दंडक राजाची भूमी म्हणून विदर्भाला ‘दंडकारण्य’ असे संबोधले जाते. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेल्या या प्रदेशाला प्राचीन परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि त्या परिसरात असलेल्या शेकडो मंदिरांपैकी निवडक आठ गणेश मंदिरे पेशवेकाळात ‘अष्टविनायक’ म्हणून प्रसिद्ध झाली. त्याचप्रमाणे विदर्भातही गणेशाची स्थाने असून काही वर्षांपासून त्यातील निवडक आठ देवस्थाने मिळून ‘विदर्भातील अष्टविनायक‘ ही संज्ञा तयार झाली. मूळ अष्टविनायकांप्रमाणे विदर्भातील अष्टविनायकांचे दर्शन कोणत्या क्रमाने घ्यायचे, असे संकेत नसले तरीही नागपूर येथील शमी विघ्नेश देवस्थानापासून अष्टविनायक दर्शनाला सुरुवात करण्याची प्रथा आहे.
शमी विघ्नेश मंदिर हे विदर्भातील अष्टविनायकांपैकी पहिले आणि मानाचे स्थान समजले जाते. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात आदासा गावातील एका टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. महाराष्ट्रातील प्रमुख २१ गणेश स्थानांपैकी हे एक जागृत स्थान समजले जाते. गावाच्या नावावरून या गणेशाला ‘आदासा गणपती’ असेही संबोधले जाते. या प्राचीन मंदिरात शमीच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती असून ती १२ फूट उंच व ६ फूट रुंदीची आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी ती सर्वात मोठी व स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. ‘गणेश पुराणा’त या मूर्तीचे वर्णन असून अभ्यासकांच्या मते ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे.
पुराणातील उल्लेखानुसार, इंद्राच्या विनंतीवरून ब्रह्मदेवाने तिलोत्तमा ही सुंदर अप्सरा निर्माण केली; परंतु तिच्या सौंदर्यावर स्वतः ब्रह्मदेवच भाळले आणि तिच्या मागे धावू लागले. धावता धावता त्यांचे वीर्यस्खलन झाले व ते ३ ठिकाणी पडले. त्यापासून महापाप, संकष्ट व शत्रू हे महाभयंकर राक्षस निर्माण झाले. त्यांनी महादेवाची तपश्चर्या केली व महादेव प्रसन्न झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी जगाला त्राही त्राही करण्यास सुरू केले. या राक्षसांच्या तावडीतून ब्रह्मांडाची सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी महादेव व पार्वतीचे रूप असलेल्या शमी वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या शमी वृक्षाच्या मुळापासून गणेश प्रकट झाले आणि त्यांनी या दानवांचा संहार केला. ज्या ठिकाणी ही कथा घडली त्या ठिकाणी मुद्गल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थापना केली. म्हणून या गणेशाचे नाव ‘शमी विघ्नेश’ हे पडले.
दुसऱ्या कथेनुसार, कश्यप ऋषींची पत्नी अदिती हिच्या पोटी इंद्रासह अनेक देवांनी जन्म घेतला होता. अदितीला हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे पुत्र होते. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद, त्याचा पुत्र विरोचन व विरोचनाचा पुत्र महापराक्रमी बळी होय. या बळीने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे ‘इंद्र हा आपल्या कुळातील असून तो स्वर्गाचे राज्य उपभोगत आहे व आम्हाला मात्र त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तेव्हा आम्हालाही स्वर्गाचे राज्य उपभोगता यावे, यासाठी आपण उपाय सुचवावा’, अशी विनंती केली. स्वर्गाचे राज्य मिळविण्यासाठी १०० अश्वमेध यज्ञ करावे लागतील, असे शुक्राचार्यांनी सांगितल्यानंतर बळी यज्ञांच्या तयारीस लागला. ९९ यज्ञ पूर्ण झाल्यानंतर १०० व्या यज्ञास प्रारंभ होताच आपले स्थान डळमळीत होणार या भीतीने इंद्राने विष्णूंकडे धाव घेतली. विष्णूंनी त्यास अभय देऊन कश्यप पत्नी अदितीच्या पोटी जन्म घेतला. श्रीविष्णूंचा हा पाचवा (वामन) अवतार समजला जातो. या वामनाने पिता कश्यप ऋषी यांच्याकडे देवांचे दुःख दूर करण्याचा उपाय विचारल्यानंतर कश्यप ऋषींनी वामनाला गजाननाच्या षडाक्षर मंत्राची दीक्षा देऊन अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वामनाने गणेशाची आराधना केली तेव्हा गणेश प्रसन्न झाले. ज्या ठिकाणी गणेश प्रसन्न झाले त्या ठिकाणी वामनाने श्रीगणेश मूर्तीची स्थापना केली. तोच हा शमी गणेश, असे सांगितले जाते.
