रामेश्वर मंदिर

सिंदखेड राजा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा नगरीत प्रभू रामचंद्रांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाचे दर्शन घडते. वनवासादरम्यान दंडकारण्यातून प्रवास करताना प्रभू रामचंद्रांनी या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची लोकश्रुती प्रचलित आहे. या मंदिराची उभारणी अकराव्या-बाराव्या शतकात, देवगिरीच्या यादव राजवंशातील राज्यकर्त्यांच्या काळात झाल्याचे मानले जाते. हेमांडपंती स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मूळ मंदिराचा जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव यांनी जीर्णोद्धार केला. या पूर्वाभिमुख मंदिरात विराजमान रामेश्वर महादेव हे सिंदखेड राजाचे ग्रामदैवत आहेत. सध्या राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीनिमित्त सात दिवसांचा मोठा उत्सव होतो. त्या काळात मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.

प्राचीन काळी या गावात शरभंग ऋषींचा आश्रम होता, अशी श्रद्धा आहे. वनवासादरम्यान सीतामाता आणि लक्ष्मणासह दंडकारण्यातून जाताना प्रभू रामचंद्रांनी या आश्रमात विश्रांती घेतली होती व त्याच वेळी त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली, अशी मान्यता आहे. वनवासाच्या प्रवासात उत्तर प्रदेशातील अयोध्येतून निघाल्यानंतर प्रभू रामचंद्र हे सीता व लक्ष्मण यांच्यासह सध्याच्या बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड ही राज्ये ओलांडत दक्षिणापथात उतरले. या मार्गामध्ये आताच्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू आदी राज्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात नाशिकनजीक पंचवटी येथे लंकाधीश रावणाने सीताहरण केले. त्यानंतर तिच्या शोधार्थ श्रीराम व लक्ष्मण दक्षिण दिशेला गेले आणि वानरराज सुग्रीवाच्या सेनेसह सध्याच्या तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथील समुद्रकाठी पोहोचले. तेथे सेतू बांधल्यावर त्यांनी लंकेवर स्वारी केली. दिल्लीचे रहिवासी रामअवतार शर्मा यांनी सखोल अभ्यासानंतर रामप्रभूंच्या पदभ्रमणाचा मार्ग शोधून काढला. अयोध्येपासून सुरू होऊन रामेश्वर येथे संपणारा हा मार्ग ‘रामगमन मार्ग’ म्हणून ओळखला जातो. अयोध्या ते रामेश्वर या दरम्यानच्या २४९ स्थळांना प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श झाला. त्यांपैकी ५१ ठिकाणे महाराष्ट्रात आहेत व त्यात सिंदखेड राजाचा समावेश आहे. प्रभू रामचंद्रांनी प्रतिष्ठापना केलेले येथील शिवलिंग ‘रामेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे.

दहाव्या ते बाराव्या शतकात, देवगिरीच्या यादव राजवंशातील राज्यकर्त्यांच्या काळात हेमांडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारण्यात आले. कालौघात ते जीर्ण झाल्यानंतर लखुजीराजे जाधव यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आपल्या आजोळी येत, तेव्हा पुण्याला जाताना या मंदिरातील रामेश्वर महादेवाचे दर्शन घेत असत. या मंदिराजवळूनच इतिहासप्रसिद्ध पुणे-नागपूर ‘डाकलाईन’ गेली होती. या मार्गामुळेच सिंदखेडचा तत्कालीन व्यापार-उदीम मोठ्या प्रमाणावर वाढला होता, असा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये आढळतो. गावातील नीळकंठेश्वर मंदिरापासून काही अंतरावरच हे मंदिर आहे. या मंदिराकडे येताना वाटेत अनेक समाधी मंदिरे लागतात. लखुजीराजे आणि त्यांच्या तीन पुत्रांचे समाधीस्थानही या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे.

या मंदिराभोवती असलेल्या तटबंदीतील लहानशा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पुरातन मूर्तींचे दर्शन होते. या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर सुंदर कलाकुसर आहे. या प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना आहे. या प्रवेशद्वारातून दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील तटबंदीला आतील बाजूने ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्येच धार्मिक कार्यक्रम सादर करण्यासाठीचा रंगमंच आहे. प्रांगणात मध्यभागी सुमारे चार फूट उंचीच्या दगडी जोत्यावर रामेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिरासमोर प्रांगणात तीन तुळशीवृंदावने आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. पाच दगडी पायऱ्या चढून मंदिराच्या जोत्यावर प्रवेश होतो. या जोत्यावर एकूण सहा प्राचीन शिवलिंगे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर पाषाणात घडवलेल्या दोन नंदीमूर्ती आहेत.

मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंकडील भिंतींवर गणेशाच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारस्तंभांवर तसेच द्वारपट्टीवर नक्षीदार कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे कोरलेली आहेत. सभामंडपात मध्यभागी चार दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या मध्यभागी जमिनीवर रंगशिळा आहे. हे सर्व स्तंभ दगडी स्तंभपादांवर उभे असून त्यावर देव-देवतांची शिल्पे व वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या वितानावरही कोरीव काम आहे. अंतराळाच्या दर्शनी भिंतीत डावीकडील देवकोष्ठकात गणेशाची मूर्ती आहे, तर उजवीकडे शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारस्तंभांवर तसेच द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम आहे. द्वारस्तंभाच्या दोन्ही बाजूंना शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर मध्यभागी असलेल्या ललाटबिंबावर गणेशाचे स्थान आहे. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे कोरलेली आहेत. अंतराळातून तीन पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात मध्यभागी मोठ्या आकाराच्या शाळुंकेमध्ये रामेश्वराची प्राचीन पिंडी आहे.

या मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे. वरच्या दिशेने निमुळत्या होत गेलेल्या या शिखरावर दोन मुख्य चौकोनी स्तरांवर देवकोष्ठके कोरलेली आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूस, गर्भगृहाच्या मागे असलेल्या गोमुखातून शिवलिंगावर होणाऱ्या अभिषेकाचे जल बाहेर पडते. प्रांगणात जुनी विहीर आणि काही समाध्या आहेत. तटबंदीला लागून असलेल्या ओवऱ्यांच्या भिंतींवर जिजाऊ-शिवराय, देव-देवता तसेच संतांची चित्रे रंगवण्यात आली आहेत. एका ओवरीमध्ये अलीकडेच बांधलेल्या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमंताच्या मूर्ती आहेत. या मूर्तींसमोर पादुका ठेवलेल्या आहेत. परिसरात मंदिराचे काही अवशेषही विखुरलेले दिसतात.

महाशिवरात्रीनिमित्त येथे सात दिवसांची यात्रा भरते. या कालावधीत येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अखेरच्या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. श्रावण महिन्यात परिसरातील काही भाविक कावडयात्रांद्वारे येथे येतात व या कावडींमधील जलाने रामेश्वराच्या शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो.

उपयुक्त माहिती:

  • सिंदखेड राजा बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८५ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून सिंदखेड राजासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८६०७३८५७३, ९०४९७८१७८९

रामेश्‍वर मंदिर

सिंदखेड राजा, ताल. सिंदखेड राजा, जिला. बुलढाणा

Back To Home