महाराष्ट्रात वारूळ रूपात पुजली जाणारी रेणुका देवी ही ‘भूमी’ म्हणजेच पृथ्वीतत्त्व आहे. तिला कुमारी भूमी म्हणजेच ‘कोरी भूमिका’ असे म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोकण व गोव्यात वारूळ रूपात पुजली जाणारी सांतेरी/सातेरी ही देवी ‘भूमका’ किंवा ‘भूमिका’ आहे. सातेरी ही सिंधुदुर्गची ग्रामदेवता मानली जाते. या जिल्ह्यात या देवीची सुमारे ८० मंदिरे असल्याचे सांगण्यात येते. त्यातीलच एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे मंदिर म्हणजे बिळवस या गावातील सातेरी देवीचे जलमंदिर होय.
बिळवस ही मालवणमधील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक अशा मसुरे गावच्या १२ वाड्यांपैकी एक वाडी आहे. या भागाचा इतिहास असा की पूर्वी मसुरे हे एक मोठे बाजारपेठेचे गाव होते. इ.स. १६६४ मध्ये कुडाळ प्रांतातील शिवाजी महाराजांची ठाणी जिंकून विजापूरकरांना दिल्याबद्दल सावंतवाडीच्या लखम सावंतांना बादशाहाने कुडाळ परगण्याची नाडगौडकी आणि पेंडूर, घावनळे, मळगाव, मठ, होडावडे, आरवली, रेडी, आरंवदे आणि मसुरे ही गावे इनाम दिली होती. या नंतर फोंड सावंत यांनी मसुरे येथे भरतगड या किल्ल्याची बांधणी केली होती.
मसुरेमध्ये भरतेश्वराचे मंदिर आहे. पुढे इ. स. १७६५ मध्ये झालेल्या तहाने हे गाव व किल्ला इंग्रजांच्या अमलाखाली गेला. अनेक ऐतिहासिक घटना–घडामोडींचा साक्षीदार असलेले मसुरे हे धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. येथील मसुरेच्या आंगणेवाडीतील भराडी देवीचे, तर बिळवसमधील सातेरी देवीचे स्थान सुप्रसिद्ध आहे.
सातेरी देवीच्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पाण्यात बांधलेले आहे. त्याच्या तीन बाजूंनी पाणी आहे. या मंदिराचा नेमका इतिहास अद्याप अज्ञात आहे. स्थानिकांकडून सांगण्यात येणाऱ्या क्षेत्रमाहात्म्यानुसार सातेरीचे येथील स्थान ७०० वर्षांपासूनचे आहे. एका जैन देवीभक्ताने हे मंदिर बांधले. या देवीची आख्यायिका अशी की सध्या ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी पूर्वी एक तलाव होता. तेथे गावातील गाई–गुरांना पाणी पाजण्यासाठी नेले जात असे. विशेष म्हणजे या तलावामध्ये एक वारूळ होते. एके दिवशी अचानक या वारूळातून रक्त येऊ लागले. ते पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. एका ग्रामस्थास स्वप्नदृष्टान्त झाला आणि त्यात देवीने सांगितले की या वारुळामध्ये माझे वास्तव्य आहे; परंतु येथे पाणी पिण्यास येणाऱ्या जनावरांचा मला त्रास होतो.
तेव्हा येथे माझे मंदिर बांध. देवीच्या या आदेशानंतर ग्रामस्थांनी येथे त्या वारुळावरच मंदिर बांधले. तेच हे सातेरी देवीचे जलमंदिर.
निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराच्या डावीकडे काही अंतरावरून ओढा वाहतो. देवीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ते जमिनीपासून काही फूट खालच्या बाजूस आहे. सात पायऱ्या उतरून मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. सभामंडप, त्यापुढे मंदिराकडे जाण्याची पॅसेजसारखी अरुंद मार्गिका, उपसभामंडप, अंतराळ आणि अंतराळात गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अलीकडेच या मंदिराचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले आहे. सभामंडपाच्या डाव्या बाजूस दोन दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे. सभामंडप कोकणी बांधकामशैलीतील, उतरत्या छपराचा, कौलारू आहे. भाविकांना बसण्यासाठी येथे कक्षासने आहेत. येथून पुढे ग्रॅनाईटमध्ये बांधलेली, वर कौलारू छत असलेली अरुंद खुली मार्गिका आहे. या मार्गिकेतून मोठे रुंदसर अष्टकोनी स्तंभ असलेल्या उपसभामंडपात प्रवेश होतो. तेथे देवीची पालखी, स्थानिक देवतांच्या तरंगकाठ्या ठेवलेल्या आहेत. अंतराळाची द्वारचौकट साधी, ग्रॅनाईटमध्ये बांधेलली आहे. आत मध्यभागी चार रुंद खांबांच्या मध्ये मंदिराचे खुल्या प्रकारचे गर्भगृह आहे.
या खांबांच्या मध्ये भूतलापासून किंचित खाली, फरशांनी बांधलेल्या वर्तुळाकारात देवीचे वारूळ आहे. सातेरी देवीच्या अन्य मंदिरांमध्ये असलेल्या वारुळांत आणि यात फरक आहे. येथील ग्रामस्थ असे सांगतात की पूर्वी हे वारूळ खूप उंच होते; परंतु २६ जुलै २००५ रोजी झालेल्या प्रलयंकारी पावसाचा त्यास तडाखा बसला व त्याची उंची कमी झाली. घट्ट मातीच्या वा खडकांच्या स्वरूपाचे हे वारूळ आहे. गर्भगृहाच्या दर्शनी स्तंभांना लावलेल्या आडव्या लोखंडी नळीला अनेक लहान मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. या देवीस नवस केले जातात व ते पूर्ण झाल्यावर येथे घंटा बांधल्या जातात. येथील मार्गिका, तसेच मंदिराची मुख्य वास्तू यांच्या भोवती पाणी आहे. एखाद्या मोठ्या खंदकाप्रमाणे ते भासते. त्यात एक चौकोनी कुंड आहे. त्याच्या तळाशी खोलवर महादेवाची पिंडी असल्याचे सांगण्यात येते. मंदिराचा उपसभामंडप आणि अंतराळ यांच्या समतल छतावर दोन शिखरे आहेत. अंतराळावरील शिखर उंच व अर्धोध्वर पद्धतीचे म्हणजे वरपर्यंत सरळ; परंतु शीर्षस्थानी आमलकाच्या खाली अचानक आतील बाजूस वळलेले आहे. शिखरावर मोठा आमलक आहे व त्यावर कळस आहे. उपसभामंडपावरील शिखर याच मुख्य शिखराची लहान प्रतिकृती आहे.
मंदिराच्या आवारात छान बगिचा तयार केलेला आहे. येथेच मंदिराच्या मागच्या बाजूला नऊ सतीशिळा मांडलेल्या आहेत. यातील बहुतेक सती गेलेल्या स्त्रियांच्या हातात शस्त्रे दाखवलेली आहेत. त्यावरून त्यांचा युद्धप्रसंगाशी संबंध असावा, असे दिसते. मसुरे गावाच्या परिसरात घडलेल्या इतिहासाच्या या सतीशिळा म्हणजे साक्षीदार आहेत. या शिळांच्या मागे थोड्या उंचावर पाच वृंदावने आहेत. त्या येथील वीरपुरुषांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या सभामंडपालगत दांडेश्वराचा मंडप आहे.
येथे आषाढ महिन्यात सातेरी देवीचा यात्रोत्सव साजरा केला जातो. गावातील प्रमुख मानकरी व ग्रामस्थ मिळून यात्रोत्सवाचा दिवस ठरवितात. ही देवी म्हणजे मसुरेच्या बारा वाड्यांची देवता असल्याने ही वार्षिक यात्रा मोठ्या स्वरूपात भरते. यात्रेच्या दिवशी देवीला नीळ घालण्याची परंपरा आहे. ही नीळ गवताची राख आणि तेल एकत्र करून तयार करण्यात येते. देवीचा पेटारा वाजत गाजत मंदिरात आणला जातो. देवीला मुखवटा घालण्यात येतो. साडी आणि अलंकाराने सजविलेल्या देवीसमोर एक मडके ठेवतात. त्यात भात व त्यावर खोबऱ्याच्या वाटीत तेल ओतून एक पेटता काकडा ठेवला जातो. गावातून प्रत्येक घरातून नैवेद्याचे ताट येते. देवीची ओटी भरतात. त्यानंतर गाऱ्हाणे घातले जाते. सकाळी देवाजवळ ठेवलेल्या मडक्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गांगो देवाजवळ देवीला पुन्हा वाडी करून गाऱ्हाणे घालतात. मडके पुन्हा मंदिराकडे आणले जाते. देवीसमोर ठेवलेल्या प्रसादाचे दोन भाग केले जातात. एक भाग कुळकरी मानकरी आणि दुसरा भाग भाविकांमध्ये वाटला जातो. प्रसाद वाटपानंतर देवीचे अलंकार आणि वस्त्रे उतरवून ठेवण्यात येतात. मानकऱ्यांकडे तो पेटारा पोहचवला जातो. यानंतर मंदिरात कोणीही थांबत नाही. हे या यात्रेचे विशेष आहे. येथील दुकानेही रात्रीस बंद होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा यात्रा भरते. इतर यात्रांमध्ये असे होत नाही, पण बिळवसची यात्रा त्यास अपवाद आहे.
या यात्रेव्यतिरिक्त येथे दसरा आणि रामनवमी हे सण साजरे केले जातात. गावातील धार्मिक विधी, पूजा–अर्चा, देवदिवाळीपासून सुरू होतात. गावपळण, देवीची पारध, होलिकोत्सव, दसरा, दहीकाला व गोंधळ असे कार्यक्रम होत असतात. दिवाळीनंतर अखंड सप्ताहाचा कार्यक्रम, दशावताराचा कार्यक्रम करण्यात येतो. देवदिवाळीनंतर सुमारे एक ते सव्वा महिने देवीचा गाभारा दर्शनासाठी बंद ठेवण्याची येथील प्रथा आहे.