कोल्हापुरात इ.स. १८४४ मध्ये ब्रिटिशांचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर येथे नवनवीन वसाहतींकरीता अनेक तळी आणि तलाव बुजवण्यात आले. गंगावेश भागातील कुंभारतळे हे त्यातीलच एक. आज त्या जागी शाहू उद्यान आहे. याच ठिकाणी कोल्हापुरातील ख्यातकीर्त असे ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे. मनुष्यावर मातृ-पितृ ऋणापासून धन ऋणापर्यंतची अनेक प्रकारची ऋणे असतात. या शिवपिंडीची मनोभावे पूजा केल्यास त्या ऋणांतून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे येथे दर सोमवारी दर्शनासाठी भाविकांची रीघ असते.
या मंदिराची आख्यायिका अशी की देवांचा राजा इंद्र याने वृत्रासुराला ठार मारले. वृत्रासुर हा ब्राह्मण होता. त्याला मारल्यामुळे इंद्रास ब्रह्महत्येचे पातक लागले. त्यापासून मुक्ती कशी मिळवावी, अशी त्याने नारदमुनींकडे विचारणा केली. नारदमुनींनी इंद्राच्या हाती एक लाल वस्त्र दिले व सांगितले की प्रत्येक तीर्थक्षेत्री हे वस्त्र घेऊन जावे. ज्या तीर्थात हे वस्त्र शुद्ध म्हणजे पांढरे होईल, तेथे महादेवाची पूजा करावी. म्हणजे पापमुक्ती मिळेल व तुझे ऋण फिटेल. या सूचनेनुसार इंद्राने अनेक तीर्थांना भेट देऊन तेथे स्नान केले. अखेर तो करवीर क्षेत्री आला. येथील ऋणमुक्तेश्वर तीर्थात त्याने स्नान केले. तेव्हा त्याच्या हातातील लाल वस्त्र पांढरे झाले. त्यानंतर त्याने तीर्थाच्या काठावरील ऋणमुक्तेश्वराची पूजा केली व त्यामुळे त्यास ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती लाभली. ते तीर्थ म्हणजे कुंभार तळे व त्या काठावरील मंदिर म्हणजे ऋणमुक्तेश्वराचे मंदिर होय.
गंगावेशीतील शाहू उद्यान परिसरातील दुमजली वाड्यासारख्या इमारतीमध्ये हे मंदिर स्थित आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. मंदिराच्या दर्शनी ओवरीस चार कमानी आहेत. येथील प्रवेशद्वारातून आत जाताच समोर प्रशस्त सभामंडप आहे. आत सर्वत्र ग्रॅनाइटच्या फरशा बसवल्या आहेत. सभामंडपाच्या भिंतींवर ज्योतिर्लिंगांची छायाचित्रे व माहिती असलेले फलक लावलेले आहेत. समतल छतावर फुलांची नक्षी असलेली उठावशिल्पे लावलेली आहेत. या सभामंडपाच्या अगदी मागच्या बाजूस मधोमध ऋणमुक्तेश्वराचा दगडी गाभारा आहे.
गाभाऱ्यासमोर नंदीची मोठी दगडी मूर्ती आहे. त्यापुढे पितळी कासव आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गजाननाची मूर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्यात भूतलावर गोल शाळुंका असलेली शिवपिंडी आहे. पिंडीवरील लिंगास पितळी नागाने विळखा घातलेला आहे व त्यावर फण्याचे छत्र धरलेले आहे. पिंडीवर गलंतिका म्हणजे अभिषेक पात्र आहे. बाजूलाच उंच त्रिशूल आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस उंच चौथऱ्यांवर त्रिमुखी दत्त, लक्ष्मी-नारायण यांच्या सुबक संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. त्यांलगतच मोठा पितळी शिवमुखवटा आहे. त्यावर नागफण्याचे छत्र आहे. येथील एका भिंतीवर असलेले पंचमुखी हनुमानाचे उठावशिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्या बाजूला एका चौथऱ्यावर हनुमानाची प्राचीन मूर्ती आहे.
या मंदिरात दर सोमवारी, तसेच शिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य असे की कोल्हापुरातील अनेक तरुणांनी येथील ऋणमुक्तेश्वराच्या साक्षीने पाणीग्रहण केले आहे. पूर्वीच्या काळी कोल्हापुरात मंगल कार्यालयांची व्यवस्था नव्हती. तेव्हा या मंदिराचा सभामंडप अगदी अल्प शुल्कात वा अनेकदा केवळ एक नारळ देऊन विवाह सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिला जात असे. अनेकदा येथे सामुदायिक विवाह सोहळेही पार पडत.
ऋणमुक्तेश्वर मंदिरापासून काही अंतरावर रावणेश्वर महादेव मंदिर आहे. सुमारे सातव्या-आठव्या शतकापूर्वीचे कोल्हापूर हा सहा खेड्यांचा समूह होता. ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रावणेश्वर अशा त्या वस्त्या होत्या. महालक्ष्मी मंदिराच्या स्थापनेनंतर या सहा वस्त्या एकत्र येऊन कोल्हापूर नगरी निर्माण झाली. यातील रावणेश्वर या खेड्यातील तळ्यात रावणेश्वराचे मंदिर होते. करवीर माहात्म्यात या भागाला राक्षसालय असे संबोधण्यात आले आहे. इंग्रजांनी कोल्हापूरवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर म्हणजे १८८४ नंतर रावणेश्वर तलाव बुजवण्यात आला. आता सध्याच्या खासबाग या भागात आणि शाहू स्टेडियमजवळ रावणेश्वर मंदिर आहे.
