सातेरी देवी ही सिंधुदुर्गची ग्रामदेवता मानली जाते. सातेरी किंवा सांतेरी ही सप्तमातृकांपैकी एक असल्याची मान्यता आहे. भूमका, भूमिका व पूर्वी या नावांनीही ही देवी ओळखली जाते. पौराणिक आख्यायिकांनुसार, देवाने पहिली भूमिका प्रकृती किंवा माया ही घेतली होती. त्यामुळे तिला ‘भूमका’ असे म्हटले जाते, तर तिचे प्राचीनत्व ‘पूर्वी’ या शब्दातून प्रकट होते. कोकणातील बारा–पाचाच्या संप्रदायात तिला ‘पूर्वसत्ता स्थळ’ असे म्हटलेले आहे. वारूळ हे या देवीचे प्रतीक आहे. कुडाळ तालुक्यातील पावशी येथील मंदिरात सातेरी देवीची भव्य वारूळाच्या रूपात पूजा केली जाते.
वारुळाच्या पूजेस देवी संप्रदायामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भगवान परशुरामाची माता रेणुका हिच्याबद्दल अशी आख्यायिका आहे की रेणुकेचा जन्म वारुळातून झाला होता व ती वारुळामध्येच अदृश्य झाली होती. रेणुका हा शब्दही रेणू म्हणजे सूक्ष्म कण यातून आला आहे. वारुळाची निर्मितीही मातीच्या सूक्ष्म कणांनी झालेली असते. ख्यातनाम विद्वान अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्यानुसार, वारूळ हे योनिप्रतीक मानले गेले आहे. या स्वरूपात देवीच्या पूजेची परंपरा प्राचीन आहे. मालवण तालुक्यातील देवली, पेंडूर इत्यादी गावीही वारुळाच्या रूपातील सातेरी देवीची मंदिरे प्रसिद्ध आहेत. मात्र पावशी येथेच सातेरी देवीच्या भव्य वारूळ मूर्तीचे दर्शन होते. या मंदिरामध्ये एखाद्या विशाल वटवृक्षासारखे दिसणारे भव्य वारूळ आहे. या वारुळाची उंची सुमारे १५ फूट व रुंदी २० फूट आहे.
मुंबई–गोवा महामार्गावरील पावशी या निसर्गरम्य गावात सातेरी देवीचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. देवीबाबत ऐतिहासिक कथा अशी की मध्य प्रदेशातील धार या संस्थानात पवार घराण्याचे सदस्य राहात असत. त्यांनी सुमारे ५०० वर्षांपूर्वी सातेरीला येथे आणून तिची प्रतिष्ठापना केली. या मंदिराच्या निर्मितीविषयी एक आख्यायिका अशीही आहे की सध्या देवीचे मंदिर जेथे आहे, तेथे सुमारे ५०० वर्षांपूर्वी एक घर होते. या घरामध्ये महाडेश्वर नावाचे कुटुंब राहात होते. त्या घरात त्यांची चूल जेथे होती, तेथे नेहमी एक वारूळ तयार होत असे. महाडेश्वर कुटुंब ते वारंवार नष्ट करीत असत. पण एकदा असे झाले की हे वारूळ तयार होणे सुरू झाले आणि त्याची उंची वाढतच गेली. त्याच रात्री महाडेश्वर कुटुंबातील एका सदस्यास सातेरी देवीने दृष्टांत दिला. मी तुमच्या घरात आले आहे, असे देवीने सांगितले. तेव्हापासून त्या वारुळाची पूजा सुरू करण्यात आली. त्या वारुळाची उंची वाढणे मात्र थांबले नाही. ते घराच्या छतास टेकले. अखेर महाडेश्वर कुटुंबाने त्या वारुळास पांढरे कापड गुंडाळले व देवीस प्रार्थना केली की आता हे वारूळ वाढू देऊ नको. त्यानंतर त्या वारुळाची वाढ थांबली. हे वारूळ आजही मंदिराच्या छतास टेकलेले दिसते. येथील भाविक असे सांगतात की वारुळाची वाढ थांबलेली असली, तरी त्याचा आकार मात्र बदलत असतो.
त्या जुन्या घराच्या ठिकाणीच आता सातेरी देवीचे भव्य मंदिर बांधलेले आहे. कोकणी स्थापत्यशैलीमध्ये बांधलेले हे मंदिर दुमजली आहे. सभामंडप अर्धखुल्या पद्धतीचा असून त्यात गोल दगडी स्तंभ आहेत. सभामंडपावरील छत उतरते व कौलारू आहे, तर गर्भृहावर पिरॅमिडच्या आकाराचे कौलारू शिखर आहे. त्यावर कळस आहे. सभामंडपाच्या आतील बाजूस बाह्यभिंतींपासून काही अंतर सोडून रुंद पाषाणस्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरच्या भागात कमलशीर्ष म्हणजे उलट्या कमळाप्रमाणे कोरलेल्या पाकळ्या दिसतात. या स्तंभांवरील तरंगहस्तांवर कोरीव काम केलेले आहे. (तरंगहस्त म्हणजे उभे खांब छताला ज्या ठिकाणी जुळतात तिथे गणितातल्या अधिकच्या खुणेप्रमाणे केलेली रचना.) सभामंडपात एका बाजूस विविध देवतांच्या तरंगकाठ्याही मांडलेल्या आहेत.
मंदिराच्या गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर डाव्या बाजूस गणेशाची, तर उजव्या बाजूस सरस्वतीची मोठी प्रतिमा चितारलेली आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार दंडगोलाकृती असून त्यावर फुलांची नक्षी चित्रित केलेली आहे. गर्भगृहात प्रवेश करताच समोर भव्य असे वारूळ दिसते. वारुळाभोवती संगमरवरी ओटा बांधलेला आहे. वारुळाच्या समोर सातेरी मातेची नाकात नथ व मस्तकी मुकुट अशा स्वरूपातील पाषाणात कोरलेली उभी मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात या ओट्याच्या मागच्या बाजूला गणेशाची, तसेच ‘पूर्वजांचे वंस’ म्हणून विविध देवतांच्या मूर्ती आहेत. येथे छोटी छोटी वारुळेही आहेत. येथील मोठ्या वारुळामध्ये सातेरी देवी सर्परूपात वास्तव्य करून असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
पावशी येथील या मंदिरात नवरात्रोत्सव, दीपावली आदी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती निरनिराळ्या रूपांत सजवली जाते. येथे हरिनाम सप्ताहही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र या मंदिराचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील नीळकार्य उत्सव होय. हा उत्सव दरवर्षी वैशाख महिन्यातील पहिल्या सोमवारी अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी येथे २० ते २५ किलो तांदळाची पेज बनवली जाते. हे तांदूळ देवस्थानाच्या जमिनीतच पिकविलेले असावेत, असा नियम आहे. या पेजेमध्ये नंतर नीळ मिसळली जाते. या नीळमिश्रित पेजेने सातेरी देवीचे वारूळ रंगविले जाते व त्यानंतर पारंपरिक वाद्यांचा कल्लोळ केला जातो. या विधीनिमित्ताने जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर व गोवा येथून मोठ्या प्रमाणावर भक्त पावशीस येतात. ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तिला तांदळाचा कौल लावला जातो. तिला साकडे घालताना ‘माते माजे आवशी’ म्हणून हुंकार दिला जातो. भाविक तिला आवशीच्या म्हणजेच माऊलीच्या रूपात पाहतात.