तोपर्यंत बळी राजाने स्वर्गावर ताबा मिळविला होता. बळी राजा दानशूर होता. तो अनेकांना दानधर्म करत असे. एकदा या वामनाने बळीकडे जाऊन आपल्याला ३ पावले जमीन दान मागितली. बळीनेही त्याला त्वरित होकार दिला. तेव्हा बुटका दिसणाऱ्या वामनाने महाप्रचंड असे भव्य रूप धारण केले व पहिला पाय पृथ्वीवर, दुसरा पाय स्वर्गावर ठेवला. तिसरा पाय कुठे ठेवू, असे बळीला विचारल्यावर त्याने आपल्या डोक्यावर ठेव, असे सांगितले. त्याप्रमाणे वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात नेले व तेथील राज्य दिले. असे सांगितले जाते की हा बळी श्रीविष्णूंच्या वरदानामुळे अमर असून आजही तो पाताळात राज्य करत आहे व वामन रूपात श्रीविष्णू त्याच्या द्वारावर पहारा देत आहेत.
आदासा येथील हे गणपतीचे स्थान ४००० वर्षांपूर्वीपासून येथे असल्याचे सांगितले जाते. येथील गणपती हा ‘शमी विघ्नेश वक्रतुंड गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे. ११ एकर परिसरात हे देवस्थान आहे. हेमाडपंती रचनेचे हे पूर्वाभिमुख मंदिर असून सभामंडपाच्या मध्यभागी गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती स्थानापन्न आहे. शेंदूर लेपनामुळे या मूर्तीचा रेखीवपणा स्पष्ट होत नसला तरी ही मूर्ती अष्टभुजा किंवा दशभुज असल्याचे सांगितले जाते. सिंहासनावर आरूढ अशी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या कपाळावर तांदळाच्या अक्षतांचा टिळा लावला जातो. डाव्या सोंडेची ही मू्र्ती उजवीकडे झुकलेल्या अवस्थेत आहे. नागपूरकर भोसले घराण्याच्या कारकिर्दीत १८ व्या शतकाच्या शेवटी या मंदिराची डागडुजी करण्यात आल्याच्या नोंदी आहेत. वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शमी विघ्नेश गणेश मंदिर परिसरात त्र्यंबकेश्वर मंदिर, महारुद्र हनुमान मंदिर, दुर्गादेवी व कालभैरव या मंदिरांसह २० मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेली शिवपिंडी दक्षिणाभिमुख आहे. साधारणतः शिवपिंडी उत्तराभिमुख असतात. या मंदिराला लागून असलेल्या एका गुहेतही शिवपिंडी व नंदी आहे. हनुमान मंदिरातील मूर्ती झोपलेल्या अवस्थेत असून ती १० फूट लांबीची आहे. येथे एक प्राचीन विहीर असून तिला ‘पायबाहुली’ असे संबोधले जाते. या विहिरीमध्ये पाण्यापर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने तेथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य (एरियल व्ह्यू) दिसते.
प्रत्येक संकष्टी चतुर्थी व गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत येथे उत्सव साजरे केले जातात. माघ शुद्ध चतुर्थीला (तिळी चतुर्थी) येथे दोन दिवस यात्रा भरते. वसंत पंचमीला एक दिवसाची यात्रा असते. या दिवशी नागपूर तसेच सावनेर येथून एसटी महामंडळाकडून यात्रेसाठी विशेष गाड्यांची सुविधा दिली जाते. दररोज पहाटे ४.३० वाजल्यापासून मंदिरातील पूजाविधी सुरू होतात. मंगळवार आणि शनिवारी येथे भाविकांची गर्दी असते.
मंदिर व्यवस्थापनाने भाविकांसाठी पूजा–प्रसादाची व्यवस्था, नारळ फोडण्यासाठीचे यंत्र, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे अशा विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सोयी–सुविधा व निसर्गरम्य परिसर यामुळे राज्य सरकारने या क्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे.