एकोणिसाव्या-विसाव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांच्या मांदियाळीत शेगावचे महान योगी संत गजानन महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. वयाच्या १८ व्या वर्षी शेगाव येथे अवतीर्ण झालेल्या गजानन महाराजांनी इ.स. १९१० मध्ये येथेच संजीवन समाधी घेतली. त्या ठिकाणी महाराजांचे समाधी मंदिर स्थित आहे. ‘महाराजांची दिव्य ज्योती। अदृश्य आहे तेच ठायां।।’ अशी या मंदिराबाबत भाविकांची श्रद्धा आहे. येथील स्वच्छता, टापटीपपणा, शिस्त आणि व्यवस्थापनाचा नेटका कारभार यामुळे हे मंदिर असंख्य भाविकांना येथे आकर्षित करीत आहे.
गजानन महाराज यांचे पूर्वायुष्य अज्ञात आहे. ‘आधुनिक महाराष्ट्रातील महिपती’ म्हणून ओळखले जाणारे दासगणू महाराज यांनी ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथातून गजानन महाराजांचे जीवनचरित्र भाविकांसमोर मांडले. हा ग्रंथ गजानन महाराजांच्या संजीवन समाधीनंतर २९ वर्षांनी, इ.स. १९३९ मध्ये दासगणू महाराजांनी लिहिला. शेगाव येथील रामचंद्र पाटील यांच्या विनंतीवरून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला. गजानन महाराजांच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्ती, त्यांच्या चमत्कारांचा अनुभव घेतलेले भाविक यांच्याशी बोलून, त्याचप्रमाणे महाराजांविषयीच्या प्रचलित कथा व आश्रमात असलेली कागदपत्रे यांच्या आधारे दासगणू महाराजांनी या ग्रंथाचे लेखन केले. त्यामुळे हा ग्रंथ अधिकृत मानला जातो.
गजानन महाराज हे मूळचे कोण व कोठून आले ही बाब अज्ञात आहे. त्याविषयी अनेक तर्कवितर्क मांडले जातात. मात्र त्यांना कोणताही सबळ पुरावा नसल्याचे दासगणू महाराजांनी स्पष्ट केले आहे.
या ग्रंथानुसार, गजानन महाराज हे माघ वद्य सप्तमी शके १८००, २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगाव येथे सर्वप्रथम प्रकट झाले. ती कथा अशी की त्या दिवशी शेगावमधील देवीदास पातूरकर यांच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त भोजनाच्या पंगती उठत होत्या. त्या वेळी तेथून बंकटलाल अगरवाल व दामोदरपंत कुलकर्णी हे गृहस्थ चालले होते. अचानक त्यांना दिसले की अंगात जुनीपुराणी बंडी, हाती चिलिम, जवळ भोपळ्याचा तुंबा अशा अवस्थेतील एक मुलगा त्या पत्रावळ्यांवरील उष्टे अन्न खात बसलेला आहे. तेच गजानन महाराजांचे शेगावला झालेले पहिले दर्शन. या प्रसंगानंतर गजानन महाराज तेथून दूर निघून गेले. ते चार दिवसांनी पुन्हा दिसले. त्या दिवशी गावात गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते. ते श्रवण करण्यास बंकटलाल अगरवाल व गावात शिंपीकाम करणारे पितांबर हे चालले होते. त्यावेळी त्यांना कीर्तनस्थळी पुन्हा गजानन महाराज दिसले.
ती तारीख होती २६ वा २७ फेब्रुवारी १८७८. त्यावेळी गजानन महाराजांनी पितांबर यांना, घोटाभर आणि तेही गढूळ पाणी असलेल्या ओढ्यात तुंबा बुडेल एवढे स्फटिकासम निर्मळ पाणी उत्पन्न करण्याचा चमत्कार दाखवला. ते पाहून पितांबर हे गजानन महाराजांचे भक्त बनले.
याच दिवशी गोविंदबुवा टाकळीकर यांनी त्यांच्या कीर्तनात हंसगीतेमधील एक श्लोक निरुपणास घेतला होता. त्याचा पूर्वार्ध त्यांनी विशद केला. त्यानंतर गजानन महाराजांनी त्याचा उत्तरार्ध सांगितला. ते ऐकून टाकळीकर बुवा चकित झाले. त्यांनी आपल्या कीर्तनातून जाहीर केले की ‘तुमच्या शेगांवी अमोल आलें। रत्न हे त्या सांभाळा।।’ गजानन महाराज हे साक्षात् पांडुरंग आहेत. त्यांची सेवा करा, असे टाकळीकर बुवांनी लोकांस सांगितले. यानंतर बंकटलाल यांनी गजानन महाराजांना घरी नेले.
