ताम्रपर्णी नदीच्या तीरावर वसलेले चंदगड या तालुक्याच्या गावाचे निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालणारे आहे. कधी काळी घनदाट अरण्याचा प्रदेश असलेल्या या भागातील लोकसंस्कृती आणि श्रद्धास्थाने आजही आपले वेगळे अस्तित्त्व टिकवून आहेत. या गावातील भातशेती आणि काजू व आंब्यांची पिके जसे कोकणाशी साधर्म्य सांगणारे आहे तसेच येथील प्रसिद्ध रवळनाथ मंदिर कोकणी श्रध्देचा आणि उपासना पद्धतीचा वसा जपून आहे. येथील रवळनाथ हा जागृत देव नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे होणारी डोक्यावरील आरतीची यात्रा प्रसिद्ध आहे.
पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘भारतीय संस्कृती कोशा’च्या सातव्या खंडानुसार, रवळनाथ ही कोकणातील ग्रामदेवतांपैकी एक देवता आहे. या कोशात त्यांनी असे नमूद केले आहे की ‘रवळनाथाविषयी संशोधकांच्या भिन्न कल्पना आहेत. काहींच्या मते हे नाव रेवणनाथाचे अपभ्रष्ट रूप असावे व हा देव नाथपंथातला असावा. काही संशोधक हा शब्द राहुल या नावावरून व्युत्पादितात. राहुल हा बुद्धाचा पुत्र होय. प्राचीन काळी काही लोक राहुलनाथ आणि त्याची उपासना घेऊन कोकणात आले असावेत. काहींच्या मते रवळनाथ हे रूरूचे अपभ्रष्ट रूप असावे. अष्ट भैरवांत रूरू आहे. रूरूचे रवळू आणि त्यापुढे नाथशब्द जोडून रवळनाथ असे ते नाव बनले असावे. सर्पविष उतरवणे हे रवळनाथाचे वैशिष्ट्य आहे व देशावरच्या बहिरोबाचेही तेच वैशिष्ट्य आहे. त्यावरून हे दोन्ही देव भैरवसंघातले असावेत.’
भैरव, मल्हारी, खंडोबा, जोतिबा यांच्याप्रमाणेच रवळनाथास शैव देवता मानण्यात येते. रवळनाथ हे उग्र व लढाऊ वृत्तीचे, तसेच यक्ष प्रकृतीचे दैवत आहे. ते दक्षिण कोकणचे संरक्षक क्षेत्रपाल असल्याने तेथील प्रत्येक गावात रवळनाथाची मूर्ती असते. रवळनाथाला कोकणात पिसो रवळू असेही म्हटले जाते. हे गोमांतकातीलही एक प्रमुख दैवत आहे. गोव्यात नागपंथीयाचे आगमन झाल्यावर त्यांनी देवाचे मूळ रवळू हे नाव बदलून रवळनाथ असे ठेवले. कोकणालगत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही रवळनाथाची अनेक मंदिरे आहेत. त्यातीलच एक मंदिर चंदगड येथे आहे.
या गावाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की रवळनाथाने येथे चंद्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या गावास चंदगड असे नाव पडले. येथील मूळ मंदिराची स्थापना ज्या अज्ञात दाम्पत्याने केली त्यांची समाधी आजही मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक चौथऱ्यावर आहे. सतराव्या शतकात १६१७ साली या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार करण्यात आला. यानंतर काही वर्षांनी मंदिराचा दुसऱ्यांदा, तर १८२३ मध्ये तिसऱ्यांदा जीर्णोद्धार झाला अशी नोंद आहे. १८९२ साली मंदिराच्या विश्वस्त संस्थेची स्थापना झाली. या देवाचा सरंजाम (इनाम जमिनी) येथील हिंडगाव, चंदगड, कोनेवाडी या गावांत मिळून १३५ एकर एवढा आहे. याच प्रमाणे लाटगाव, हेरे आणि कणकुंबी या परिसरातील ८४ गावेही देवाच्या सरंजामात येतात. त्यामुळे येथील रवळनाथाला ‘८४ चौबार’ असे म्हटले जाते.
हे भव्य मंदिर रस्त्यापासून काहीसे उंचावर आहे. ३५ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. यातील पहिल्या दहा पायऱ्या चढून आल्यावर बाजूला एका द्विस्तरीय चौथऱ्यावर पाच थरांची दीपमाळ आहे. या चौथऱ्यांच्या खालच्या थरात दीपकोष्ठक आहे. वरील थरात चारही कोनांवर गजराज व कमळ फुलांची नक्षी आहे. दीपमाळेच्या पायाकडील बाजूस कमळ फुलाची प्रतिकृती असून वर निमुळती होत गेलेली दीपमाळ आहे. दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. यापुढे २५ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या मंदिराभोवती भक्कम आवारभिंत आहे.
