साटम महाराज मंदिर

दाणोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

कोकणातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीच्या घाटातून गोव्याकडे जाताना सावंतवाडीनजीक दाणोली हे गाव आहे. श्रीसमर्थ साटम महाराज यांचे वास्तव्यस्थान असलेले दाणोली हे आज एक पुण्यक्षेत्र गणले जाते. या गावात साटम महाराजांचे समाधी मंदिर आहे. या समाधी मंदिराच्या परिसरात साटम महाराजांच्या जीवनातील महत्त्वाची स्थळे व वास्तू आहेत. वाचासिद्धी प्राप्त झालेल्या या महान अवलिया सिद्धपुरुषाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून असंख्य भाविक-भक्त येथे येत असतात. त्यांच्या चमत्कारांची प्रचिती आजही येत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

साटम महाराज यांचे पूर्ण नाव शंकर नारायण साटम असे आहे. ते मूळचे मालवण तालुक्यातील कोईळ या गावचे. त्याच गावात त्यांचा जन्म झाला. मात्र त्यांची नेमकी जन्मतारीख अज्ञात आहे. ते महान सिद्ध पुरुष म्हणून सावंतवाडी संस्थानात परिचित होते. असे सांगितले जाते की त्यांच्या सिद्धीची प्रचिती अनेकांना येत असे. इ.स. १९२४ पूर्वी दोन-तीन पिढ्या सावंतवाडीतील राजघराण्यातील पुरुषांना राज्याधिकार मिळाले नव्हते. मात्र साटम महाराजांच्या कृपेमुळे सावंतवाडीचे राजे श्रीमंत बापूसाहेब खेमसावंत यांना राज्याधिकार मिळाले. त्यामुळे ते साटम महाराजांचे निस्सीम भक्त बनले. २८ मार्च १९३७ रोजी साटम महाराजांचे निर्वाण झाले. त्यानंतर श्रीमंत बापूसाहेब महाराजांनीच दाणोली येथे साटम महाराजांचे समाधी मंदिर उभारले.

साटम महाराजांचे पूर्वजीवन हे अत्यंत अतर्क्य अशा घटनांनी भरलेले होते. ते लहान असतानाच त्यांच्या माता-पित्याला पोटासाठी मुंबईला जावे लागले. मुंबईतील कामाठीपुरा येथील बकाल वस्तीत त्यांना राहावे लागले. तेथेच साटम महाराजांचे लहानपण व्यतीत झाले. मोठे झाल्यानंतर त्यांनी छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या. काही काळ त्यांनी चक्क दारूच्या गुत्त्यावर काम केले होते, पण कामाठीपुऱ्यात लागलेल्या कुसंगतीमुळे व स्वच्छंदी वृत्तीमुळे त्या टिकल्या नाहीत. इ.स. १८९७-९८ मध्ये मुंबईत आलेली प्लेगची साथ अद्याप निवळली नव्हती. या प्लेगने १९०९ साली ५१९७ जणांचा बळी घेतल्याची ‘कौन्सुल डेनिसन रिपोर्ट’मधील नोंद आहे. याच प्लेगने साटम महाराजांच्या भाऊ आणि भावजयीचा बळी घेतला. त्यानंतर त्यांचे आई-वडीलही परलोकवासी झाले. या आघाताने ते उदासीन झाले. त्यानंतर त्यांची पत्नीही गृहत्याग करून गेली. महाराजांच्या मनावर या सर्व गोष्टींचा मोठा परिणाम झाला. हे प्रारब्धभोग कशामुळे, असा प्रश्न त्यांना पडला. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी विमनस्कावस्थेत ते फिरत असतानाच एका सिद्धपुरुषाशी त्यांची भेट घडली. त्यांचे नाव बाबा अब्दुल रहमान असे होते.

बाबा अब्दुल रहमान यांचे पूर्वज मूळचे बगदादचे होते. त्यांचे वडील हजरत शमसुद्दिन कादिर हे बगदादवरून मद्रासला (आताचे चेन्नई) येथे आले होते. तेथे बाबांनी कुराणची तालीम घेतली व ते हाफिस झाले. नंतर ते मुंबईत पायधुनी येथील आताच्या बापू खोटे रस्त्यावरील जांबली मोहल्ल्यातील मशिदीत येऊन राहू लागले. त्यांनी हज यात्राही केली होती. एकदा त्यांची आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची भेट झाली. असे सांगितले जाते की त्यावेळी स्वामी समर्थांनी त्यांना ‘श्री दत्तस्वरूपाय नमः’ हा मंत्र दिला व आपले कार्य पुढे चालवण्याचा आदेश दिला. यानंतर बाबांनी समाज व धार्मिक कार्य सुरू केले. एकदा साटम महाराज हे चर्चगेटजवळील पारशी विहिरीजवळ चिंताग्रस्त अवस्थेत बसले असता बाबा रहमान यांनी त्यांना पाहिले. त्या भेटीत बाबा रहमान यांनी त्यांना उपदेश केला. तेव्हापासून साटम महाराज नेहमी डोंगरी येथे जाऊ लागले. डोंगरीतील पोलिस ठाण्याच्या बाजूस पूर्वी एक टेकडी होती. तेथे बाबा रहमान बसत असत.

