सप्तकोटेश्वर मंदिर
नार्वे, ता. डिचोली, जि. उत्तर गोवा
नार्वे येथील सप्तकोटेश्वर (सप्तकोटीश्वर) मंदिर हे गोव्यातील सर्वांत जुन्या आणि महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. आज गोव्याच्या राजदैवताचा मान असलेले सप्तकोटेश्वर हे कदंब राजघराण्याचे कुलदैवत होते. कदंबांप्रमाणेच विजयनगर साम्राज्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाशीही सप्तकोटेश्वराचे नाते आहे. येथील सप्तकोटेश्वराचे देवालय हे छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धारित करून बांधलेले एकमेव मंदिर आहे. गोवा सरकारने काही वर्षांपूर्वी या मंदिराचे जतन-संवर्धन केले. असंख्य भाविकांप्रमाणेच अनेक इतिहासप्रेमीही या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.
सप्तकोटेश्वराची पौराणिक आख्यायिका अशी की समुद्र आणि पंचगंगा नदीच्या संगमावर सप्तऋषींनी सात कोटी वर्षे भगवान शंकराची उपासना केली. त्यांच्या तपामुळे प्रसन्न झालेले भगवान शंकर ऋषींसमोर प्रकट झाले. तुम्हांस हवा तो वर मागा, असे ते म्हणाले. त्यावर ऋषींनी महादेवास अशी विनंती केली की आम्ही जेथे तपश्चर्या केली, त्या ठिकाणी आपण सात कोटी वर्षे निवास करावा. शंकराने ती प्रार्थना मान्य केली. त्यामुळे येथील महादेवास ‘सप्तकोटीश्वर’ असे नाव पडले. तर सात ऋषींचा नाथ म्हणून त्यास सप्तनाथ असेही म्हटले जाऊ लागले. आणखी एका आख्यायिकेनुसार, जरासंधाच्या आक्रमणामुळे भगवान श्रीकृष्णास मथुरेहून स्थलांतर करावे लागले. त्यावेळी कृष्णाने या स्थानी सप्तकोटेश्वराची पूजा केली व नंतर द्वारका येथे आपले राज्य स्थापन केले.
गोवा गॅझेटियरनुसार, सप्तकोटेश्वर ही देवता महाराष्ट्रातील जेजुरीच्या खंडोबाचे एक रुप आहे. गोव्यामध्ये रवळनाथाच्या स्वरूपातील मार्तंड-भैरव ही देवता प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. गोव्यातील अनेक देवालयांतील परिवार देवतांमध्ये रवळनाथाचा समावेश असल्याचे दिसते. शिवचित्त कदंबाच्या काळापासून (इ.स. ११५५) कदंबांनी याच रवळनाथास सप्तकोटेश्वराच्या स्वरुपात अंगिकार केला असणे शक्य असल्याचे गॅझेटियरमध्ये नोंदविलेले आहे.
‘कल्चरल अँड रिलिजियस ट्रॅडिशन्स इन टेम्पल्स ऑफ गोवा’ (२००४) या गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात कमला माणकेकर यांनी असे म्हटले आहे की गोव्यात खंडोबा हा मार्तंड भैरव वा सौम्य भैरव म्हणून लिंग रुपात पूजला जातो. त्याची मूर्ती घडवतात तेव्हा ती चतुर्भज असते.तिच्या हातात डमरू, त्रिशुल, खड्ग आणि पात्र असते. सप्तकोटेश्वर हे या खंडोबाचे रूप आहे. गोव्यातील ख्यातनाम इतिहासकार पी. पी. शिरोडकर यांनीही ही संकल्पना मांडली आहे.
