सातेरी देवस्थान

खोर्ली-म्हापसा, ता. बार्देश, जि. उत्तर गोवा

गोव्यात वारूळ रूपात पूजली जाणारी सांतेरी/सातेरी ही देवी सप्तमातृकांपैकी एक मानली जाते. भूमका, भूमिका, पूर्वी या नावांनीही ही देवी ओळखली जाते. पौराणिक आख्यायिकांनुसार, देवाने पहिली भूमिका प्रकृती किंवा माया ही घेतली होती. त्यामुळे तिला भूमका असे म्हटले जाते, तर तिचे प्राचीनत्व पूर्वी या शब्दातून प्रकट होते. गोव्यातील सुप्रसिद्ध देवता शांतादुर्गा हे याच देवीचे एक रूप आहे. सातेरी तथा शांतादुर्गेची अनेक प्राचीन मंदिरे गोव्यात आहेत. त्यातीलच एक मंदिर म्हापसा या शहराजवळ असलेल्या खोर्ली या गावात वसले आहे.

हिंदू धर्म परंपरेनुसार वारूळ हे सातेरी देवीचे प्रतिक मानले जाते. देवी संप्रदायामध्ये वारूळाच्या पूजेस महत्त्वाचे स्थान आहे. भगवान परशुरामाची माता रेणुका हिच्याबद्दल अशी पौराणिक आख्यायिका सांगण्यात येते की रेणुकेचा जन्म वारूळातून झाला होता, तसेच ती वारूळामध्येच अदृश्य झाली होती. रेणुका हा शब्दही रेणु म्हणजे सूक्ष्म कण यातून आला आहे. वारूळाची निर्मितीही मातीच्या सूक्ष्म कणांनी झालेली असते. ख्यातनाम विद्वान अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्यानुसार, वारूळ हे योनिप्रतिक मानले गेले आहे. या स्वरूपात देवीच्या पूजेची परंपरा प्राचीन आहे. तिच्या शांतादुर्गा या नावाबद्दल आख्यायिका अशी की शिव आणि विष्णू यांच्यात एकदा युद्ध सुरू झाले. तेव्हा दुर्गादेवीने या दोघांना उपदेश करून शांतता प्रस्थापित केली. म्हणून तिला शांतादुर्गा असे म्हणतात.

सातेरी देवीचे खोर्ली येथील मंदिर विस्तिर्ण प्रांगणात व निसर्गरम्य वातावरणात वसले आहे. प्रांगणास आवारभिंत आहे. त्यास दाक्षिणात्य गोपुरासारख्या आकाराचे, परंतु उंचीने लहान असलेले महाद्वार आहे. २००४ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या महाद्वाराचे उद्‌घाटन करण्यात आले होते. येथून आत येताच डाव्या बाजूस संगमरवरी चौथऱ्यावर नऊ स्तरांचा भव्य दीपस्तंभ दिसतो. २००२ साली उभारण्यात आलेला हा दीपस्तंभ कूर्मपृष्ठावर उभा आहे. त्याच्या खालच्या दोन स्तरांमध्ये असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांची, तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी आदी संतांची उठावशिल्पे आहेत. उजवीकडे एका कोपऱ्यामध्ये कारंजे बांधलेले आहे. या ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती विराजमान आहे. महाद्वारापासून काही अंतरावर समोरच सांतेरीचे भव्य देवालय उभे आहे. त्यासमोर चवाटेश्वराचे देऊळ आहे. चवाटेश्वर ही गावाची रक्षकदेवता मानली जाते. या देवळात शाळुंकेच्या आकाराच्या उंच चौथऱ्यावर चवाटेश्वराचे पाषाणलिंग आहे. त्याच्या मागच्या बाजूस चवाटेश्वराची आशीर्वाद मुद्रेतील व धोतर, सदरा आणि मस्तकी पागोटे ल्यालेली उभी संमरवरी मूर्ती आहे.

