राऊळ महाराज संस्थान

पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र पिंगुळी हे दत्तावतारी ब्रह्मयोगी श्रीसमर्थ राऊळ महाराज यांच्या वास्तव्याने आणि समाधीस्थानाने पुनीत झालेले भक्तिपीठ होय. देशविदेशांतील असंख्य भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक नकाशावर राऊळ महाराजांच्या मठामुळे आज या गावास महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. हे क्षेत्र राऊळ महाराजांचे आध्यात्मिक वारसदार समर्थ अण्णा महाराज यांचीही तपोभूमी आणि कर्मभूमी आहे. अण्णा महाराजांनी या मठाचा कायापालट करून येथे अनेक सुंदर मंदिर वास्तूंची उभारणी केली. याशिवाय त्यांनी येथे राऊळ महाराजांच्या कृपाशीर्वादाने सातत्याने अन्नदान यज्ञही चालवला.

पिंगुळी या भक्तिपीठाचा इतिहास असा आहे की या गावात सावित्रीबाई आप्पाजी राऊळ या दाम्पत्याच्या पोटी १६ ऑक्टोबर १९०५ रोजी राऊळ महाराजांचा जन्म झाला. त्यांचे पाळण्यातील नाव श्रीकृष्ण असे होते. मात्र सर्वजण त्यांना आबा म्हणत. पिंगुळीचे ग्रामदैवत असलेल्या रवळनाथाच्या पूजाअर्चेची वहिवाट राऊळ कुटुंबाकडे होती. शिवाय ते शेतीही करीत. बालवयातच राऊळ महाराजांना अध्यात्माची गोडी लागली. त्या वयातही त्यांना संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग, तसेच ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. तिसऱ्या इयत्तेनंतर त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर ते परमार्थातच रममाण झाले. मोठे झाल्यानंतर काही काळ त्यांनी मुंबईत नोकरी केली. मात्र देवाच्या ध्यासापायी त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यांचा विवाह झाला होता. मात्र संसारातही ते अलिप्तपणे वावरत असत. मुंबईत गिरगावातील माधवबाग येथे वास्तव्य असलेले, इंचगिरी संप्रदायाचे बाळकृष्ण महाराज हे राऊळ महाराजांचे सद्‌गुरू. त्यांच्या दर्शनासाठी ते नेहमी मुंबईला येत असत. त्यांना कीर्तनात साथसंगत करणे, वादनगायन करणे अशी कार्ये ते करीत असत. वयाच्या चाळिशीत त्यांनी ध्यानसाधनेस प्रारंभ केला

१९४५ ते १९७२ या काळात तब्बल २७ वर्षे त्यांनी ध्यानसाधना केली. योगी पुरुष ध्यानसाधनेसाठी अरण्यात वा हिमालयात जातात. मात्र राऊळ महाराजांनी पिंगुळीतच ध्यानसाधना केली. त्यांची आई वाणसामानाचे दुकान चालवत असे. त्या दुकानास लागून असलेल्या छोट्या खोलीत ते ध्यानाला बसत असत. सलग सहा महिने हे ध्यान सुरू असे. या काळात ते खाणेपिणे कमी करीत करीत नंतर त्याचा पूर्णतः त्याग करीत असत. असे सांगतात की सहा महिने सलग समाधीवस्थेत बसल्यामुळे त्यांचे शरीर लाकडासारखे कडक होत असे. समाधीतून भानावर आल्यावर ते जागचे हलू शकत नसत. अशा वेळी मालीश करून त्यांचे हातपाय मोकळे करावे लागत असत. सुरुवातीला ग्रामस्थ त्यांची टवाळी करीत असत. ‘राऊळांचो झील येडो झालो, त्याका खूळ लागला,’ असे म्हणत असत; परंतु नंतर त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची प्रचिती आल्यानंतर हेच लोक त्यांच्या पायाशी आले. दत्तावतार मानल्या गेलेल्या या समर्थ सत्पुरुषाने वयाच्या ऐंशीव्या वर्षी गाणगापूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी भक्तमंडळींसह मुंबईला आले असता, तेथेच ३१ जानेवारी १९८५ रोजी ते परब्रह्मतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या महानिर्वाणानंतर अण्णा महाराज आणि अन्य भक्तजनांनी त्यांचे पिंगुळी येथे समाधी मंदिर उभारले