मंदिरासमोर चौथऱ्यावर तुलसी वृंदावन व त्या शेजारी समाधीस्थान आहे. दर्शनमंडपाच्या छतावर दोन स्तंभांवर तीन देवकोष्ठके व त्यावर तीन कळस आहेत. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूस असलेल्या उपमंडपांवर निमुळती शिखरे व त्यावरील आमलकावर कळस आहेत. दोन्ही बाजूस दोन अष्टकोनी स्तंभ असलेल्या मुखमंडपात प्रवेश करताना चार पायऱ्या चढून यावे लागते. स्तंभांच्या बाजूला सिंह शिल्प आहेत. सभामंडपाच्या लाकडी प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. द्वारशाखांवर पर्णपुष्पलता कोरलेल्या, द्वाराच्या झडपांवर चौकोनात मंगल कलश व बाजूने पानाफुलांची नक्षी आहे. चंद्राकार द्वारपट्टीवर पुष्पलता व पर्णलता कोरलेल्या आहेत व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. सभामंडपात प्रवेश करताच समोर टांगून ठेवलेली चर्म पादत्राणे दिसतात. रवळनाथ देवास पादत्राणांचे नवस बोलण्याची प्रथा आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या (गूढमंडप) दुमजली सभामंडपात दोन्ही बाजूस प्रत्येकी १२ नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभ पायाजवळ गोलाकार, वर अष्टकोनी व निमुळते होत गेलेले आहेत. स्तंभांवर वर्तुळाकार कणी व त्यावरील महिरपी कमानींनी वरचा सज्जा तोलून धरलेला आहे. सभामंडपातील चारही बाजूंनी असलेल्या वरच्या सज्जास सुरक्षा कठडा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला वरच्या सज्जात जाण्यासाठी सुरक्षा कठडे असलेले जीने आहेत. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सज्जावर भाविकांना कार्यक्रमांच्यावेळी बसण्याची सुविधा आहे.
सभामंडपातील समतल जमीन संगमरवरी फरशी आच्छादित आहे. दोन्ही बाजूंस दरवाजे आहेत. सभामंडपात गर्भगृहासमोर असलेल्या दोन फूट उंच चौथऱ्यावरील अंतराळात चार षटकोनी लाकडी स्तंभ व त्यावर चंद्राकार तुळया आहेत. येथील लाकडी मंडप पानाफुलांच्या नक्षीकामाने सुशोभित आहे. पुढे गर्भगृह आहे. आतून चौकोनी असलेल्या गर्भगृहात चांदीच्या नक्षीदार मखरात रवळनाथाची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू व अमृतपात्र आहे. डोक्यावर मुकुट व गळ्यात जानवे आहे. मूर्तीच्या मागे चांदीची सूर्य प्रभावळ आहे. गर्भगृह बाहेरून अष्टकोनी आहे. त्याच्या प्रत्येक भिंतीवर गणपती, लक्ष्मी, सरस्वती, शंकर, श्रीराम, राधा कृष्ण व श्रीदत्त या देवतांच्या लाकडात कोरलेल्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाच्या बाजूने असलेल्या प्रदक्षिणा मार्गावर उत्सव काळात वापरली जाणारी देवाची चांदीची पालखी ठेवलेली आहे.
रवळनाथ मंदिरास बाह्य बाजूने असलेल्या नक्षीदार स्तंभांची तसेच वरच्या मजल्यावर असलेल्या खिडक्यांना कोष्टकांची रचना आहे. मंदिराच्या छतावर आठ थरांचे उंच अष्टकोनी शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. मुख्य मंदिराशिवाय प्रांगणात गणेश, हनुमान, महादेव, सातेरी देवी, बारावस, भावेश्वरी देवी आदी मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांतील मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत.
मंदिरात चैत्र पाडवा, गणेश चतुर्थी, नवरात्री, दसरा, होळी आदी वार्षिक उत्सव साजरे होतात. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारपासून रविवारपर्यंत पाच दिवसांचा जत्रोत्सव असतो. मंगळवारी गावातील महिला महालक्ष्मी मंदीरात देवीची खणा नारळाने ओटी भरतात. रात्री गोंधळ व महाप्रसाद केला जातो. बुधवारी चौक भरणे, विडे मांडणे व आरती बांधणे आदी विधी गावातील मानकरी करतात. दुपारी पेटत्या आरतीचे ताट डोक्यावर तोलून, त्यास हातही न लावता देवाचे गुरव ग्रामप्रदक्षिणा करतात. दिवाळी पाडव्यास देखील डोक्यावरील आरतीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी ग्रामप्रदक्षिणा मार्गावर म्हशी उधळण्याची प्रथा आहे. भाविक ग्रामप्रदक्षिणा मार्गावर लोटांगण घालतात व डोक्यावरील आरती संतुलीत करत गुरव प्रदक्षिणा पूर्ण करतात. हा उत्सव पाहण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातून हजारो भाविक येथे येतात.