गोव्यातील मंदिरांची स्थापत्यशैली देशातील अन्य भागांतील मंदिरांच्या स्थापत्यशैलीहून भिन्न आहे. मंदिर अभ्यासकांच्या मते, येथे सतराव्या शतकानंतर बांधण्यात आलेल्या मंदिरांच्या स्थापत्यावर हिंदू मंदिर स्थापत्यशैलीबरोबरच प्रबोधन काळातील युरोपांतील गिरिजाघरे, तसेच मुघल व मराठा वास्तुकला यांचा मोठा प्रभाव आहे. हा प्रभाव मंदिरांचे भव्य उंच सभामंडप, अष्टकोनी आकाराची मनोऱ्यासारखी शिखरे, शिखरांवरील घुमटाकार यांतून दिसून येतो. सातेरी देवस्थानातील मंदिरातही ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराचा मुखमंडप उंच व दुमजली आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. सभामंडपास कोरीव स्तंभ असलेले उंच प्रवेशद्वार आहे. आत मंडपाच्या भिंतीपासून काही अंतर सोडून, दोन्ही बाजूंनी मोठे चौकोनी स्तंभ आहेत. हे स्तंभ एकमेकांस कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपास गजपृष्ठाकार वितान आहे. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूकडील भिंतींवर खालच्या भागात गजथर आहे. सभामंडपाच्या डावीकडील भिंतीवर नंदीवर आरूढ असलेल्या देवी महेश्वरीचे, तर उजवीकडील भिंतीवर हंसारूढ देवी ब्रह्माणीचे उठावशिल्प बसवलेले आहे. गर्भगृहास चंदेरी पत्र्याने मढवलेले प्रवेशद्वार आहे. त्याच्या ललाटबिंब स्थानी देवीची प्रतिमा कोरलेली आहे. देवीच्या दोन्ही बाजूंस समृद्धीचे प्रतीक असलेल्या गजमूर्ती कोरलेल्या आहेत. त्यावरील उतरांग भागामध्ये सिंहासनावर आरूढ सातेरी मातेची भव्य प्रतिमा आहे.

गर्भगृहात सातेरी मातेची चांदीचा मुखवटा घातलेली मूर्ती विराजमान आहे. देवीने हातात ढाल, तलवार धारण केलेली आहे. देवीस वस्त्रालंकार तसेच पुष्पमालांनी मढवलेले आहे. देवीच्या मस्तकी उंच मुकूट आहे. गर्भगृहावर अष्टकोनी मनोरा व त्यावर घुमटाकार शिखर आहे. शिखरावर आमलक आणि त्रिस्तरीय कलश आहे. मंदिर प्रांगणाच्या डाव्या बाजूस मंदिराचे भव्य सभागृह स्थित आहे.

सातेरी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिर परिसर भजन-कीर्तन, संगीत आदी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबलेला असतो. गावातील विविध समाजातील लोक या उत्सवात सहभागी होतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस, दिवाळी पाडव्याच्या दिवशी देवीच्या पालखीच्या नगर प्रदक्षिणेचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. याशिवाय या मंदिरात गुढीपाडवा, आषाढी एकादशी, कोजागरी पौर्णिमा, तसेच भाद्रपद शुद्ध पौर्णिमेस मंदिराचा संस्थापना दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात. मंदिरात दर श्रावणी सोमवारी देवीची खास पूजा केली जाते. त्या पूजेचा मान पहिल्या व दुसऱ्या सोमवारी त्वष्टा ब्राह्मण समाजास, तिसऱ्या सोमवारी भंडारी समाजास, चौथ्या सोमवारी नाईक, पानकर व वैश्य समाजास, तर पाचव्या सोमवारी पुजारी किंवा ब्राह्मण समाजास असतो. या मंदिरात दर मंगळवारी संध्याकाळी ७.३० ते ९.३० या काळात स्थानिक कलाकारांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मंदिरात सोमवार, बुधवार, गुरूवार या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते ७ या कालावधीत प्रसाद (कौल) स्वीकारला जातो.

उपयुक्त माहिती:

  • म्हापसा येथून १.५ किमी आणि पणजी येथून १६ किमी अंतरावर
  • म्हापसा व पणजी येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : संदेश नाईक, अध्यक्ष, मो. ८६०५०१२८८९
  • नारायण साळगावकर, उपाध्यक्ष, मो. ९०४९०७९५२५
Back To Home