कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवर सुमारे २२ टेकड्यांची मोठी रांग दिसते. यातील पूर्वेकडील सर्वांत शेवटची टेकडी म्हणजेच महादेवाची टेकडी. या टेकडीवर संपूर्ण कातळात कोरलेले महादेवाचे आणि पार्वतीचे मंदिर आहे. या टेकडीच्या खालच्या बाजूला असलेल्या सातेरी मंदिरामुळे या टेकडीस सातेरी महादेवाची टेकडी असेही म्हणतात. या मंदिरस्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नंदीची मूर्ती. मुख्य मंदिरापासून खालच्या बाजूस काही अंतरावर ती एका मोठ्या शिळेत कोरलेली आहे.
येथील कातळ–मंदिर नेमके केव्हा कोरण्यात आले याची माहिती अनुपलब्ध आहे. अशा प्रकारची, इतिहास अज्ञात असलेल्या प्राचीन मंदिरे वा गुहा वा लेणी पांडवांनी बांधली वा खोदली असे सांगण्याची रीत आहे. त्यानुसार येथील मंदिरही पांडवांनी खोदले असे सांगण्यात येते. कोल्हापूरमध्ये इ.स. १०९५ मध्ये गादीवर आलेला शिलाहार राजा भोज (पहिला) याचे तीरवाडबीड (सध्याचे कसबा बीड) हे वास्तव्याचे ठिकाण होते. त्यानंतर १११० मध्ये गादीवर आलेला त्याचा बंधु गण्डरादित्य याच्या सैन्याचे स्थायी शिबिर हेही तीरवाड बीड येथे होते. भोजराजाच्या एका ताम्रपटात तीरवाड बीड ते पन्हाळा मार्गाचा उल्लेख आहे. या व्यापारी मार्गावरील अनेक टप्प्यांपैकी महादेव डोंगर हा सर्वांत उंचावरील टप्पा होता. त्या काळात हे मंदिर कोरण्यात आले असावे, असा अभ्यासकांचा कयास आहे.
या टेकडीवर जाण्यासाठी गाडीरस्ता बांधलेला आहे. वर आल्यानंतर भाविकांच्या सोयीसाठी येथे पत्र्याची शेड बांधलेली आहे. तेथून वर जाण्यासाठी पायरीमार्ग आहे. येथे सर्वप्रथम दिसतो तो साधारण पाच फूट उंचीचा संपूर्ण कातळात कोरलेला नंदी. हा नंदी बसलेल्या स्थितीत असून त्याचे मुख आग्नेय दिशेस आहे. या नंदीची आभुषणे ही कातळात अगदी उत्तमरितीने कोरण्यात आली आहेत. येथून काही अंतरावर पायऱ्यांच्या डाव्या बाजूस टेकडीत खोदलेली एक विहिर दिसते. ही विहीर सुमारे ४० फूट खोल असल्याचे सांगण्यात येते. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. काही ठिकाणी खोबण्याही केलेल्या दिसतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही विहीर हाच येथील पाण्याचा एकमेव स्त्रोत होता. टेकडी माथ्यावर झालेल्या बांधकामांनंतर ही विहीर कोरडी पडल्याचे सांगण्यात येते. येथून पायऱ्या चढून टेकडीमाथ्यावर येताच समोरच महादेवाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिरासमोर पत्र्याचा मंडप बांधलेला आहे.
महादेवाचे हे मंदिर टेकडीवरील भल्यामोठ्या पाषाणशिळेमध्ये कोरलेले आहे. मंदिर बाहेरून ओबडधोबड आहे व त्यावर उंच कळस बसवलेला आहे. मंदिरास पोलादी दरवाजा आहे. आतून गोलाकार असलेल्या या गुहावजा मंदिरात मध्यभागी महादेवाची प्राचीन दगडी पिंडी आहे. पसरट आकाराची शाळुंका, मध्यभागी शिवलिंग, त्यावर फणा उभारलेली नागाची पितळी मूर्ती असे या पिंडीचे स्वरूप आहे. शाळुंकेवर आणखी दोन पितळी नागमूर्ती आहेत, तसेच मागच्या बाजूला दोन मोठे पितळी त्रिशूल आहेत. या गुहेच्या छतावर अगदी मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते. तीन स्तरांची ही रचना एखाद्या फुलाप्रमाणे दिसते. कालौघात त्याची बरीच झिज झालेली आहे. या गुहामंदिराच्या मागच्या बाजूस याच शिळेमध्ये कोरलेले पार्वतीचे मंदिर आहे. तेथील छोट्या दरवाजातून आत गेल्यानंतर उजवीकडे एक देवळी कोरलेली आहे. त्यात गणपतीची छोटी मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती संगमरवरी आहे व ती अलीकडच्या काळात स्थापन करण्यात आल्याचे दिसते. येथून पुढे काही अंतरावर आणखी एक प्रवेशद्वार आहे. आत पार्वतीची पाषाणमूर्ती आहे. या वस्त्रांकित मूर्तीचे केवळ मुखदर्शन होते. या मूर्तीच्या मागच्या बाजूच्या कातळ भिंतीवर पार्वतीची चतुर्भूज प्रतिमा कोरलेली आहे. याच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी ओट्याप्रमाणे रचना आहे. गुहेच्या या भागातील वातावरण सर्वांत थंड आढळते. बाहेर कितीही कडक ऊन असले तरी आतील गारवा कमी होत नाही.