गजानन महाराज हे नेहमी टिचक्या वाजवून ‘गण गण गणांत बोते’ असे भजन म्हणत असत. काहींच्या मते ते ‘गिण गिण गिणांत बोते’ असे म्हणत असत. मात्र त्यावरून त्यांना गजानन महाराज असे नाव पडले. त्यांच्या दर्शनासाठी बंकटलाल यांच्या घरी दूरदूरवरून लोक येऊ लागले.
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, वस्त्रविहीन शरीर आणि अजानुबाहू हात अशी त्यांची देहयष्टी होती. त्यांची दिनचर्या दासगणूंनी वर्णन केली आहे. ती अशी की ‘कधीं करावें मंगलस्नान। कधीं हाळांत जाऊन। कधीं कधीं प्राशन। करावें गढूळ जलाचें।। चिलमीवरी प्रेम भारी। ती लागे वरच्यावरी। नव्हती आसक्ति तिच्यावरी। तें केवळ कौतुक।।’ तिसऱ्या अध्यायात दासगणू महाराजांनी एका गोसाव्याने महाराजांना केलेल्या गांजाच्या नवसाची कथा सांगितली आहे. त्या गोसाव्याने नवसपूर्ती म्हणून महाराजांना गांजा दिला. त्यानंतर दासगणू महाराज सांगतात की ‘ऐसी गांजाची पडली प्रथा। ते ठायीं तत्त्वतां।’ परंतु महाराजांना त्यामुळे व्यसनाधीनता आली नाही. ते कधी कधी अस्खलित वेदऋचा म्हणत असत. कधी मौन धरीत. एकदा त्यांनी ‘चंदन चावल बेलकी पतीया प्रेम भारी’ हे पद वेगवेगळ्या रागांमध्ये गाऊन दाखवले होते.
महाराज अनेकदा आसपासच्या गावांमध्ये जात असत. त्या त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांच्या अनेक कथा ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
बंकटलाल अगरवाल यांच्या घरात काही काळ निवास केल्यानंतर महाराज गावातील अत्यंत पुरातन असलेल्या मारुती मंदिरात राहण्यास गेले. त्या काळी गावातील खंडू पाटील हा मातब्बर इसम या मंदिरात मोठा उत्सव करीत असे. त्याला पाच बंधू होते. ते महाराजांची हेटाळणी करीत असत. एकदा त्यातील एकाने महाराजांना कुस्तीचे आव्हान दिले, तेव्हा महाराजांनी त्याचे गर्वहरण केले. यानंतर एकदा या बंधूंनी महाराजांना उसाच्या दांडक्यांनी मारहाण केली, परंतु महाराजांच्या अंगावर त्याचा एक व्रणही उठला नाही. हा चमत्कार पाहून ते सारे महाराजांचे भक्त बनले.
यानंतर महाराजांनी खंडू पाटील याचा सर्वांत धाकटा बंधू कृष्णाजी पाटील याच्या मळ्यात काही काळ निवास केला. या मळ्यामध्ये गजानन महाराजांनी एका समर्थभक्तास समर्थ रामदास स्वामींच्या स्वरूपात दर्शन दिले, तसेच या मळ्यात असतानाच गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी नामक गोसाव्याचे गर्वहरण केले अशी कथा प्रचलित आहे. येथे नजीकच एक शंकराचे मंदिर होते. मोटे नामक सावकारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्यामुळे त्याला मोट्यांचे मंदिर म्हटले जाई. त्याच्या पूर्वेस सखाराम आसोलकर या व्यक्तीची ओसाड जागा होती. त्या जागेवर महाराजांचा मठ बांधण्यात आला. हा गजानन महाराजांचा पहिला मठ होय.
