शंकराचार्य मंदिर / पीठ

शुक्रवार पेठ, कोल्हापूर, जि. कोल्हापूर

कोल्हापूर म्हणजेच करवीर नगरी. ही अंबाबाईच्या प्राचीन स्थानासाठी ज्या प्रमाणे ओळखली जाते, त्याच प्रमाणे येथील शंकराचार्यांचे पीठ हीसुद्धा करवीरची एक महत्त्वपूर्ण ओळख आहे. आद्य शंकराचार्य यांनी हिंदू धर्माच्या उत्थानासाठी स्थापन केलेल्या चार मठांपैकी कर्नाटकातील शृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांनी सोळाव्या शतकात या मठाची स्थापना केली. हे महाराष्ट्रातील एकमेव आचार्यपीठ आहे. करवीरमधील पंचगंगेच्या तीरावर हा मठ वसलेला आहे. त्यामुळे शंकराचार्यांच्या बिरुदावलीमध्ये ‘अभिनव पंचगंगातीरवास कमलानिकेतन करवीर सिंहासनाधीश्वर’ असा उल्लेख केला जातो.

आद्य शंकराचार्य यांच्या कार्यकाळाबद्दल अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही. मात्र साधारणतः इ.स. ७८८ ते ८२० हा त्यांचा काळ मानला जातो. त्यांचा जन्म केरळातील अलवाये शहरानजीकच्या कलटी नावाच्या खेड्यात झाला होता. त्यांचे कूळ कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मणाचे होते. त्यांचा जन्म, कार्यकाळ आदी बाबी विवाद्य असल्याने त्यांचे ग्रंथ हेच त्यांचे खरे जीवनचरित्र मानले जाते व पुढील श्लोकात त्यांचे चरित्र सांगितले जाते. – ‘अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद । षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात।।’ याचा अर्थ असा की आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व ३२ व्या वर्षी महाप्रस्थान. श्रीमद्‌भगवद्‌गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र मिळून प्रस्थानत्रयी होते. त्यावरील महान भाष्यकार, केवलाद्वैत म्हणजे एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य, जीवात्मा त्याहून भिन्न नाही व इतर सर्व विश्व मिथ्या आहे या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक आणि ‘पूर्वज वेडा होता म्हणून आपणही वेडे असायला पाहिजे असा काही नियम नाही’ (नहि पूर्वजो मूढ आसीदित्यात्मनि मूढेन भवितव्यमिति किंचितदस्ति प्रमाण् – ब्रह्मसूत्र २.१.११) अशा मिश्कील शब्दांत धर्मसुधारणावाद प्रतिपादन करणारे युगकर्ते वेदान्ती म्हणून आद्यशंकराचार्य ओळखले जातात. आपल्या तत्त्वज्ञानाची परंपरा अखंड चालू राहावी यासाठी त्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व शृंगेरी असे भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. या चार मठांव्यतिरिक्त त्यांनी काशी येथील सुमेर मठ व कांचीचे कामकोटीपीठ याचीही स्थापना केली होती. या मठांवर आद्य शंकराचार्यांनी अधिकारी पीठाधीश नेमले. ती परंपरा आजही कायम आहे. या मठांपैकी शृंगेरी मठाचे अधिपती शंकराचार्य विद्याशंकर भारती यांनी कोल्हापूरचे दक्षिण काशी हे स्थानमाहात्म्य लक्षात घेऊन सोळाव्या शतकात करवीर येथे मठाची स्थापना केली.

या मठामध्ये ‘करवीर शंकराचार्यपीठाचा इतिहास’ म्हणून एक माहिती फलक लावण्यात आला आहे. त्यानुसार, आद्य शंकराचार्यांनी शृंगेरी पीठावर सुरेश्वराचार्य स्वामी यांची नियुक्ती केली होती. विद्याशंकर भारती स्वामी (देवगोसावी) हे या परंपरेतील ३३ वे पीठाधीश होत. आद्य शंकराचार्यांनी अवतार समाप्तीच्या वेळी ज्या हिमालयीन गुहेत प्रवेश केला होता, ती गुहा पाहण्यासाठी एकदा विद्याशंकर भारती आपल्या शिष्यांसह गेले होते. त्यावेळी ‘सहा महिन्यांपर्यंत जर मी गुहेतून बाहेर आलो नाही, तर तुमच्यापैकी एकाने शृंगेरीपीठ चालवावे,’ असा आदेश देऊन त्यांनी गुहेत प्रवेश केला. त्यांच्या आदेशानुसार शिष्य सहा महिन्यांपर्यंत गुहेच्या दारात थांबले. त्यानंतरही विद्याशंकर भारती बाहेर न आल्याने ते शिष्य माघारी परतले व गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी कार्य केले. यानंतर काही दिवसांनी गुरुस्वामी बाहेर आले. तेव्हा गुहेच्या दारात कोणीच नव्हते. त्यांनी सर्व वृत्त जाणून घेतले व नंतर तेथून पर्यटन करून ते कर्नाटकातील संकेश्वर येथे गेले. तेथील वल्लभगडावर त्यांनी वास्तव्य केले. तेथे त्यांनी हरिद्रादेवीची उपासना केली. त्यावेळी कोल्हापुरात सोमवंशीय कृष्णराय राजाचे राज्य होते. त्याने विद्याशंकर भारती यांचा अधिकार जाणून त्यांना दक्षिण काशी करवीरमध्ये मठ स्थापन करून राहण्याची प्रार्थना केली. विद्याशंकर भारती यांना महालक्ष्मीनेही तसा स्वप्नादेश दिला. त्यानुसार त्यांनी करवीर पीठाची स्थापना केली. या फलकामध्ये त्याचा काळ इ.स. १५७९ असा देण्यात आला आहे. मात्र १३४७ च्या सुमारासच येथील देवगिरीच्या यादवांची सत्ता नामशेष होऊन, कोल्हापूरवर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे येथे कृष्णराय याची सत्ता होती व त्याने विद्याशंकर भारती स्वामी यांना पाचारण केले, ही माहिती इतिहासाचा विपर्यास करणारी आहे.

