रेणुका मंदिर

कोल्हापूर शहर, ता. करवीर, जि. कोल्हापूर

एके काळी कोल्हापूर शहराबाहेर जयंती ओढ्याच्या काठी असलेले रेणुका मातेचे मंदिर आज शहराचा एक भाग बनलेले आहे. रेणुका आणि एल्लम्मा ही एकाच देवीची दोन नावे आहेत. येथे देवीचे स्थान ओढ्याच्या काठी असल्याने तिला ओढ्यावरची यल्लमा असेही नामानिधान प्राप्त झाले आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील सौंदत्ती हे एल्लम्मा देवीचे मुख्य स्थान आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतील अनेकांची ती उपास्य देवता आणि अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. त्यामुळे येथे नेहमीच भाविकांची मोठी वर्दळ असते.

‘रेणुकासहस्त्रनाम’ स्तोत्रात रेणुकेला महापूरनिवासिनी, महापुराद्रिनिलया या विशेषणांनी संबोधले आहे. त्याच प्रमाणे तिला अलकापूरसंस्थाना असे विशेषण लावून तिच्या आलंपूर पीठाचा निर्देश केलेला आहे. आलंपूर हे एल्लम्मादेवीशी निगडित आहे. याचप्रमाणे या स्तोत्रात रेणुकेला एलांबा (एल्लम्मा) प्रमाणेच एकवीरा व यमांबा (यमाई) या नावानेही निर्देशिले आहे. रेणुका देवीला पार्वतीचा अवतार मानण्यात आले आहे. लज्जागौरी, जोगुळंबा, भूदेवी, मातंगी व सांतेरी ही तिचीच रूपे असल्याचे अभ्यासक सांगतात. देशात अनेक ठिकाणी तिची मंदिरे आहेत. तिचे भक्तगण जगभर पसरले आहेत. कोल्हापूरमधील रेणुकेची एल्लम्मा या स्वरूपातही आराधना केली जाते. ज्यांच्या घरी रेणुकामातेची परडी असते त्यांना वर्षातून एकदा तरी देवीच्या मूळ स्थानी म्हणजे बेळगावजवळच्या सौंदत्तीच्या डोंगरावर जावे लागते. तेथे दिलेल्या भेटीनंतर भाविक या मंदिरात येतात.

‘स्कंद पुराणां’तर्गत येणाऱ्या संस्कृत आलंपूर स्थलमाहात्म्यात रेणुका देवीची पौराणिक आख्यायिका येते. ती अशी की रेणुका ही जमदग्नी ऋषींची पतीव्रता पत्नी होती. तिला वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌ (बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रामभद्र असे पाच पुत्र होते. यातील रामभद्र म्हणजेच भगवान परशुराम. भगवान परशुराम हे सप्तचिरंजीवींपैकी एक असल्याचे मानले जाते. महेंद्र पर्वतावर ते अजूनही तपसाधनेत व्यस्त असल्याचे सांगितले जाते. रेणुका आपल्या पतीदेवाच्या नित्य पूजेअर्चेसाठी लागणारे पाणी मातीच्या घड्यात भरून तुंगभद्रेवरून आणून देत असे. त्यासाठी ती रोज चिखलाचा घडा करीत असे व त्या ताज्या घड्यातच भरून पाणी नेत असे. पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे तो ओलाकच्चा घडा कधीच पाझरत वा विरघळत नसे. मात्र एके दिवशी तुंगभद्रेच्या जळराशीत एक राजा आपल्या तरुण व सुंदर पत्नीसह जलक्रीडा करीत होता. काही कथांमध्ये गंधर्व जलक्रीडा करीत होता असे म्हटलेले आहे. ते दृश्य पाहून रेणुकेचे चित्त क्षणभरासाठी विचलित झाले. त्या एवढ्याशा मानसिक स्खलनामुळे चिखलाचा ताजा कच्चा घडा टिकवण्यास ती असमर्थ ठरली. ती हताशपणे रिक्तहस्ते आश्रमात परतली. जमदग्नी हे अत्यंत कोपिष्ट होते. त्यांनी सर्व प्रसंग जाणला आणि आपल्या मुलांपैकी एकेकाला तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पहिल्या तीन मुलांनी मातृहत्येस नकार दिला. मात्र परशुरामाने पित्याची आज्ञा तत्काळ पाळली. त्याने उडवलेले मातेचे शिर चांभाराच्या पाण्याच्या कुंडीत जाऊन पडले. त्याची आज्ञाधारकता पाहून जमदग्नी प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने मातेला सजीव करण्याचा वर मागितला. त्यावर जमदग्नी म्हणाले, की ते आता अशक्य आहे. कारण तू उडवलेले तिचे शिर अपवित्र ठिकाणी जाऊन पडले आहे. त्यामुळे ते तिच्या धडास लावणे इष्ट नाही. मात्र या पुढे लोक तिच्या शिराची उपासना एल्लम्मा या नावाने करतील आणि धडाची ख्याती भूदेवी म्हणून होईल.

