गोवेकरांचा लाडका दामबाब म्हणजे दामोदर. हे मूळात भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे. परंतु जांबावलीतील मंदिरात दामोदर हा शिवस्वरूपात विराजमान आहे. या शिवाय या मंदिरात लक्ष्मी नारायणाची मूर्तीही स्थापित आहे. यामुळेच शैव आणि वैष्णव पंथातील समन्वयाचे एक प्रतिक म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. असे सांगण्यात येते की येथील दामोदराचे मूळ स्थान मडगावमध्ये होते. सोळाव्या शतकात ते येथे स्थलांतरित करण्यात आले. संकटकाळात दामोदराला हाक मारली असता तो मदतीला धावून येतो, अशी गोमंतकवासियांची श्रद्धा आहे.
दामोदर या नामाची व्युत्पत्ती ज्याच्या उदरास वा कमरेस दाम म्हणजे दोरीने बांधलेला आहे तो बाळकृष्ण अशी सांगण्यात येते. खोडकर बालकृष्णाच्या उदरास एकदा यशोदा मातेने दोरीने बांधून ठेवले होते, या कथेवरून कृष्णास दामोदर असे म्हटले जाते. परंतु येथे दामोदर हे शिवाचे शांत स्वरूप आहे. या मंदिराचा इतिहास असा की मडगावचे मूळ नाव मठग्राम असे होते. गोव्यातील आर्यांच्या पहिल्या वसाहतीचे ते ठिकाण होते. या ठिकाणी आर्यांनी त्यांचे मठ स्थापन केले. त्यामुळे त्यास हे नाव पडले. म्हाडग्राम किंवा जोहारग्राम या नावांनीही ते ओळखले जाई. ‘कोकणाख्यान’ या ग्रंथातील ‘सासष्टी महिमा’मध्ये ‘सासष्टदेशी मुख्य सदर। जोहारग्राम महा थोर। तेथे देव दामोदर। महिमा अपार तयाचा।।’ असा याचा उल्लेख आहे.
काही अभ्यासकांच्या मते, इसवी सनाचे बारावे शतक म्हणजे कदंब काळापासून मडगावमध्ये दामोदराचे मंदिर अस्तित्वात होते. पुढे इ.स. १५१० मध्ये गोव्यावर पोर्तुगीजांनी आक्रमण केले. यानंतर १५६५ मध्ये पोर्तुगीज कॅप्टन दियोगु रुद्रिगीस (रॉड्रिग्ज) याने आर्चबिशप डोम कॅस्पर लियो पेरेरा यांच्या आदेशाने मडगावमधील हे मंदिर उद्ध्वस्त केले. परंतु तत्पूर्वीच मंदिरातील मूळ मूर्ती ग्रामस्थांनी लपवून ठेवली होती. ती १५६७ मध्ये केपेतील जांबावली (झांबोलिम) या गावात स्थलांतरित करण्यात आली व येथे या मंदिराची स्थापना झाली.
या मंदिराबाबत अशीही आख्यायिका सांगण्यात येते की मडगावची देशमुखी किंवा देसाईपण असलेल्या एका कुटुंबात मखजी किंवा मलकाजी दामोदर हा तरुण होता. आपल्या सत्कर्मांमुळे तो जनसामान्यांत प्रिय होता. त्याचा विवाह केळशी गावातील एका मुलीशी झाला. लग्न करून तेथून परतत असताना मडगावच्या वेशीवर त्या वधु-वरांची भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली. पुढे ज्या ठिकाणी या वधु व वरांची हत्या करण्यात आली, तेथेच एक मंदिर बांधण्यात आले. ते दामोदराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. स्थानिकांनी त्या मंदिरात आपले गाऱ्हाणे मांडायला सुरुवात केली. हळुहळू या स्थानाची महती वाढत गेली व दामोदरास देवत्व प्राप्त झाले.
