सांब सदाशिव मंदिर

डोंगरगाव (शिव), ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर


उंच टेकडीला नागमोडी वळसा घालत चढत जाणारा छोटा रस्ता, आजूबाजूला गर्द झाडीचा परिसर आणि वर जाताच टेकडीमाथ्यावर उभे असलेले सांब सदाशिव महादेवाचे सुंदर मंदिर हे चित्र फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव (शिव) परिसरात पाहावयास मिळते. यास तोंडेश्वर महादेव मंदिर, असेही म्हटले जाते. आगळीवेगळी शाळुंका असलेली शिवपिंड आणि याच बरोबर सांब सदाशिव मंदिराच्या बाजूला असलेले नरसिंह महादेवाचे मंदिर ही येथील दोन खास वैशिष्ट्ये आहेत. भगवान शंकर आणि विष्णूचा अवतार असलेला नरसिंह हे एकत्र असणे ही दुर्मीळ बाब मानली जाते

सांब सदाशिव हे महादेवाचे एक नाव आहे. धर्मशास्त्रानुसार सांब सदाशिव याचा अर्थ उमापार्वती अर्थात अंबेसह शंकर असा होतो. या नावामध्ये शिव आणि शक्ती यांचे सहचर्य दर्शविले आहे. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी रचलेल्याशिव स्वर्णमाला स्तुती मंत्रा सांब सदाशिवाचे स्तवन केले असून त्याचा प्रारंभसाम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम्या पंक्तीने करण्यात आलेला आहे. हाराष्ट्रात गावोगावी शंकराची मंदिरे आहेत; परंतु सांब सदाशिव या नावाने संबोधल्या जाणाऱ्या महादेवाची मंदिरे मोजकीच आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डोंगरगाव (शिव) येथील हे मंदिर त्यातीलच एक आहे. या मंदिरात शिवभक्तांची नेहमीच गर्दी असते. शिवाय त्याच्या निसर्गरम्य स्थानामुळे ते एक पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे.

हे मंदिर उंच टेकडीवर असल्यामुळे या परिसरातून कुठूनही त्याचे दर्शन होते. डोंगरगावपासून काही अंतरावर मंदिराकडे जाण्याची वाट लागते. तेथील उंच लोखंडी वेशीतून काही अंतर गेल्यानंतर सर्वप्रथम गणपतीचे मंदिर लागते. अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह, त्यावर उंच शिखर अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात उंच चौथऱ्यावर मूषकाची दगडी मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपीठावर गणेशमूर्ती विराजमान आहे. तेथे दर्शन घेऊन आणखी वर आल्यानंतर वाहने पार्क करण्यासाठीची जागा आहे. तेथून मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. शिवाय हा रस्ताही थेट मंदिरापर्यंत जातो. पायऱ्या सुरू होतात तेथेच बाजूला विठ्ठलरुक्मिणीचे एक छोटे मंदिर आहे.

टेकडीमाथ्यावरील कातळावर बांधलेल्या उंच जोत्यावर सांब सदाशिव महादेवाचे हे प्राचीन मंदिर आहे. फाल्गुन वद्य पंचमी, शके १९३३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर मोठे होमकुंड आहे. तीन पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपास चार मोठे खांब असून ते महिरपी कमानींनी जोडलेले आहेत. त्याच्या समतल छतावर एक मोठी शिवपिंडी आहे त्यावर फणा उभारलेल्या नागाची मूर्ती आहे

मुखमंडपातून एका कमानदार प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. नव्याने बांधण्यात आलेल्या या चौरसाकृती सभामंडपातील स्तंभांवरून त्याची मूळची स्थापत्यशैली लक्षात येते. चौकोनी मंडपाच्या भिंतीत दोन्ही बाजूंना चारचार स्तंभ आहेत. त्या पुढे काही जागा सोडून तीनतीन रुंद चौकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या मधील जागेमध्ये अखंड पाषाणातून कोरलेला उंच नंदी आणि कासवमूर्ती आहेत. प्रवेशद्वारासमोर लावलेल्या रेलिंगमुळे थेट सभामंडपात जाता येत नाही. या दरवाजातून डाव्या उजव्या बाजूने गर्भगृहाच्या दारात रांगेने जाण्यायेण्यासाठी रेलिंगने आखलेला मार्ग आहे. गर्भगृहासही महिरपी कमान असलेले प्रवेशद्वार आहे. तेथून पायरी उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. येथे मध्यभागी जमिनीपासून खाली असलेल्या स्टिलचे लहान रेलिंग लावलेल्या चौकोनात शिवपिंडी आहे. या पिंडीची शाळुंका मीनाकृती आहे दंडगोल लिंगावर फणा उभारलेल्या नागाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाजूस गणेशाची मूर्ती आहे

सर्वसाधारणतः मंदिराच्या गर्भगृहावर शिखर उभारलेले असते. मात्र या सांब सदाशिव महादेव मंदिराच्या गर्भगृहाचा बाह्य आकार पाहिल्यास असे वाटते की येथे शिखर जणू जमिनीपासूनच उभारण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने गर्भगृह आणि शिखर एकमेकांत मिसळून गेलेले आहे. गर्भगृहासह या पाच स्तरीय शिखराच्या मधल्या तीन स्तरांवर चारी बाजूने देवळ्या आहेत, तर त्याच्या वरच्या स्तरावर सर्व बाजूंनी ऊरुशृंग पद्धतीची म्हणजे एकावर एक बसवलेली शिखरे आहेत. वर द्विस्तरीय सोनेरी आमलक त्यावर कळस आहे. मंदिराच्या सभामंडपावरही गोलाकार शिखर आहे.

या मंदिराच्या बाजूला एका बैठ्या इमारतीत नरसिंह महादेव मंदिर आहे. आत शंकराची ध्यानमग्न मूर्ती असून त्या शेजारी हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असलेल्या नरसिंहाची मूर्ती आहे. अत्यंत निसर्गरम्य अशा टेकडीवर असलेल्या या सुंदरशा मंदिरात दर श्रावणी सोमवारी, तसेच महाशिवरात्रीस भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीस मंदिर परिसरास यात्रेचेच स्वरूप प्राप्त होते. अनेकदा येथे परिसरातील प्राथमिक शाळांच्या एक दिवशीय सहलीही येत असतात. या सांब सदाशिव महादेव मंदिरावर अनेकांनी गीतेही रचली आहेत

उपयुक्त माहिती

  • फुलंब्रीपासून १२ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ४० किमी अंतरावर
  • डोंगरगावी येण्यासाठी फुलंब्रीहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : गणेश महाराज, मो. ७६६६५८४३५१
  • किरण गुरुजी, मो. ९५४५१३८६२१
Back To Home