शांतादुर्गा ही गोव्यातील एक लोकप्रिय देवता आहे. देवीच्या नावात दुर्गा देवीचे नाव असले, तरी येथे देवी सौम्य स्वरुपात विराजमान आहे. शैव आणि वैष्णव संप्रदायात समेट घडवून आणणारी, शिव आणि विष्णू यांच्यातील युद्ध थांबवणारी ही देवी गोवा तसेच कोकण प्रांतात पूजल्या जाणाऱ्या सातेरी देवीचे एक रूप मानली जाते. ही देवी कुंकळ्ळी येथील देवीचे प्रतिरूप असल्याची मान्यता आहे. येथे चैत्रात होणारा गडे उत्सव प्रसिद्ध असून त्या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात.
कोकणात वारूळ स्वरूपात पूजली जाणारी व सप्तमातृकांपैकी एक मानली गेलेली सातेरी वा सांतेरी ही देवी म्हणजेच गोमंतकातील शांतादुर्गा होय. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामधील नागव्य महात्म्यामध्ये ‘शांतादुर्गा प्रादुर्भाव’ या नावाचा एक अध्याय आहे. त्यातील कथा अशी की प्राचीन काळी नागव्यपूर म्हणजे हल्लीच्या नागवे गावामध्ये शांतमुनी नावाचे एक साधुपुरूष राहात असत. त्यांनी आपल्या तपश्चर्येने देवीस प्रसन्न करून घेतले. देवी त्यांच्यासमोर प्रकट झाली तेव्हा त्यांनी तिला आग्रह केला की गोव्याच्या या मातीतच तू अनंत काळ निवास करावा.
त्यावर तथास्तु म्हणत देवीने त्यांची इच्छा पूर्ण केली. ती तेथील एका वारूळात लुप्त झाली. तीच सांतेरी देवी होय. वारूळ हे सातेरी देवीचे प्रतिक मानले जाते. देवी संप्रदायामध्ये वारूळाच्या पूजेस महत्त्वाचे स्थान आहे.
स्थानमाहात्म्यानुसार, प्राचीन काळी कुंकळ्ळी परिसरात कालांतक नावाचा क्रूर राक्षस राहात होता. त्याच्या अत्याचारांपासून मुक्तता मिळण्यासाठी भक्तांनी देवीचा धावा केला. त्यांची विनवणी ऐकून देवी तेथे प्रकट झाली. तिने कालांतकाचा वध केला. यानंतर भक्तांनी केलेल्या आग्रहामुळे देवी तेथेच थांबली. असे सांगितले जाते की पोर्तुगीज काळात देवीचे कुंकळ्ळीतून बाळ्ळी येथे स्थलांतर करण्यात आले. याचा इतिहास असा सांगितला जातो की इ.स. १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर आक्रमण केले. यानंतर त्यांच्या धर्मांधतेने गोव्यातील हिंदूचे जगणे दुस्तर झाले. इ.स. १५६० साली गोवा बेटांत इन्क्विझिशन म्हणजेच धर्म समीक्षण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून हिंदूंचा क्रूर छळ सुरू झाला. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात येऊ लागली. त्यांना हिंदू देवदेवतांची पूजा करण्यास सक्त मनाई करण्यात आली. त्यांची मंदिरे पाडून, जाळून टाकण्यात येऊ लागली.
साल्सेत तालुक्यातील कुंकळ्ळीतील शांतादुर्गा देवीच्या मंदिरावरही पोर्तुगीजांची वक्रदृष्टी पडली होती. त्या मंदिरावर त्यांचा हल्ला होणार याची खबर लागताच गावकऱ्यांनी देवीची मूर्ती रातोरात जुवारी नदीच्या पल्याड आदिलशाही राज्यातील बाळ्ळी व त्यानंतर फातर्पा येथे हलवली. कालांतराने येथे देवीचे मोठे मंदिर उभारण्यात आले.
फातर्पा येथील प्रसिद्ध शांतादुर्गा कुंकळ्लीकरीण देवी मंदिरापासून दोन किमी अंतरावर हे मंदिर आहे. गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाशी संलग्न असलेले हे मंदिर प्रशस्त पटांगणात वसले आहे. बाळ्ळी-फातर्पे मार्गाला लागून असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात जाण्यासाठी रस्त्यापासून सुमारे २५ पायऱ्या आहेत. पायरी मार्गासह येथील संपूर्ण मंदिराचे बांधकाम हे लाल पाषाणात (जांभ्या दगड) केलेले आहे. पायरी मार्गाच्या दोन्ही बाजुला मनोरे आहेत. प्रशस्त प्रांगणात मंदिराच्या पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. मंदिराच्या भोवतीने सुंदर उद्यान विकसित केलेले असून त्यात अनेक फुलझाडे आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर अष्टकोन असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ आहे.
ही गोमंतकीय शैलीपेक्षा वेगळी असून ती महाराष्ट्रातील मंदिराबाहेर उभारल्या जाणाऱ्या दीपमाळेशी नाते सांगते. या मंदिराची वास्तू पारंपरिक गोमंतकीय स्थापत्यशैलीतील आहे. दुहेरी छताचा खुला सभामंडप, गजपृष्ठाकार छताचा गुढमंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहाला गोमंतकीय शैलीचा घुमट आणि शिखर आहे. अर्धखुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
प्रांगणातून सहा पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या अर्धखुल्या सभामंडपात प्रवेश होतो. अंतराळात अर्धगोलाकार छत आणि दगडी शैलीचे खांब दिसतात. अंतराळात पुढील बाजुला प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांचे नक्षीकाम व खालील बाजुस द्वारपाल कोरलेले आहेत. याशिवाय गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकांत दोन्ही बाजुला द्वारपालमूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर देवीच्या दोन मूर्ती आहेत. काळ्या शिळेत घडवलेल्या या दोन्ही मूर्ती स्वतंत्र लाकडी मखरात स्थापित आहेत.
या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या प्रशस्त प्रांगणात मध्यभागी एक धातूचा खांब उभा केलेला आहे. तो येथील प्रसिद्ध गडे उत्सवासाठी वापरण्यात येतो. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये यात्रोत्सवात बगाड किंवा गाडीबगाड फिरवण्याची परंपरा आहे. त्याच प्रमाणे बाळ्ळीतील या मंदिरात चैत्र महिन्यात ‘शिडियोत्सव’ किंवा ‘गडे उत्सव’ साजरा केला जातो. हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. या उत्सवाची तयारी चैत्र शुक्ल पक्षाच्या पंचमीपासून सुरू होते. यात येथील धातूच्या उंच खांबावर असलेल्या आडव्या लाकडी खांबास भाविक स्वतःस टांगून घेतात. नंतर तो आडवा खांब गोलगोल फिरवला जातो. देवीस केलेल्या नवसाची पूर्ती म्हणून हा कष्टप्रद विधी केला जातो. अशा प्रकारे लटकणाऱ्या भाविकास गडो असे म्हणतात. हा गडो या उत्सव काळात कठोर व्रत करतो. त्या काळात तो फक्त फळे आणि पाणी सेवन करतो. या प्रसंगी तयार केल्या जाणाऱ्या गूळ-तांदळाच्या मिठाईलाही गड्या असेच म्हटले जाते. हा विधी पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
मंदिरात नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. माघ शुक्ल पंचमीला ललिता पंचमी साजरी होते. कार्तिक शुद्ध द्वादशीस येथे तुलसी विवाहाचा सोहळा आणि वनभोजन होते.