समर्थ धोंडू तात्या समाधी मंदिर

डोंगरशेळकी, ता. उदगीर, जि. लातूर

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात डोंगरशेळकी हे क्षेत्र वसले आहे. येथील श्री समर्थ धोंडू तात्या समाधी मंदिर हे या परिसरातील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन क्षेत्र मानले जाते. या मंदिराच्या माध्यमातून मानवसेवा, आध्यात्मिक आणि ग्रामीण विकासाचे विविध उपक्रम राबवले जातात. शासनाने या क्षेत्राला ‘ब’ दर्जाच्या पर्यटन स्थळाची मान्यता दिलेली आहे. हे क्षेत्र भाविकांमध्ये ‘प्रतिपंढरपूर’ या नावाने ओळखले जाते. संपूर्ण मराठवाडा तसेच लगतच्या कर्नाटक व तेलंगणा या सीमावर्ती भागातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.

लातूर जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांच्या खोऱ्यात अश्मयुगीन मानवी संस्कृतीच्या खुणा सापडतात. इसवीसनाच्या सातव्या व आठव्या शतकात हा संपूर्ण परिसर बदामीच्या चालुक्य राजवंशाच्या अधिपत्याखाली होता. चालुक्य आणि त्यानंतरच्या देवगिरीच्या यादवांच्या काळातील अनेक प्राचीन मंदिरे या भागात आजही पाहायला मिळतात. उदगीरचा भुईकोट किल्ला आणि खरोसा येथील प्राचीन कोरीव लेणी त्याच ऐतिहासिक काळाची साक्ष देतात.

या प्रदेशात वारकरी संत विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री समर्थ धोंडू तात्या महाराज याच परंपरेतील एक संत होते. डोंगरशेळकी येथील त्यांची संजीवन समाधी नव्वद वर्षांपेक्षा अधिक प्राचीन आहे. धोंडूतात्या महाराजांचा जन्म एका वारकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई होते. इसवी सन १८४६ मध्ये कौटुंबिक अडचणींमुळे त्यांचे मामा बापुराव महाराज माळी पाटील यांनी धोंडूतात्या आणि त्यांच्या मातोश्रींना जळकोट तालुक्यातील विराळ या गावी आणले. मामांना स्वतःची संतती नसल्यामुळे त्यांनी धोंडूतात्यांना दत्तक घेतले. तात्यांनी आपली आई, मामा आणि मामी यांची अखंड सेवा केली. तारुण्यात पाऊल ठेवताच संसाराच्या मोहात न पडता त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला. शारीरिक आणि मानसिक निग्रहासाठी ते दररोज नियमित व्यायाम, योगासने आणि सूर्यनमस्कार करत असत. ते दररोज नियमाने बाराशे गायत्री मंत्रांचा जप करत असत. त्यांच्या या आचरणामुळे त्यांची तुलना भीष्माचार्यांशी केली जात असे.

त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांना महान संतांचे मार्गदर्शन लाभले. संत सखाराम महाराज यांच्या भेटीमुळे त्यांच्या पारमार्थिक विकासाला गती मिळाली. ते उदगीर जवळील एका टेकडीवर राहून विठ्ठल नामाचा जप करू लागले. तेथेच त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. परमेश्वरी दृष्टांतानुसार त्यांनी लोकप्रबोधनाचे कार्य केले. समाजातील अंधश्रद्धा व कुप्रथा दूर करून लोकांना भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. रंजल्या-गांजल्यांची सेवा हेच व्रत त्यांनी आयुष्यभर अंगीकारले. जनकल्याणासाठी त्यांनी प्रसंगी चमत्कारही केले. एकदा परिसरात तीव्र दुष्काळ पडला होता. पाण्याविना माणसे आणि गुरेढोरे तडफडू लागली होती. त्यावेळी महाराजांनी एका जागेवर पाऊल ठेवले आणि तेथे विहीर खोदण्यास सांगितले. लोकांनी विहीर खोदली. त्या विहिरीला मुबलक पाणी लागल्याने संपूर्ण परिसराची तहान भागली. महाराज डोंगरावर तपस्या करत तेव्हा त्यांच्या आसपास हिंस्र श्वापदे शांतपणे बसून राहत. महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या अनेक भाविकांचे आजार केवळ आशीर्वादामुळे बरे होत असत.

