिय देवता आहे. भगवान विष्णू आणि महादेव यांच्यातील महायुद्ध थांबवून विश्वात शांतता प्रस्थापित करणारी देवी म्हणून शांतादुर्गा देवीची पूजा केली जाते. देवीचे येथील स्थान ५२५ वर्षांपूर्वीचे आहे. येथील देवी मूळची कर्नाटकातील असल्याचे सांगण्यात येते.

शांतादुर्गा देवीविषयीची पौराणिक आख्यायिका अशी की प्राचीन काळी शिव आणि विष्णु यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विश्वाचा अंत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे पाहून अखेर ब्रह्मदेवाने आपल्या दिव्य तेजाने आदिशक्ती जगदंबा निर्माण केली. तिला भूतलावर पाठवून या दोन्ही देवांमध्ये सलोखा घडवण्यास सांगितले. त्यानुसार ही देवी समरभूमीवर आली व दोन्ही योद्ध्यांच्या मध्ये उभे राहून तिने त्यांना उपदेश केला. ‘स्कंद पुराणा’तील ‘अंबिका खंडा’नुसार देवीने त्यांना ब्रह्म तोच हरि व महेश्वर आहे, असा उपदेश केला. अशा प्रकारे देवीने युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित केली. म्हणून तिचे नाव शांतादुर्गा असे पडले.

गोमंतकातील लोकधर्मानुसार, शांतादुर्गा ही वारूळ स्वरूपात पूजल्या जाणाऱ्या व सप्तमातृकांपैकी एक मानल्या गेलेल्या सातेरी वा सांतेरी देवीचे रूप आहे. हिंदू धर्म परंपरेनुसार वारूळ हे सातेरी देवीचे प्रतिक मानले जाते. गोमंतक आणि कोकण भूमी वसविणाऱ्या भगवान परशुरामाची माता रेणुका हिच्याबद्दल अशी पौराणिक आख्यायिका सांगण्यात येते की रेणुकेचा जन्म वारूळातून झाला होता, तसेच ती वारूळामध्येच अदृश्य झाली होती. यामुळे देवी संप्रदायामध्ये वारूळाच्या पूजेस महत्त्वाचे स्थान आहे.

गोव्यातील अनेक मंदिरे आक्रमकांनी धार्मिक, तसेच राजकीय व आर्थिक कारणांसाठी पाडल्याचा इतिहास आहे. सोळाव्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगीजांच्या धर्मांधतेमुळे येथील अनेक हिंदूंना तसेच हिंदूंच्या देवीदेवतांना येथून सुरक्षित स्थानी स्थलांतर करावे लागले होते. तत्पूर्वी बहमनी सल्तनतीच्या कालखंडातही येथील अनेक समृद्ध मंदिरे धनसंपत्तीच्या लोभाने लुटून उद्‌ध्वस्त करण्यात आली होती. बहमनी सल्तनतीचा संस्थापक जफर खान याचे मूळ नाव हसन गंगू असे होते. तो एका ब्राह्मणाचा सेवक होता. त्या ब्राह्मणाने हसन गंगू हा पुढे मोठा होईल असे भाकीत वर्तवले होते, अशी आख्यायिका सांगण्यात येते. या ब्राह्मणाप्रती कृतज्ञता म्हणून हसन गंगू याने बहमनी असे नाव धारण केले. इ.स. १३४७ मध्ये स्थापन झालेल्या या बहमनी सत्तेने पुढच्या दहा वर्षांत, इ.स. १३५८पर्यंत उत्तरेस मांडू ते दक्षिणेस रायचूर आणि पूर्वेस भोनगिर ते पश्चिमेस दाभोळ आणि गोव्यापर्यंतचा मुलुख काबीज केला. त्यांच्या टोळधाडीत दिवाडी बेटावरील नार्वे येथील सप्तकोटेश्वराच्या मंदिरास मोठी हानी पोहचली. याच ठिकाणी गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) समुदायाची कुलदेवता असलेल्या शांतादुर्गा देवीचे मूळ स्थान होते, असे सांगण्यात येते. बहमनी फौजेकडून देवीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये, यासाठी इ.स. १३६५ मध्ये मोरपिरला या ठिकाणी देवीची मूर्ती हलवण्यात आली. यानंतर इ.स. १५०० च्या सुमारास फातर्पा येथे देवीची मूर्ती आणून तिचे छोटे मंदिर उभारण्यात आले. कालांतराने येथे देवीचे मोठे मंदिर उभारण्यात आले.

फातर्पा मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. मंदिराभोवती प्रशस्त प्रांगण आहे. त्यात मंडप आणि इतर उपमंदिरे आहेत. मुखमंडप, अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात असलेल्या चार पायऱ्या चढून मंदिराच्या दुमजली अर्धमंडपात प्रवेश होतो. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला व्यालशिल्पे आहेत. अर्धमंडपातून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. अर्धमंडपात सभामंडपाच्या दर्शनी भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांत द्वारपाल मूर्ती आहेत. सभामंडपाच्या छताला देवकोष्टकात अनेक देवदेवतांच्या मूर्ती व दशावतारही मांडण्यात आलेले आहेत. येथील मोठ्या लाकडी स्तंभांवर अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेली आहे. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाला चांदीची महिरप आहे. गर्भगृहात चांदीच्या मखरात शांतादुर्गेची सुंदर चतुर्भुज मूर्ती आहे.

या मंदिरात नवरात्र, वसंत पंचमी, ललिता पंचमी आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. येथील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे जत्रा होय. पौष शुद्ध प्रतिपदेला पाच दिवसीय जत्रोत्सवास सुरूवात होते. पहिल्या दिवशी महामंगलार्चन, अभिषेक आणि आरती होते. दुसऱ्या दिवशीपासून रथोत्सव सुरू होतो. सजवलेल्या वेगवेगळ्या रथांतून देवीची मिरवणूक काढली जाते. तिसऱ्या दिवशी मगणी परंपरा पाळली जाते. यात देवीला विवाहप्रसंगी वधुला सजवतात तसे शृंगारले जाते. विवाहाच्या आठवड्यात जसे विधी होतात तसे इथेही होतात. या निमित्ताने नाट्य, संगीत आणि लोककलांचे सादरीकरणही होते. दररोज सकाळी सात ते रात्री आठपर्यंत भाविकांना या मंदिरात शांतादुर्गा देवीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • केपे शहरापासून १४ किमी आणि मडगावपासून २० किमी अंतरावर
  • गोव्यातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७०५७२८४४९९,
  • दूरध्वनी ०८३२ २६७०८६४
Back To Home