शनिदेव मंदिर

वाघोली, ता. वसई, जि. पालघर

पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य वाघोली येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. बारा एकर जागेत खुल्या आकाशाच्या निळ्या छताखाली असलेली शनिशिंगणापूर येथील शनिमंदिरातील शिळेची प्रतिकृती तसेच कोकण व केरळच्या वास्तुकलेनुसार नव्या व जुन्या शैलीच्या संगमातून बांधलेल्या कौलारू मंदिरातील शनिदेवाची मूर्ती हे येथील मुख्य आकर्षण आहे. दर शनिवारी सूर्यास्तानंतर येथे होणारा दीपोत्सव हे येथील वैशिष्ट्य आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराच्या परिसरातील वनराई, झोपाळा गार्डन, ट्री हाऊससारख्या सुविधांमुळे हे ठिकाण देवदर्शनासोबतच पर्यटकांसाठीही योग्य ‘डेस्टिनेशन’ ठरते.

पौराणिक आख्यायिकेनुसार, शनी हा सूर्यपुत्र आहे. यम हा त्याचा धाकटा भाऊ आहे. त्याच्या मातेचे नाव छाया असे होते. सूर्याने छायाची उपेक्षा केल्याने संतापलेल्या शनीने सूर्याशी युद्ध केले व त्याचा पराभव केला. दशरथकृत ‘शनैश्चर स्तोत्रा’त शनीची कोणान्तक, रौद्र, ब्रभू, कृष्ण, पिंगल, मंद, सौरी अशी नावे देण्यात आली आहेत. शनीचे वाहन म्हैस आहे, तर कधीकधी घार आणि कबुतर हेही त्याचे वाहन असल्याचे सांगतात. तिसऱ्या ते पाचव्या शतकातील मार्कंडेय पुराणात शनीचा उल्लेख आहे. तात्याजी महिपत या तेराव्या ते सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या ग्रंथकाराने लिहिलेल्या ‘शनी माहात्म्या’त शनीचा महिमा वर्णन केला आहे.

शनीचे येथील मंदिर नालासोपारा पश्चिमेकडील वाघोली येथील जयवंत नाईक यांच्या कुटुंबीयांनी बांधले आहे. मंदिराचे व्यवस्थापन जयवंत नाईक आणि त्यांचे बंधू किशोर नाईक यांच्या फुलारे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पाहिले जाते. नाईक कुटुंबीय पूर्वीपासून शनिदेवाचे भक्त आहेत. ते पूर्वी नित्यनेमाने दर शनिवारी वसईनजीकच्या शनी मंदिरात जात असत. २०१० मध्ये जयवंत नाईक यांना शनिदेवाने दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी आपल्या जागेत शनिदेवाचे मंदिर बांधण्याचे ठरविले. २७ फेब्रुवारी २०१० रोजी मंदिराच्या वास्तूची पायाभरणी झाली. सुमारे दीडशे कामगार अहोरात्र या मंदिराचे बांधकाम करत होते. मंदिरातील शनिदेवाची मूर्ती जयपूरवरून मागवण्यात आलेली आहे. येथे शनिदेवाच्या शिळेच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्याचा नाईक कुटुंबीयांचा आधी विचार नव्हता. मात्र, जयपूरमधून शनिदेवाची मूर्ती पाठवणाऱ्या कंपनीने मूर्तीसोबत शनिदेवाची शिळाही पाठविली. त्यामुळे येथे या प्रतिकृतीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. या शिळेच्या चौथऱ्यासाठी लागलेला दगड नेवासे येथून आणण्यात आला आहे. अवघ्या ९० दिवसांत मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर २८ मे २०१० रोजी येथे मूर्तीची तसेच शिळेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

नालासोपारा पश्चिमेकडे असलेल्या वाघोली गावात हे मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्व. धर्मा फुलारे यांचा पुतळा आहे. मंदिराकडे येण्याच्या वाटेवर तोफेच्या तसेच बैलगाडीच्या चाकाच्या प्रतिकृती व दिवे ठेवण्यात आलेले आहेत. या प्रतिकृतींच्या उजव्या बाजूस एका चौथऱ्यावर खुल्या आकाशाच्या छताखाली खांबावर आधारलेल्या उघड्या रिंगणाच्या मधोमध शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेची प्रतिकृती आहे. शिळेच्या प्रतिकृतीच्या वरच्या भागात गलंतिका आहे. शिळेसमोर हनुमानाची पितळी मूर्ती आहे. भाविक येथे स्वहस्ते शनिदेवाच्या शिळेच्या प्रतिकृतीवर तेलाचा अभिषेक करतात. यामागील पौराणिक कथा अशी सांगण्यात येते की रावणाने अनेक देवदेवतांसह नवग्रहांना बंदी बनवले होते. सीतामातेच्या शोधासाठी लंकेत आलेल्या हनुमानाने लंकेस आग लावून दिली. त्या अग्निकल्लोळाच्या वेळी बंदिवासातील देव-देवता व ग्रह पळाले; परंतु शनीला उलटे बांधण्यात आले होते. त्यामुळे त्याला पळता आले नाही. त्याला आगीच्या ज्वाळांनी वेढले. त्याच वेळी हनुमानाची दृष्टी शनीवर पडली. वेदनांनी तळमळणाऱ्या शनीला हनुमानाने खाली उतरवले आणि शनीच्या देहावर तिळाचे तेल लावले. त्यामुळे शनीच्या वेदना शमल्या. तेव्हा शनीने म्हटले की जी व्यक्ती माझ्या देहावर तेल अर्पण करील व माझ्या वारी म्हणजे शनिवारी जो हनुमानाचीही पूजा करील त्याच्यावर माझी कृपादृष्टी सदैव राहील. यामुळे सर्व भाविक अत्यंत श्रद्धेने शनीस तेल वाहतात. येथील शनिमंदिरात लागणाऱ्या तेलाची विक्री बचत गटातर्फे केली जाते. मात्र प्रतिकृतीवर वाहिलेल्या तिळाचे तेल वाया घालवले जात नाही. त्यात औषधी वनस्पतींचा अर्क मिसळून योग्य प्रक्रियेद्वारे बनवलेले तेल वृद्ध तसेच रुग्णांना मालिशसाठी प्रसादरूपाने विनामूल्य दिले जाते.