येथील सप्तकोटेश्वराचे मूळ स्थान गोव्यातील दिवाड बेटावरील नार्वे हे होते. तिसवाडीच्या उत्तरेस मांडवी नदीत हे छोटे बेट आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात या बेटाचा उल्लेख दीपवती असा करण्यात आला आहे. इ.स. १००० ते १२३७ या कालखंडात गोव्यामध्ये कदंब राजघराण्याची सत्ता होती. या राजघराण्याची सप्तकोटेश्वरावर मोठी श्रद्धा होती. कदंबकुळाचे ते कुलदैवत होते. कदंब राजा शिवचित्त पेर्मांडीदेव व त्याची पट्टराणी कमलादेवी हे सप्तकोटेश्वराचे भक्त होते.
कर्नाटकातील इ.स.११७४च्या डेगांवे शिलालेखात कमलादेवीने सप्तकोटीश्वराच्या पायाशी पवित्र जल अर्पण करून ब्राह्मणांना अग्रहार दिला, असा उल्लेख आहे. पेर्मांडीचा पुतण्या जयकेशी तिसरा हा ११८७मध्ये राज्यारुढ झाला. त्याच्या सुवर्णनाण्यांवर ‘सप्तकोटीश्वरलब्धवरप्रसाद’ म्हणजे ‘सप्तकोटीश्वराचा प्रसाद प्राप्त झालेला’ असे बिरुद कोरलेले होते. इसवी सनाचे बारावे शतक ते तेराव्या शतकाचा उत्तरार्ध या काळातील कदंब राजवंशाचे अन्य काही शिलालेख, ताम्रपट आणि नाणी यांवर सप्तकोटेश्वराचे उल्लेख आढळतात. या राजवंशातील कोणत्या राजाने नार्वे-दिवाडीत सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधले याची माहिती अनुपलब्ध आहे. मात्र डेगांवेतील शिलालेखावरून हे मंदिर इ.स. ११७४मध्ये अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढे दिल्लीच्या मुहंमद तुघलकाविरोधात दक्षिण भारतातील अमिरांनी बंड केले आणि त्यातून इ.स. १३४७मध्ये जफर खान याच्या नेतृत्त्वाखालील मुस्लिमांची सत्ता उदयास आली. जफर खान याचे मूळ नाव हसन गंगू असे होते. तो एका ब्राह्मणाचा सेवक होता. त्या ब्राह्मणाने हसन गंगू हा पुढे मोठा होईल, असे भाकीत वर्तवले होते, अशी आख्यायिका सांगण्यात येते.
या ब्राह्मणाप्रती कृतज्ञता म्हणून हसन गंगू याने बहमनी असे नाव धारण केले. या बहमनी सत्तेने पुढच्या दहा वर्षांत, इ.स. १३५८ पर्यंत उत्तरेस मांडू ते दक्षिणेस रायचूर आणि पूर्वेस भोनगिर ते पश्चिमेस दाभोळ आणि गोव्यापर्यंतचा मुलुख काबीज केला. बहमनींच्या या टोळधाडीत दिवाडी बेटावरील सप्तकोटेश्वराच्या मंदिरास मोठी हानी पोहचली.कोकणाख्यान या ग्रंथात असे म्हटले आहे की म्लेंच्छांकडून सप्तकोटेश्वराची विटंबना होईल या भयाने लोकांनी मंदिरातील शिवलिंग एका भातखेचरात नेऊन गाडून ठेवले होते.
इ.स. १३७८ मध्ये सुलतान मुजाहिद याच्या मृत्यूमुळे बहामनी दरबारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा फायदा घेऊन विजयनगरचा सम्राट हरिहर द्वितीय याच्या आदेशानुसार वीर वसंत माधव उर्फ मल्लप्पा ओडियार याने गोवा काबीज केला. विजयनगर सम्राटाने २९ ऑगस्ट १३८० रोजी वीर वसंत माधव (माधव मंत्री) याची कोकण राज्याचा महाप्रधान म्हणून नियुक्ती केली. गोवापूर ही या राज्याची राजधानी होती. १३९० पर्यंत त्याने येथे राज्य केले. ‘गोवापुराधीश’ माधव मंत्री हा शूर सेनापती होता, पण त्याचबरोबर तो मुत्सद्दी राज्यकर्ताही होता. त्याने ‘तुरुश्कांचा संहार करून येथे सप्तनाथाबरोबरच अन्य मंदिरे पुन्हा बांधली’, अशी नोंद आहे.
