संत गुलाबबाबा समाधी मंदिर
टाकरखेडा मोरे, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात टाकरखेडा मोरे येथे संत गुलाबबाबांचे समाधिमंदिर आहे. विसाव्या शतकात कार्य केलेल्या गुलाबबाबांनी भक्तीबरोबर सदाचार, परोपकार आणि सेवाभावाची शिकवण दिली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व कर्नाटकातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. वारकरी परंपरेतील नामस्मरण आणि दत्तभक्तीशी जोडलेल्या अनुयायांच्या श्रद्धा येथे एकत्र येतात. मंदिरसंकुलात अन्नछत्र, गोशाळा, अतिथीगृह आणि सत्संगमंडप आहेत. समाधीच्या दर्शनाबरोबर भजन, कीर्तन व अन्नदानासाठी भाविक येथे जमतात. फाल्गुन पौर्णिमेचा समाधी सोहळा आणि आषाढी वारीतील सहभाग यांना येथील धार्मिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. समाधिमंदिर आणि रस्त्यापलीकडील मठ असे या परिसराचे दोन भाग आहेत.
टाकरखेडा मोरेचा परिसर पायनघाटाच्या मैदानी प्रदेशात येतो. जवळचे अंजनगाव सुर्जी हे नागवेलीच्या पानांचा व्यापार आणि हातमागावर कापड विणण्याच्या व्यवसायासाठी ओळखले जात असे. महाराष्ट्र शासनाच्या ‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’मध्ये या व्यवसायांची नोंद आहे. शहानूर नदीकाठच्या अंजनगाव आणि सुर्जी या दोन वस्त्यांतून शहराचा विस्तार झाला. अर्जुनाने बाण मारून ही नदी निर्माण केली आणि तिला ‘शरनीरा’ नाव पडले, अशी स्थानिक आख्यायिका सांगितली जाते. जुन्या ‘गॅझेटिअर’नुसार विठुजी नारायण यांनी इ.स. १६९७ मध्ये सुर्जी येथे गढी व तटबंदी बांधली. ‘सुर्जी’ हे नाव ‘सुरंजी’ वृक्षावरून पडल्याची समजूतही ‘गॅझेटिअर’मध्ये नोंदवली आहे. असाये व आडगावच्या लढायांनंतर दौलतराव शिंदे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील सुर्जी अंजनगाव तह ३० डिसेंबर १८०३ रोजी झाला. टाकरखेड्याच्या नावातील ‘मोरे’ हा उल्लेख तेथील मोरे घराण्याशी जोडला जातो.
उपलब्ध चरित्रानुसार संत गुलाबबाबांचा जन्म टाकरखेडा मोरे येथील शेतकरी कुटुंबात १ जुलै १९३२ रोजी झाला.
चार भावंडांमध्ये ते तिसरे होते. घरच्या गरिबीमुळे त्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही. लहानपणापासून त्यांना भजन, संगीत आणि ईश्वरचिंतनाची आवड होती. त्यांच्या चरित्रपरंपरेत पंढरपूरच्या आश्रमातील दीर्घ वास्तव्याचा उल्लेख येतो. त्या काळात त्यांनी साधना केली आणि संतांचा सहवास घेतला. अनेक सिद्धपुरुषांचे सान्निध्य त्यांना लाभल्याचे सांगितले जाते. साधनेत त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाले आणि दुःखी माणसांना आधार देण्याची आध्यात्मिक शक्ती लाभली, अशी अनुयायांची श्रद्धा आहे. संसारापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळल्याचेही त्यांच्या चरित्रपरंपरेत सांगितले जाते. गाडगे महाराजांच्या कीर्तनात गुलाबबाबांनी अनेक वर्षे पखवाजाची साथ केल्याची आठवण त्यांच्या अनुयायांमध्ये सांगितली जाते. गाडगेबाबांच्या समाजप्रबोधनाचा आणि सेवाविचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ या नामगजरातून त्यांनी भक्तीचा प्रसार केला. अन्नदान, आरोग्यसेवा आणि गोरक्षण यांसोबत सदाचाराने जगण्याचा संदेश दिला. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेशातील ग्रामीण भागांत त्यांनी भ्रमण केले. त्यांनी १९९१ मध्ये टाकरखेडा मोरे येथे मठ स्थापन केला.
