शिर्डी हे गाव ‘श्रद्धा व सबुरी’, ‘सब का मालिक एक’ आणि ‘सर्वधर्मसमभावाची’ शिकवण देणाऱ्या साईबाबांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी हे त्यांचे जन्मस्थान असल्याचा दावा पुराव्यांच्या आधारे केला जातो. महाभारत काळात अर्जुनाने वसवलेल्या या गावाला पूर्वी ‘पार्थपुरी’ म्हणत. या नावाचा पुढे अपभ्रंश होऊन ‘पाथरी’ हे नाव रूढ झाले. येथील जुना किल्ला गावाची प्राचीनता दर्शवतो. येथेच सुप्रसिद्ध संत श्रीधर यांनी ‘अश्वमेध’ ग्रंथ लिहिल्याचे उल्लेख आढळतात. पाथरीचे ऐतिहासिक श्रेष्ठत्व स्पष्ट करणारा प्राचीन ताम्रपटही प्रसिद्ध आहे. या गावातील साईबाबांचे गुरू सेलू येथील बाबासाहेब महाराज होते. साईबाबा सेलू येथे गेले असताना लोकांनींना वेडा समजून हाकलले. त्या वेळी लागलेल्या एका दगडाने त्यांच्या कपाळावर जखम झाली आणि खोक पडली. त्यामुळे बाबासाहेब महाराजांनी त्यांच्या कपाळावर बांधलेली ती पट्टी कायमची राहिली, अशी स्पष्ट नोंद सरकारी गॅझेटमध्ये आढळते.
जगाला मानवता, कल्याण आणि एकात्मतेची शिकवण देणाऱ्या साईबाबांचे भारतात तसेच भारताबाहेरही सर्व धर्मांतील असंख्य भाविक आहेत. अनेक हिंदू धर्मीय त्यांना दत्तात्रयांचा अवतार मानतात. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी येथे त्यांचे सुमारे ६० वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यादरम्यान त्यांनी मानवतेची सेवा करत ‘श्रद्धा व सबुरी’ हा महामंत्र दिला. त्यांच्या शिकवणीमध्ये सर्व धर्मांच्या तत्त्वज्ञानाचे मिश्रण होते. या शिकवणीत सर्व धर्मांची एकता, निस्वार्थ सेवा, दान आणि प्रेमाचे महत्त्व यांवर विशेष भर देण्यात आला होता. त्यांची करुणा, प्रेम आणि एकात्मतेची शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरित करते. साईबाबांनी स्वतः कधीही आपल्या पूर्वायुष्याबाबत भाष्य केले नव्हते. त्यामुळे शिर्डी ही त्यांची कर्मभूमी मानली गेली, तरीही त्यांच्या जन्मस्थानाबाबत सर्वच लोक अनभिज्ञ होते. या पार्श्वभूमीवर मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे पुत्र आणि शिर्डीच्या साई संस्थानाचे माजी विश्वस्त विश्वास बाळासाहेब खेर यांनी साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत सुमारे २५ वर्षे संशोधन केले.
पाथरी येथील साईबाबांच्या सहवासात आलेल्या अनेक वृद्ध व्यक्तींची त्यांनी भेट घेतली. साईबाबांचे परमभक्त असलेल्या संत दासगणू महाराजांशीही त्यांनी सखोल चर्चा केली. या संशोधनात त्यांना पाथरी येथील साईभक्त दिनकरराव चौधरी यांची मोलाची साथ मिळाली. या संशोधनात मिळालेल्या माहितीच्या आधारे खेर यांनी पाथरी गावात भुसारी आडनाव असलेल्या एका ब्राह्मण कुटुंबात साईबाबांचा जन्म झाल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांचे मूळ नाव ‘हरी’ होते, असे सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या संशोधनासाठी खेर यांना साईबाबांचे शिष्य स्वामी साई शरणानंद व श्री बल्वबाबा यांचे सहकार्य लाभले होते.
पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे काही भक्कम पुरावे पाथरी येथील श्री साईबाबा जन्मस्थान संस्थान ट्रस्टकडे उपलब्ध आहेत. संत दासगणू महाराज लिखित ‘श्री भक्तिसारामृत’ या ग्रंथातील सातव्या खंडातील ओवीमध्ये साईबाबांचा जन्म सेलू-मानवत म्हणजेच पाथरी येथे झाल्याचे स्पष्ट नमूद आहे. पाथरी नगरपरिषदेच्या जुन्या दप्तरी साईबाबांचे पिता अण्णासाहेब भुसारी यांच्या घराची अधिकृत नोंद आढळते.
