रामेश्वर मंदिर

सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगराळ भागात उगम पावणारी विंचरणा नदी सौताडा येथे सुमारे दोनशे फूट उंचीच्या डोंगरकड्यावरून एका नयनरम्य धबधब्याच्या रूपात कोसळते. हा सौताडा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या परिसरात विविध वनस्पती, प्राणी तसेच कीटकांचा अधिवास आढळतो. ही नैसर्गिक जैवविविधता व निसर्गसौंदर्य निसर्गप्रेमींना भुरळ घालते. याच धबधब्याच्या परिसरात बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध व प्राचीन रामेश्वर शिवमंदिर आहे. पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाविकांचे हे मंदिर एक प्रमुख श्रद्धास्थान आहे.

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे, अर्थात चालुक्य काळातील आहे असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण करून आकाशमार्गे लंकेला नेत असताना सीतेने आपल्या अंगावरील दागिने खाली टाकले. ते रामाला येथेच सापडले, तेव्हा रामाने येथे वालुकामय शिवपिंडीची स्थापना केली होती. श्रीरामाने स्थापन केलेल्या या शिवपिंडीस ‘श्री रामेश्वर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. याच ठिकाणी मारुतीने काशीहून आणलेल्या शिवपिंडीची देखील स्थापना केली आहे.

हे मंदिर सौताडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. गावापासून मंदिराच्या वाहनतळापर्यंत येण्यासाठी उत्तम रस्ता आहे. वनराईने वेढलेल्या या परिसरातील वाहनतळालगत खाद्यपदार्थ व पूजासाहित्याची दुकाने आहेत. तेथून मंदिरापर्यंत उतरून जाण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे ३५० पायऱ्या आहेत. पायरीमार्गाच्या एका बाजूला डोंगरकड्याचा कठडा आहे, तर दुसऱ्या बाजूला पाषाणी सुरक्षा कठडा आहे. पायरीमार्गावरून मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला सौताडा धबधब्याचे सुंदर दर्शन होते. पायरीमार्गावरून खाली उतरताच विंचरणा नदीच्या पात्रावर बांधलेल्या दगडी पूल पार करून पुढे मंदिराकडे जाता येते. मंदिरास भक्कम व दुहेरी तटबंदी आहे. पहिल्या तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. उंचावर असलेल्या या प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. या प्रवेशद्वारास महिरपी कमानीने जोडलेले चार नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत व त्यावर छत आहे. वितानावर चक्रनक्षी कोरलेली आहे आणि छतावर दुसरा मजला आहे. वरील मजल्यावर समोरील बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. तसेच डाव्या बाजूला मारुती व उजव्या बाजूला महादेवाची मूर्ती आहे. दुसऱ्या मजल्यावर आठ गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. दुसऱ्या मजल्याच्या छतावर पिरॅमिडसारख्या उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले शिखर आणि त्यावर कळस आहे. या प्रवेशद्वारातून पुढे सुमारे पन्नास पायऱ्या चढून दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता येते. तटबंदीला लागून असलेल्या या पायरीमार्गाच्या दुसऱ्या बाजूला पाषाणी सुरक्षा कठडा आहे आणि त्यावर विशिष्ट अंतरावर आमलकांची सजावट केलेली आहे. अशीच सजावट दोन्ही तटबंदीच्या भिंतींवर पाहायला मिळते.

दुसरे प्रवेशद्वार बंदिस्त स्वरूपाचे आहे व प्रवेशद्वारावर अर्धचंद्राकार कमान आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर कठडा आहे आणि समोरील बाजूला देवकोष्टकात गणपती शिल्प आहे. कठड्याच्या चारही कोपऱ्यांवर चौकोनी लघू शिखरे आणि त्यावर कळस आहेत. छतावर मध्यभागी चौकोनी शिखर व त्यावर कळस आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजव्या बाजूला तिसरी तटबंदी आहे. या तटबंदीच्या बाह्य बाजूला चौथऱ्यावर अश्वशिल्प आहे, ज्याला ‘देवघोडा’ म्हणतात. तटबंदीत स्वागत कमान आहे व कमानीत दोन्ही बाजूला दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ व त्यावर सज्जा आहे. सज्जावर रांगेत पाच शिखरे आहेत. मध्यभागी असलेल्या शिखरातील देवकोष्टकात गणपती मूर्ती आहे. येथून दोन पायऱ्या उतरून रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो.

