हिंदूंमधील भक्ती संप्रदाय आणि मुस्लिमांतील सुफी पंथ यांच्या अध्यात्मिक एकतेचा गजर करणारे अनेक संत आणि फकीर महाराष्ट्रात होऊन गेले. यातील वारकरी संतांमध्ये शेख महम्मद, शेख फरीद, शेख सुलतान, शेख सय्यद, चांद बोधले, अनगडशहा फकीर, लतिफ आदी मुस्लिम संतांची नावे घेता येतील. या संतांप्रमाणेच धार्मिक सलोखा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न इस्लामपूरमधील मठातून संभूआप्पा यांनी केला. बुवा फन हे मुस्लिम अवलिया त्यांचे गुरू होते. येथील मठात या गुरु–शिष्यांची समाधी मंदिरे आहेत.
येथून जवळच असलेल्या माळगाव येथे बुवा किंवा बाबा फन यांचा प्राचीन दर्गा आहे. ‘सांगली गॅझेटियर’मधील माहितीनुसार, बुवा फन यांच्या अनेक चमत्कारकथा आहेत. बुवा फन यांना नवस बोलल्यास पुत्रप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी येथे भरणाऱ्या उरूसास हजारो हिंदू–मुस्लिम भाविकांची गर्दी होते. नवसपूर्तीनंतर लोक येथे सोन्या–चांदीचे वा लाकडाचे पाळणे अर्पण करतात. संभुआप्पा हे बुवा फन यांचे शिष्य होते. त्यांच्याविषयी आख्यायिका अशी की ते मच्छिंद्रगडावरील मत्स्येंद्रनाथांचे दर्शन घेऊन कोल्हापूरला चालले होते. इस्लामपूरनजीकच्या रस्त्यावरून जात असताना त्यांना खेलजी पाटील या व्यक्तीने पाहिले व त्यास दिसले की त्यांच्या डोक्यावरील ओझे हे हवेत तरंगत आहे.
हा चमत्कार पाहून हा कोणी सिद्धपुरूष असल्याचे खेलजी पाटील यांनी ओळखले व त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांना येथेच थांबण्याचा आग्रह केला. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी ही हकीकत घडल्याचे सांगण्यात येते. खेलजी पाटील यांनी त्यावेळी सुमारे शंभर एकर जमीन दान देऊन येथे मठ उभारला. यानंतर हळुहळू संभुआप्पा यांची कीर्ती वाढत गेली. मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे येऊ लागले. संभुआप्पा त्यांना समतेचा संदेश देत असत.
संभुआप्पा यांच्या चमत्कारांच्या अनेक कथा येथे सांगितल्या जातात. एका कथेनुसार, गावातील काही लोकांनी संभुआप्पांकडे पंढरपूर वारी करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी त्या लोकांना बसल्या जागी भावसमाधी अनुभव देवून पंढरपूरची वारी घडवली होती. संभुआप्पा यांना मुस्लिम अवलिया बुवा फन यांनी शिष्यत्व दिल्याने त्या समाजातील काही व्यक्ती नाराज झाल्या होत्या. एकदा ते संभुआप्पांना जाब विचारण्यासाठी मठात आले. तेव्हा संभुआप्पांनी त्यांना कुराण लिहून दाखवले. तेव्हा त्या लोकांना संभुआप्पा हे सिद्ध असल्याची खात्री पटली व त्यांनी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली. एकदा काही विघ्नसंतोषी लोकांनी संभुआप्पा यांना खाण्यासाठी मांस शिजवून आणले होते. परंतु मांस असलेले भांडे उघडताच त्यातून जास्वंदीची फुले बाहेर पडली. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, काही समाजकंटकांनी संभुआप्पांना दगड फेकून मारले, तर त्या दगडांचे आंबे झाले.
भक्कम तटबंदी असलेल्या या मठाच्या प्रवेशद्वारावर हिंदू व इस्लाम स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस चौथरे व त्यावर नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. स्तंभांच्या पायाकडील बाजूस सिंह शिल्पे कोरलेली आहेत. त्यांच्या खाली व वर नक्षीपट्टया आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी रंगवलेली आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व आतील दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर बाशिंगी कठडा, चारही कोनांवर मिनारस्तंभ व त्यावर घुमटाकार शिखरे आहेत.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगणात विविध वृक्ष असलेल्या वाटिका आहेत. येथून पुढे गेल्यावर चार भिंतींच्या आत खाऱ्या पाण्याची विहीर आहे. याची अशी आख्यायिका आहे की एकदा संभुआप्पांच्या भक्तांनी आपले बुडते जहाज वाचवण्यासाठी त्यांचा धावा केला. तेव्हा संभुआप्पा आपल्या शिष्यांसोबत बसले होते. ते अचानक बेशुद्ध झाले. काही वेळाने ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांचा अंगरखा खाऱ्या पाण्याने भिजला होता. आपण सूक्ष्मदेहाने भक्तांच्या मदतीला जाऊन त्याचे बुडते जहाज वाचवले, असे म्हणत संभुआप्पांनी आपला अंगरखा पिळला. त्यातील खारे पाणी विहिरीत पडल्याने या विहिरीचे पाणी खारे झाले.
