लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मांजरा नदीच्या खोऱ्यात भूतमुंगळी हे गाव वसलेले आहे. या गावात असलेले प्राचीन सदाशिव मंदिर आणि भुतेश्वर बाबांचे स्थान हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. भूतमुंगळी या गावाचे मूळ नाव भुतेश्वर या नावावरूनच पडले आहे, असे मानले जाते. या परिसरात सदाशिव मंदिर, भुतेश्वर बाबांची समाधी आणि महादेव मंदिर ही तिन्ही देवालये एकत्र आहेत. यामुळे या संपूर्ण परिसराला पवित्र तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हा परिसर प्राचीन काळापासून एक आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखला जातो. हे क्षेत्र पूर्वी ऋषीमुनींच्या तपश्चर्येसाठी प्रसिद्ध होते. या मंदिराची निर्मिती साधारणपणे अकराव्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान झाली असावी, असे सांगितले जाते. येथील दगडी बांधकामावर चालुक्य आणि यादव काळातील स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. लातूर आणि एकंदरीत मराठवाड्याचा हा भाग ऐतिहासिक काळापासून चालुक्य व यादव राजांच्या अधिपत्याखाली होता. या काळात या भागात अनेक दगडी देवालये उभारली गेली.
निलंगा येथील प्रसिद्ध नीलकंठेश्वर मंदिराची आणि या मंदिराची निर्मिती एकाच कालखंडात झाल्याचे सांगितले जाते. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे भूमीज शैलीतील चालुक्य स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. भूतमुंगळी येथील मंदिरही त्याच काळाची साक्ष देते. या परिसरात पूर्वी वास्तव्यास असलेले भुतेश्वर बाबा हे महान सिद्ध पुरुष होते. सदाशिव मंदिरातील महादेव हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. स्थानिक लोकांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी सामान्य लोकांना भक्तीचा मार्ग दाखवून आपले संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले.
भूतमुंगळी येथील सदाशिव मंदिर हे हेमाडपंती धाटणीचे आहे. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिराच्या समकालीन असलेले हे मंदिर त्याच पद्धतीप्रमाणे ‘त्रिकूट’ प्रकारातील आहे. या मंदिरामध्ये तीन गर्भगृहे आहेत. मात्र, हे मंदिर नीलकंठेश्वर मंदिरासारखे तारकाकृती रचनेचे नाही. तरीही या मंदिराच्या बाह्य भागावर आणि एकंदरीत रचनेत कोरीव काम, छोट्या मूर्ती आणि देवकोष्टके आढळतात. बाह्य भिंतींवरील देवकोष्टकांमध्ये विविध देवी-देवतांच्या, यक्षांच्या आणि सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत.
यातील काही मूर्ती काळाच्या ओघात झिजल्या आहेत आणि काही भग्न झाल्यामुळे त्या नेमक्या कोणत्या देवतेच्या आहेत, हे ओळखणे कठीण बनले आहे. मंदिर परिसरात मूळ मंदिराचे काही प्राचीन दगडी अवशेष विखुरलेले दिसतात. मंदिराच्या बाह्य भिंतीला टेकवून काही पुरातन मूर्ती ठेवलेल्या आहेत.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुखमंडपासारखी रचना आहे. या प्रवेशद्वाराच्या समोर नंदीची मूर्ती आहे. मुखमंडपातून आत प्रवेश केल्यावर सभामंडपाचे नक्षीदार दगडी खांब आणि कक्षासने दृष्टीस पडतात. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या चार दगडी स्तंभांच्या मध्यभागी रंगशिळा आहे. या रंगशिळेवर उभे राहिल्यावर समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या व उजव्या बाजूला उपगर्भगृहे दिसतात. या तिन्ही गर्भगृहांच्या समोर अंतराळ आहे. सभामंडपात असलेल्या देवकोष्टकांमध्ये विविध मूर्ती आहेत, तर काही कोष्टके रिकामी आहेत. याच भागात शेषशायी विष्णूची एक मूर्ती दिसते. मंदिराचे खांब चौरस आणि गोलाकार अशा मिश्र शैलीचे आहेत. खांबांच्या मध्यभागावर कीर्तिमुखे आणि पुष्पवेलींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराचे वितान म्हणजेच छत कमळाच्या पाकळ्यांच्या नक्षीने सजवलेले आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूच्या गर्भगृहात विष्णूची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूच्या गर्भगृहात शिव-पार्वतीची मूर्ती आहे. बहुसंख्य मंदिरांमध्ये शिवाच्या मांडीवर बसलेली पार्वती पाहायला मिळते, परंतु येथे शिव आणि पार्वती उभे असलेल्या स्वरूपात आहेत. तिन्ही गर्भगृहांची द्वारे तिहेरी द्वारशाखा प्रकारची आहेत. या दारांवर केलेली बेलबुट्टी, द्वारस्तंभ, भौमितिक नक्षीकाम आणि तळाशी असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती स्पष्टपणे दिसतात. मुख्य गर्भगृहात प्राचीन शिवपिंड म्हणजेच सदाशिव प्रस्थापित आहे. येथील उंच शाळुंकेवर शंकराचा मुखवटा ठेवलेला आहे. मंदिराच्या समोर पूर्वी एक मोठी बारव होती आणि त्यात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. आता या बारवेचा आकार छोटा करण्यात आला आहे.
या मंदिरापासून काही अंतरावर भूतनाथ बाबांचे स्थान असलेले महादेव मंदिर आहे. या देवालयाला भूतनाथेश्वर मंदिर म्हणूनही ओळखतात. भूतनाथ बाबांची समाधी या मंदिराच्या अगदी जवळ आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार १८ मार्च २०१८ रोजी झाल्याची नोंद मंदिरावर पाहायला मिळते. मंदिराचे नव्याने उभारलेले शिखर अत्यंत उंच आहे. ते दूरवरूनही स्पष्ट दिसते. पूर्वी हे मंदिरसुद्धा प्राचीन दगडी बांधकामाचे होते. येथील जुने कोरीव काम असलेल्या शिळा पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, असे स्थानिक रहिवासी सांगतात. नव्याने बांधलेल्या या मंदिराच्या बांधकामात सिमेंट आणि इतर आधुनिक साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील शिवपिंडीच्या शाळुंकेची रचना ही ‘सदाशिव मंदिरातील’ शाळुंकेसारखीच आहे, मात्र या मंदिरातील पिंडीची उंची थोडी जास्त आहे. या मंदिराच्या समोरच विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि भवानी मंदिर आहे. या मंदिराला लागूनच भुतेश्वर बाबांची समाधी आहे.
भूतमुंगळी गावातील या तिन्ही मंदिरांना एकत्रितपणे गावाचे ग्रामदैवत मानले जाते. या मंदिरांच्या रचनांमध्ये आणि अंतरामध्ये फरक असला, तरी त्यांचे प्रशासन आणि उत्सव एकच आहेत. भुतेश्वर बाबा, सदाशिव मंदिर आणि महादेव मंदिर यांचा जत्रोत्सव एकत्रितपणे साजरा होतो. गुढीपाडव्यानंतर बारा दिवसांनी हा एकत्रित उत्सव सुरू होतो. उत्सवकाळात देवाची आणि बाबांच्या पादुकांची पालखी काढली जाते. या जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड रंगतात, तसेच भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. याशिवाय महाशिवरात्रीनिमित्तही येथे उत्सव साजरा केला जातो. दररोज सकाळी ६ ते दुपारी १.३० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८.३० या वेळेत भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात.