समर्थ समाधी मंदिर / श्रीराम मंदिर

सज्जनगड, ता. सातारा, जि. सातारा

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेला त्यांचे समाधी स्थान असलेला सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हा किल्ला प्रसिद्ध आहे. विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये जिंकून घेतला रामदास स्वामींनी या किल्ल्यावर वास्तव्य करावे, अशी विनंती केली. आधी पायथ्याशी असलेल्या परळी गावावरून परळीगड असे नाव असलेल्या या गडाचे समर्थांच्या वास्तव्यानंतर छत्रपतींनी सज्जनगड असे नामकरण केले.

सातारा शहराच्या वायव्येकडे सज्जनगड किल्ला आहे. हा परिसर पूर्वी अश्वलायन ऋषींची तपोभूमी असल्याने या गडाचे प्राचीन नाव अश्वलायन गड असे होते. ११व्या शतकात शिलाहार राजाने या किल्ल्याची बांधणी केली आणि पायथ्याशी असणाऱ्या परळी गावामुळे याला परळीगड हे नाव दिले. १३५८ ते १३७५ या काळात चौथ्या बहामनी राजाच्या ताब्यात हा किल्ला होता. विजापूरचा आदिलशहा बहामनी राज्याचा वारसदार असल्यामुळे काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्याच्या कार्यकाळात यालानवरसताराअसे नाव दिले गेले होते. एप्रिल १६७३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला.

या किल्ल्यात अधूनमधून समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य असे. वाढत्या वयामुळे समर्थांनी कायमस्वरूपी या किल्ल्यात वास्तव्य करावे, अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना केली. समर्थांच्या होकारानंतर १७७६ मध्ये येथील किल्लेदार जिजोजी काटकर यास पत्र लिहून समर्थांची चोख व्यवस्था ठेवण्याची आज्ञा केली. समर्थ येथे वास्तव्यास आल्यानंतर या किल्ल्याचे नाव बदलून सज्जनगड असे करण्यात आले. सहा वर्षांच्या वास्तव्याने हा गड पावन करून समर्थांनी २२ जानेवारी १६८२ या दिवशी सज्जनगडावर आपला देह ठेवला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छत्रपती संभाजी महाराजांनी येथे श्रीराम मंदिर समर्थ समाधी मंदिर बांधले होते.

समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर सज्जनगड किल्ला आहे. किल्ल्याच्या सर्व बाजूंनी दरी असून पायथ्याशी काही गावे आहेत. यापैकी गजवडी गावातून सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. तेथून गडावर पोचण्यासाठी सुमारे २५० पायऱ्या आहेत. गजवडी येथून सज्जनगडावर जाणारी जुनी पायवाटही आहे. पायरी मार्गावर प्रथम एक कामधेनू मंदिर आणि त्यासमोर एक हनुमान मंदिर आहे. पायथ्यापासून १३० पायऱ्या चढून आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार लागते. उंच आणि रेखीव बुरुजांमधील या महाद्वारापासून आणखी ५० पायऱ्या चढल्यावर आणखी एक दरवाजा आहे. त्यालासमर्थ महाद्वारअसे नाव आहे. महाद्वारे रात्री ते सकाळी यादरम्यान बंद असतात.

समर्थ महाद्वारातून पुढे आल्यावर गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो. डाव्या बाजूला असलेल्या घोडाळे तलावाशेजारी गडाच्या एका टोकाला आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे या मंदिरातील देवीची स्थापना समर्थांनी केलेली आहे. ही मूर्ती समर्थांना अंगापूर येथील एका डोहात सापडली होती. या डोहामध्ये त्यांना श्रीराम आणि आंग्लाई देवी या दोन मूर्ती सापडल्या होत्या. त्यापैकी श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळमध्ये आणि आंग्लाई देवी मूर्तीची सज्जनगडावर स्थापना केली. देवीची ही मूर्ती सुबक अखंड काळ्या पाषाणातील आहे.

आंग्लाई देवी मंदिरापासून पुन्हा पायऱ्यांच्या मुख्य वाटेवरून पुढे गेल्यानंतर डाव्या पेठेतील मारुती मंदिर (पूर्वी येथे पेठ असावी) आहे. असे सांगितले जाते की समर्थ गडावर राहण्यासाठी आले त्याआधीपासून हे मंदिर आहे. मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की या मारुतीचे तोंड उघडे आहे. मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारेसोनेरे तळेआहे. या तलावामध्ये उत्तर बाजूस काही प्राचीन गुंफा आहेत. तलावातील पाण्याची पातळी कमी असल्यास त्या दिसतात. सज्जनगडाचा संपूर्ण माथा हा शंखाच्या आकाराचा आहे.

