संत गोरोबा काका समाधी मंदिर
कालेश्वर मंदिर

तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव

साधू, संत, संन्यासी, तपस्वी व योगी हे आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी व्यतित करतात. त्यांची शिकवण सामान्य माणसांच्या जीवनात असामान्य बदल घडवून आणतो. आयुष्यातील दुःख, दारिद्र्‌य व अज्ञान दूर करणारी त्यांची शिकवण चिरकाल स्मरणात रहावी म्हणून अशा विभुतींची समाधी मंदिरे बांधली जातात. संत गोरोबाकुंभार अशा महान संतांपैकी एक होते. त्यांनी संत नामदेवांना उपदेश केला. ते संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. तेर येथे तेराव्या शतकात संत समागम सभा भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
संत गोरोबा काका यांचा जन्म १२६७ साली झाला. त्यांचे वडील येथील कालेश्वर महादेवाचे निःसीम भक्त होते. विठ्ठलभक्त गोरोबा काका यांचा अध्यात्मात इतका अधिकार होता की तेर येथील संत सभेत संतांची परीक्षा पाहण्याची कामगिरी मुक्ताबाईंनी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी प्रत्यक्ष नामदेवांना ‘नाम्या तुझे मडके कच्चे आहे, गुरु कर’ असा सल्ला दिला होता. २० एप्रिल १३१७ साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. गोरोबा काका यांचे समाधी मंदिर त्यांच्या पश्चात त्यांचे भक्त बापूजी पाटील यांनी चौदाव्या शतकात बांधले. सहाशे वर्षांपूर्वीच्या या समाधी मंदिराचे सौदर्य आजही कायम आहे.
कालेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात गोरोबा काकांचे समाधी मंदिर आहे. सभामंडप व अंतराळ अशी मंदिराची संरचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपाची समोरील बाजू खुली आहे. चार चौकोनी स्तंभ व त्यावर तीन अर्धंचंद्राकार कमानी, अशी प्रवेशद्वाराची रचना आहे. प्रवेशद्वारात गोरोबा काकांचे परम भक्त बापूजी पाटील यांची मूर्ती व पाषाणपादुका आहेत. सभामंडपात प्रत्येकी दहा चौकोनी लाकडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात बाह्यबाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. पुढे गर्भगृह आहे व गर्भगृहाच्या दोन्ही बाजूने सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी दारे आहेत.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर छताकडे पानाफुलांची नक्षी आहे. त्यात मधोमध गोरोबा काकांचे मुखशिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पितळी आवरण व द्वारशाखेवर पर्ण आणि पुष्पलता नक्षी आहेत. ललाटबिंबावर कमळपुष्प शिल्प आहे. गर्भगृहात मध्यभागी गोरोबा काकांची समाधी व त्यावर त्यांची मूर्ती आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावरील मखरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर भूमीज शैलीतील शिखर व शिखराच्या चारही बाजूंनी बाशिंगी कठडा आहे. कठड्याच्या चारही कोपऱ्यावर अर्धस्तंभ आहेत. शिखरावर आमलकाच्या चारही बाजूंना लघूशिखरे, त्यावर आमलक व कळस आहेत. चैत्र वद्य त्रयोदशीला गोरोबा कुंभार पुण्यतिथीनिमित्त समाधी मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येतो. या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून संतदिंड्या घेऊन हजारो भाविक गोरोबा काकांच्या दर्शनाला येतात.
गोरोबा काका मंदिराशेजारी त्रिविक्रम, उत्तरेश्वर व कालेश्वर अशी तीन प्राचीन मंदिरे आहेत. कालेश्वर मंदिर नदी तीरावर गावाच्या उत्तरेला आहे. हे मंदिर सातव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. गोरोबा कुंभार यांचे वडील माधवबुवा कालेश्वराचे निःसीम भक्त होते. माधवबुवांची सात मुले मृत जन्माला आली तेव्हा त्यांनी कालेश्वराला नवस केला व जन्माला आलेला आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिला. असे सांगितले जाते की संत गोरोबाकाका स्वतः कालेश्वराच्या मंदिरात तेरणा नदीच्या पाण्याने देवाचा नित्य अभिषेक करायचे.
मंदिरास भक्कम तटबंदी आहे. जमिनीपासून या तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत २० पायऱ्या चढून यावे लागते. प्राचीन बांधणीच्या या प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व वरील बाजूस महिरपी कमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूला वैष्णव द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात भाविकांचे ऊनपावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत उभारलेले आहे. प्रांगणातील महावृक्षाच्या पारावर लहान मंदिरात मारूतीची मूर्ती आहे. या प्रांगणात दगडी बांधणीच्या ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भक्तनिवास, धर्मशाळा, अन्नछत्र यांसाठी केला जातो.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हत्ती व सिंह यांचा युद्धप्रसंग कोरलेला आहे. सिंहाने हत्तीचा पराभव केल्याचे चित्रण या शिल्पात आहे. यावरून हे दोन राजांच्या युद्धानंतर झालेले सत्तांतरण दिसून येत आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. सभामंडपातील मधल्या स्तंभावर चतुर्भुज भैरवद्वारपाल शिल्प कोरलेले आहे. याच स्तंभावर वरती वाली व सुग्रीव यांचा युद्धप्रसंग कोरलेला आहे. सभामंडपाच्या भिंतीवर पाषणात कोरलेली इतर युद्ध शिल्पे आहेत. सभामंडपात गणेशाची चतुर्भुज शेंदूर चर्चित मूर्ती आहे.
अंतराळाच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी व स्तंभनक्षी आणि मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर दोन्ही बाजूला चतुर्भुज द्वारपाल शिल्पे व वर स्तंभनक्षी आहे. ललाटबिंबावर गरुड शिल्प आहे. गर्भगृहात सध्या शिवपिंडी असली तरी हे मूळ विष्णूचे मंदिर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गर्भगृहाच्या छतावर भूमीज शैलीतील शिखर आहे. शिखरात चारही बाजूंना देवकोष्टके आहेत. शिखरावर शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या प्रांगणात अनेक शिवपिंडी व काही समाधी स्थळे आहेत. कालेश्वर मंदिराच्या बाजूला नीलकंठेश्वर महादेव मंदिर व संत गोरोबाकाका समाधी मंदिर आहे. महाशिवरात्री व श्रावण मास हे कालेश्वर मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव असतात. या वेळी दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. गोरोबा काकांच्या उत्सवानिमित्त येणारे भाविकही कालेश्वर मंदिरात आवर्जून दर्शनासाठी येतात. दररोज सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात गोरोबा काका समाधीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • धाराशिवपासून २९ किमी अंतरावर
  • धाराशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : दत्ता स्वामी, पुजारी, मो. ७६६६८५०८५७, ९३५९१०९९८९
Back To Home