साई नंदनवन शिवालय

चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर

लातूर जिल्ह्यातील चाकूर या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी साई नंदनवन शिवालय हे देवस्थान स्थित आहे. प्राचीन काळी राजा चक्रधराने वसवल्यामुळे चक्रपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूभागाचे कालांतराने चाकूर असे नामकरण झाले. लातूर-नांदेड राज्य महामार्गावर लातूर शहरापासून सुमारे ३४ किलोमीटर अंतरावर वसलेला हा परिसर धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनला आहे. १९९९ मध्ये या भागातील ओसाड आणि खडकाळ जमिनीचा कायापालट करण्याचा संकल्प करण्यात आला. जलसंधारणाच्या अभिनव प्रयोगांतून येथे वनीकरण करण्यात आले आहे. याच नंदनवनात १६ जुलै २००१ रोजी या शिवालयाची स्थापना करून त्यात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

पूर्वी अहमदपूर तालुक्यात समाविष्ट असलेले चाकूर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अहमदपूरच्या विभाजनानंतर चाकूर हा नवीन स्वतंत्र तालुका म्हणून अस्तित्वात आला. मराठवाडा हा पारंपरिक दुष्काळी आणि कमी पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अशा आव्हानात्मक हवामानात चाकूरजवळील कलमुली येथील समाजसेवक आणि शासकीय कंत्राटदार उत्तमराव जाधव आणि त्यांचे बंधू शिवाजीराव जाधव यांनी या ओसाड जमिनीचे नंदनवन करण्याचा संकल्प केला. पुट्टपार्थीचे आध्यात्मिक गुरू श्री सत्य साईबाबा यांच्या जीवनकार्याने प्रभावित होऊन या बंधूंनी १९९९ मध्ये चाकूर येथील ओसाड आणि नापीक खडकाळ जमिनीचा कायापालट करण्याचा विडा उचलला. जलसंधारणाचे अनेक अभिनव प्रयोग राबवून, लहान जलकुंभ, कृत्रिम तलाव आणि कूपनलिका निर्माण करून त्यांनी या कोरड्या जमिनीत तब्बल एक लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले. या खडकाळ भूप्रदेशावर पूर्वी पाण्याचा लवलेशही नव्हता, तिथे आज घनदाट वनीकरण झाले आहे.

लातूर जिल्ह्याला प्राचीन इतिहासाचा समृद्ध वारसा आहे. राष्ट्रकूट राजघराण्याची मूळ राजधानी असलेल्या या शहराचा इतिहास थेट दंतीदुर्ग राजाच्या काळापर्यंत जातो. राष्ट्रकूट वंशातील प्रसिद्ध राजा पहिला अमोघवर्ष हा प्राचीन ‘लट्टालूर’ म्हणजेच आजच्या लातूर नगराचा अधिपती होता आणि त्याच्या पूर्वजांनी हे शहर वसवले होते. चालुक्य घराण्यातील विक्रमादित्य सहावा याच्या कारकिर्दीनंतर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा राजपदावर आला. सोमेश्वराने ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथलेखनामुळे त्याला ‘सर्वज्ञ चक्रवर्ती’ म्हणून संबोधिले गेले. लातूर जिल्ह्यातील एका कोरीव शिलालेखात शके १०४९ म्हणजेच इसवी सन ११२७ मध्ये येथील प्रसिद्ध पापविनाशी देवीच्या मंदिर उभारणीचा उल्लेख आढळतो. देवगिरीचे यादव, बहामणी साम्राज्य, आदिलशाही आणि हैदराबादचा निजाम अशा विविध सत्ताधीशांच्या अधिपत्याखाली या प्रांताची जडणघडण होत राहिली. निजामाची सत्ता संपुष्टात आल्यावर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा भाग स्वतंत्र भारतात समाविष्ट झाला आणि पुढे १६ ऑगस्ट १९८२ रोजी धाराशिव जिल्ह्याचे विभाजन होऊन स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. याच जिल्ह्यातील चाकूर शहराजवळ हे साई नंदनवन व शिवालय आहे. १६ जुलै २००१ रोजी या मंदिराचे उद्घाटन आणि शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी देशभरातून हजारो भाविक उपस्थित होते. या मंदिरातील मूर्तींची प्रतिष्ठापना श्री सत्य साईबाबा यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी त्यांनी असे भाकीत केले होते की, “हे ठिकाण भविष्यात सोमनाथ ज्योतिर्लिंगासारखे शक्तिशाली ठरेल आणि ‘१३ वे ज्योतिर्लिंग’ म्हणून नावारूपास येईल.”

गावापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वागतकमान आहे. वनराईतून जाणारा हा मार्ग हिरवाईने नटलेला असून खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. मंदिरासमोर प्रांगण असून या प्रांगणातच वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. येथे पूजासाहित्याची दुकान आणि विविध प्रकारचे वृक्ष आहेत. या वृक्षांखाली भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रांगणात तुळशी वृंदावन, वृषभ शिल्प व सुमारे चाळीस फूट उंच ध्वजस्तंभ असून समोरील भागात एक तलाव देखील आहे.

सभामंडप व गर्भगृह अशी संरचना असलेले मंदिर उंच जगतीवर स्थित आहे. संपूर्ण मंदिर शिवलिंगाच्या आकाराचे आहे. मंदिराची एकूण लांबी २६० फूट व उंची १०० फूट आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास सहा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस असलेल्या चौथऱ्यांवर गजराज शिल्पे आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्यबाजूस कठडे बांधले आहेत. या कठड्यांमध्ये एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले गोलाकार स्तंभ आहेत. सभामंडपात जमिनीवर कासवशिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीची मूर्ती स्थापित आहे. सभामंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात नक्षीदार लाकडी द्वारशाखा व झडपा आहेत. गर्भगृहात जमिनीवर सुमारे नऊ फूट लांबीची शिवपिंड आहे. या पिंडीचे वजन नऊ टन असल्याचे सांगितले जाते. शिवपिंडीवर छत्र धरलेल्या नागाची पितळी प्रतिकृती आहे. पिंडीच्या मागे वज्रपीठावर मध्यभागी वेणूगोपाळ श्रीकृष्णाची मूर्ती आहे. वज्रपीठावर डाव्या व उजव्या बाजूला सत्य साईबाबा व शिर्डीच्या साईबाबांची मूर्ती आहे. वज्रपीठाच्या दोन्ही बाजूस सत्य साईबाबांच्या मोठ्या आकाराच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाच्या छतावर लिंगपाषाण आकाराचे शिखर आहे.

प्रांगणात शिवालयाच्या बाजूला तिरुपती बालाजी मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारास अकरा पायऱ्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर उजव्या व डाव्या बाजूला वज्रपीठावर गरुड व हनुमान यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर तिरुपती बालाजीची मूर्ती आहे. याशिवाय प्रांगणात गायत्री देवी व पार्वती देवी यांची लहान मंदिरे आहेत. मंदिरापासून काही अंतरावर ‘वृंदावन अम्युझमेंट आणि वॉटर पार्क’ची उभारणी करण्यात आलेली आहे.

श्रीराम नवमी, आषाढी एकादशी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जन्मोत्सव, महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, नागपंचमी, शारदीय नवरात्री, दसरा, दिवाळी आदी वर्षभरातील अनेक सण व उत्सवांच्या वेळी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन आदी पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या वेळी भाविकांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था केली जाते. वॉटर पार्कला भेट देणारे पर्यटक येथील मंदिराला आवर्जून भेट देतात. दररोज पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • चाकूर येथून ३ किमी अंतरावर
  • लातूर शहरापासून ३४ किमी अंतरावर
  • चाकूर येथून एसटीची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३८१ २९९०१९

साईं नंदनवन शिवालय

चाकुर, तालुका चाकुर, जिला लातूर

Back To Home