सप्तनाथ म्हणजेच सप्तकोटेश्वर. १३८० ते १३९० या काळात हे मंदिर येथे उभारण्यात आले. इटालियन प्रवासी ग्वालियानो डे मेडिसी याच्या प्रवासवर्णनानुसार, काळ्या पाषाणात बांधलेले हे मंदिर अतिशय सुरेख होते. त्यावर सुंदर नक्षीकाम आणि शिल्पकाम केलेले होते. यानंतर सुमारे शतकभर येथील सप्तकोटेश्वराचे मंदिर सुरक्षित उभे होते. आदिलशाहीच्या काळातही येथील पूजाअर्चा सुरू होती. मात्र १५१० मध्ये पोर्तुगीज फिरंग्यांचा गोव्यात प्रवेश झाला आणि काळ बदलला. २५ नोव्हेंबर १५१० रोजी पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्यावर हल्ला चढवला आणि तीन दिवसांत गोवा बेट ताब्यात घेतले. पोर्तुगीजांचा हिंदुस्थानातील तत्कालिन व्हिसेरेई ऑफाँस द अल्बुकर्क याने त्यानंतर द्वाही फिरवून हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य दिले. परंतु काही दिवसांतच त्याने सप्तकोटेश्वराचे मंदिर पाडले. १५६७मध्ये त्याच जागेवर चर्च बांधण्यात आले. असे सांगण्यात येते की त्यावेळी सप्तकोटेश्वराच्या शिवलिंगाची विटंबना करण्यात आली होती.
हे मंदिर मांडवी नदीतील एका बेटावर वसले होते. नदीच्या पलीकडच्या भागात तेव्हा आदिलशाही राजवट होती. तेथील आदिलशाहीतील सरदार नारायणराव सूर्यराव देसाई यांना मंदिराच्या विटंबनेची बातमी समजल्यानंतर एके रात्री त्यांनी आपले काही लढाऊ लोक त्या बेटावर धाडले. त्या लोकांनी तेथील शिवलिंग गुपचूप उचलून आणले. हिंदळे या गावातील घनदाट जंगलात खोल दरीमध्ये एका मोठ्या खडकात गाभारा कोरून, त्यात या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. या गावास नवे नार्वे असे म्हणण्यात येऊ लागले.
कोकणातील कुडाळचा लखम सावंत, तसेच केशव नाईक, केशव प्रभू हे देसाई गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयास राहून स्वराज्यास उपद्रव करीत असत. त्यांना शासन करण्यासाठी, तसेच गोव्यात धार्मिक अत्याचार करणाऱ्या पोर्तुगीजांनाही जरब बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६७च्या नोव्हेंबरमध्ये पोर्तुगीजांच्या बार्देश आणि साष्ट प्रांतावर हल्ला चढवला. १०, ११ आणि १२ नोव्हेंबर असे तीन दिवस महाराजांच्या फौजेने बार्देश प्रांत घुसळून काढला आणि
सुमारे १३०० कैद्यांसह व १५० लक्ष होन एवढी संपत्ती संपादन करून महाराज डिचोली (भतग्राम) येथे आले. येथे काही दिवस महाराजांचा मुक्काम होता. या दरम्यान महाराज नार्वे या गावी गेले. येथे त्यांनी सप्तकोटेश्वराचे दर्शन घेतले व कदंबांच्या या कुलदैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा केली. ‘पोर्तुगीज-मराठा संबंध’ या स. शं. देसाई यांच्या पुस्तकात या घटनेबाबतची अशी आख्यायिका नमूद आहे की ‘सप्तकोटीश्वराने रात्री त्यांच्या (महाराजांच्या) स्वप्नात येऊन आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा दृष्टांत दिला.’
