शांता दुर्गा मंदिर

वडाचा पाट, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

सातेरी देवी ही सिंधुदुर्गची ग्रामदेवता मानली जाते. सातेरी ही सप्तमातृकांपैकी एक मानली जाते. शांता दुर्गा हे याच देवीचे एक रूप. पौराणिक कथांनुसार युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करणारी शांता दुर्गा ही गोव्यातील प्रसिद्ध देवता आहे. मालवणमधील वडाचा पाट येथे ही देवी शांता आणि दुर्गा अशा दोन रूपांत पुजली जाते. येथील देवीचे स्थान जागृत असल्याची तसेच ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

स्कंद पुराणातील काशी खंडाच्या उत्तरार्धात दुर्गा देवीचे माहात्म्य वर्णन केलेले आहे. त्यातील कथेनुसार प्राचीन काळी दुर्ग नावाचा एक बलाढ्य दैत होता. पुरुषापासून अवध्य असण्याचे वरदान त्याला मिळाले होते. या वरदानामुळे त्याने समस्त देवगणांचा पराभव करून आपल्या अधीन केले होते. त्यामुळे सर्व देवता शंकरास शरण आल्या. शंकराच्या आज्ञेनुसार रुद्रशक्ती कालरात्रीने त्याच्या विरोधात युद्ध पुकारून त्याला नामशेष केले. त्यानंतर देवीने असे घोषित केले की तिने दुर्ग नामक दैत्याचा वध केल्यामुळे ती यापुढे दुर्गा या नावाने ओळखली जाईल. देवी दुर्गा ही असुरांविरोधात युद्ध करणारी, शस्त्रधारिणी आहे. तिला शांता दुर्गा हे नाव कसे पडले याबद्दलचीही एक पौराणिक आख्यायिका आहे.

या आख्यायिकेनुसार, एकदा शिव आणि विष्णू यांच्यात युद्ध सुरू झाले. ते दीर्घकाळ चालले तरी त्यात कोणाचा विजय होण्याची शक्यता दिसेना. हे युद्ध थांबल्याशिवाय विश्वव्यवस्था सुरळीतपणे चालणार नाही, हे पाहून अखेर ब्रह्मदेवाने दुर्गा देवीला युद्धभूमीवर पाठवले. तिने या दोघांना उपदेश करून युद्ध थांबवले व शांतता प्रस्थापित केली. म्हणून ती शांता दुर्गा या नावाने ओळखली जाऊ लागली. ‘विश्वकोशा’त याबाबत असे म्हटले आहे की ‘शैव-वैष्णवांतील वाद मिटावा ही दृष्टी या कथेमागे दिसून येते.’ गोव्यालगतच्या कोकण भागात शांता दुर्गा ही सातेरी या रूपातही पुजली जाते. याच देवीचे वडाचा पाट येथे मंदिर आहे. मात्र तेथे ती शांता व दुर्गा या दोन रूपांत विराजमान आहे.

येथील देवस्थानाबद्दल अशी आख्यायिका आहे की येथील एका गुराख्याची गाय रोज एका विशिष्ट स्थळी जाऊन पान्हा सोडत असे. हे लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत चौकशी केली; परंतु त्यास त्याचे स्पष्टीकरण मिळाले नाही. अखेर एके रात्री त्याला स्वप्नदृष्टान्त झाला. त्यात आपण या ठिकाणी वास्तव्य करून असल्याचे देवीने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने गावातील पालव समाजातील काही लोकांना घेऊन त्या ठिकाणी साफसफाई केली. त्यावेळी एका कुदळीचा घाव तेथील एका शिळेवर पडला. तिच्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्या शिळेची येथे देवी म्हणून स्थापना करण्यात आली.

येथील शांता दुर्गा मंदिर एका विस्तीर्ण मैदानात वसलेले आहे. मंदिराभोवती सीमाभिंत आहे. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर तुळशी वृंदावन व त्याच्या शेजारी स्थानिक देवतेचा पाषाण आहे. सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि अंतराळात गर्भगृह तसेच उपसभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूस लागून दोन मंदिरे आहेत. या मंदिरांवर तसेच उपसभामंडप आणि अंतराळावर शिखरे आहेत. मंदिराचे मुख्य शिखर अन्य शिखरांहून अर्थातच उंच आहे. काहीसे पिरॅमिडच्या आकाराचे असलेल्या या शिखरावर चारी बाजूंनी देवकोष्टके आहेत. शिखरावर चार स्तरीय आमलक व त्यावर कळस आहे. सभामंडपाचे छत मात्र कौलारू आहे. त्याची रचना कोकणी स्थापत्यशैलीतील आहे.

सभामंडपाच्या प्रवेशद्वारालगत पायऱ्यांच्या बाजूस दोन मोठ्या सिंहमूर्ती आहेत. येथेच देवाची लाकडी पालखी, तसेच तरंगकाठ्या व अब्दागिरी ठेवलेली आहे. येथील छत अष्टकोनी व आतून वर निमुळते होत गेलेले आहे. अंतराळाच्या द्वारचौकटीवर कोरीव नक्षीकाम आहे. ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. अंतराळाच्या मध्यभागी कोरीव सुरूदार स्तंभ असलेले खुल्या प्रकारचे गर्भगृह आहे. येथे कमी उंचीच्या वज्रपीठावर शांता, दुर्गा आणि मंगेशाचे पाषाण आहेत. त्या बाजूलाच गावऱ्हाटीचे पाषाण आहेत. या पाषाणांच्या मागच्या बाजूस शांता, दुर्गा आणि मंगेशाची उत्सवी रूपातील मोठी प्रतिमा आहे. अंतराळात एका बाजूस गांगो देवाचा पाषाण आहे.

या मंदिराच्या उपसभामंडपाच्या बाजूस वडाचा पाट या गावाचा मूळपुरुष असलेल्या पालवाचे मंदिर आहे. अर्धखुल्या प्रकारचे गर्भगृह असलेल्या या मंदिरात आयताकृती वज्रपीठावर विविध देवतांचे पाषाण तसेच शिवपिंडी आहे. या पिंडीसमोर पाषाणाचा लहानसा, सुबक कोरीव काम केलेला नंदी आहे. मंदिराच्या पाठीमागील भागात पाण्याचे तळे आहे व त्यातील पाण्याचा उपयोग देवीच्या जलाभिषेकासाठी केला जातो.

येथे पौष पौर्णिमेला देवीच्या जत्रोत्सवास प्रारंभ होतो. पाच दिवस हा उत्सव चालतो. यात्रोत्सवात शांता, देवी व मंगेशाच्या पाषाणांस मुखवटा चढवण्यात येतात, वस्त्रे परिधान केली जातात. रात्री अत्यंत उत्साह व जल्लोषात देवीची पालखी काढली जाते. जत्रोत्सवात तीनदा अशा प्रकारे पालखी निघते. या काळात येथे देवीचा अभिषेक, कीर्तन, भजन, दशावतारी नाटक असे कार्यक्रम होतात. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंदिराच्या आवारात एका बाजूस मोठा रंगमंच उभारलेला आहे. यात्रोत्सवात भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून २० किमी, तर कसालपासून २२ किमी अंतरावर
  • मालवण व कसाल येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home