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला अन्नछत्र व प्रसादालय कक्ष आहे. पुढे मठाची दुसरी तटबंदी व त्यात प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला कडूलिंबाचे झाड व त्याभोवती पार बांधलेला आहे. असे सांगितले जाते की हा मठ बांधतांना मजुरांना देण्यास पैसे उरले नव्हते. तेव्हा संभुआप्पांनी त्यांना कडुनिंबाच्या झाडाच्या काड्या (लहान फांद्या) दिल्या. ज्या मजुरांनी मनापासून काम केले त्यांच्याकडील काड्या सोन्याच्या व बाकीच्यांच्या काड्या चांदीच्या झाल्या. या प्रवेशद्वाराच्या समोर खुला सभामंडप आहे. सभामंडपात प्रत्येकी पाच गोलाकार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या सभामंडपात उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सभामंडपाच्या पुढे उजव्या बाजूला बुवा फन यांचे व डाव्या बाजूला संभुआप्पा यांचे समाधी मंदिर आहे. दोन्ही मंदिरे सुमारे तीन फूट उंच जगतीवर आहेत. प्रवेशद्वारासमोर पाच चौकोनी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजुंस गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे कठडे व पुढे चौथरे आहेत.
बुवा फन यांच्या समाधी मंदिरांच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची व मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. मंदिरात जमिनीवर मध्यभागी बुवा फन यांची तुरबत आहे. तुरबतवर हिरवी चादर व भोवतीने स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे. शेजारी असलेल्या संभुआप्पा यांच्या समाधी मंदिरांच्या द्वारशाखांवरही उभ्या धारेची नक्षी व मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. मंदिरात जमिनीवर मध्यभागी संभुआप्पा यांची समाधी आहे. त्यावर भगवी चादर आणि बाजुने स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. दोन्ही समाधी मंदिरांच्या छतावर मध्यभागी घुमट व घुमटावर चांदतारा असलेले कळस आहेत. दोन्ही मंदिरांच्या छतावर चारही कोनांवर मिनारस्तंभ व त्यांवरील घुमटावर कळस आहेत.
या मंदिरांच्या प्रांगणात चांभार सोपा व सोनार सोपा अशा धर्मशाळा आहेत. त्यांमध्ये त्या–त्या समाजाच्या भाविकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. येथेच बाजूला असलेल्या अनेक ओवऱ्यांमध्येही यात्रेकरूंच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. पुढे नगारखाना आहे. सर्व उत्सवांच्यावेळी येथील नगारे वाजवले जातात. असे सांगितले जाते की याच ठिकाणी असलेल्या भांडारमाळ कक्षात संभुआप्पा ध्यानाला बसत असत. प्रांगणात दिवंगत मठाधिपती, मठासाठी जमीन दान केलेले खेलजी पाटील यांच्या समाध्या आहेत.
या मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात. आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरू पौर्णिमेला गावातील सर्व समाजाच्या दिंड्या मठात एकत्र येऊन येथे गोपाळकाला साजरा करतात. कार्तिक पौर्णिमा हा संभुआप्पांचा जन्म दिवस व पौष वद्य नवमी संभुआप्पांनी संजीवन समाधी घेतली तो दिवस. या दोन्ही दिवशी येथे उरूस भरतो. कार्तिक शुद्ध दशमीला पाच चांदण्या असलेला कशिदी मंडप उभारून व गूळ साखर वाटून येथील उरुसाला सुरवात होते. मंडपाचे मुख्य चार स्तंभ उभे करण्याचा मान समाजातील वेगवेगळ्या जातींना दिलेला आहे. त्यामुळे सर्व समाज एकोप्याने उरुसाची तयारी करतो. येथील मंडपात रोजे ठेवण्याची परंपरा आजही कायम आहे. याशिवाय येथे तुलसी विवाहही उत्साहात साजरा केला जातो. त्यावेळी संभुआप्पा व बुवा फन यांच्या समाधी मंदिरांच्या घुमटांना जोडणारा ध्वज बांधण्याची परंपरा आहे.
मंदिरांत कार्तिक शुद्ध चतुर्दशी, पौष वद्य नवमी (संभुआप्पांनी समाधी घेतल्याचा दिवस), संभुआप्पा इस्लामपुरात आले तो दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी व माघ वद्य एकादशी या चार दिवशी गंधरात्री उत्सव (उरूस) साजरा केला जातो. प्रत्येक गंधरात्रीनंतर पाखलणी म्हणजे समाधी स्थळ व मठ धुवून काढण्याचा विधी केला जातो. या वेळी सर्व जाती–धर्मांचे मानकरी उपस्थित असतात. महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी मठात मानकरी, गावकरी व भाविकांना महाभोजन देण्याची प्रथा आहे.