हिंदू धर्मात प्रयागराज येथील गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या संगमावरील स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की या संगमावर स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते. त्याचप्रमाणे जिथे दोन किंवा अधिक नद्यांचा संगम होतो, त्या ठिकाणी साक्षात गंगेचा वास असतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून अशा पवित्र ठिकाणी प्राचीन काळापासून अनेक मंदिरे उभारली गेली आहेत. धर्माबाद तालुक्यातील संगम गावातील मंदिर हे याचेच एक उत्तम उदाहरण आहे. गोदावरी व मांजरा नद्यांच्या संगमावर वसलेल्या या मंदिरातील महादेव जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार झाला असला, तरी मूळ देवस्थान हजारो वर्षे प्राचीन असल्याचे येथील पुजारी सांगतात. मंदिराचे अंतराळ व गर्भगृहाचे दगडी बांधकाम हेमाडपंती शैलीतील असल्याने ते मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देते. काही जाणकारांच्या मते, हे मंदिर यादवकालीन असून ते सुमारे बाराव्या शतकातील असावे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की येथील शिवपिंडी दिवसागणिक कणाकणाने वाढत जाते.
नदीतीरावर असलेल्या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. येथे भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. वाहनतळापेक्षा मंदिराचे प्रांगण उंचावर असल्यामुळे येथे येण्यासाठी सुमारे २५ पायऱ्या आहेत. सुमारे वीस फूट लांबीच्या या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस कठडे आहेत. पायरीमार्गाच्या अंतिम टप्प्यावर चार चौकोनी स्तंभांवर मंडप आहे, येथून पुढे प्रांगणात प्रवेश होतो. या प्रशस्त फरसबंदी प्रांगणाभोवती भक्कम तटबंदी आहे.
प्रांगणातून पुढे आल्यावर अलिकडे बांधलेल्या सभामंडपाचे प्रवेशद्वार लागते. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाहेरील बाजूस कठडा व या कठड्यात दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपाच्या पुढील भागात एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीच्या पाठीवरील झूल, गळ्यातील गोंडे व घंटांच्या माळा अत्यंत बारकाईने कोरलेल्या आहेत. पुढे मंदिराचे प्राचीन हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बांधकाम असलेले अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व त्याच्या उत्तरांगावर शिखरशिल्पांचे तोरण कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस वातायने आहेत व छताला पितळी घंटा लटकवलेल्या आहेत.
अंतराळात डाव्या व उजव्या बाजूला खिडक्या आहेत. येथे गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई व गणपती यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत, तर उजवीकडील वज्रपीठावर पार्वती देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीवर पर्ण व पुष्पलतांचे नक्षीकाम आहे.
गर्भगृहाच्या मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी पंचफणी नाग असून त्याच्या वर छताला जलधारेसाठी अभिषेक पात्र टांगलेले आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीत खिडकी आहे. अशी समजूत आहे की पूर्वी या खिडकीतून वाहिलेले पूजा साहित्य व अभिषेक जल गर्भगृहातील या शिवपिंडीवर पडत असे. गर्भगृहाच्या बाहेरील भिंतींवर कोरीव पाषाणात विविध भौमितिक नक्षी कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या सभोवती फरशी बसवलेला प्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराच्या छताला चहूबाजूने उतरता नक्षीदार सज्जा व कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर लहान-लहान होत जाणाऱ्या पायऱ्यांच्या रचनेचे, द्रविड शैलीतील उरुशृंगी प्रकाराचे, तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरातील प्रत्येक थरात कोनांवर उभ्या शिखरांची मंदिर शिल्पे म्हणजे ‘कुट’ व मधल्या भागात आडव्या शिखरांची मंदिर शिल्पे म्हणजेच ‘शाल’ आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तुपी व त्यावर कळस आहे.
मंदिरासमोर गोदावरी नदीवर बांधीव घाट असून येथे विविध धार्मिक विधी केले जातात. घाटावर अनेक शिवलिंगे व इतर देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. या उत्सवात मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
श्रावण महिन्यात महिनाभर भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. भक्तांच्या या मांदियाळीने परिसरास जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. विविध वस्तूंची दुकाने सजल्यामुळे बाजारपेठेचे स्वरूप येते. येथील देवाला भंडारा करण्याचा नवस बोलण्याची प्रथा असल्याने मंदिरात वर्षभर भंडारे सुरू असतात. दर सोमवारी तसेच पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरावरील भाविकांची श्रद्धा आणि येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येची दखल घेऊन राज्य शासनाने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा बहाल केला आहे.