अन्य एका पौराणिक कथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेले, तेव्हा रेणुका एका दलित वस्तीत शिरली. परशुरामाने तिला शोधून तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुकेचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्नींच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरीरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शिर लाभलेल्या रेणुकेला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात एल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले.

रेणुकामातेचे मंदिर मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्याला अगदी लागूनच आहे. मंदिर मोठ्या परिसरात वसलेले आहे. प्रांगणात सर्वत्र दगडी फरसबंदी केलेली आहे. देवीचे पूजासाहित्य विकणारी काही दुकाने येथे आहेत. मूळ मंदिर फार मोठे नाही. पूर्वीच्या दगडी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराची संरचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपातील गोल बारीक खांबांच्या मध्ये कोरीव काम केलेली महिरपी कमान आहे. छत पत्र्याचे आहे. सभामंडपात देवीची आख्यायिका सांगणारे फलक लावलेले आहेत. येथे देवीच्या पालखीचा चौथरा आहे. अंतराळात देवीची पालखी ठेवलेली आहे.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार पितळेचा पत्रा जडवलेले आहे. त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले असून, चौकटीच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या उंच मूर्ती कोरलेल्या आहेत. आत चांदीच्या मखरात रेणुका देवीची मूर्ती विराजमान आहे. कलश साडीतील देवीचा साजशृंगार आणि सजावट कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आठवण करून देते.

देवीच्या मंदिराच्या शेजारी डाव्या बाजूस परशुराम आणि मातंगी देवीचीही मंदिरे आहेत. या मंदिरांची शिखरे पिरॅमिडच्या आकाराची आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील रेणुका आणि मातंगी देवी मंदिराच्या शिखरावरील कळसास साडी नेसवलेली आहे. कळस ही देवीची प्रतिमा मानून, देवीच्या तांदळ्यास ज्या प्रमाणे साडी नेसवतात तशीच हिरवी साडी येथे कळसाला नेसवलेली आहे.

एल्लम्मा देवीची आंबिल यात्रा हा या मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेस सौंदत्ती येथे होणाऱ्या यात्रेनंतरच्या पहिल्या शनिवारी येथे आंबिल यात्रा भरते. उदं ग आई, उदं… च्या गजरात भल्या पहाटेचा अभिषेक, देवीची आरती, पालखी सोहळा, भंडाऱ्यांची उधळण असे उत्साही वातावरण या वेळी पाहावयास मिळते. यात्रेच्या दिवशी रेणुका देवीला दहीभात, आंबील, वडी-भाकरी, वरण-वांग्याची भाजी, मेथीची भाजी, गाजर, केळी, कांद्याची पात, लिंबू अशा भाज्या व फळे देवीला अर्पण केली जातात. यावेळी येथे भाविकांची अलोट गर्दी असते. हे एक अतिशय जागृत देवस्थान मानले जात असल्याने येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारीही भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळ देवीची महाआरती होते.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूर बस स्थानकापासून ३.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून कोल्हापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home