साईबाबा मंदिर

कविलगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. आज देशात अनेक ठिकाणी साईबाबांची मंदिरे आहेत; मात्र त्यांचे जगातील सर्वांत पहिले मंदिर उभारण्याचा बहुमान कुडाळमधील कविलगावला लाभलेला आहे. शिर्डीचे साईबाबा यांचे १५ ऑक्टोबर १९१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी देहावसान झाले. त्यानंतर चारच वर्षांत कविलगाव येथे हे मंदिर उभारण्यात आले. सुरुवातीला एका लहानशा गवताच्या झोपडीत साईबाबांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती. आज त्याच ठिकाणी साईबाबांचे मोठे मंदिर आहे. ‘कोकणची शिर्डीम्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी दर गुरुवारी तसेच साई पुण्यतिथीस साईभक्तांची मोठी गर्दी होते.

शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराची कहाणी अशी की कुडाळनजीक असलेल्या कविलगाव येथील रामचंद्र माडये हे निस्सीम दत्तभक्त होते. ते सतत दत्ताच्या नामस्मरणात तल्लीन असत. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. त्यात त्यांना दत्तगुरू हे साईबाबांच्या रूपात शिर्डीत असल्याचे दिसले. त्यानंतर ते शिर्डीला गेले. तेथे त्यांना साईबाबांचे दर्शन झाले. त्यावेळी साईबाबांनी त्यांना एक रुपयाचे नाणे दिले. त्यानंतर ते पंचक्रोशीतील भाविकांना घेऊन शिर्डीस साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ लागले. १९१८ मध्ये साईबाबांनी महासमाधी घेतल्यानंतर माडये बुवांनी १९१९ च्या विजयादशमीस कुडाळमध्ये बाबांची पहिली पुण्यतिथी धार्मिक पद्धतीने सार्वजनिकरीत्या साजरी केली. साईबाबांनी दिलेला एक रुपया माडये यांनी या पुण्यतिथी सोहळ्यासाठी खर्च केला. तेव्हापासून येथे दरवर्षी साईबाबांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

यानंतर या ठिकाणी साईबाबांचे मंदिर उभारावे, अशी त्यांना प्रेरणा झाली. यातूनच १९२२ मध्ये येथे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात मूर्तिकार बाबुराव सारंग यांनी साकारलेली साईबाबांची सहा फूट उंचीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. विशेष म्हणजे ही मूर्ती शिर्डी येथील मंदिरातील मूर्तीच्या ३२ वर्षे आधीची आहे. शिर्डीमध्ये साईबाबांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह शिर्डीतील बुट्टी वाडा येथे ठेवण्यात आला त्यावर बाबांची समाधी बांधण्यात आली. त्या ठिकाणी बाबांची तसबीर ठेवून तिची पूजा करण्यात येत असे. आज शिर्डी येथे साईबाबांची जी मूर्ती आहे, ती १९५४ मध्ये विजयादशमीच्या दिनी तेथे प्रतिष्ठापित करण्यात आली. याबाबतची आख्यायिका अशी की एके दिवशी अचानक मुंबईला एका जहाजातून संगमरवराची मोठी शिळा आली. ती इटलीहून पाठवण्यात आली होती. ती बाबांच्या मूर्तीसाठी पाठवण्यात आली होती; परंतु ती कोणी पाठवली होती, याचा आजवर पत्ता लागलेला नाही. त्या संगमरवरातून बाळाजी वसंत तालीम यांनी साईबाबांची हुबेहूब प्रतिमा साकारली. कविलगाव येथील मूर्ती त्या पूर्वीची आहे. पुढे १९८३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला

कुडाळ रेल्वेस्थानकापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. मंदिराचे बांधकाम कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिरासमोर गवताच्या छोट्या गोलाकार वाफ्यामध्ये तुळशी वृंदावन आहे. या वृंदावनाच्या चारही बाजूंनी गजमुखे बसवलेली आहेत. त्या समोरच काही अंतरावर मंदिराचा मुखमंडप आहे. मुखमंडपाचा आकार समोरून अर्धगोलाकार आहे. तो अर्धखुल्या प्रकारचा आहे. त्यास आठ गोल खांब असून छप्पर कौलारू उतरत्या प्रकारचे आहे. सभामंडपाची दर्शनी भिंत कोकणातील साध्या घरांप्रमाणे आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत तीन दारे आहेत. त्यातील मधल्या साध्या चौकटीच्या दारातून आत प्रवेश होतो. सभामंडप बंदिस्त प्रकारचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये प्रकाशासाठी मोठ्या खिडक्या आहेत. या बाह्यभिंतीत अर्धस्तंभ म्हणजे भिंतीत अर्धे रोवलेले खांब आहेत. भिंतीपासून आत काही अंतरावर दोन्ही बाजूंना तीनतीन लाकडी ताशीव स्तंभ आहेत. वर उतरत्या प्रकारचे छत आहे

तेथूनच एक पायरी उतरून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. समोरच गर्भगृह आहे. या गर्भगृहाची बाह्य भिंत पूर्णतः काचेची आहे. गाभाऱ्यात एका उंच वज्रपीठावर साईबाबांची साडेसात फूट उंचीची सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे. मंदिराचा १९८३ मध्ये जेव्हा जीर्णोद्धार झाला, त्यावेळी पहिल्या मूर्तीच्या ठिकाणी ही नवी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. पहिल्या मूर्तीचे मूर्तिकार बाबुराव सारंग यांचे पुत्र श्याम सारंग यांनी ती साकारलेली आहे. मंदिर गाभाऱ्याच्या आणि अंतराळाच्या भिंतींवर साईबाबांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग चित्रित केलेली मोठी भित्तीचित्रे आहेत

गाभाऱ्यास प्रदक्षिणा घालण्यासाठी सभामंडपातून मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गामध्ये मंदिरात १९२२ मध्ये प्रतिष्ठापित केलेली मूर्ती आहे. या शिवाय येथे मंदिराच्या इतिहासाशी निगडित काही वस्तू तसेच गणेश, विष्णूलक्ष्मी, त्रिमुखी दत्त या देवतांच्या मूर्तीही आहेत. येथेच मूर्तिकार बाबुराव सारंग यांनी साकारलेली साईबाबांची आणखी एक आकर्षक मूर्तीही पाहावयास मिळते. उभ्या असलेल्या साईबाबांच्या कटेवर बालगणेश असे या मूर्तीचे स्वरूप आहे. ही मूर्ती श्रीपादबुवा माडये यांच्या गणेशोत्सवातील होती. गणपती विसर्जनानंतर ती येथे ठेवण्यात आली. साईबाबांच्या मंदिरालगत दत्तदास रामचंद्र माडयेबाबांचे छोटे समाधीमंदिर आहे. तेथे माडयेबाबांची लाकडी देव्हाऱ्यात बसवलेली मूर्ती आहे. या मंदिरामध्ये दर गुरुवारी अभिषेक, लघुरुद्र असे कार्यक्रम केले जातात. दरवर्षी साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा येथे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. त्यावेळी मंदिरात साईभक्तांची मोठी गर्दी होते

उपयुक्त माहिती

  • कुडाळ रेल्वेस्थानकापासून सुमारे अर्धा किमी अंतरावर
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home