संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी तळागाळातील वंचितांचा उद्धार केला. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार शेताच्या बांधावर तसेच नदीच्या घाटावर नेऊन सामान्य माणसांचे जीवनमान उन्नत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अनिष्ट व कालबाह्य चालीरीतींवर घणाघाती टीका केली. व्यसनाधीन व्यक्तींना सन्मार्गाला लावून समाजाला सद्गती देण्याचे कार्य त्यांनी केले. या महान संताचे समाधी मंदिर बीड जिल्ह्यातील चिंचोली येथे आहे. समाधीचे दर्शन घेतल्याने संत वामनभाऊंचा सहवास व ऊर्जा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
संत वामनभाऊ यांचा जन्म त्यांच्या आजोळी बोरगाव येथे १ जानेवारी १८९१ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव राहीबाई तर वडिलांचे नाव तोलाजी ग्यानबा सोनवणे होते. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या चाळीस दिवसांत राहीबाई यांचे देहावसान झाले. भाऊंचे संगोपन त्यांच्या आजीने केले. लहानपणापासून त्यांना भक्तिमार्गाची ओढ लागली आणि त्यांनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. पुढे ते गहिनीनाथ गडावर यादव बाबांच्या छत्रछायेखाली गेले व त्यांचे उत्तराधिकारी झाले. त्यांनी आयुष्यभर संन्यासधर्माचे पालन केले. भाऊंना वाचा सिद्धी प्राप्त होती आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद हमखास फळायचा, असे त्यांचे हजारो अनुयायी आजही श्रद्धेने सांगतात.
चिंचोली येथील गहिनीनाथांची समाधी व शिवमंदिर प्राचीन असल्याचे सांगितले जाते. येथील स्थानमाहात्म्य असे की या ठिकाणी पूर्वी फक्त निवडुंगाची झाडे होती. येथे स्वतः गहिनीनाथांनी आपल्या पादुका ठेवल्याची आख्यायिका आहे. गहिनीनाथांनी वैराग्यशील ऋषी दामोदर नाथ महाराज यांना दृष्टांत देऊन येथे मंदिर बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या. दामोदर नाथ महाराजांनी हिमालयात तपश्चर्या करून कणकागिरी (चिंचोली) येथे येऊन परिसरातील लोकांना एकत्र केले, त्यांना धार्मिक कार्यासाठी प्रवृत्त केले आणि या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यानंतर येथे संत यादव बाबांचे आगमन झाले. त्यांनी लोकांना एकत्र करून नाथ महाराजांची सेवा करण्यास शिकवले, परमार्थाचे ज्ञान दिले आणि गहिनीनाथ मंदिराच्या पायाभरणीचे काम केले. त्यानंतर ते समाधिस्त झाले. त्यापूर्वी, संत वामनभाऊ महाराजांनी येथे तपश्चर्या पूर्ण केली होती. संत सद्गुरू यादव बाबांची प्राचीन गादी संत वामनभाऊंनी पुढे चालवली. त्यानुसार, वामनभाऊ महाराजांनी येथे भक्तांना कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताहाद्वारे ज्ञान दिले, मानवता धर्म शिकवला, गहिनीनाथांचे मंदिर बांधले आणि बाजूचा दगडी गड उभा केला. त्यांनी महाराष्ट्रात पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी मठ बांधले. पदभ्रमण करून
समाजप्रबोधन, गोपालन आणि वृक्षलागवडीचे मोठे कार्य केले. पौष वद्य सप्तमी (२४ जानेवारी १९७६) या दिवशी संत वामनभाऊंनी इहलोकीची यात्रा संपवली व ते या ठिकाणी समाधिस्त झाले.
मुख्य रस्त्यापासून गहिनीनाथ गडावर जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन पिरॅमिड सदृश चौथरे आहेत. त्यावर नक्षीदार चौकोनी स्तंभ व त्यांवर सज्जा आहे. या सज्जावर आडव्या ओळीत तीन मेघडंबरी आहेत व त्यांत देवमूर्ती आणि दोन सिंहशिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचा संपूर्ण परिसर पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभित केलेला आहे. वाहनतळ परिसरात प्रसाद, पूजा साहित्य, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची दुकाने आहेत. वाहनतळ परिसरात संत वामनभाऊंचे शिष्य खंडोजी बाबा व गुरू यादव बाबांची समाधी मंदिरे आहेत. या मंदिरांच्या छतावर द्रविडी शैलीतील चौकोनी शिखरे आहेत. या शिखरांच्या शीर्षभागी स्तूपिका आणि त्यावर कळस आहेत.
संत वामनभाऊ समाधी मंदिरास सुमारे वीस फूट उंच भक्कम दगडी तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर व्याल, गजराज व इतर शिल्पे आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी कवाडे आहेत व आतील दोन्ही बाजूंना देवकोष्ठके आहेत. प्रवेशद्वारातील उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात मारुती आणि डाव्या बाजूच्या देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वारातून पुढे प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप व त्यापुढे तीन गर्भगृहे अशी मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपास मुक्तद्वार स्वरूपाची तीन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात प्रत्येकी पाच स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ अर्धचंद्राकार कमानींनी जोडलेले आहेत. स्तंभांवर तुळई आहे आणि त्यावर छत आहे. सभामंडपात उजव्या बाजूला गहिनीनाथांची धुनी आहे. येथून पुढे मुख्य गर्भगृह लागते. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी कवाडे आहेत. गर्भगृहात गहिनीनाथांची समाधी आहे. समाधीच्या शिव पाषाणास रुद्राक्ष माळा घातल्या आहेत. गर्भगृहातील भिंतीत दीपकोष्ठके आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीतील देवकोष्ठकात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत.
या गर्भगृहाच्या उजवीकडे दुसरे गर्भगृह आहे. येथील द्वारशाखांवरही उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी कवाडे आहेत. गर्भगृहात मध्यभागी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची समाधी आहे. समाधीवर चौकोनी शिव पाषाण आहे. गर्भगृहात मागील भिंतीनजीक वज्रपीठावर वामनभाऊंची ध्यानस्थ मूर्ती आहे. उजवीकडील गर्भगृहात गोरक्षनाथ महाराज व पुंडलिक महाराज यांची समाधीस्थाने आहेत. गहिनीनाथांची समाधी असलेल्या गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे उंच शिखर आहे. या शिखराच्या पहिल्या चौकोनी थरात वीस देवकोष्ठके आहेत आणि त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या वरील चार अष्टकोनी थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत आणि त्यातही देवमूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहेत. अगदी याच प्रकारचे शिखर सद्गुरू वामनभाऊ समाधी मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर देखील आहे.
मंदिराच्या प्रांगणात तटबंदीला लागून दुमजली ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून केला जातो. येथेच एका ठिकाणी उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे. मागील बाजूच्या एका ओवरीत सद्गुरू विठ्ठल महाराजांची गादी व पादुका आहेत. गादीच्या उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर नंदीची मूर्ती आणि नंदीसमोर शिवपिंडी आहे. मंदिरात मागील भिंतीतील देवकोष्ठकात महादेव व पार्वतीच्या मूर्ती आहेत. प्रांगणात यज्ञकुंड आहे.
मंदिरात माघ वद्य अष्टमी हा संत वामनभाऊ यांचा पुण्यतिथी उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक भाऊंच्या दर्शनासाठी येतात. यानिमित्ताने मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सलग आठ दिवस मंदिरात भजन, कीर्तन व प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, चैत्र पाडवा, दत्त जयंती, गहिनीनाथ समाधी दिन, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात रोज शेकडो भाविक भाऊंच्या व गहिनीनाथांच्या दर्शनासाठी येतात.