पूर्वी साध्या लोखंडी छत्रीखाली असलेल्या देवालयाचा जीर्णोद्धार १९९४ साली करण्यात आला. शिवलिंगाच्या आकाराचे भव्य मंदिर येथे बांधण्यात आले. त्यानंतर २०१३ साली मंदिरावर शिखर बांधण्यात आले. मंदिरात सर्वत्र संगमरवरी दगड व फरशा यांचा वापर केला गेला आहे. मंदिरात प्रवेश करताना एक मोठे प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी शंकराची पांढऱ्या रंगाची ध्यानस्थ मूर्ती आहे, दोन्ही बाजूला नंदी आहेत. खाली मोरांची आकर्षक शिल्पे आहेत. मंदिरात जाण्यापूर्वी तेथे असणाऱ्या संरक्षक भिंतींवर बारा ज्योतिंर्लिंगाची सुंदर उठावशिल्पे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या बाजूला नंदीचे अर्धस्तंभ आहेत. एका शिळेवर नागयुगुल कोरण्यात आलेले दिसते. मंदिरात येण्याआधी डाव्या आणि उजव्या बाजूला स्तंभावर हाती टाळ असलेल्या शृंगी आणि हाती वीणा असलेल्या भृंगी या शिवगणांची शिल्पे दिसतात. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या तीन पायांच्या आहेत व कोणताही एक पाय झाकला असता तेथे नृत्यमुद्रा तयार होते.
नक्षीदार लाकडी प्रवेशद्वारावर काचेवर दोन्ही बाजूला वीरभद्र आणि भैरवाचे दर्शन होते. वरच्या बाजूला द्वारपट्टिकेवर गणेशाची मूर्ती आहे. तिथून पुढे कोपऱ्यात उजव्या बाजूला कमळात वसलेली आणि मगर वाहन असलेली काळ्या पाषाणातील गंगादेवीची मूर्ती आहे. तिच्या वरील दोन हातात कमळ, कलश तर खालील दोन हात आशीर्वाद देत आहेत. दुसरीकडे डाव्या बाजूला गौरी देवी आहे. ही मूर्तीही काळ्या पाषाणात घडविलेली आहे. त्यांच्यासमोर एक जलपात्र दिसते. या मूर्तींच्या वरच्या बाजूला थोर चित्रकार आबालाल रहमान यांनी रावणेश्वर मंदिर साकारण्यापूर्वी आणि त्या आधी काढलेली चित्रे लावण्यात आली आहेत. पुढे मधोमध एका चौथऱ्यावर नंदीची मोठी काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. डाव्या बाजूला पितळी देव्हाऱ्यात हनुमान व उजव्या बाजूला गणराय यांच्या सुबक मूर्ती दिसतात. गाभाऱ्यात एका दगडी चौकोनी पिठीकेवर रावणेश्वराची पूर्वाभिमुख शिवपिंडी आहे.
गाभाऱ्यासमोर एका खांबावर त्रिजटेची मूर्ती कोरण्यात आली आहे. तेथील एक भित्तिशिल्प लक्ष वेधून घेते. सीता वाळूची पिंडी तयार करत आहे, तर श्रीराम-लक्ष्मण आणि हनुमान ते पाहत आहेत, असे ते शिल्प आहे. एका भिंतीवर महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुकामाता आणि सप्तशृंगी देवींची चित्रे लावण्यात आली आहेत. गाभाऱ्याच्या बाहेरून डाव्या बाजूने सरळच पुढे गेल्यावर लक्ष्मणेश्वराची शिवपिंडी पाहाण्यास मिळते. शिवलिंगाला नागदेवतेने वेटोळे घातले आहे. येथेच अमरनाथ गुफा आणि अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती साकारलेली पाहायला मिळते. खाली शिळेवर कोरलेली आणखी एक गणेशाची मूर्ती येथे आहे. प्रवेशद्वारावर आणि जागोजागी सुबक नक्षीकाम पाहायला मिळते.
या मंदिराचे शिखर वैविध्यता असलेले आहे. शिवलिंगाचा आकार असलेला मध्यभाग, चारी बाजूला खांब व त्यावर एका अधिष्ठानावर चार बाजूंना कोरली गेलेली शिल्पे दिसतात. त्यात पूर्वेला महादेव व पार्वती, कार्तिक-गणेशासह विराजमान आहेत. पश्चिमेस भगवान महादेव नटेश्वर स्वरूपात आहेत. उत्तरेकडील मूर्ती पाचमुखे असलेली महादेवाची आहे, तर दक्षिणेस भगवान महादेवाची आराधना करणाऱ्या रावणाचे शिल्प पाहावयास मिळते. येथे श्रावण महिन्यात दररोज रुद्राभिषेक करण्यात येतो, तर इतर वेळी लघुरुद्र अभिषेक करण्यात येतात.