‘शककर्ते शिवराय – खंड दोन’मध्ये विजयराव देशमुख यांनी असे म्हटले आहे की ‘या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची आंतरिक प्रेरणा त्यांना झाली. लगेच त्यांनी देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. सप्तकोटेश्वराच्या महाद्वारावर यावेळी कोरलेला शिलालेख अजूनही कायम आहे. तो असा – श्रीसप्तकोटीश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराजाज्ञा देवालयस्य प्रारंभः’ ही तारीख होती १३ नोव्हेंबर १६६८. शके १५९०च्या कार्तिक कृष्ण पंचमीस शुक्रवार होता. शिलालेखात सोमवार असे चुकून पडले असावे, असे इतिहासकार विजयराव देशमुख यांनी म्हटले आहे.
२०१९ साली या ऐतिहासिक घटनेस ३५० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी गोवा सरकारने या मंदिराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. हे कार्य पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. सुमारे साडेसहा कोटी रूपये खर्चून ११ फेब्रुवारी २०२३ रोजी हे जतन-संवर्धन-नूतनीकरणाचे कार्य पूर्ण झाले. त्या दिवशी सातारचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या संवर्धित व नूतनीकरण करण्यात आलेल्या मंदिरवास्तू व परिसराचे लोकार्पण करण्यात आले. या मंदिराची वास्तू पुरातत्त्व विभागातर्फे संरक्षित वास्तू म्हणून जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यापासून काहीशा खोलगट भागात, घनदाट झाडीच्या कुशीतील प्रशस्त प्रांगणात सप्तकोटेश्वराचे हे ऐतिहासिक मंदिर वसले आहे. मंदिर परिसरात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक पायरीमार्ग आहे. तो मंदिर परिसराच्या उजव्या बाजूस आहे. दुसरा मंदिराच्या समोरून आहे. त्या पक्क्या रस्त्यावरून येताना उजव्या हातास मंदिराची पुष्करिणी लागते. येथेच उजव्या बाजूस उंचावर काळभैरवाचे मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात उंच दीपस्तंभ आहे. हा ११ स्तरांचा, गोलाकार नागबंधांनी सुशोभित असा दीपस्तंभ चार स्तरांच्या अष्टकोनी चौथऱ्यावर उभारलेला आहे. दीपस्तंभासमोर एक छोटा खुला रंगमंच आहे. त्याच्या मागच्या बाजूस तुलसीवृंदावन आहे. समोरच, हिरव्यागार झाडींच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या आणि लालसर रंगात उठून दिसणारी मंदिराची वास्तू आहे. मंदिर पूर्णतः लाल दगडी चिऱ्यांत बांधलेले आहे व त्यावर पारंपरिक पद्धतीने चुन्याचा गिलावा देण्यात आला आहे.
मुखमंडप, महामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. या मंडपांवर दोन्ही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. मुखमंडपाचे प्रवेशद्वार कमानाकार आहे. मंडपाच्या डाव्या आणि उजवीकडील भिंतींमध्ये मोठ्या कमानाकार खिडक्या आहेत. महामंडपाचे प्रवेशद्वार दगडी बांधणीचे व कमानदार आहे.
याच्या वरच्या भागात मंदिराच्या बांधणीसंबंधीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख असलेला ऐतिहासिक शिलालेख आहे. या प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस असलेल्या कक्षासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा विराजमान आहे. प्रवेशद्वारातून आत दोन पायऱ्या चढून महामंडपात प्रवेश होतो. महामंडप प्रशस्त आणि उंच आहे. गोमंतकातील मंदिर स्थापत्यशैलीनुसार याची रचना आहे. डाव्या-उजव्या बाजूच्या बाह्यभिंतींपासून आत काही अंतरावर रुंदसर स्तंभांनी निर्माण केलेल्या कमानींची रचना येथेही पाहावयास मिळते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भिंतींवर, स्तंभांवर, कमानींवर असलेले कावी कला प्रकारातील नक्षीकाम. हे कामही पारंपरिक रंग वापरून, जुन्या पद्धतीने केलेले आहे. महामंडपातील स्तंभांवर, तसेच छतावर दिव्यांकरीताच्या काचेच्या हंड्या बसवलेल्या आहेत. छतास दोन पितळी घंटा टांगलेल्या आहेत. अंतराळाची उंच दर्शनीभिंतही कावी नक्षीकामाने सुशोभित आहे. या भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंनी चौकोनी देवकोष्ठके आहेत. त्यात गणेश आणि हनुमंताच्या दगडी मूर्ती विराजमान आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस असलेल्या मोठ्या लाकडी देव्हाऱ्यात सप्तकोटेश्वराची प्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या समोर नंदीची पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहात भूतलावर सप्तकोटेश्वराची पिंडी प्रतिष्ठापित आहे. अन्य मंदिरांतील शिवपिंडीपेक्षा येथील पिंडी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती भूमीच्या पातळीच्या वर आहे. तिचे ब्रह्मभाग, विष्णूभाग आणि रुद्रभाग असे तीन भाग आहेत. पिंडीच्या खालच्या भागास ब्रह्मभाग म्हणतात. त्यावरचा भाग विष्णूभाग असतो आणि सर्वांत वरच्या भागास रुद्रभाग असे म्हणतात. अनेकदा यातील ब्रह्मभाग आणि विष्णूभाग हे जमिनीत पुरलेले असतात. या मंदिरातील शिवपिंडीत हे दोन्ही भाग भूमीच्या पातळीच्या वर आहेत. या मंदिरातील गर्भगृह अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते बांधलेले नसून एका मोठ्या शिलाखंडामध्ये कोरलेल्या गुहा स्वरूपातील आहे. त्याच्या वरील भागात या शिळेमध्ये कोरलेलेच एक दालन आहे. त्या दालनात जाण्यासाठी पायऱ्याही कोरलेल्या आहेत. गर्भगृहास प्रदक्षिणा घालताना ही रचना पाहावयास मिळते. मंदिर संवर्धनाच्या कामाच्या वेळी या गर्भगृहाच्या बाह्य बाजूस काचेची भिंत बसवण्यात आली आहे. या गाभाऱ्यावर गोमंतकीय स्थापत्यशैलीतील उंच शिखर आहे.
या मंदिरात विविध सण व उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. त्यातील सर्वांत महत्त्वाचे उत्सव म्हणजे महाशिवरात्र व गोकुळाष्टमी. पौराणिक आख्यायिकेनुसार, भगवान शंकरांनी सप्तऋषींना ज्या दिवशी दर्शन दिले, तो दिवस गोकुळाष्टमीचा होता. त्यामुळे हा दिवस येथे मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. या वेळी अनेक भाविक येथील पवित्र कुंडामध्ये स्नान करतात. शिवरात्रीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. या शिवाय या मंदिरात कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराप्रमाणेच किरणोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी २१ जूनच्या सूर्योदयसमयी येथे सूर्याची किरणे सप्तकोटीश्वराच्या पिंडीस उजळून टाकतात. ही घटना पाहण्यासाठी येथे असंख्य भाविक येतात. गोव्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनरूत्थानाचे प्रतिक मानले गेलेले हे ऐतिहासिक मंदिर असंख्य इतिहासप्रेमींनाही आकर्षित करीत असते.
उपयुक्त माहिती:
- डिचोलीपासून ८ किमी आणि पणजीपासून १७ किमी अंतरावर
- डिचोली येथून परिवहन सेवेच्या बस उपलब्ध
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : शिरीष सरदेसाई, अध्यक्ष, मो. ९८२२१०००८७,
- मंदार सरदेसाई, सचिव, मो. ९९२३७१००८८