काही दिवसांतच साटम महाराज बाबा रहमान यांचे लाडके शिष्य बनले. त्यांना बाबांकडून दीक्षा लाभली. नंतर त्यांनी तपश्चर्येस सुरुवात केली, तसेच देशभरात तीर्थभ्रमण केले. या भ्रमंतीतच ते आंबोलीच्या जंगलात आले. तेथे तपस्या केल्यानंतर ते १९१० च्या सुमारास सावंतवाडीत आले. प्रारंभी लोक त्यांना वेडा समजत. भिक्षाही देत नसत. या वेळी दोन ख्रिस्ती भिकारी त्यांना आपल्या भिक्षेतील काही भाग देत असत. १९१४ ते १९१६ च्या सुमारास महाराज दाणोलीस आले. हळूहळू त्यांच्या आध्यात्मिक शक्तीची प्रचिती लोकांस येऊ लागली. लवकरच महान सिद्धपुरुष म्हणून त्यांची ख्याती झाली. अनेक लोक त्यांचे भक्त बनले. त्यात सावंतवाडीचे श्रीमंत बापूसाहेब महाराज, तसेच ‘नोगी’ व ‘माकडछाप’ दंतमंजनचे निर्माते गणेश वडेर अशा सारख्यांचाही समावेश होता. असे सांगितले जाते की महात्मा गांधी एकदा आंबोली येथे आले असता त्यांची व साटम महाराजांची भेट झाली होती. महात्मा गांधी यांनी साटम महाराज यांना जेव्हा पाहिले तेव्हा ते म्हणाले की सावंतवाडीत दोनच महाराज आहेत. एक बापूसाहेब व दुसरे तुम्ही. त्यावेळी साटम महाराजांनी केवळ स्मितहास्य केले.

असे सांगितले जाते की महाराज बालउन्मन व पिशाच अवस्थेत नेहमी असत. त्यांच्याविषयी अशा आख्यायिका आहेत की ते कधी उंच दिसत, तर कधी ठेंगू. कधी वजनाने जड होत, तर कधी हलके. कधी ते भजन म्हणत, तर कधी कव्वालीही. तसेच त्यांना दाणोलीत बसून विश्वातील सर्व घडामोडी समजत असत. दाणोलीतील सखाराम अनंत केसरकर ऊर्फ बाबा मेस्त्री यांच्या घरी महाराजांचे वास्तव्य होते. तेथेच २८ मार्च १९३७ रोजी साटम महाराजांनी देह ठेवला.

दाणोलीतील एका रस्त्यालगत प्रशस्त आवारात साटम महाराजांचे समाधी मंदिर आहे. आवारास तीन छोटी शिखरे असलेली उंच प्रवेशकमान आहे. आत एका मोठ्या पत्र्याच्या मंडपाखाली, कोकणी स्थापत्यशैलीतील छतरचना असलेले समाधी मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर तुळशी वृंदावन, तसेच होमकुंड आहे. दोन्ही बाजूंना पाच पाच खांब आणि त्यात अर्धकमानी अशा प्रकारचा अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. त्यात कक्षासने आहेत. अंतराळात उजव्या बाजूस, गाभाऱ्याच्या दर्शनीभिंतीलगतच्या उंच ओट्यावर गजाननाची मूर्ती आहे. साटम महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग, तसेच व्यक्तींच्या तसबीरी येथे लावलेल्या आहेत. एका बाजूला ग्रंथविक्रीचे टेबल आहे. गाभाऱ्यात उंच वज्रपीठावर साटम महाराजांची मूर्ती आहे. महाराजांच्या पुण्यतिथीला २८ मार्च १९८५ रोजी विधीपूर्वक त्यांची कांस्यमूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती. वज्रपीठास खेटून त्यांची त्या काळी घेतलेली तसबीरही ठेवण्यात आली आहे.

येथून जवळच महाराजांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या नूतनीकरण झालेल्या आधुनिक पद्धतीच्या वास्तूत भिंतीवर महाराजांच्या विविध प्रतिमा लावलेल्या आहेत. साटम महाराज विश्रांती घेत असत त्या पलंगाचेही येथे जतन करण्यात आलेले आहे. त्याच्या मागील बाजूस त्रिमुखी दत्ताची भव्य चित्रप्रतिमा, बाजूलाच महाराजांची मुखमूर्ती तसेच साईबाबांचीही छोटी मूर्ती आहे. याच खोलीमध्ये महाराजांचे गुरू बाबा अब्दुल रहमान यांचीही प्रतिमा आहे. या निवासस्थानात त्यांना अखेरचे महास्नान घालण्यात आले ती जागा, त्यांच्या वापरातील चिपळ्या, गुडगुडी, पादुका, वस्त्रेही जपून ठेवलेली आहेत. या निवासस्थानामागे एका गवती झोपडीत साटम महाराज नेहमी ध्यानधारणा करण्यासाठी बसत असत. घनदाट झाडी व बाजूला नागझरीच्या खळाळत्या पाण्याचा आवाज असे ते ठिकाण होते. आज त्या ठिकाणी एक साधीशी मंडपवजा इमारत उभी आहे. त्या ठिकाणी, तसेच नागझरीवर ते जेथे रोज स्नानास जात त्या नागझरी तीर्थाचे जल प्राशन करण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने जातात. महाराजांच्या समाधी मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि भक्तांच्या अलोट गर्दीत २८ मार्चला पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो.

उपयुक्त माहिती

  • सावंतवाडी येथून १४ किमी, तर आंबोली येथून १७ किमी अंतरावर
  • सावंडवाडी तसेच आंबोली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home