डोंगरशेळकी येथील एकादशी उत्सवाची एक आख्यायिका सांगितली जाते. विठ्ठलाचे परमभक्त समर्थ धोंडूतात्या महाराज दरवर्षी पंढरपूरची वारी करत असत. वृद्धापकाळात महाराजांना ही वारी करणे कठीण झाले. आपल्या भक्ताची पीडा पांडुरंगाला पाहवली नाही. त्यांनी महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला की “यापुढे पंढरीस येणे करू नये. दर एकादशीला आम्ही स्वतः डोंगरशेळकी येथे येऊ.” त्यानंतर दर एकादशीला डोंगरशेळकी येथे एकादशीचा उत्सव सुरू झाला.

महामार्गावरून डोंगरशेळकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची स्वागतकमान आहे. कमानीच्या स्तंभांवरील सज्जावर असलेल्या मेघडंबरीत समर्थ धोंडू तात्यांची मूर्ती आहे. तिच्या दोन्ही बाजूंना संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी व इतर साधू-संतांची शिल्पे कोरलेली आहेत. येथून काही अंतरावर समाधी मंदिर देवस्थान आहे. मंदिरासमोर वाहनतळ असून, तेथे पूजासाहित्याची दुकाने आहेत.

समाधी मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराला तीन पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना कठडे आहेत. प्रवेशद्वारात नक्षीदार द्वारशाखा आणि वर महिरपी तोरण आहे. सभामंडपात एकाच वेळी शेकडो भाविक बसू शकतात. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूंनी भिंती आहेत तर मध्ये चौकोनी स्तंभाच्या दोन रांगा आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार उंचावर आहे आणि त्याला दोन पायऱ्या आहेत. गर्भगृहात महाराजांच्या समाधीचा चौथरा आहे. चौथऱ्यावर धोंडू महाराजांची ध्यानस्थ मूर्ती सहजासनात बसलेली आहे. वस्त्रे परिधान केलेल्या महाराजांच्या डोक्यावर रेशमी फेटा आहे. समाधीचा चौथरा आणि मागील प्रभावळ चांदीची आहे. त्यावर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणामार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार उंच आणि वर निमुळते होत गेलेले शिखर आहे.

समाधी मंदिरासमोर प्रांगणात सूर्यनारायण मंदिर आहे. या मंदिरात वज्रपीठावर सप्तअश्वरथारूढ सूर्यदेवाची मूर्ती आहे. समाधी मंदिराच्या मागील बाजूस हनुमान मंदिर आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आणि मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती प्रतिष्ठित आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे शिखर असून शिखराच्या प्रत्येक थरात आठ देवकोष्टके आहेत. त्यांमध्ये देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेली आहेत. प्रांगणात मरीआई आणि पोचम्मा देवी यांची स्थाने आहेत. मंदिरसमोरील प्रांगणात मंगल कार्यालयाची इमारत आहे. मंगल कार्यालयाच्या स्वागतकमानीवर दोन्ही बाजूंना गजराज शिल्पे आणि मधोमध गणपतीची मूर्ती आहे. अन्नछत्रात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अन्नदान केले जाते.

आषाढी एकादशी हा येथील वार्षिक उत्सव आहे. या वेळी सुमारे दोन ते अडीच लाख भाविक समाधीच्या दर्शनासाठी येतात. गावोगावच्या पायी दिंडी यात्रा डोंगरशेळकी येथे दाखल होतात. संपूर्ण परिसर भगव्या पताका आणि “जय हरी विठ्ठल” या नामसंकीर्तनाने व्यापून जातो. जत्रेच्या दिवशी पहाटे ५ वाजता पहिली शासकीय महापूजा स्थानिक प्रशासकीय प्रमुख, उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या हस्ते पार पडते. या महापूजेदरम्यान वारकरी संप्रदायातील सामान्य दांपत्यांना पूजेचा मान देऊन सामाजिक समतेचा संदेश दिला जातो. यात्रेकरूंच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या उदगीर आगाराकडून विशेष व्यवस्था केली जाते. यात्रेकरूंसाठी मंदिर प्रशासनासोबतच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मोफत फराळ, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. मंदिरात हनुमान जयंती, शारदीय नवरात्री, दसरा, दिवाळी, श्रावण मास, कार्तिकी एकादशी तसेच दर महिन्याच्या पौर्णिमा व एकादशीला भजन-कीर्तनाचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. दररोज सकाळी ५.३० वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात समर्थ धोंडू तात्यांच्या समाधीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • उदगीर येथून १२ किमी अंतरावर
  • लातूर शहरापासून ८० किमी अंतरावर
  • उदगीर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : राजू महाराज, पुजारी, मो. ७७९८४९१७३२

समर्थ धोंदु तात्या समाधि मंदिर

डोंगरशेल्की, तालुका उदगीर, जिला लातूर

Back To Home