वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे संत भोजाजी महाराज यांचे समाधी मंदिर हे विदर्भातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थान मानले हाते. महाराजांच्या या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी खासकरून प्रत्येक बुधवारी व रविवारी विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५०,००० हून जास्त भाविक येतात. याशिवाय नवसपूर्तीसाठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या बुधवारी व रविवारी किमान ५०० ते १००० कुटुंबांकडून मंदिर परिसरात चुलीवर पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो व देवाला नैवेद्य दाखविले जाते. पुरणपोळीच्या नैवेद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाचा समावेश ‘केंद्रीय प्रसाद योजने’त झाला असून त्यामुळे पुढील काळात शेगाव, शिर्डी व पंढरपूरप्रमाणे या तीर्थक्षेत्राचा विकास होणार आहे.
आजनसरा हे गाव नागपूर–हैदराबाद महामार्गावरील वडनेरनजीक आहे. विठ्ठलाचे परमभक्त असलेले संत भोजाजी महाराज यांचे हे गाव. याच गावात भोजाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. येथे राहणाऱ्या देवाजी महाराजांनी १९५५ पासून चैत्र द्वादशीला भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. आज ७० वर्षांनंतरही उत्सवाची ही परंपरा कायम आहे. या उत्सवाच्यावेळी सुमारे २ लाख भाविकांची येथे उपस्थिती असते. या समाधीस्थळी आजही भोजाजी महाराजांचे वास्तव्य आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भोजाजी महाराजांची महती दिवसेंदिवस वाढत असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही दररोज हजारोंनी वाढ होत आहे.
भोजाजी महाराज मंदिरात पुरणपोळीच्या नैवेद्याची परंपरा नेमकी कधी आणि कुणी सुरू केली, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी एका भक्ताच्या स्वप्नात भोजाजी महाराज आले आणि त्यांनी पुरणाच्या नैवेद्याचा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासूनच याठिकाणी पुरणपोळीच्या नैवेद्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार नवसपूर्तीनंतर येथे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. प्रत्येक बुधवारी येथे साधारणतः ५,००० किलो व रविवारी ७,००० किलो डाळीचे पुरण शिजविले जाते. येथील नोंदींनुसार प्रत्येक महिन्याला भाविकांकडून सुमारे ४५,००० ते ५०,००० किलो डाळीचे पुरण शिजविण्यात येते.
१० ते १२ वर्षांपूर्वी या मंदिर परिसरात फारशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे पुरणाची डाळ परंपरागत पद्धतीने म्हणजे पाटा–वरवंट्यावर वाटली जात असे; परंतु भक्तांची वाढती संख्या आणि पुरणाचे वाढलेले प्रमाण यामुळे देवस्थान समितीतर्फे येथे पुरण वाटण्याची आधुनिक यंत्रे लावली आहेत. अत्यल्प शुल्क घेऊन भाविकांना यांतून पुरण वाटून घेता येते. हे पुरण शिजविण्यासाठी रविवारी आणि बुधवारी संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक येथे येतात. या मंदिर परिसरात सध्या स्वयंपाकासाठी १० शेड बनविण्यात आल्या आहेत. त्यातील प्रत्येक शेडमध्ये १०० चुली पेटतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एका दिवशी १,००० हून जास्त चुली पेटविण्याची येथे सोय असूनही भाविकांना यासाठी आधीच नोंदणी करून घ्यावी लागते. त्यासाठी प्रतीक्षा यादीही असते. याशिवाय दर बुधवारी व रविवारी भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी व पुरणाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी हजारो भाविकांची मांदियाळी येथे उपस्थित असते.
आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांचे समाधी स्थळ हे सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशा रचनेचे आहे. सभामंडपासमोर कमानीयुक्त प्रवेशद्वार आहे. त्यातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातून भोजाजी महाराजांचे केवळ मुखदर्शन घेता येते. सभामंडपात राधा–कृष्ण व गणेश यांच्या मूर्ती आहेत. मंदिराला लागून मागच्या बाजूला बांधलेल्या मोठ्या दर्शन रांग मंडपातून भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची सुविधा आहे. दर बुधवारी व रविवारी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे रांगेतून दर्शन घेण्यासाठी साधारणतः एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. गर्भगृहात भोजाजी महाराज यांची मूर्ती व त्यामागे घोड्याचे शिल्प आहे. या मंदिर परिसरात ४ मजली भव्य प्रसादालयाची इमारत असून एकावेळी १,००० ते १,५०० भाविकांची पंगत येथे बसू शकते. बुधवारी व रविवारी दिवसभर अशा पंगती सुरू असतात व त्यात ५०,००० ते ६०,००० भाविक पुरणपोळीसह महाप्रसादाचे ग्रहण करतात.
महाराष्ट्र सरकारतर्फे या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देण्यात आला होता; परंतु मंदिरावर असलेली लाखो भाविकांची श्रद्धा व वाढत्या लोकप्रियतेमुळे २०२३ मध्ये या मंदिराचा समावेश केंद्रीय प्रसाद योजनेत झाला आहे. शेगाव, शिर्डी, पंढरपूरप्रमाणे विदर्भातील कोराडी येथील जगदंबा मंदिराचा या योजनेत याआधी समावेश झालेला आहे. प्रसाद योजना म्हणजे तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि आध्यात्मिक संवर्धन ड्राईव्ह ही योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे राबविण्यात येते. त्यातून देवस्थानाला थेट १०० कोटींचा निधी उपलब्ध होतो. त्यामुळे पुढील काळात या देवस्थानाच्या परिसरात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे.
मंदिर परिसरात पूजा–साहित्य विक्रीची स्थायी स्वरूपातील ५० हून अधिक दुकाने आहेत, तर प्रत्येक बुधवारी व रविवारी येथे जत्रेचे स्वरूप आलेले असते. त्यावेळी या दुकानांची संख्या २५० ते ३०० इतकी असते. याशिवाय भोजाजी महाराज पुण्यतिथीलाही येथे यात्रोत्सव असतो. भोजाजी महाराज देवस्थानाच्या वतीने येथे आरोग्य केंद्र चालविले जाते. यामध्ये भाविकांना अल्प दरात आरोग्याची तपासणी व उपचार करता येतात.