मंदिराच्या समोर दुमजली इमारत आहे व त्यातील वरील मजल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आहे. येथे विवाह सोहळे देखील आयोजित केले जातात. या इमारतीच्या तळमजल्यावर दर्शन रांग मंडप आहे. जेव्हा उत्सवकाळात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात, तेव्हा या मंडपाचा वापर केला जातो. दर्शन मंडपाच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंग दाखवणारी चित्रे रेखाटलेली आहेत आणि मंडपात स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन केलेले आहे. दर्शन मंडप व रामेश्वर मंदिर यांच्यामध्ये सुमारे दहा फूट खुली जागा आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रामेश्वर मंदिराची रचना आहे.

सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला मेघडंबरीत श्री गणेशाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. मेघडंबरीच्या उजव्या बाजूला श्रीरामाची प्राचीन मूर्ती आहे. ही या मंदिरातील मूळ मूर्ती आहे व मंदिरात नव्या मूर्ती स्थापित केल्यानंतर ही प्राचीन मूर्ती प्रवेशद्वाराजवळ स्थापित करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. सभामंडपाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत, तर वरील भागावर नरशाखा, वेलबुट्टीशाखा, पर्णलताशाखा, पुष्पलताशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणेश शिल्प व ललाटपट्टीवर पुष्पलतेचे नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपास डाव्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार आहे व या प्रवेशद्वाराच्या समोर देखील नंदी शिल्प आहे. या प्रवेशद्वारास तीन द्वारशाखा आहेत. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारशाखांवर पानाफुलांचे आणि स्तंभांचे नक्षीकाम आहे. ललाटबिंबावर गणपती शिल्प व ललाटपट्टीवर संयुक्त नक्षीकाम आहे.

सभामंडपात सुमारे २१ नक्षीदार स्तंभ आहेत व हे सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. वितानावर चक्राकार नक्षीकाम आहे. सभामंडपातील मधील सहा स्तंभांच्या मध्यभागी चौकोनी रंगशीला आहे व डाव्या बाजूला जमिनीवर काशी विश्वनाथ शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी हनुमानाने काशीहून आणून येथे स्थापित केली होती, असे सांगितले जाते. या शिवपिंडीच्या मागे भिंतीतील देवकोष्ठकात चतुर्भुज विष्णूची मूर्ती आहे.

येथून पुढे अंतराळ व त्यापुढे गर्भगृहाचे सात द्वारशाखा असलेले प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका, गंगा, यमुना यांची शिल्पे आहेत व वरील बाजूस नरशाखा, व्यालशाखा, पर्णलताशाखा, पुष्पलताशाखा आणि स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे व ललाटपट्टीवर पानाफुलांचे नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. या वालुकामय शिवपिंडीची स्थापना श्रीरामाने केली होती, असे सांगितले जाते. गर्भगृहात मागील भिंतीजवळ वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

मंदिराच्या छतावर सर्व बाजूंनी कठडा आहे व कठड्यात मुख्य सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वर देवकोष्टकात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराच्या वर देवकोष्टकात श्री विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे. कठड्यावर प्रत्येक कोनात लघु शिखरे आहेत. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे शिखर आहे. त्यातील पहिले तीन थर अष्टकोनी आहेत व त्यात प्रत्येकी आठ देवकोष्टके आहेत. चौथा थर गोलाकार आहे व त्यात स्तंभनक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे तीन आमलक आणि त्यावर कळस आहे.

मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूला गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिरात मध्यभागी जमिनीवर गुप्तेश्वर महादेवाची पिंडी व मागील भिंतीजवळ वज्रपीठावर गौरीहराची प्राचीन मूर्ती आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या मागे श्री कृष्णाचे मंदिर आहे. या मंदिरात मागील भिंतीजवळ वज्रपीठावर गाईच्या पाठीला टेकून बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती आहे. प्रांगणात मंदिराचे दिवंगत पुजारी देवराज दाजी भालेराव यांचे समाधीस्थळ व काही प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात पुजाऱ्यांची निवासस्थाने व इतर वास्तू आहेत. मंदिरापासून काही अंतरावर सौताडा धबधबा व सीताकुंड आहे.

महाशिवरात्री, रामनवमी आणि श्रावण मास हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उत्सवांच्या वेळी अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • पाटोदा येथून १९ किमी अतंरावर
  • बीड येथून ५८ किमी अंतरावर
  • पाटोदा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहारीची सुविधा आहे

रामेश्‍वर मंदिर

सौताडा, ताल. पाटोदा, जिला. बीड

Back To Home