अण्णा महाराज हे राऊळ महाराजांचे पुतणे, तसेच उत्तराधिकारी होते. ते पिंगुळी मठाचे मठाधिपतीही होते. १३ मार्च १९४५ रोजी विनायक चतुर्थीला त्यांचा जन्म झाला. त्यामुळे राऊळ महाराजांनी त्यांचे नाव विनायक असे ठेवले होते. लहानपणी गुरे राखणे हा अण्णा महाराजांचा आवडीचा छंद होता. त्यामुळे ते शाळेत रमले नाहीत. वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते राऊळ महाराजांच्या सेवेत निमग्न झाले. त्यातूनच त्यांना अध्यात्माची ओढ लागली. त्यांचे त्यांच्या आईवर नितांत प्रेम होते. त्यामुळे आई हाच श्रेष्ठ गुरू असा उपदेश ते भक्तांना करीत असत. ते स्वतःला भक्तांचा झाडूवाला, तसेच गुराखी असे म्हणवून घेत असत. एकतारीवर ते सुश्राव्य भजन म्हणत असत. स्थापत्य क्षेत्रात त्यांना मोठी गती होती. त्यांच्या मठाधिपती कार्यकाळात पिंगुळीत अनेक मंदिरे उभी राहिली. १८ मार्च २०१८ रोजी, गुढीपाडव्याला त्यांनी अन्नत्यागाचे कडक व्रत केले होते. सलग १३ महिने ते दिवसाला केवळ एक ग्लास दूध पाच ग्लास गरम पाणी घेत असत. कोरोना महामारीनंतर १६ मे २०२१ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी, पडवे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. . पू. सद्गुरू राऊळ महाराज ट्रस्ट . पू. विनायक अण्णा राऊळ महाराज ट्रस्ट या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना साह्य केले. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी ते धावून गेले. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ राज्यालाही त्यांनी आपत्तीच्या वेळी आर्थिक मदत केली होती. अण्णा महाराज यांनी आपली समाधी आधीच करून ठेवली होती. तेथेच त्यांच्या भक्तांनी त्यांना समाधीस्त केले

राऊळ महाराजांचे समाधी मंदिर दुमजली आहे. मंदिराच्या समोर एक मोठी विहीर आहे. जमिनीपासून काही फूट उंच जोत्यावर मंदिर बांधलेले आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. मंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. दर्शनीभागात कमानदार प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोठ्या खिडक्या आहेत. द्वाराच्या उजव्या बाजूस चौथऱ्यावर नमस्कार मुद्रेतील गरुडाची, तर डाव्या बाजूस हनुमंताची मोठी रंगीत मूर्ती आहे. सभामंडपात आत जमिनीवर सर्वत्र गडद भगव्या रंगातील गुळगुळीत फरशा बसवण्यात आल्या आहेत. समोरच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आकारातील खुल्या प्रकारचा गाभारा आहे. त्यात मध्यभागी राऊळ महाराजांचे समाधीस्थान आहे. त्यावर चांदीने मढवलेल्या चबुतऱ्यावर राऊळ महाराजांची छोटीशी बैठी मूर्ती आहे. या मूर्तीचे तोंड मंदिरालगत बाहेर असलेल्या औदुंबराकडे आहे. याबाबत अशी कथा सांगण्यात येते की हा राऊळ महाराजांनी रोपित केलेला औदुंबराचा वृक्ष आहे. १९६४ साली त्यांनी येथे अण्णा महाराजांनाविन्या ये विन्या, ह्यो औदुंबर हय लाव. तो गाणगापुरचो दत्त आसा,’ असे सांगून औदुंबराचे रोपटे येथे लावले होते. आपल्या भक्तांना ते प्रथम या औदुंबरास नमस्कार करून प्रदक्षिणा करण्यास सांगत असत. असे सांगितले जाते की खूप संकटात असलेला भक्त पाहून ते अण्णा महाराजांनाविन्या हेका औदुंबराक तोडूक सांगअसे सांगत. त्या भक्ताने औदुंबराची फांदी तोडली की त्यास संकटमुक्ती मिळत असे. आपल्या नजरेसमोर नेहमी हा दत्तस्वरूप औदुंबर असावा, अशी राऊळ महाराजांची इच्छा असे. ‘माका तेच्याकडे कायम बघुचा आसा,’ असे ते म्हणत असत. त्यामुळेच राऊळ महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांना औदुंबराकडे कायम पाहता येईल, अशा स्थितीत समाधीत बसवण्यात आले

राऊळ महाराजांच्या या समाधीस्थळी खाली छोटासा चांदीचा पाट ठेवला आहे. त्या पाटावर माथा टेकवून समाधीचे दर्शन घ्यावे, असा नियम आहे. याचे कारण असे सांगण्यात येते की समाधीपीठावर डोके टेकवले तर तेथे खालीच राऊळ महाराजांचे मस्तक आहे. त्यावर आपले डोके टेकवल्यासारखे होईल. म्हणून पायथ्याशी ठेवलेल्या पाटावर डोके टेकवूनच दर्शन घेण्याची येथे पद्धत आहे.