कालांतराने कृष्णाजी पाटील यांच्या निधनानंतर महाराजांच्या मनात शेगाव सोडण्याचा विचार आला. तेव्हा त्यांच्या भक्तांनी ‘कुठेही राहा पण गाव सोडून जाऊ नका,’ अशी विनवणी केली. त्यावर ‘तुमच्या गावात दुफळी आहे, जी कोणाचीच नसेल, ती जागा दिलीत तरच गावात राहीन’, अशी अट महाराजांनी घातली. तेव्हा सर्वांना पेच पडला. अशी जागा केवळ सरकारी होती, परंतु तेव्हा ब्रिटिश राजवट होती आणि ब्रिटिश सरकार अशा कार्यासाठी जागा देणार नाही, अशी भीती भक्तमंडळींना वाटत होती. अखेर महाराजांच्या आदेशाने त्यांनी दोन एकर जागेसाठी सरकारदरबारी अर्ज केला. त्यावेळी बुलडाण्यात करी नामक ब्रिटिश अधिकारी होता. त्याने एक एकर जागा मंजूर केली व ही जागा वर्षभरात सुव्यवस्थित केली तर आणखी जागा देऊ असे सांगितले. यानंतर लोकवर्गणी काढून तेथे मठाचे काम सुरू करण्यात आले. आपण गेल्याशिवाय काम नीट होणार नाही, असे वाटल्याने महाराज बैलगाडीत बसून जुन्या मठातून तेथे गेले.
जाताना ते एका रेतीच्या गाडीवर बसले. तिचा गाडीवान एक महार जातीचा गृहस्थ होता. तो गाडीतून उतरला. ते पाहून महाराजांनी त्याला सांगितले की ‘आम्हां परमहंसांस। विटाळाची बाधा नसे।।’ अशा प्रकारे स्पृश्यास्पृश्यतेला थारा देऊ नये, असा उपदेश महाराजांनी स्वकृतीतून दिला. त्या ठिकाणी ते एका जागी जाऊन बसले. तेव्हा ती जागा मठाच्या मध्यभागी यावी म्हणून कारभाऱ्यांनी थोडीशी बाजूची जागा वापरली. त्यावेळी गावातील एका गृहस्थाने सरकारी जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार केली. त्यावरून जोशी नावाचे एक अधिकारी चौकशीसाठी आले. तेव्हा गजानन महाराजांनी स्फूर्ती दिल्याने जोशी यांनी संस्थेला केलेला दंड चुकीचा असल्याचा शेरा दिला व हे प्रकरण मिटले. महाराज तेव्हा जेथे बसले होते, त्याच जागी आता त्यांची समाधी आहे.
अकोल्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गजानन महाराज आणि लोकमान्य टिळक यांची भेट झाल्याची कथाही दासगणू महाराजांनी वर्णन केली आहे. पुढे लोकमान्य टिळकांना राज्यद्रोहाच्या आरोपाखाली कारावासाची शिक्षा झाली, तेव्हा लोकमान्यांच्या सहकाऱ्यांनी गजानन महाराजांना साकडे घातले. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितले की ‘सज्जनांस त्रास झाल्याविना। राज्यक्रांती होईना’. कितीही प्रयत्न केले तरी टिळकांची सुटका होणार नाही. त्यावेळी महाराजांनी टिळकांच्या कोल्हटकर नामक सहकाऱ्यांकडे एक भाकरी दिली. ती टिळकांना खाऊ घाला, त्या योगे टिळकांच्या हातून मोठे कार्य होईल, असे सांगितले.
टिळकांनी ती भाकरी खाल्ल्यामुळे पुढे ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात त्यांच्या हातून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला गेला, असे ‘गजानन विजय’ ग्रंथात म्हटले आहे.
विदर्भात ठिकठिकाणी महाराजांनी अशा प्रकारे विविध चमत्कार केल्याच्या कथा या ग्रंथात आहेत. महाराजांच्या लीला अगाध होत्या. त्यांतून ते जनसामान्यांना, त्यांच्या जवळच्या भक्तांना खास शिकवण देत असत. माळी विठोबा घाटोळ नावाचा एक भक्त स्वतःस महाराजांचा पट्टशिष्य म्हणवून घेत जनसामान्यांना त्रास देत असल्याचे समजताच महाराजांनी त्याला मार देऊन हुसकावून दिले होते. आपल्या चरित्रातून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचाही संदेश दिलेला आहे. ‘हिंदु आणि मुसलमान। हे एकाच देवापासून। निर्माण आहेत जाहले।। धर्म बापा ज्याचा त्यांनी। प्रिय मानावा प्राणाहुनी। परी विधर्म्यांच्या ठिकाणीं। अलोट प्रेम धरावे।।’ ही शिकवण दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात नोंदवली आहे. गजानन महाराजांना आपल्या अवतारकार्य समाप्तीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी एका गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांना बोलावून आता ‘गणपती बोळवण्याची’ वेळ झाल्याचा संकेत दिला. त्यानुसार त्यांनी शेगाव येथे शके १८३२, साधारणनाम संवत्सर, भाद्रपद शुद्ध पंचमी, गुरुवार, ता. ८ सप्टेंबर १९१० या दिवशी योगाने प्राण रोधून संजीवन समाधी घेतली. म. जोतिबा फुले नगरातील विस्तीर्ण अशा परिसरात महाराजांचे हे मंदिर वसले आहे.
