हिंदू पुराणानुसार भगवान विष्णूचा नरसिंह अथवा नृसिंह हा चौथा अवतार मानला जातो. या अवतारात परमेश्वराने हिरण्यकश्यपूचा अर्धमानव आणि अर्धसिंह अशा उग्र रूपात वध केला होता. भक्तांवर आलेल्या संकटात त्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या आणि दुष्टांचा विनाश करणाऱ्या भगवान नरसिंहाचे हे रूप अत्यंत प्रभावी मानले जाते. हिरण्यकश्यपूला मारून देवाने भक्त प्रल्हादाचा उद्धार केला, म्हणूनच नरसिंह देवास भक्तांचा ‘उद्धारकर्ता’ मानले जाते. या देवाची महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी प्रसिद्ध देवालये आहेत. याच साखळीतील एक महत्त्वाचे आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नांदेड जिल्ह्यातील शंखतीर्थ येथील नरसिंह मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
शंखतीर्थ येथील हेमाडपंती शैलीचे हे दगडी बांधकाम असलेले मंदिर सुमारे तेराव्या शतकातील असल्याचे जाणकारांचे मत आहे. येथील नदीत सापडणाऱ्या उजव्या मुखाच्या शंखामुळे या गावास ‘शंखतीर्थ’ हे नाव पडले असावे. मंदिरातील नक्षीदार स्तंभांवर उलटे नागशिल्प कोरलेले आहे. हे बदामीच्या चालुक्य राजघराण्याचे राजचिन्ह असल्याने हे मंदिर चालुक्य काळातील असल्याचे सिद्ध होते. काही तज्ञांच्या मते, हे मंदिर चालुक्य वंशातील राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकिर्दीत म्हणजेच बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले गेले आहे.
गावाच्या प्रवेशद्वारावर सिमेंट काँक्रिटने बांधलेली मंदिराची आधुनिक पद्धतीची स्वागतकमान आहे. या स्वागतकमानीच्या दोन्ही बाजूस दोन चौकोनी स्तंभ व त्यावरील तुळईवर घुमट आहे. गावातून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्की सडक आहे. मंदिराभोवती कोरीव दगडात बांधलेली सुमारे सात फूट उंच व दोन फूट रुंद अशी भक्कम तटबंदी असून या तटबंदीत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. रस्त्यांपेक्षा खोलगट असलेल्या मंदिराच्या पेव्हर ब्लॉकने आच्छादित प्रांगणात उतरण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेल्या नऊ पायऱ्या आहेत.
सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा खालील बाजूस असलेल्या सभामंडपात येण्यासाठी दोन पायऱ्या आहेत. सभामंडपाचा प्रवेशद्वाराकडील भाग काहीसा अरुंद आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपात बाह्य बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात समोरील बाजूला असलेले दोन नक्षीदार स्तंभ कक्षासनांत आहेत. तसेच सभामंडपात पुढे प्रत्येकी तीन नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. त्यापैकी बाह्य बाजूचे स्तंभ कक्षासनांत आहेत. येथील स्तंभपाद व स्तंभदंड चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी तसेच गोलाकार अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. शीर्षभागी कणी व त्यांवर हस्त आहेत. हस्तांवर शीर्षासने व नागशिल्पे आहेत. ही बदामीच्या चालुक्य राजघराण्याची निशाणी असल्याचे सांगितले जाते. सभामंडपाच्या वितानावर म्हणजेच छतावर चक्राकार नक्षी आहे.
पुढे बंदिस्त स्वरूपाच्या मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या पहिल्या तीन द्वारशाखांवर पर्णलता व पुष्पलता यांची नक्षी आहे. पुढील दोन स्तंभशाखांवर विविध भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत.
द्वारशाखेच्या तळाशी चंद्रशीला व दोन्ही बाजूस कीर्तिमुख शिल्पे आहेत. उत्तरांगावर शिखरशिल्पांचे तोरण आहे. मुख्य सभामंडपात प्रत्येकी तीन नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. वितानावर चक्राकार नक्षी व झुंबर साकारलेली आहेत. येथील स्तंभदंडातील चौकोनी भागावर चारही बाजूंना रामायण-महाभारतातील प्रसंग, देवी-देवता व कीर्तिमुखे कोरलेली आहेत. एका स्तंभावर हिरण्यकश्यपूचे पोट फाडणारा नृसिंह कोरलेला आहे.
पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या पहिल्या द्वारशाखा सपाट व बाजूच्या स्तंभशाखा नक्षीदार आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पाषाणात कोरलेली जाळीदार वातायने आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत. त्यापैकी तीन द्वारशाखांवर पर्णलता व पुष्पलता नक्षी आहे आणि दोन स्तंभशाखांवर विविध भौमितिक आकृत्या आहेत. ललाटबिंबावर देवप्रतिमा व उत्तरांगावर शिखरनक्षीचे तोरण आहे. द्वारशाखेच्या तळाशी चंद्रशिला व दोन्ही बाजूस कीर्तिमुख शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर नृसिंहाची ध्यानमुद्रेत बसलेली शांत स्वरूपातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. देवाच्या पायाजवळ भक्त प्रल्हादाचे शिल्प कोरलेले आहे.
मूर्तीच्या प्रभावळीतील शीर्षपट्टिकेवर विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बलराम, कृष्ण व कल्की हे दशावतार कोरलेले आहेत. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे. त्यात छतावरील पावसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी प्रणाळ आहेत. गर्भगृहाचे छत घुमटाकार आहे.
नरसिंह मंदिराच्या बाजूला एक महादेव मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. फरसबंदी केलेल्या सभामंडपात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग आहे व जलधार धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. या मंदिरासमोर काही प्राचीन समाध्या आहेत.
मंदिराच्या मागील बाजूला गोदावरी नदीच्या तीरावर घाट आहे. मंदिराच्या तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून सुमारे तीस ते चाळीस पायऱ्या उतरून घाटावर जाता येते. या प्रवेशद्वारात आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी कक्ष आहेत. प्राचीन काळी जलमार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी व राजघराण्यातील व्यक्तींसाठी या प्रवेशद्वाराची रचना केली असावी. गोदावरी पात्रात नारोबा मंदिर आहे. येथे मार्कंडेय मंदिर ते शंखतीर्थ व परत अशी पाच दिवसांची गोदावरी परिक्रमा घालण्याची प्रथा आहे.
मंदिरात नृसिंह जयंती हा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देवाची ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. परिसरातील शेकडो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात.