शनी मंदिर

राक्षस भुवन, ता. गेवराई, जि. बीड

हिंदू धर्मात वैदिक ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणूस जन्माला येताच आकाशातील ग्रहताऱ्यांची स्थिती नोंदवणारी जन्मकुंडली मांडली जाते. त्यानंतर प्रत्येक गोष्ट ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून शुभाशुभ मुहूर्त बघून केली जाते. प्रत्येक माणसाच्या जन्मकुंडलीत दर तीस वर्षांनी साडेसात वर्षांचा अशुभ काळ येतो. यावेळी शनीची उपासना व पूजा केल्यास हा वाईट काळ सौम्य होतो, अशी मान्यता आहे. शनी पूजा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नस्तनपुर, मध्य प्रदेशातील उज्जैन, बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन ही तीन पूर्णपीठे व बीड शहरात असलेले अर्धपीठ मिळून साडेतीन शनीपीठे उत्तम समजली जातात. यापैकी राक्षस भुवन हे आद्य शनीपीठ मानले जाते. येथे दर्शन घेतल्याने शनीची बाधा त्वरित दूर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

गोदावरीच्या तीरावर असलेले हे देवस्थान फार प्राचीन असले तरी सध्याचे बांधकाम अधिक जुने नसावे असे अभ्यासकांचे मत आहे. शनीपीठाबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी हा दंडकारण्याचा भाग होता. येथील अरण्यात दोन राक्षस ऋषीमुनींना ब्राह्मणांच्या रूपात येऊन भोजनाचे आमंत्रण देत. त्यानंतर ते स्वतः अन्नाचे रूप घेऊन ऋषींच्या पोटात शिरत आणि मेंढ्यांचे रूप घेऊन ऋषींचे पोट फाडून बाहेर पडत. ही जेव्हा अगस्त्य ऋषींना समजले तेव्हा ते स्वतः त्या राक्षसांच्या आमंत्रणाने भोजनास गेले व मंत्राने अन्न शुद्ध करून खाल्ल्याने राक्षस पोटातच मरून गेला. दुसरा एक राक्षस पळून जाऊन समुद्रात लपून बसला, तेव्हा अगस्त्य ऋषींनी पूर्ण समुद्र पिऊन राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्यांनी राक्षस भुवन येथे येऊन शनीपीठ व नवग्रहांची स्थापना केली. आणखी एका आख्यायिकेनुसार, प्रभू रामचंद्रांच्या कुंडलीत साडेसाती सुरू झाल्यानंतर वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून श्रीरामाने राक्षस भुवन येथे येऊन शनीची पूजा केली होती.

गावापासून काही अंतरावर गोदावरी नदीच्या तटावर हे देवस्थान आहे. मंदिरापासून काही अंतरावर प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळापासून नदीतीरापर्यंतच्या पायवाटेवर पूजासाहित्य, खाद्य पदार्थ व इतर विविध वस्तूंची दुकाने आहेत. रस्त्यापेक्षा मंदिर खालच्या पातळीवर असल्याने रस्त्यावरून प्रांगणात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रांगणातून मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर साधीशी स्वागत कमान आहे. त्यापुढे खाली उतरण्यासाठी आणखी काही पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या डाव्या बाजूला मंदेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंडी आहे, तर त्यामागील भिंतीतील देवकोष्टकात बुध व शुक्र या दोन ग्रहांच्या मूर्ती आहेत. या मंदिरापासून शनी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला भिंतीवर मंगळ ग्रहाची मूर्ती आहे.

येथून पुढे नदीपात्राला लागून दुमजली शनी मंदिर आहे. मंदिरास मागील बाजूने भिंत आहे, मात्र इतर तीन बाजू खुल्या आहेत. मंदिराच्या तिन्ही बाजूंना बारा गोलाकार स्तंभ आहेत. दुसऱ्या मजल्याच्या छतावर चहूबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. शनी मंदिरात मध्यभागी चार गोलाकार स्तंभ आहेत. त्यांना लोखंडी जाळीदार सुरक्षा कठडा आहे. हे मंदिराचे गर्भगृह आहे. मागील बाजूच्या पाषाण कठड्याला लागून असलेल्या वज्रपीठावर, मध्यभागी शनी मूर्ती विराजमान आहे. शनीमूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला राहू व केतू यांच्या मूर्ती आहेत. शनी देवाला अभिषेक घालण्यासाठी तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. या अभिषेक पात्रात भाविक कठड्याच्या मागून म्हणजेच शनिदेवाच्या मागून पाणी घालतात व येथूनच दर्शन घेतात. दर्शन घेताना शनीदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये, यासाठी ही प्रथा असल्याचे येथील पुजारी सांगतात.

मंदिराच्या परिसरात नदीच्या तीरावर असलेले घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहेत. मंदिराच्या आसपास मोकळी जागा व काही मंडप उभारण्यात आले आहेत. त्यात शनी शांती, नवग्रह शांती तसेच विविध प्रकारच्या जनन शांतीचे विधी केले जातात. मंदिराच्या परिसरात पेशवाईतील गाजलेल्या ‘साडेतीन शहाण्यांपैकी’ एक विठ्ठल सुंदर यांची समाधी आहे. १० ऑगस्ट १७६३ रोजी निजाम व पेशवे यांच्यात या ठिकाणी झालेल्या घनघोर युद्धात सरदार विठ्ठल सुंदर यांचा मृत्यू झाला होता. येथून पुढे श्री दत्तात्रेयांनी स्थापन केलेले हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले प्राचीन दांडेश्वर शिवमंदिर आहे. या मंदिरापासून जवळच अत्रि ऋषी व अनुसया यांचे आश्रमस्थान आहे. याच आश्रमाच्या ठिकाणी श्रीरामाला दत्तात्रेयांनी दर्शन दिले होते, अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी दत्तात्रेयांची एकमुखी मूर्ती असलेले प्राचीन दत्त मंदिर आहे. या मंदिरात ओलेत्या अंगाने दर्शन घेण्याची प्रथा आहे. दत्त मंदिराच्या बाजूला विज्ञान गणेश मंदिर आहे. हे भारतातील २१ प्रमुख गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिरातील गणेश मूर्तीची स्थापना स्वयं श्री दत्तात्रेयांनी केली असल्याचे सांगितले जाते.

वैशाख अमावस्या म्हणजेच शनी जयंती या दिवशी येथे हजारो भाविक शनी देवाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिरात महाअभिषेक, नवग्रह पूजन, शनी शांती याग, भजन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक अमावस्या व शनिवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. राक्षस भुवन हे गोदावरी तीरावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविकांचा राबता असतो. श्रावण महिन्यात येथे विशेष गर्दी असते. दररोज सकाळी ११ ते १२ व सायंकाळी ६ ते सात या वेळेत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असते.

उपयुक्त माहिती:

  • गेवराई येथून २३ किमी अंतरावर
  • बीड येथून ५४ किमी अंतरावर
  • गेवराई येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

शनि मंदिर

राक्षस भुवन, ता. गेवराई, जिला. बीड

Back To Home