या मंदिरावर पोर्तुगीज धर्मांधांची वक्रदृष्टी पडल्यानंतर या मंदिरातील मूर्ती हलविण्यात आल्या. या संदर्भात अशी दंतकथा सांगण्यात येते की पोर्तुगीज सैनिक विटंबना करतील या भयाने त्या मूर्ती रात्रीच्या अंधारात गुपचूप नदी पार करून जांबावलीस नेण्यात आल्या. त्या वेळी दैवी चमत्कार घडला. अचानक नदीमधील पाणी कमी झाले आणि नदीने मूर्ती नेण्यासाठी वाट करुन दिली.
जांबावलीतील मंदिर गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) समाजाचे असून गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या मार्गदर्शनाने चालते. मंदिराच्या वाटेवर शोभिवंत कमान आहे. आवारात वड आणि पिंपळाचे वृक्ष आहेत. येथे चिरेबंद बांधकाम केलेली एक विहिरही आहे. याच विहिरीच्या पाण्याचा वापर दामोदराच्या अभिषेकासाठी करण्यात येतो. मंदिराच्या रचनेत गोव्याची पारंपारिक स्थापत्यकला आणि कर्नाटक शैलींचा संगम दिसतो. त्याची बांधणी काळ्या दगडांत करण्यात आली आहे. मात्र त्यावर आता रंगकाम केलेले आहे.
मंदिर प्रशस्त आहे. सभामंडप, अवकाश आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुख्य दरवाजाच्या वर सिंहासनावर बसलेल्या शिवाचे उठावशिल्प आहे. याशिवाय दरवाजावर कोरीव तोरण आणि सिंहाच्या आकृत्याही आहेत. प्रशस्त सभामंडपाच्या छतावर आणि भिंतीवर सुरेख नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या भिंतींवर भगवद्गिता, रामायण आणि महाभारतातील श्लोक तसेच छतालगत अनेक देवप्रतिमा कोरलेल्या आहेत. सभामंडपात अखंड काळ्या पाषाणातील सुबक कोरीवकाम असलेली नंदीची मूर्ती आहे. सभामंडपासमोर दोन स्वतंत्र गर्भगृहे आहेत. त्यापैकी डावीकडच्या गर्भगृहात लक्ष्मीनारायण आणि उजवीकडील गर्भगृहात दामोदराची मूर्ती स्थापित आहे. या दोन्ही मूर्ती चांदीच्या नक्षीदार मखरात आहेत. या गर्भगृहांभोवती प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग आहे.
याशिवाय मंदिर परिसरात रामनाथ, मुळवीर, चामुंडेश्वरी आणि महेश ही लहान मंदिरे आहेत. महाकालीची मूर्तीही येथे पूजली जाते. येथेच क्षेत्री आणि रौद्री विग्रह असल्याचेही सांगितले जाते. मंदिराच्या आवारात दीपस्तंभ, तुळशीवृंदावन आणि नदीघाट आहे. परिसरात भक्तांच्या सोयीसाठी अनेक इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यात सभागृह आणि भक्तनिवास आहेत.
दामोदर मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात. येथील मुख्य उत्सव शिगमो (शिमगा) हा असतो. गोव्याचा वसंतोत्सव मानला जाणारा हा उत्सव फाल्गुन महिन्यात साजरा होतो. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात लोकनृत्ये सादर केली जातात. देवाची मिरवणूक काढली जाते. या उत्सवात हिंदूंबरोबर ख्रिश्चन धर्मियही उत्साहाने सहभागी होतात. महाशिवरात्र हा येथे साजरा होणारा आणखी एक प्रमुख उत्सव. यात अभिषेक, जागरण आणि भजन केले जाते. येथे दिवाळीला विशेष पूजा आणि सहभोजनाचा कार्यक्रम असतो. जुलै महिन्यात होणाऱ्या रथोत्सवामध्ये दामोदराची पालखी रथावरून मिरवली जाते. नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. या साऱ्या उत्सवांमध्ये हजारो भक्त सहभागी होतात. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८.३० पर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.