या शिळेच्या नजीकच शनिदेवाची मूर्ती असलेले मंदिर आहे. कौलारू असलेल्या या मंदिरात लाकडाचा उपयोग अधिक केलेला आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपातही दिव्यांची मांडणी केलेली आहे. गर्भगृहात एका वज्रपीठावर शनिदेवाची पूर्वाभिमुख काळी मूर्ती आहे. या मुकुटधारी मूर्तीच्या डाव्या हातात राजदंड व उजव्या हातात त्रिशूळ आहे. खालील डावा हात आशीर्वाद मुद्रेत व खालील उजवा हात खालच्या दिशेला आहे. शनिदेवाच्या मूर्तीच्या मागे त्याचे वाहन असलेली म्हैस आहे.

दर शनिवारी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर संपूर्ण मंदिर परिसरातील विजेचे दिवे मालवण्यात येतात. त्यानंतर दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. या दिव्यांच्या प्रकाशातच आरती केली जाते. हे दृश्य विलोभनीय असते. येथे शनी जयंती, शनी अमावस्या, हनुमान जयंती आदी उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी सकाळी श्रीशनिपूजा, होमहवन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होतात. सकाळी ७ ते रात्री ८.४५ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील शनिदेवाचे दर्शन घेता येते.

मंदिर परिसरात संत बाळूमामा, त्यांचे गुरू मुळे महाराज, तसेच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती असलेले मंदिरही आहे. संत बाळूमामा हे आधुनिक संत परंपरेतील एक चमत्कारी पुरुष होते. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ रोजी कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी झाला. त्यांची गुरूपरंपरा दत्त – नृसिंगसरस्वती – स्वामी नारायण महाराज – मौनी महाराज – मुळे महाराज अशी होती. अखंड नामस्मरण आणि रामकृष्णहरीचा जप हा मूलमंत्र त्यांनी भक्तांना दिला. ४ सप्टेंबर १९६६ रोजी श्रावण वद्य चतुर्थीला ते आदमापूर येथे समाधीस्थ झाले. मुंबई परिसरात चेंबूर येथे बाळूमामांचे मंदिर आहे. पालघर पट्ट्यात त्यांचे मंदिर नाही. त्यामुळे त्यांच्या भक्तांना विशेषतः धनगर समाजातील भाविकांना आदमापूर येथे जाण्याऐवजी येथेच त्यांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने हे मंदिर बांधण्यात आले. येथे दर अमावस्येला बाळूमामांच्या नावाने भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.

शनिमंदिराच्या डावीकडे नाईक यांची आपल्या मातोश्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेली ‘मणिभवन’ नावाची वास्तू आहे. येथे भाविक ध्यान करू शकतात. मंदिर परिसरात विविध झाडे असलेले सुंदर उद्यान आहे त्यात रुद्राक्षाचे झाडही पाहायला मिळते. येथे लहान मुलांना खेळण्याची अनेक साधनेही आहेत. नजीकच लाकडापासून बनवलेले कौलारू ‘ट्री हाऊस’ आहे. येथे भाविक तसेच पर्यटक काही क्षण विसावा घेतात. या परिसरात ‘झोपाळा गार्डन’ही आहे. येथे असलेल्या अनेक झोपाळ्यांवर बसून भाविक कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवतात. मंदिराचा संपूर्ण परिसर सौर ऊर्जेवर प्रकाशमान होतो.

मंदिर परिसरात शनिवारी स्थानिकांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांची विक्री होते. त्यामध्ये खास मराठी पद्धतीने बनवलेली झुणका-भाकर, थालीपीठ, बटाटा वडा, पुरण-पोळी, मोदक, खरवस, अळुवडी यांसारख्या मराठमोळ्या पदार्थांचा समावेश असतो. फुलारे ट्रस्टतर्फे येथे वर्षभर आरोग्य-रक्तदान शिबिरे, परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, खाद्य व नाट्यसंगीत महोत्सव, एकांकिका तसेच विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • नालासोपाऱ्यापासून ६ किमी तर वसईपासून १० किमी अंतरावर
  • वसई व नालासोपारा येथून शहर परिवहन बस व एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा उपलब्ध नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९०११६६७७८८
Back To Home