समाधीच्या समोर एका उंच चौथऱ्यावर राऊळ महाराजांची आसनारूढ मूर्ती आहे. डोईवर गुलाबी फेटा, अंगात सोनेरी वस्त्र, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, एक हात आसनावर टेकवलेला आणि दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत, अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीची वस्त्रे उत्सवानिमित्ताने बदलली जातात. कधी त्यांना मस्तकी करंडक मुकुट अंगात सदराजाकीट, अशी वस्रे परिधान केली जातात. या मूर्तीच्या मागे चांदीचे नक्षीकाम केलेला मखर आहे. त्यावर खालच्या बाजूस गजमुखे आहेत वर मध्यभागी कमळपुष्प कोरलेले आहे. मूर्तीच्या खाली डाव्या बाजूस आदिनाथाची उजव्या बाजूस मायमाऊलीची पितळी मूर्ती आहे. गाभाऱ्यात एका बाजूस महाराजांची सुशोभित पालखी ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी महाराजांची काही छायाचित्रेही पाहावयास मिळतात. याशिवाय मंदिर प्रांगणात गुरुकाका समाधी मंदिर (गुरुकाका हे राऊळ महाराजांचे पुतणे अण्णा महाराजांचे धाकटे बंधू होत), हनुमान मंदिर, विठ्ठलरखुमाई मंदिर गौरीशंकर अशी मंदिरे आहेत. भाविकांच्या सोयीसाठी येथे सुसज्ज भक्त निवास आहे

समर्थ राऊळ महाराजांनी माघ शुद्ध दशमीला (३१ जानेवारी १९८५) देह ठेवला. माघ शुद्ध द्वादशीला ( फेब्रुवारी १९८५) त्यांना समाधीस्त करण्यात आले. म्हणून दर द्वादशीला सायंकाळी ते रात्री या वेळेत येथे पालखी मिरवणूक काढली जाते. या वेळी आलेल्या सर्व भाविकांना अन्नदान केले जाते. याशिवाय ३१ जानेवारीला राऊळ महाराज यांची पुण्यतिथी, महाशिवरात्र, १३ मार्चला अण्णा महाराज जयंती, आषाढी कार्तिकी एकादशी, गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशी, दत्त जयंती कोजागिरी पौर्णिमा या दिवशी येथे उत्सव साजरे केले जातात. येथील स्थानावर असलेली भाविकांची श्रद्धा येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार राज्य सरकारनेही या मंदिराचा तीर्थक्षेत्राचादर्जा देऊन गौरव केला आहे

पिंगुळी गाव हे राऊळ महाराजांच्या मठामुळे जसे ख्यातकीर्त आहे, तसेच ते कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी या लोककलेसाठीही सुप्रसिद्ध आहे. येथील आदिवासी ठाकर समाजाने कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथीची ही परंपरा आजही जतन केलेली आहे. रामायण, महाभारतातील कथा कळसूत्री बाहुल्या आणि चित्रांच्या माध्यमातून लोकांना सांगून त्यांचे मनोरंजन करतानाच धार्मिकता रुजवण्याचे काम या बाहुलेकरांनी पिढ्यान् पिढ्या केले आहे. या गावातील परशुराम गंगावणे हे वयाच्या बाराव्या वर्षापासून ही कला सादर करीत असत. या पारंपरिक कलेचा ठेवा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावा, त्यांना सांस्कृतिक इतिहास समजावा यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्या घराच्या गोठ्यातील गुरे विकून त्या पैशांतून कलादालन सुरू केले होते. आज येथे मोठेविश्राम ठाकर आदिवासी कला आंगणउभे आहे. देशविदेशांतील अभ्यासक येथे येत असतात. परशुराम गंगावणे यांच्या या कार्याबद्दल २०२१ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

उपयुक्त माहिती

  • कुडाळपासून किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील अनेक शहरांतून कुडाळसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दू. ०२३६२ २२२५०८
  • मो. ९७६५९५६६११ 
Back To Home