काळू आणि डोईफोडी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले श्री क्षेत्र संगमेश्वर हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडनजीकचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. नवसाला पावणारा देव, अशी ख्याती असलेल्या येथील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून भाविक येथे येतात. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिराच्या गर्भगृहाची रचना अशा पद्धतीने केली आहे की येथे कोणताही शब्द उच्चारल्यावर त्याचा प्रतिध्वनी तीन वेळा ऐकू येतो. या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला होणाऱ्या मोठ्या उत्सवात पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभाग घेतात. मंदिराची आख्यायिका अशी की सध्या जिथे मंदिर आहे तेथे साधारणतः १९३० साली करवंदाच्या जाळ्या होत्या. येथून जवळच असलेल्या डोळपाडा या गावातील एक व्यक्ती येथून जात असताना करवंदे काढण्यासाठी जाळीत शिरला असता तेथे त्याला शिवलिंग दिसले. त्याने ते तेथून आपल्या घरी आणले व देवघरात ठेवले. मात्र, त्याच रात्री त्या व्यक्तीला महादेवांनी स्वप्नदृष्टांत देऊन शिवलिंग जेथे होते, त्याच जागेवर पुन्हा ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिवलिंग पुन्हा होते त्या जागी ठेवल्यावर या सर्व प्रकाराची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली. हे समजल्यावर डोळपाडा येथील पुरुषोत्तम मंडलिक यांनी पुढाकार घेऊन १९३१ मध्ये या जागेवर मंदिराचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हे मंदिर येथे आहे.
उजवीकडून शाई नदी आणि डावीकडून डोईफोडी नदी या दोन नद्यांचा संगम या संगम गावात होतो. या गावाचे पूर्वीचे नाव कासगाव असे होते, परंतु येथील संगमावर मंदिर बांधल्यापासून त्याच्या नावावरून संगम असे झाले आहे. शाई नदी मूळ काळू नदीला अगोदर येऊन मिळते. त्यामुळे संगम गावात येणारी नदी काळू नदी म्हणून ओळखली जाते. मूळ काळू नदीचा उगम माळशेज घाटात होतो. ही नदी पुढे टिटवाळामार्गे खाडीला जाऊन मिळते. येथून जवळच असलेल्या, शहापूर आणि मुरबाडला जोडणाऱ्या जुन्या पुलाखाली एक बारमाही झरा वाहतो. त्या झऱ्याच्या ठिकाणाला गुप्त रूपाने वाहणाऱ्या नदीचे स्वरूप मानून येथे तीन नद्यांचा (त्रिवेणी) संगम होतो, अशीही मान्यता आहे. या नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याला संगमेश्वर असे नाव पडले.
सभामंडप आणि गर्भगृह असे या छोटेखानी मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात गर्भगृहासमोरील बाजूस नंदीमंडप आहे. येथील नोंदींनुसार, त्यातील नंदीची मूर्ती शके १८६४ (सन १९४२) मध्ये शिवले येथील गो. रा. झुंजारराव यांनी बसविलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. द्वारशाखेवर नक्षीकाम करण्यात आले असून ललाटबिंबावर गणेशमूर्ती व उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहेत. सभामंडपातून सहा फूट खोल असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी सात पायऱ्या उतराव्या लागतात. गर्भगृहाच्या मध्यभागी प्राचीन शिवपिंडी आहे. शिवपिंडीच्या मागील भिंतीत तीन देवकोष्टके आहेत. त्यापैकी एकात पार्वतीची मूर्ती आहे. पिंडीजवळ शंकराचे अस्त्र त्रिशूळ असून त्यावर डमरू ठेवण्यात आलेला आहे. या गर्भगृहाची संपूर्ण दगडाची बांधणी व त्यावरील घुमट प्राचीन बांधकाम शैलीची साक्ष देतो. गर्भगृहाचे छत गोलाकार पद्धतीने निमुळते होत गेलेले दिसते. या छताखाली हवा खेळती राहावी, यासाठी दगडी भिंतींमध्ये लहान लहान खिडक्यांची योजना आहे.
मंदिराच्या सभामंडपातून नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. नदीपात्राला लागून व मंदिराच्या समोरील बाजूस प्राचीन दीपमाळ आहे. कितीही पाऊस पडला तरी ही दीपमाळ पाण्याखाली जात नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीला एक दिवसाची यात्रा असते. यावेळी गावातून पालखी मिरवणूक काढली जाते. याशिवाय प्रत्येक श्रावणी सोमवारीही येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. दररोज या मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक केले जातात. तसेच या परिसरात दशक्रिया व इतर विधी पार पडतात.
मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे मंदिराचे जुने स्वरूप कायम ठेऊन मे २०२४ पासून येथे नूतनीकरण व जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथील पीरजी योगी गणेशनाथ महाराज, टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथ महाराज, संगमेश्वर मठाचे योगी गोपीनाथ महाराज यांच्या उपस्थितीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिराचा पायाभरणी सोहळा पार पडला आहे.