९ मार्च २००१ रोजी टाकरखेडा मोरे येथे त्यांचे देहावसान झाले. अनुयायांनी त्यांच्या समाधीवर मंदिर उभारले. मंदिरातील पूजा, अन्नछत्र आणि मठातील सेवाकार्य यांच्या माध्यमातून त्यांची परंपरा पुढे चालवली जाते.
मुख्य रस्त्यालगतच्या मंदिरसंकुलाभोवती तटबंदी आहे. तिच्या दर्शनी भागात उंच प्रवेशद्वार उभारले आहे. मंदिरासमोर पूजासाहित्याची दुकाने आणि भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. तीन मजल्यांच्या समाधिमंदिराच्या बाह्यभागावर गुलाबी वालुकाश्माचे आवरण व कोरीव काम आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या तीन प्रवेशद्वारांसमोर प्रत्येकी चार कोरीव स्तंभांचा मुखमंडप आहे. स्तंभांच्या माथ्यावरील कणी व हस्त यांच्या आधारावर आडव्या तुळया बसवल्या आहेत. त्यांवर पायऱ्यांसारखे टप्पे असलेले पिरॅमिडच्या आकाराचे छत आहे. प्रांगणातून दहा पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश करता येतो. दर्शनी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना हत्तींची उठावशिल्पे आहेत.
सभामंडपातून पुढे आल्यावर अंतराळाचे प्रवेशद्वार लागते. त्याच्या दोन्ही बाजूंनाही हत्तींची शिल्पे आहेत. अंतराळात आणि गर्भगृहात जाळीदार संगमरवरी कठडे बसवले आहेत. गर्भगृहातील उंच पीठावर संगमरवरी मखरात संत गुलाबबाबांची पांढऱ्या संगमरवरातील मूर्ती आहे. मखराच्या माथ्यावर घुमटाकार शिखर आणि कळस आहे. गर्भगृहाच्या वितानावर, म्हणजे छताच्या आतील पृष्ठभागावर, काचेची कलाकुसर केलेली आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. बाबांची मूळ समाधी तळघरात आहे. त्या समाधीकडे जाण्यासाठी मंदिराच्या मागील बाजूने स्वतंत्र मार्ग आहे. पहिल्या मजल्यावरील गर्भगृहातील मखरात श्रीकृष्ण आणि राधा यांच्या दगडी मूर्ती आहेत. त्यांना मुकुट व पारंपरिक वस्त्रालंकारांनी सजवले जाते. दुसऱ्या मजल्यावरील गर्भगृहात संगमरवरी मखरातील पीठावर महादेव आणि पार्वती यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या दोन्ही मजल्यांवरील गर्भगृहांभोवती प्रदक्षिणामार्ग आहेत.
मंदिराच्या छतावर गर्भगृहाच्या माथ्याशी वरच्या दिशेने निमुळते होत जाणारे शिखर आहे. त्याच्या पृष्ठभागावर उठावदार उभे पट्टे आहेत. शिखराच्या दर्शनी बाजूला स्तंभांवर आधारलेली दोन मजल्यांची रचना आहे. मुख्य मंदिराच्या बाह्यभागावरील कोरीव कामासोबत शिखरावरही नक्षीकाम केलेले आहे.
तळघरातील समाधीकडे जाणारा मागील मार्ग प्रांगणातील रंगमंडपातून जातो. या मंडपाची रुंदी सहा ते दहा फूट आहे. दोन्ही बाजूंना स्तंभांच्या रांगा आणि छताच्या आतील भागावर पानाफुलांची चित्रे व सजावट आहे. पायऱ्या उतरल्यावर समाधीकक्षाचे प्रवेशद्वार लागते. त्याला महिरपीचे तोरण आणि कोरीव लाकडी झडपा आहेत. कक्षाच्या मध्यभागी समाधीचा चौथरा आहे. त्याभोवती चौकोनी स्तंभांचा जाळीदार संगमरवरी कठडा बसवलेला आहे. छतावर काचेची कलाकुसर आहे. समाधीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग आहे.