मंदिर परिसरास भक्कम दगडांनी घडवलेले प्रवेशद्वार आहे. त्यावर कठडा असलेला सज्जा आहे. मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना आणखी दोन लोखंडी लहान दरवाजे आहेत. आत प्रवेश केल्यानंतर सुरक्षा चौकी आहे. येथून मुख्य मंदिराजवळ येण्यासाठी इमारतीच्या बाजूने छप्पर असलेली मार्गिका आहे. मुख्य मंदिर परिसरामध्ये आणखी एक मोठे प्रवेशद्वार आहे. या परिसरात समाधी स्थळ, महाराजांचे विश्रांतीस्थळ आणि महाप्रसादालय या तीन महत्त्वाच्या वास्तू आहेत. मुख्य द्वाराच्या उजवीकडे असलेल्या दरवाजातून समाधी स्थळी येण्याचा मार्ग आहे. येथील दर्शन मार्गिकेमध्ये बसण्याची, पाण्याची आणि माफक दरात चहा, कॉफी व दूध घेण्याची व्यवस्था आहे. लहान बाळांना स्तनपानासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. दर्शनबारीमधील प्रत्येक टप्प्यावर सेवेकरी भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असतात.
महाराजांची समाधी एका गुहेमध्ये आहे. येथे खाली उतरण्यासाठी संगमरवरी पायऱ्या आहेत. या गुहेमध्ये शिरल्यानंतर डावीकडे आणि मग उजवीकडे अशी वळणांची वाट आहे. ती पार केल्यानंतर आपण समाधीच्या समोर येतो.
येथे आणखी १५-२० पायऱ्या खाली उतरल्यावर महाराजांचे समाधी स्थान आहे. येथे गजानन महाराजांची मोठी संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीसमोर महाराजांच्या पादुका आहेत. येथून पुन्हा पायऱ्या चढून वर जाताना मध्ये साखरफुटाणे किंवा चिरंजीचा प्रसाद दिला जातो. वर गेल्यानंतर समाधीस्थळी असलेल्या राममंदिरात प्रवेश होतो. या मंदिराच्या सभामंडपाचे खांब दगडांमध्ये कोरलेले आहेत. खांबांवर ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथातील प्रत्येक अध्यायातील प्रसंगाचे एकेक, अशी २१ चित्रे लावण्यात आली आहेत. गर्भगृहासमोर मारुतीचे छोटेसे मंदिर आहे. गर्भगृहात तीन शिखरांचे देवकोष्टक आहे. त्यात श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या प्रसन्न मूर्ती आहेत.
समाधी मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. येथे मागच्या बाजूला डाव्या हाताला भव्य ध्वजस्तंभ आहे. त्याचप्रमाणे उजवीकडे यज्ञमंडप आहे. मुख्य मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला महाराजांचे विश्रांतीस्थळ आणि पारायण मंडप आहे. येथे दर्शनरांगेतून पुढे आल्यानंतर अभिषेकाच्या पादुका आणि विठ्ठल-रखुमाईच्या काळ्या दगडात कोरलेल्या मूर्तींचे दर्शन होते.
विश्रांतीस्थळी सागवानी लाकडाचा नक्षीदार दिवाण आहे. त्यावर महाराजांची गादी, उशी, लोड-तक्के, पादुका आदी वस्तू आहेत. या ठिकाणी महाराजांचे अदृश्य स्वरूपात आजही अस्तित्व आहे व ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विश्रांतीस्थळाच्या समोर पारायण मंडप आहे. मंदिर परिसरात एक मोठा औदुंबर वृक्ष आहे. हा वृक्ष महाराजांच्या काळापासून असून ते त्याच्याखाली बसून भक्तांशी संवाद साधत असत, असे सांगितले जाते. या औदुंबर वृक्षाच्या जवळच दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे. तेथून बाहेर पडल्यानंतर उत्तर दिशेला नागदेवता मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूला बाळाभाऊ महाराज आणि नारायण महाराज यांची समाधी मंदिरे आहेत. महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी बाळाभाऊंना आपल्या गादीवर बसविले होते, तर बाळाभाऊंनी समाधी घेतल्यानंतर नारायण महाराजांना गजानन महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन शेगावची गादी सांभाळण्याची प्रेरणा दिल्याचे मानले जाते.