या मंदिरात महाशिवरात्र, नवरात्र तसेच प्रत्येक सोमवारी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. हा महादेव आमशी या गावाचे ग्रामदैवत आहे. या मंदिराची सर्व व्यवस्था मुख्यतः आमशीचे ग्रामस्थच पाहतात. दर वर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. त्यानिमित्त आमशी गावातून पालखी सोहळा तसेच अश्व रिंगण सोहळा आयोजिला जातो. महसुलीदृष्ट्या सातेरी–महादेव टेकडी धोंडेवाडी विभागात येत असली तरी ती मुख्यतः आमशीचाच भाग मानली जाते.
या टेकडीवरून जोतिबा डोंगर, पन्हाळा, पावनगड, मसाई पठार, तुमजाई पठार आदी अनेक ठिकाणे नजरेच्या टप्प्यात येतात. मंदिराच्या मागच्या बाजूने राधानगरीचा जंगल परिसर, डोंगर रांग, धामोडचा तुळशी जलाशय, केळोशी जलाशय आपण पाहू शकतो. पावसाळ्यात महादेव टेकडीवरून तुळशी नदी, भोगावती नदी, कुंभी नदी यांचे प्रवाह तसेच त्यांचे संगम देखील पहायला मिळतात. महादेव टेकडीच्या पश्चिम बाजूने खाली जाताना अनेक गुहा दिसतात. एकाच वेळी अनेक लोक त्यात बसू शकतील, अशा या गुहा आहेत.
या टेकडीच्या पायथ्यानजीक सातेरी देवीचे मंदिर आहे. या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की प्राचीन काळी कसबा बीड परिसरातील एका दाम्पत्यास सात मुली होत्या. या मुलींच्या आईचे अचानक निधन झाले. त्या नंतर मुलींचा सांभाळ करणे कठीण झाल्याने त्यांच्या पित्याने त्यांना फसवून या टेकडीनजीक जंगलात आणून सोडून दिले. त्यानंतर त्या मुली कधीच दिसल्या नाहीत. असे म्हणतात की आपल्या वडिलांची वाट पाहता पाहता त्या मुली निसर्गात विलीन झाल्या. निसर्गाने त्यांना आपल्यात सामावून घेतल्याची आठवण म्हणून मग काहींनी त्या जागी या सात जणींची पूजा करायला सुरुवात केली. त्या पुढे सातेरी म्हणजेच सात देवींच्या रूपात येथे पूजल्या जाऊ लागल्या. कालांतराने येथे त्यांचे मंदिर उभारण्यात आले.
हे मंदिर पूर्वी अगदीच छोटेखानी होते. मूळ मंदीराच्या समोर आता एक सभामंडप उभारण्यात आला आहे. या सभामंडपात मध्यभागी काही लहान पादुकांच्या जोड्या ठेवलेल्या आहेत. यातील मूळ सात जोड्यांची नित्यनियमाने पूजा केली जाते. या मंदिराचे गर्भगृह आकाराने छोटे व हेमाडपंती रचनेचे आहे. गाभाऱ्यात सात असमान पाषाण आहेत, त्यांना देवीच्या रूपात येथे पुजले जाते.
येथील मूळ मंदिर प्राचीन असल्याच्या अनेक खुणा या परिसरात दिसतात. मंदिराच्या बाहेर काही दगडी कोरीव अवशेष दिसतात. मंदिराच्या मागे दोन वीरगळ आहेत. एका वीरगळीचा फक्त युद्धप्रसंगाचा भाग उपलब्ध आहे. तर दुसरी वीरगळ खंडित असली तरी त्याचे सर्व भाग उपलब्ध आहेत. ही वीरगळ चार स्तरीय असून यावर गाई–गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराचे अंकन पहायला मिळते. या वीरगळचा सर्वात खालचा टप्पा हा गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराला दर्शवतो. दुसऱ्या टप्प्यावर युद्धप्रसंग कोरण्यात आला आहे. तिसरा टप्पा वीराला स्वर्गी नेणाऱ्या अप्सरांचा आहे. तर शेवटचा चौथा टप्पा हा कैलासातील शंकराच्या पूजेचा आहे. या प्रत्येक टप्प्याच्या दरम्यान आपल्याला सुरेख नक्षीकाम दिसते. ही वीरगळ शिलाहार पूर्वकालीन असावी असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत. धोंडेवाडी, केकतवाडी, आमशी, नरगेवाडी, वाघोबावाडी ही गावे मिळून येथे दरवर्षी देवीची जत्रा साजरी करतात.