समाधिमंदिरालगतच्या दुसऱ्या मंदिरात विविध देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. त्याच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुगादी असलेला झोपाळा जतन करून ठेवलेला आहे. मागील प्रांगणात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. त्याच्या गर्भगृहावरील शिखराला चौकोनी तळ आणि त्यावर तीन गोलाकार थर आहेत. खालच्या दोन थरांत प्रत्येकी बारा अशी एकूण चोवीस देवकोष्टके आहेत. त्यांत विविध देवीदेवतांच्या मूर्ती बसवल्या आहेत. शिखराचे थर कमळाच्या पाकळ्यांच्या नक्षीने विभागले आहेत. माथ्यावर आमलक आणि कळस आहे.
रस्त्यापलीकडील मठाभोवती तटबंदी आणि प्रवेशद्वार आहे. प्रांगणात वृक्षांच्या सावलीत हनुमान व शिवमंदिर आहे. पुढील स्वागतकमानीच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर प्रत्येकी चार देवकोष्टके आहेत. त्यांत ऋषीमुनींची शिल्पे कोरलेली आहेत. मठात बाबांचे मूळ निवासस्थान, सत्संगमंडप आणि श्रीराम मंदिर आहे. श्रीराम मंदिरात नंदी व शिवलिंग आहे. पीठावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. आवारात गोशाळा, अन्नछत्र आणि अतिथीगृहाच्या इमारती आहेत. येथील गोशाळेची क्षमता एक हजार गायींच्या संगोपनाची असल्याचे सांगितले जाते. गोशाळेशेजारी गुलाबबाबांनी समाजकार्यासाठी वापरलेली बस, जीप आणि कार जतन करून ठेवली आहेत.
मंदिराची दारे सकाळी ७ वाजता भाविकांसाठी उघडतात. काकड आरतीनंतर समाधी व मूर्तींची अभिषेक, स्नान आणि चंदनलेपनासह नित्य पूजा होते. दुपारी नैवेद्य अर्पण केला जातो. सूर्यास्ताच्या वेळी धूपारती होते. रात्री शयन आरतीपूर्वी सामूहिक हरिपाठ आणि भजन केले जाते. या कार्यक्रमांत भाविक सहभागी होतात. दिवसभरातील पूजाविधींच्या दरम्यान समाधीचे दर्शन घेता येते. रात्री ९ वाजता शयन आरतीनंतर दर्शन बंद होते. मठातील अन्नछत्रात भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. मुक्काम करणाऱ्या भाविकांसाठी अतिथीगृह आणि भक्तनिवासाची सुविधा आहे.
फाल्गुन पौर्णिमेच्या समाधी सोहळ्यानिमित्त यात्रामहोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. सप्ताहात काकड आरती, हरिपाठ, प्रवचन, भजन, कीर्तन, ग्रंथपारायण आणि पादुकापूजन होते. सांगतेच्या दिवशी बाबांच्या पादुका व प्रतिमा पालखीत ठेवून गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. या उत्सवप्रसंगी हजारो भाविक येथे येतात. आषाढी वारीसाठी मंदिरातून पंढरपूरकडे पायी दिंडी निघते. दिंडीत शेकडो वारकरी टाळ आणि मृदंगाच्या गजरात सहभागी होतात. याशिवाय रामनवमी, गोकुळाष्टमी, गुरुपौर्णिमा आणि हनुमान जयंती हे उत्सव मंदिरात साजरे केले जातात.
उपयुक्त माहिती
- अंजनगाव सुर्जी येथून सुमारे ७ किमी अंतरावर
- अचलपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे ३२ किमी अंतरावर
- अंजनगाव सुर्जी, अकोला व अमरावती येथून एसटी बसची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात संस्थानाचे अतिथीगृह, भक्तनिवास आणि मोफत अन्नछत्राची सुविधा
- संपर्क कार्यालय मो. ९८२२२११५३२, ९४२१०५७९२१