पंचगंगा नदीतीराकडे जाणाऱ्या वाटेवर शुक्रवार पेठेमध्ये प्रशस्त आवारामध्ये शंकराचार्य पीठ वसलेले आहे. आवारात प्रवेश करताच डावीकडे श्रीनारायणेश्वर मंदिर आहे. आवारभिंतीलगत असलेले हे मंदिर छोटेखानी व दगडी बांधणीचे आहे. गर्भगृहात शंकरेश्वराचे पाषाणलिंग आहे. मठाची मुख्य इमारत आधुनिक पद्धतीची व दुमजली आहे. इमारतीस समोरच्या बाजूने मोठी खुल्या प्रकारची ओसरी आहे. तिच्या प्रवेशस्थानासमोर दोन्ही बाजूंना छोट्या चौथऱ्यावर हत्तींच्या छोट्या मूर्ती आहेत. ओसरीच्या पायरीवर कीर्तिमुख आहे व मध्यभागी अर्धचंद्रशीला आहे.

ओसरीतून चार पायऱ्या चढून मठाच्या इमारतीत प्रवेश होतो. येथील प्रवेशद्वाराच्या बाजूस जगद्गुरू विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांची मोठी तसबीर लावलेली आहे. आत चारी बाजूंनी लाकडी खांब असलेली प्रशस्त ओसरी, मध्ये फरसबंदी असलेले खुले चौकोनी आंगण, ओसरीस लागून विविध दालने, त्यावर इमारतीचा दुसरा मजला अशा प्रकारची एखाद्या जुन्या वाड्यासारखी या मठाची रचना आहे. मध्ये खुल्या जागेत तुळशी वृंदावन व दोन होमकुंडे आहेत. समोरच्या बाजूस मध्यभागी असलेल्या दालनात शंकराचार्यांचे पीठ आहे. समोरच्या ओसरीवर डावीकडील बाजूच्या कोपऱ्यामध्ये एका उंच चौथऱ्यावर आद्य शंकराचार्यांची पितळी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्ताने १ मे १९९३ रोजी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती एका चौरंगावर स्थापन केलेली आहे व मूर्तीच्या मागच्या बाजूस लाकडी मखर आहे. त्याच्या मध्यभागी कीर्तिमुख आहे. मूर्तीच्या बाजूस शंकराचा मोठा पितळी मुखवटा आहे. या ओसरीत आद्य शंकराचार्यांच्या, तसेच शारदांबादेवीच्या तसबिरी लावण्यात आलेल्या आहेत.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे असलेल्या सुप्रसिद्ध कोपेश्वर मंदिराचे प्रशासन करवीर पीठातर्फे चालत असे. इ.स. १७०६ मध्ये खिद्रापूर हा गाव करवीर पीठास इनाम म्हणून मिळाला होता. येथील काही शेतजमिनी खिद्रापूरमधील शेतकऱ्यांकडून कसल्या जातात व त्यांचा मोबदला खंड स्वरूपात करवीर पीठ येथे जमा केला जातो. खिद्रापूरप्रमाणेच करवीर तालुक्यातील अनेक गावे शंकराचार्यांच्या पीठास दुमाला (जमिनींच्या महसूल वसुलाचा अधिकार) दिलेली आहेत. तेथूनही खंडाची रक्कम मठास मिळते.

शंकराचार्यांच्या मठामध्ये सकाळी ६ ते ९ या वेळेत प्रातःपूजा होते. यानंतर १२ वाजेपर्यंत आचार्य भाविकांना दर्शन देतात. येथे सायंकाळी साडेसात ते आठ या वेळेत सायंपूजा होते. मठामध्ये शंकराचार्य जयंती, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. या मठामध्ये वेद अध्ययनाचे कार्य आजही सुरू आहे.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • महाराष्ट्र व कर्नाटकमधील अनेक शहरांतून कोल्हापूरसाठी थेट एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मठाच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : कार्यालय, दूरध्वनी : ०२३१२५४१४५४
Back To Home