शिर्डी येथील साई संस्थानाने १९७२ मध्ये इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलेल्या ‘साई सच्चरित्र’ या पुस्तकात साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाल्याचा उल्लेख आहे. या पुस्तकात साईबाबांनी त्यांचे परमशिष्य म्हाळसापती यांना “माझा जन्म पाथरी येथे झाला आहे,” असे सांगितले असल्याचा उल्लेख आढळतो. बी. व्ही. नृसिंह स्वामी लिखित ‘डिवाईन लाईफ ऑफ साईबाबा’ (भाग १) या ग्रंथातही पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याचा उल्लेख आढळतो. शिर्डीतील साई संस्थानाने १९९४ मध्ये हिंदी भाषेत प्रकाशित केलेल्या ‘साई सच्चरित्र’ या ग्रंथातही साईबाबांचा जन्म पाथरी गावातील असल्याचा उल्लेख आहे. हा उल्लेख त्यात चुकून ‘पाथर्डी’ या नावाने करण्यात आला आहे. अशा विविध पुराव्यांच्या आधारे १९७८ मध्ये विश्वास बाळासाहेब खेर यांनी साई संस्थानच्या नावाने विश्वस्त मंडळाची स्थापना केली. त्याच वर्षी खेर आणि चौधरी यांनी सध्या मंदिर असलेली ही जागा हैदराबाद येथे स्थायिक असलेल्या भुसारी कुटुंबाचे वंशज रघुनाथ भुसारी यांच्याकडून खरेदी केली. साईबाबांच्या जन्मस्थळासंदर्भात अनेक मतमतांतरे असली तरी देशभरातील अनेक साईभक्त शिर्डीप्रमाणेच येथेही दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.
या ऐतिहासिक जन्मस्थानाच्या वास्तूवर १९९८ मध्ये साईबाबांचे हे मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या बांधकामादरम्यान झालेल्या उत्खननात दोन ऐतिहासिक कमानी आणि एक भुयार आढळले. या भुयारामध्ये साईबाबांशी संबंधित काही प्राचीन वस्तू सापडल्या. हे मंदिर पूर्ण झाल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर १९ ऑक्टोबर १९९९ रोजी भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिराला दक्षिण आणि पूर्व दिशेने प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या समोर एका छोट्या दगडी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती स्थापित आहे. मोठा सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहात साईबाबांची साडेपाच फूट उंचीची ब्राँझची सिंहासनाधिष्ठित मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीपासून काही अंतरावर चांदीचे आवरण असलेल्या साईबाबांच्या संगमरवरी पादुका पूजेसाठी ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला ‘द्वारकामाई’ आणि अखंड धुनीची व्यवस्था आहे. मंदिर परिसरात लांबून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी एक भक्तनिवास उभारण्यात आले आहे. तसेच साईबाबांसाठी नैवेद्य बनवण्यासाठी या परिसरात एक विशेष नैवेद्यकोठी उपलब्ध आहे.
मंदिराच्या तळघरात जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर तळघरात साईबाबांच्या कुटुंबाच्या पुरातन वास्तूतील काही मूळ भाग पाहायला मिळतो. हा भाग जसाच्या तसा बंदिस्त आणि सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या तळघरात जुनी दगड-मातीची इमारत आहे. या इमारतीमध्ये बाळंतखोली व इतर भागांचा समावेश होतो. मंदिराच्या बांधकामाच्या उत्खननादरम्यान सापडलेली पूजेची साधने, मारुतीची मूर्ती, मातीची घागर, जाते, जुन्या पणत्या इत्यादी सर्व वस्तूंचे जतन या तळघरात अतिशय काळजीपूर्वक केले आहे. तळघरामध्ये एक विहीर आणि भूमिगत धान्यकोठार देखील आहे. याच भागात एक ध्यानमंदिर बांधण्यात आले आहे. येथे साईबाबांचे सुमारे सहा फूट उंचीचे मोठे तैलचित्र लावलेले आहे. या तैलचित्राच्या डाव्या बाजूला स्वामी साई शरणानंद आणि उजव्या बाजूला बल्वबाबा यांची तैलचित्रे लावलेली आहेत. येथे साईबाबांची उटी ठेवली आहे. तसेच जुन्या वास्तूची काही दुर्मिळ छायाचित्रेही पाहायला मिळतात.
हे मंदिर दररोज पहाटे पाच वाजता खुले होते आणि पहाटे ५.३० वाजता बाबांची काकड आरती केली जाते. त्यानंतर दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी धूपआरती, तर रात्री ८:४५ वाजता शेजारती होते. रात्री ९ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. या मंदिरात दररोज सकाळी ८.३० वाजता साईबाबांना न्याहारीचा नैवेद्य दाखवला जातो.
या न्याहारीत दोन पोळ्या, चटणी, साखर, दूध आणि कांदा या पदार्थांचा समावेश असतो. दुपारच्या महानैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर केला जात नाही. या महानैवेद्यात प्रामुймаने दही, शिरा, खीर, पुरी, दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, भात आणि लिंबू या पदार्थांचा समावेश असतो. सायंकाळी पिठले-भाकरी, कांदा, चटणी, दूध आणि गूळ असा साधा नैवेद्य दाखवला जातो. एकादशीच्या दिवशी साईबाबांना विशेष फराळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. मंदिर परिसरात एक मोठे प्रसादालय आहे. तेथे दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत प्रसादाचे वितरण केले जाते. दुपारच्या आरतीनंतर भाविकांना या प्रसादालयात खिचडीचा प्रसाद दिला जातो.
पाथरी येथील या मंदिरामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या शेजारच्या राज्यांतून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
दर गुरुवारी मंदिरातून साईबाबांची पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिरात वर्षभरात अनेक धार्मिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यात प्रामुख्याने हनुमान जयंती, रामनवमी, स्वामी साई शरणानंद जयंती, श्रीकृष्ण जन्माष्टमी, बल्वबाबा पुण्यतिथी, दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, विजयादशमी आणि दीपावली पाडव्याचा दीपोत्सव यांसारख्या विविध उत्सवांचा समावेश असतो. या उत्सवांच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते.