सावळसिद्ध (सिध्दनाथ) मंदिर

सावळज, ता. तासगाव, जि. सांगली

तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात प्रसिद्ध आहे. या तालुक्यातील सावळज हे गाव अग्रणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. गावाला वळसा घालून पुढे जाताना ही नदी सहा ठिकाणी वळण घेते. त्यावरून या गावाचे नाव सावळज पडले, असे येथील ग्रामस्थ सांगतात. या गावातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील पुरातन सावळसिद्ध मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरातील मारुतीला गावाच्या नावावरून सावळसिद्ध असे संबोधले जाते. येथील देव नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नऊ दिवस चालणारा येथील दसरा महोत्सव विशेष प्रसिद्ध आहे

पश्चिम महाराष्ट्रातील समाज जीवनावर नवनाथ पंथीयांच्या प्रभावामुळे अनेक देवतांच्या नावापुढे नाथ शब्द जोडला जाऊ लागला. मारुतीला अनिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्रकम्य, इशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी प्राप्त होत्या. अनिमा, महिमा सिद्धीमुळे मारुतीला अतीसूक्ष्म तसेच विशाल रूप धारण करणे शक्य होते. गरिमा लघीमा सिद्धीमुळे तो अतीभार तसेच भारहिन अवस्थेत जाऊ शकत होता. प्राप्ती सिद्धिमुळे मारुती विश्वातील कोणतीही वस्तू प्राप्त करून घेऊ शकत होता, तसेच सर्व पशू पक्षांच्या भाषा त्याला अवगत होत्या. प्रकम्य सिद्धी प्राप्त असल्यामुळे मारुती आकाश, पाताळ तसेच जलात विहार करण्यास समर्थ होता. इशित्व सिद्धिमुळे त्यास दैवी शक्ती प्राप्त होत्या. वशित्व सिद्धी प्राप्त असल्यामुळे तो तनमनावर नियंत्रण करण्यास सक्षम होता. या सिद्धी प्राप्त असल्यामुळे मारुतीचे सिद्धनाथ हे नाव रूढ झाले.

कोरीव दगडात बांधलेले हे मंदिर सातशे ते आठशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिरास भक्कम बुरूज असलेली तटबंदी दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर अर्धचंद्राकार कमान आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस दर्शनीभिंतीवर उठाव शैलीतील व्याल शिल्पे आहेत. त्यावरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मंदिराच्या तटबंदीत गवक्षाची विशिष्ट रचना असल्यामुळे त्यातून पाहिले असता गर्भगृहातील सिध्दनाथ मारुती मूर्तीचे दर्शन घडते. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. पुढे मंदिराचे प्रांगण आहे. प्रांगणात एका मोठ्या चौथऱ्यावर दोन थरांची गोलाकार दीपमाळ बाजूला तुलसी वृंदावन आहे

त्यापुढे मंदिराचे लाकडी बांधणीचा दुमजली मुखमंडप आहे. मुखमंडपाच्या तुळईवर भीमराव धोंडी सुतार यांनी हे मुखमंडप १८५७ ते १८५८ साली बांधले असल्याचा उल्लेख आहे. यामध्ये मध्यभागी एका चौथऱ्यावर घोड्याची पितळी मूर्ती चांदीच्या पादुका आहेत. या चौथऱ्याच्या खाली शेंदूर लावलेली प्राचीन मूर्ती आहे. यापुढे मंदिराचा दगडी बांधणीतील बंदिस्त सभामंडप (गूढमंडप) आहे. बंदीस्त सभामंडपात उजेड हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. या सभामंडपातून पुढे काहीशा उंचावर असलेल्या आणखी एका सभामंडपात प्रवेश होतो. येथील भिंतींवर नागशिल्पे १९७५ साली रंगवलेली हनुमान गणपतीची चित्रे आहेत. उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी येथे छताला टांगलेली आहे

पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या तिनही द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी ललाटबिंबावर गणपती मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन नक्षीदार स्तंभ आहेत. अंतराळात असलेल्या शयनकक्षात देवाची शय्या सजवलेली आहे. शयन कक्षातील भिंतींवर शेंदूरचर्चित गणेशाची प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखा पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. येथील ललाटबिंबावर गणेशमूर्ती ललाटपट्टीवर दोन्ही बाजूस कमळ फुलांची नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर सिद्धनाथ मारूतीची सहा फूट उंच शेंदूर लावलेली उभी मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे, मिशा डोक्यावरील मुकुट चांदीचे आहे. धोतर उपरणे ल्यालेल्या मूर्तीच्या बाजूला ढाल आहे. मूर्तीच्या पाठशीळेवरील पितळी अच्छादनावर पानाफुलांची नक्षी आहे. हे जागृत देवस्थान असल्याने या मारुतीची सोवळ्याने पुजा केली जाते

गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार लघूशिखरे त्यावर कळस आहेत. छतावर मध्यभागी पाच थरांचे द्वादशकोनी शिखर आहे. त्यातील प्रत्येक थरात बारा देवकोष्टके त्यात देवतांच्या मूर्तीं आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे. मंदिराच्या मागील बाजूस बाह्य भिंतीत गोमुख आहे. या गोमुखाशेजारी मंदिराचे प्राचीन अवशेष वीरगळ आहेत. मंदिराच्या प्रांगणात तटबंदीला लागून नक्षीदार स्तंभ असलेल्या ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्ये गणपती, श्रीदत्त, विठ्ठलरुक्मिणी मारुती यांची मंदिरे आहेत. या ओवरीमध्ये असलेल्या मारुती मंदिरातील मूर्तीची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे सांगितले जाते. प्रांगणातील पिंपळाच्या विशाल वृक्षाखाली असलेल्या पारावर शनीदेवाची मूर्ती आहे

मंदिरात दसऱ्याचा मुख्य वार्षिक उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. या प्रत्येक दिवशी मारुतीला वेगवेगळ्या रुपांत सजविले जाते. यावेळी भजन कीर्तन प्रवचन संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवकाळात दररोज ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत देवाची पालखी मिरवणूक काढली जाते. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. याशिवाय चैत्रात सात दिवसांचा येथे सप्ताह साजरा केला जातो. श्रावणातील सरत्या सोमवारी येथे मोठी यात्रा असते

उपयुक्त माहिती

  • तासगावपासून २५ किमी
  • तर सांगलीपासून ४८ किमी अंतरावर
  • तासगाव सांगली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा 
Back To Home