पहाटे पाच वाजल्यापासून मंदिराच्या परिसरात मंगलवाद्ये वाजविली जातात व काकड आरतीने दिवस सुरू होतो. साडेपाच ते साडेसात अशी षोडशोपचार पूजा आणि पंचामृतपूजा होते. या काळात भक्तांना महाराजांच्या पादुकांवर स्वहस्ते अभिषेक किंवा समाधीस्थानी उपाध्यायांकरवी अभिषेक करता येतो. सकाळी अकरा वाजता पंचोपचार पूजा, आरती आणि महानैवेद्य होतो. दुपारी चारनंतर ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ केला जातो. दर गुरुवारी आणि दशमीला संध्याकाळी पाच वाजता पालखीची मंदिर परिक्रमा होते. सूर्यास्ताला टाळ्यांचा नाद सुरू होतो आणि शंखनादाने आरती सुरू होते. रात्री आठ ते नऊ असा एक तास भजन आणि पंचपदी होते. दर गुरुवारी, तसेच दशमी-एकादशीला आणि उत्सवाच्या दिवसांमध्ये आठ ते दहा या वेळेत कीर्तन रंगते. साडेनऊला पंचोपचार पूजा आणि शेजारतीने दिवस संपतो.
येथे वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात. माघ वद्य प्रतिपदा ते सप्तमी असा सात दिवस प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सप्तमीला सकाळी १० वाजल्यापासून प्रकट दिनोत्सवाचे कीर्तन आणि १२ वाजता प्रकट दिनोत्सव साजरा होतो. दुसरा मोठा उत्सव रामनवमीचा असतो. तो चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात असतो. पंचमीपासून नवमीपर्यंत रामायण स्वाहाकार होतो. नवमीला सकाळी १० वाजता कीर्तन आणि दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा रंगतो.
भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली. त्यानिमित्त प्रतिपदेपासून पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. या काळात गणेशयाग व वरुणयाग केला जातो. यावेळी शेगावात मोठी यात्रा भरते. गज, अश्व, रथ, मेणा, दिंडी यासह नगरपरिक्रमा मिरवणूक निघते. टाळ मृदंगाच्या गजरात हरीनामाचा गजर करत भाविक यात सहभागी होतात. यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्रभरातून शेकडो दिंड्या शेगावला येतात. या तिन्ही उत्सवांवेळी हजारो भाविक शेगावमध्ये दर्शनाला येतात. याखेरीज आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पालखीची मंदिर परिक्रमा असते. तसेच पंढरपूरलादेखील वारी निघते. कृष्णजन्मोत्सव, हनुमान जयंती, तुकाराम बीज, ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, एकनाथ षष्ठी, अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी, दासनवमी, शंकराचार्य जयंती, नृसिंह जयंती असे अनेक सोहळेही येथे उत्साहाने साजरे केले जातात.
मंदिर संस्थानात भव्य असे प्रसादालय आहे. येथे विनामूल्य भोजन उपलब्ध असते. मंदिराजवळ भक्तनिवास क्रमांक एक आणि दोन असून तेथे निवासासाठी १६१ खोल्या आहेत. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर हत्तीखाना परिसरात भक्तनिवास क्रमांक तीन ते सहा अशा प्रत्येकी चार मजल्यांच्या चार इमारती आहेत. तेथे विविध प्रकारच्या ४१७ खोल्या आहेत. याखेरीज मंदिरापासून काहीसे दूर आनंदविहार आणि आनंदसागर विसावा अशी दोन भक्तनिवास संकुले आहेत. आनंदविहारमध्ये ११ इमारती असून तेथे ६७७ खोल्या आहेत. या परिसरात सर्व संतांना अंगाखांद्यावर खेळविणाऱ्या विठुरायाच्या ‘विठू माझा लेकूरवाळा’ शिल्पासह अन्य आकर्षक शिल्पे आहेत. आनंदसागर विसावा संकुलात ५९७ खोल्या आणि एकट्यादुकट्या भाविकासाठी किंवा दिवसा विश्रांती घेण्यासाठी ९२ ‘डॉर्मेटरी हॉल’ (शयनगृह) आहे. येथे निवासासाठी खोलीतील सोयी-सुविधांनुसार दिवसाला ठराविक देणगीमूल्य असते.