नांदेड जिल्हा हा संतांची आणि भक्तीची भूमी म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपणारे ‘लोहा’ हे शहर अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. येथील प्राचीन कपिलेश्वर मंदिरामुळे हे शहर दक्षिण काशी व मराठवाड्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात उभे राहिलेले साफल्य बालाजी मंदिर हे अल्पावधीतच भाविकांसाठी श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मंदिराची रचना, भव्यता आणि येथील प्रसन्न वातावरण यामुळे या मंदिराला मराठवाड्याचे ‘प्रति-तिरुपती’ अशी ओळख मिळाली आहे.
‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या अभ्यासपूर्ण ग्रंथात थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे, पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णूच्या पुराणप्रसिद्ध अवतारांशी अथवा रूपांशी थेट संबंध नसूनही विष्णुरूप पावलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण मानला जातो, तर वेंकटेश हा बालाजी या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी जशी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसलेली आहे, तशीच वेंकटेशाची पत्नी देखील भृगूने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरुचानूरमध्ये दूर वेगळी राहिलेली आहे. वेंकटेश हा विठ्ठलाप्रमाणेच शस्त्रहीन, मौनी आहे आणि डावा हात कटीवर ठेवून, उजव्या हाताने भक्तांना वरप्रदान करीत आहे. अशा या बालाजीचे भक्त आंध्राप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर आहेत.
महाराष्ट्रातील याच भक्तांना तिरुपती बालाजीचे दर्शन सहज घेता यावे यासाठी श्री. विठ्ठल गायकवाड यांनी २००० साली लोहा शहरात हे मंदिर उभारले. मूळ तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला डोंगरावर स्थित आहे. ते किमान दीड हजार वर्षे जुने आहे. इतिहासातील नोंदीनुसार, पल्लव राणी समवाई हिने इ.स. ६१४ मध्ये या मंदिराची पहिली वेदी बांधली होती.
त्या मंदिराच्या उभारणीत व देखभालीमध्ये चोल, पल्लव राजांप्रमाणेच मराठा सेनापती रघुजी भोसले यांचाही मोलाचा सहभाग आहे. रोममधील व्हॅटिकन सिटीनंतरचे हे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थान गणले जाते. तिरुपती बालाजीचे हे मंदिर ज्या द्राविड शैलीतील आहे, अगदी त्याच मंदिरशैलीमध्ये लोहा येथील साफल्य बालाजी मंदिरही बांधण्यात आलेले आहे.
लोहा शहराच्या मध्यवर्ती भागात, मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. या वाहनतळाजवळ मारुतीचे लहानसे मंदिर आहे. त्यात मारुतीची काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या सभोवती आवारभिंत आहे. द्राविड शैलीप्रमाणे प्रवेशद्वारावर पाच थरांचे भव्य गोपुरम् उभारण्यात आलेले आहे. प्रत्येक गोपुरात देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गोपुराच्या शीर्षभागी आडव्या रचनेचे शिखर व त्यावर पाच कळस आहेत. प्रवेशद्वारावर शेषशयनी विष्णू व त्यांच्या चरणांशी लक्ष्मी विराजमान आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष आहेत, जेथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा व त्यावरील लहान देवळीत विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्ती आहे.
देवळीवर घुमटाकार नक्षीदार शिखर व त्यावर कळस आहे. या देवळीमागे पाषाणी चौथऱ्यावर सुवर्णकांतीचा ध्वजस्तंभ आहे. मंदिरासमोर डाव्या बाजूला असलेल्या लहान मंदिरात नवग्रहांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत.
पुढे अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्यबाजूला भाविकांसाठी कक्षासने बनवण्यात आली आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. येथे स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावून दर्शन रांगेचे व्यवस्थापन केले आहे. पुढे गर्भगृहासमोर स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व उत्तरांगावर सुंदर तोरणनक्षी आहे. प्रवेशद्वारास लाकडी नक्षीदार झडपा आहेत व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चतुर्भुज लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर बालाजीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती विराजमान आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. तो. मूर्तीच्या मागील प्रभावळीत दोन्ही बाजूस स्तंभ व त्यांवर पानाफुलांची नक्षी असलेले मकर तोरण आहे.
या तोरणात वर मध्यभागी कीर्तीमुख आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर रंगीत काचांचा वापर करून विविध नक्षी साकारण्यात आल्या आहेत. मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी कठडा आहे. कठड्याच्या दर्शनी भागात सुमारे वीस देवकोष्टके व त्यात अनेक साधू-संत व देवतांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाच्या छतावर द्राविड शैलीतील चौकोनी शिखरे आहेत. त्यात चारही कोनांवर उभ्या शिखरांच्या मंदिर प्रतिकृती म्हणजे ‘कूट’ व मधल्या भागात आडव्या शिखरांच्या मंदिर प्रतिकृती म्हणजे ‘शाल’ रचना आहेत. त्यावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी गोलाकार स्तूपी आणि त्यावर चारही बाजूंना देवप्रतिमा व मध्यभागी कळस आहे.
मंदिराच्या मागे डाव्या बाजूस पद्मावती देवीचे मंदिर आहे. या मंदिरात वज्रपिठावर पद्मावती देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या हातात पद्मफुले आहेत. मूर्तीच्या मागील प्रभावळीत पानाफुलांची नक्षी असलेले मकर तोरण व तोरणात मध्यभागी कीर्तीमुख आहे. मंदिरावरील चौकोनी नक्षीदार शिखरात चारही बाजूंना असलेल्या देवकोष्टकांत पद्मावती देवीच्या मूर्ती आहेत. शिखरात शीर्षभागी स्तूप व त्यावर कळस आहे. मंदिराच्या मागील उजवीकडे लक्ष्मी देवीचे मंदिर आहे. येथे वज्रपीठावर लक्ष्मी देवीची मूर्ती व छतावर चौकोनी उंच शिखर आहे. शिखरावर चारही बाजूंना देवकोष्टक व त्यात देवी लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. येथेही शिखरावर शीर्षभागी कळस आहे. मंदिराच्या तटबंदीला लागून अनेक वास्तू आहेत, ज्यांचा वापर धर्मशाळा, मंदिर कार्यालय व भांडारगृह म्हणून केला जातो.
मंदिरात चैत्र पाडवा व दसरा हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दोन्ही उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन, भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन व भाविकांसाठी महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वार्षिक उत्सवांच्या वेळी शेकडो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे उपस्थित असतात.