वेंगुर्ला शहराचे ग्रामदैवत असलेल्या सातेरी देवीचे येथील मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ५० फूट रुंद व १५० फूट लांबीच्या या मंदिराचे संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडाचे आहे. येथील प्रत्येक भिंत ही चार फूट रुंदीची आहे. कोकणातील प्राचीन वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी येथे साजरा होणारा देवीचा उत्सव हा प्रसिद्ध आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यावेळी सातेरी देवीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी की वेंगुर्ल्यापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या अणसूर गावात सातेरी देवीचे मंदिर आहे. येथील परब कुळातील एक देवीभक्त रोज अणसूर येथे देवीच्या दर्शनासाठी पायी जात असे. वृद्धत्वामुळे त्याला रोज अणसूरला जाणे जमेनासे झाले. तरीही त्याने आपला दिनक्रम सोडला नाही. त्यावर देवीने त्याला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की तुला आता माझ्या दर्शनासाठी अणसूरला येण्याची गरज नाही. तुझ्या गावात तुझी गाय जेथे पान्हा सोडेल तेथे मी प्रकट होईन. त्याप्रमाणे शोध घेतला असता त्याची गाय एका ठिकाणी पान्हा सोडत असताना त्याला दिसली. त्याचवेळी एक वारुळ मोठे होताना त्याला दिसत होते. त्याने तत्काळ त्या वारुळाला मिठी मारली व सांगितले की आई, आता तू येथेच रहा. त्याक्षणी वारुळाचे वाढणे थांबले. त्यानंतर या ठिकाणी सातेरी देवीची स्थापना करण्यात आली.
वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती भागात सातेरी देवीचे मंदिर आहे. पूर्वाभिमुख मंदिराच्या समोरील बाजूस एका मोठ्या व रुंद दगडी चौथऱ्यावर सहास्तरीय दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी असून ठिकठिकाणी भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. दीपस्तंभाच्या चौथऱ्यापासून ते मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी मार्ग असून या मार्गावर दोन्ही बाजूने चार–चार दगडी खांब आहेत. या खांबांवर कोणत्याही प्रकारचे छत नाही. पुढील दोन खांबांवर मंदिराचा मुखमंडप आहे. त्यापुढे सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. मुखमंडपातून पुढे गेल्यावर एका कमानीसदृश्य प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो.
येथील सभामंडप हा अर्धखुल्या प्रकारातील असून दोन्ही बाजूला कक्षासने आहेत. या कक्षासनांवरील खांब कमानीसदृश्य कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. मुखमंडप व सभामंडपात संगमरवरी फरसबंदी आहे. येथील अंतराळ व गर्भगृह हे सभामंडपापासून उंचावर आहेत. सभामंडपातून पाच पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या कमानीदार प्रवेशद्वाराच्या द्वारपट्ट्यांभोवती सुंदर नक्षीकाम आहे. या भागात तरंगदेवता ठेवलेल्या आहेत. कोकणात प्रत्येक मंदिरात तरंगदेवता ठेवण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी तीन, पाच किंवा सात अशा तरंगदेवता असतात. या मंदिरात तीन तरंगदेवता आहेत. श्री रवळनाथ, श्री पावनाई आणि श्री भूतनाथ. येथेच देवीची सुबक नक्षीकाम असलेली चांदीची मोठी पालखी आहे. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या मध्यभागी सातेरी देवीचा काळाभोर मुखवटावजा तांदळा आहे. या मुखवट्यावर चांदीचे डोळे, चांदीचे रेखीव नाक, नाकात मोत्यांची नथ, डोक्यावर चांदीचे छत्र आणि मागच्या बाजूस सुंदर नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे. या देवीच्या डोक्यावर लहानसा चांदीचा मुकुट आहे. देवीची ही मूर्ती दर तीन ते चार वर्षांनी बदलण्यात येते व नव्याने प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. याला स्थानिक भाषेत ‘मळलेपन’ असे म्हणतात. या मूर्तीच्या मागे नवग्रहांची स्थापना केलेली आहे. प्रदक्षिणा मार्गावर काही शिळा आहेत, त्यांना परिवारदेवता असे म्हटले जाते.
या मंदिराच्या सभामंडपावर सहा शिखरे आहेत. याशिवाय गर्भगृहावर घुमटाकार मोठे शिखर असून त्याभोवती उपशिखरे आहेत. दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत मंदिराच्या प्रवेशद्वारावर नौबत झडते. हे वादक मुस्लिम असतात. शेकडो वर्षांपासून येथे ही परंपरा सुरू आहे.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी चांदीच्या पालखीतून देवीची मिरवणूक काढण्यात येते. मानाच्या देवाच्या तरंगकाठ्यांचे पूजन होते व त्या नाचविल्या जातात. सायंकाळी ७ ते ८ या वेळात मंदिर व परिसरात हजारो पणत्या लावल्या जातात. हे दृश्य पाहण्यासाठी वेंगुर्ले शहरातील हजारो भाविक व नागरिक येथे उपस्थित असतात. याशिवाय अश्विन शुद्ध प्रतिप्रदेला येथे घटस्थापना करण्यात येते. यावेळी नऊ दिवस दररोज पुष्पपूजा, सजावट करून देवीची वेगवेगळ्या नऊ रूपांत पूजा केली जाते. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर संस्थानातर्फे येथे भक्त निवास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
सातेरी देवीच्या या मंदिराशिवाय वेंगुर्ल्याची ख्याती पूर्वीपासून एक महत्त्वाचे बंदर म्हणून होती. ऐतिहासिक नोंदींनुसार, इ.स. १६३८ मध्ये फिंगेर्ला या नावाने डचांनी या बंदराची स्थापना केली होती. त्या काळात डचांची येथे मोठी वसाहत होती. बंगाल, सुरत, जपान, इराक, इराण या व इतर अनेक देशांशी या बंदरामार्फत व्यापार होत होता. इ. स. १६७५ मध्ये हे बंदर व हा संपूर्ण परिसर ताब्यात घेण्यासाठी मोगलांनी येथे जाळपोळ केली होती; परंतु त्यांना या परिसरावर ताबा मिळविता आला नाही. त्यानंतर इ.स. १६९६ मध्ये सावंतवाडी येथील सावंत घराण्याच्या ताब्यात हा परिसर गेला. इ.स. १८१२ मध्ये सावंत घराण्याकडून हे बंदर व येथील परिसर इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांच्या काळात हे बंदर भरभराटीस आले होते. आंबा, फणस, काजू, नारळ यांचे या भागात चांगले उत्पादन होत असल्याने या वस्तूंची ही मोठी बाजारपेठ होती.