हनुमान हे शक्तीचे दैवत म्हणून पुजले जाते. ‘माझ्या भक्तांना छळू नये’ असा वर हनुमानाने शनीदेवाकडून मिळवला होता. त्यामुळे अशुभ निवारणार्थ हनुमानाची उपासना केली जाते. हनुमान उपासनेचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने समर्थ रामदास स्वामींच्या काळात झाला. रामदास स्वामींनी गावोगावी हनुमान मंदिरांची स्थापना केली. गडहिंग्लज तालुक्यातील हनिमनाळ गावात असलेले हनुमान मंदिर त्यापैकीच एक असल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारा हा स्वयंभू हनुमान पिडा व व्याधी दूर करणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. फाल्गुन शुद्ध पंचमीस भरणारी देवाची यात्रा नारळाच्या उधळणीची यात्रा म्हणून प्रसिध्द आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे ३५० वर्षांपूर्वी हनिमनाळ गावातील एका शेतकऱ्याच्या दुभत्या गायीने दूध देणे अचानक बंद केले. तेव्हा शेतकऱ्याने कारणाचा शोध घेतला असता त्याला असे कळले की गाय रानात चरायला जाते तेव्हा एका विशिष्ट जागी पान्हा सोडते. तेव्हा रामदास स्वामींनी गावकऱ्यांना या जागी खोदून पाहण्यास सांगीतले. समर्थांच्या सल्ल्यानुसार या जागी खोदले असता जमिनीतून हनुमानाचे स्वयंभू पाषाण प्रकटले. जमीन खोदत असताना पहारीचा एक घाव चुकून पाषाणास लागल्याने पाषाणातून रक्त प्रवाहित झाले. तेव्हा गावातील गुरवाने क्षमा याचना करून प्रायश्चित म्हणून निर्जली उपवास धरला. उपवासाच्या तिसऱ्या दिवशी पाषाणातून रक्त वाहणे बंद होऊन जखम भरून निघाली. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या हनुमानाचा उपवास धरला असता मानसिक व शारीरिक पीडा, व्याधी नाहीशा होतात. ग्वाल्हेरच्या राजघराण्याची या मारुतीचरणी अपार श्रद्धा होती. त्यांनी मंदिरास धर्मशाळा बांधून दिली होती.
मंदिर व नगारखान्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैलीमुळे हनुमान जयंती दिनी पहाटेची किरणे नगारखान्यातून थेट गर्भगृहात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीवर पडतात. निसर्गाचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी या दिवशी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी होते.
मंदिराचे दुमजली दगडी प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे भासतो. काळ्या पाषाणातील बांधकाम असलेल्या प्रवेशद्वाराच्या नक्षीदार द्वारशाखा या लाल गाळखडक प्रकारच्या दगडाच्या आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती व दोन्ही बाजूस वर चक्र आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभांमध्ये दीपकोष्ठके आहेत. स्तंभांवर असलेल्या अर्धवर्तुळाकार दगडी कमानीत मध्यभागी पाषाणात सिंहमुख कोरलेले आहे. कमानीखाली मध्यभागी मांगल्याचे प्रतीक असलेल्या केळफुलाचे उठाव शिल्प आहे. कमानीच्या दोन्ही बाजूंस देवकोष्ठकांत शस्त्रधारी द्वारपाल आहेत. या प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना आहे. नगारखान्याच्या दोन्ही बाजूस त्रिकोणी भिंतींवर सिंहशिल्प आहेत. सिंहशिल्पांच्या बाजूस स्तंभांवर दोन व नगारखान्याच्या छतावर एक अशा तीन मेघडंबरी आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो.
मुख्य मंदिरासमोर एका मोठ्या दगडी चौथऱ्यावर पाच थरांची अष्टकोनी प्राचीन दीपमाळ आहे. दीपमाळेचा खालचा थर अधिक रुंद आहे व ती वर निमुळती होत गेलेली आहे. सर्वांत वरचा थर गोलाकार आहे. या दीपमाळेच्या बाजुने प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या नागरखान्यात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. नगारखान्यास सुरक्षा कठडे आहेत. नगारखान्यात उभे राहून या मंदिर परिसराचे व गावाचे विहंगम दृश्य पाहता येते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मुख्य मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरुपाच्या सभामंडपातील दहा चौकोनी स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपातून पुढे बंदिस्त असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात मध्यभागी कासवमूर्ती आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार सोनेरी धातूपटलाने आच्छादित आहे. येथील द्वारशाखांवर द्वारपाल व पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती व मूर्तीच्या दोन्ही बाजूंना गजराज आहेत. त्यावरील भागात चंद्र व सूर्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहात स्वयंभू हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. मंदिराच्या छतास कठडा असून त्यात बाह्य बाजूस कोष्ठकसदृश रचना आहे. कठड्यावर सिंहांची चार शिल्पे आहेत. मंदिराचे शिखर द्वादशकोनी घुमटाकार व दहा थरांचे आहे. ते वर निमुळते होत गेलेले आहे. त्यावरील आमलक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर उभ्या धारेची नक्षी आणि वर कळस व ध्वजपताका आहे.
मंदिराच्या प्रांगणात डाव्या हाताला घडीव काळ्या दगडात बांधलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. प्रांगणात दत्त मंदिर व दुसऱ्या बाजूला महादेव मंदिर आहे. मंदिरात फाल्गुन शुद्ध पंचमी हा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देवाचा पालखीसोहळा पार पडतो. परिसरातील अनेक ग्रामदैवतांच्या पालख्या यावेळी स्वयंभू हनुमानाच्या भेटीला येथे येतात. यात्रेसाठी जमलेले लाखो भक्तगण बोललेल्या नवसाचे नारळ उधळतात. या अनोख्या परंपरेमुळे ही यात्रा नारळाच्या उधळणीची यात्रा म्हणून ओळखली जाते.