पेठेतील मारुती मंदिराच्या बाजूला समर्थांचे शिष्य श्रीधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेली श्रीधर कुटी आहे. श्रीधर स्वामींचे शिष्यगण श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या सदस्यांनी १९५१ साली या कुटीचे बांधकाम केले होते. या कुटीमध्ये समर्थ रामदास स्वामी श्रीधर स्वामी यांच्या पादुकांचे मंदिर आहे. श्रीधर कुटीतील या पादुकांची दररोज सकाळी ते .३० या वेळेत अभिषेक पूजा होते. त्यानंतर आरती झाल्यावर तीर्थप्रसादाचे वाटप होते. १९५० पासून मंदिरात होणारी उपासना २००१ पासून सायंकाळी ते .१५ या वेळेत श्रीधर कुटीत होते. या उपासनेनंतर आरती होऊन आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

गडावरील मुख्य वास्तू म्हणजे येथील श्रीराम मंदिर आणि समर्थांची समाधी. श्रीराम मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती तंजावरमधील अरणीकर नावाच्या अंध कारागिराकडून बनवून घेऊन व्यंकोजीराजे यांनी समर्थांना भेट दिल्या होत्या. या मूर्तींसोबतच रामदास स्वामींची एक छोटी मूर्ती येथे आहे. श्रीराम मंदिरातील गर्भगृहाच्या तळघरात समर्थांची समाधी आहे. ही समाधी काळ्या पाषाणाची आयताकृती असून त्यावर असलेल्या पितळी मेघडंबरीवर कोरीवकाम आहे. असे सांगितले जाते की या समाधीच्या जागेवर पूर्वी खड्डा होता. तेथे समर्थ रामदास स्वामींच्या पार्थिवावार शिष्य उद्धव स्वामींनी अग्निसंस्कार केल्यावर दुसऱ्या दिवशी या जागेवर ही दगडी समाधी प्रगट झाली. त्यामुळे ही समाधी स्वयंभू मानली जाते. समाधी मंदिरात दिवे लावण्यासाठी १०८ कोनाडे आहेत.

श्रीराम मंदिराच्या उजव्या बाजूला उंच जोत्यावर समर्थांचे शेजघर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांच्या वास्तव्यासाठी बांधून दिलेला हाच तो मठ. या मठामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याठिकाणी आता त्यांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यात शिवाजी महाराजांनी समर्थांना दिलेला पितळी खूर असलेला पलंग असून या त्यावर समर्थांचे शिष्य तंजावरचे मठाधीपती मेरुस्वामी यांनी समर्थांना पाहून काढलेले चित्र आहे. समर्थांच्या शस्त्रांमध्ये शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडीतील गुप्ती, एक नक्षीदार कुबडी, वेताची काठी आणि सोटा या वस्तू आहेत. याशिवाय समर्थांच्या नित्य वापरातील पिण्याच्या पाण्याचा लोटा, पानाचा डबा पिकदाणी आहेत. उरमोडी धरणातून समर्थ रामदासांसाठी त्यांचे शिष्य कल्याणस्वामी ज्या हंड्यांमधून पाणी आणत ते तांब्याचे हंडेही येथे आहेत. मुख्य मंदिरासमोर असलेल्या अशोकवनात समर्थांच्या शिष्या अक्कास्वामी यांचे वृंदावन आहे. रामदास स्वामींनी देह ठेवल्यानंतर सज्जनगडावरील मठ मंदिरांची व्यवस्था या अक्कास्वामींनी २९ वर्षे सांभाळली होती.

मंदिर प्रांगणातून गडाच्या पश्चिम बाजूला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर उजवीकडे गडाच्या अगदी टोकावर एका चौथऱ्यावर हनुमान मूर्ती आहे. येथून पुढे धाब्याचा मारुती मंदिर आहे. या मारुती मंदिराची उभारणी समर्थांनीच केलेली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या शत्रूचे धाबे दणाणून सोडणारा म्हणून याचे नामकरण समर्थांनी धाब्याचा मारुती असे केले होते.

गडावर भाविकांच्या सोयीसाठी भक्तधाम कल्याण स्मृती या दोन बहुमजली भक्त निवास इमारती बांधण्यात आल्या आहेत. यामध्ये गडावर निवास करणाऱ्या भाविकांसाठी मोफत राहण्याची सुविधा आहे. समर्थ सेवा मंडळातर्फे १९६० पासून येथे सुरू असणारे अन्नदान २००१ पासून भक्त निवासाच्या प्रशस्त सभामंडपात केले जाते. यामध्ये भाविकांना सकाळी चहा नाश्ता, दुपारी रात्री महाप्रसादाची सोय असते. दरवर्षी दासनवमी उत्सवामध्ये प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसांत भक्त निवासाच्या सभामंडपात मनाचे श्लोक दासबोधाचे पारायण केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून १८ किमी अंतरावर
  • सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • गडावर निवास न्याहरीची व्यवस्था
  • संपर्क : मंदिर कार्यालय : ०२१६२ २७८०१९
Back To Home