परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या रामपुरी (खुर्द) या गावात गोदावरी, खडकी (यक्षिणी) आणि सिंधफणा या तीन नद्यांच्या संगमावर रत्नेश्वर महादेवाचे मंदिर वसलेले आहे. येथील शिवलिंगाचा शोध प्रभू रामचंद्र यांना लागला, असे सांगितले जाते. त्यांनी पुरोहितांकरवी या शिवलिंगावर नवरत्नांचा अभिषेक केला. यामुळे या पिंडीला ‘रत्नेश्वर महादेव’ असे नाव पडले. पाथरी तालुक्यातील रामपुरी (खुर्द) येथे असलेल्या या स्वयंभू शिवलिंगाच्या कंठातून सदैव पाणी वाहत असते. हे शिवलिंग जागृत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कारणामुळे दूरदूरवरून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
येथील शिवलिंगाबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार, त्रेतायुगात प्रभू रामचंद्र आपल्या परिवारासह येथे आले होते. त्या काळी येथे दाट जंगल होते. प्रभू रामचंद्र यांचा तीन दिवस येथे मुक्काम होता. ते परिसरात असलेल्या टेकडीखालील एका झाडाजवळ बसत असत. सध्याचे शिवलिंग असलेल्या ठिकाणी कपिला नावाची गाय नेहमी दूध सोडत असे.
ती जंगलातील या स्थानावर दूध सोडत होती. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या प्रभू रामचंद्र यांनी आपल्या भात्यातील एक बाण टेकडीवर मारला. तो बाण पुन्हा त्यांच्या पायापाशी येऊन पडला. त्यानंतर त्यांनी टेकडीवर जाऊन पाहिले. तेथे त्यांना या शिवलिंगाचे दर्शन झाले. त्यांनी या पिंडीची विधिवत पूजा केली. त्यानंतर त्यांनी पुरोहितांना बोलावून या शिवलिंगावर नवरत्नांचा अभिषेक केला. प्रभू रामचंद्र यांच्या वास्तव्यामुळे या गावाला ‘रामपुरी’ असे नाव पडले, तर त्यांनी येथे नवरत्नांचा अभिषेक केल्यामुळे या पिंडीला ‘रत्नेश्वर महादेव’ म्हटले जाते.
हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे. या मंदिराच्या मागील बाजूने खडकी नावाची छोटी नदी वाहते. पूर्वी या नदीचे नाव ‘यक्षिणी’ होते. त्यासंदर्भातही एक कथा सांगितली जाते. पौराणिक काळात विश्वावसू नावाच्या यक्षाला पिप्पला नावाची बहीण होती. ती नेहमी ऋषींची टिंगलटवाळी करत असे. तिच्या या वर्तनामुळे क्रोधित झालेल्या ऋषींनी एके दिवशी तिला शाप दिला. त्या शापामुळे ती यक्षिणी नावाची नदी होऊन वाहू लागली. त्यावेळी विश्वावसूने येथे तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेल्या शिवशंकरांनी त्याला वर मागायला सांगितला.
त्यावेळी विश्वावसूने आपल्या बहिणीस उःशाप मिळावा, अशी विनंती केली. त्यावर शिवशंकरांनी, “ही नदी गोदावरी नदीला मिळाल्यावर तुझी बहीण पूर्ववत होईल,” असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार यक्षिणी नदी येथे गोदावरी नदीला मिळाली. त्यानंतर पिप्पला यक्षिणी शापातून मुक्त झाली.
रामपुरी येथील हे मंदिर एका शांत ठिकाणी आहे. मंदिरासमोरून गोदावरी नदीचे पाणी वाहते. परिसरात अनेक मोठी झाडे आहेत. पेशवेकाळात हे मंदिर उभारल्याचे सांगण्यात येते. मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे. हे मंदिर सुमारे चार फूट उंचीच्या जोत्यावर हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. भाविकांना काही पायऱ्या चढून मंदिरात यावे लागते. मंदिरासमोर नव्याने बांधलेल्या मंडपावर पत्र्याचे छप्पर आहे. या मंदिराची मूळ रचना तीन दगडी कमानी असलेला सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपातील चार स्तंभांच्या मधोमध, गर्भगृहाकडे मुख करून नंदीची मूर्ती आहे. सभामंडपातील स्तंभ दगडी स्तंभपादांवर उभे आहेत. या स्तंभांवर विविध आकार आणि सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे. येथे महिषासुरमर्दिनी आणि कृष्णलीला अशी शिल्पेही कोरलेली आहेत.
गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. या स्वयंभू शिवलिंगाखाली थोडी पोकळी असून तिथे सतत पाणी असते. हे मंदिर गोदावरी नदीच्या पात्रापासून उंचावर आहे, तरीही या पिंडीखालून सतत पाणी पाझरत असते. गावावर एखादे संकट येणार असल्यास हे पाणी आटते. अशा वेळी ग्रामस्थ या पिंडीवर दुग्धाभिषेक करतात. या उपायामुळे संकट टळते, अशी लोकांची धारणा आहे. या शिवलिंगाच्या मागील बाजूला असलेल्या चौथऱ्यावर भगवान शिवांची ध्यानस्थ मूर्ती आहे. या मूर्तीच्या खालील बाजूस उजवीकडे गणेशाची पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहात संगमरवरी फरसबंदी आहे आणि वर दगडी छत आहे. मंदिरातील छोट्या दरवाजातून गोदावरी पात्राचे दर्शन होते.
गर्भगृहावर एक शिखर आहे. शिखराच्या चारही बाजूंना मिनारांसारखी रचना असून या मिनारांजवळ सिंहशिल्पे कोरलेली आहेत. त्याच्या मध्यभागी चौकोनी आकाराचे चार स्तर आहेत. या स्तरांमधील देवकोष्टकांमध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्याच्या वरील बाजूस आमलक आणि कळस आहेत. शिखरापासून जवळच शेषशायी विष्णू आणि श्रीलक्ष्मी यांचे शिल्प आहे. या मंदिराला लागूनच एक मोठा मंडप आहे. या मंडपात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
मंदिर परिसरातील एका झाडाखाली आणि नदीपात्राजवळ खुल्या जागेत स्वतंत्र शिवलिंगे आहेत.
रत्नेश्वर महादेवाचे शिवलिंग जागृत असल्याच्या श्रद्धेमुळे अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर सोमवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येथे अनेक कुटुंब गर्भवती महिलांच्या डोहाळजेवणाचे विधीही करतात. जलस्रोतांजवळ असलेल्या बहुतांश शिवमंदिरांच्या परिसरात दशक्रिया विधी करण्यात येतात. मात्र, येथे हे विधी केले जात नाहीत. महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव आहे. या दिवशी शेकडो भाविक रत्नेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी येतात. महाशिवरात्रीनिमित्त येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. सोमवती अमावस्या आणि इतर पर्वकाळात अनेक भाविक येथील गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करून महादेवाचे दर्शन घेतात. श्रावण महिन्यातही येथे भाविकांची मोठी गर्दी होते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात.