पर्यटनस्थळ म्हणून परिचित असलेल्या देवगड तालुक्यातील मिठबाव गाव आपल्या स्वच्छ, सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. येथील माडाचे बन आणि पांढऱ्या चंदेरी वाळूचा किनारा पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतो. याच गावातील प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले रामेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. श्रद्धा, संस्कृती आणि सौंदर्य यांचा आगळावेगळा मिलाप या मंदिराकडे पाहिल्यावर जाणवतो. मिठबावचे ग्रामदैवत असलेला रामेश्वर जागृत व भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आहे, अशी ग्रामस्थांची व भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की मिठबाव गावातील मानकरी लोके व राणे आचरे येथे असलेल्या इनामदार रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवास हजर झाल्याशिवाय तेथील उत्सव सुरू होत नसे. एके वर्षी आचरा नदीस पूर आल्याने या मानकऱ्यांना आचऱ्यास वेळेवर पोहोचता आले नाही. तेव्हा लोके व राणे यांच्या अनुपस्थितीत उत्सव साजरा केल्याने ते संतापले. त्यांनी याच आचरा नदीतील काळ्या पाषाणापासून एक शिवपिंडी घडविली. या शिवपिंडीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून त्याभोवती त्यांनी एक लहानसे मंदिर उभारले. सध्या मिठबाव येथील रामेश्वर मंदिराच्या गर्भगृहात असलेली ही पिंडी साधारणतः ३५० वर्षे जुनी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. २००९ ते २०१५ असे सलग सहा वर्षे नूतनीकरणाचे काम झाल्यानंतर या मंदिराला प्रशस्त व भव्य असे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
या मंदिरास छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी ५१ रुपयांची सनद सुरू केली होती. असे सांगितले जाते की पत्नीस स्वास्थ्य लाभावे म्हणून चिमाजी आप्पा यांनी या रामेश्वरास पालखी अर्पण केली होती. इ.स. १७१६ ते १७४० या दरम्यानची ही घटना आहे.
रामेश्वर मंदिर संकुलाच्या प्रांगणास मोठे प्रवेशद्वार आहे. नक्षींनी सजवलेले दोन खांब, त्यावरील आडव्या खांबावर मध्ये मोठे देवकोष्ठक, त्याच्या दोन्ही बाजूंस नंदीच्या मूर्ती आणि दोन्ही कडेला छोट्या देवळ्यांचा आकार असे याचे स्वरूप आहे. या देवकोष्ठकात लक्ष्मी, शंकर आणि गणेशाच्या मूर्ती आहेत, तर कडेच्या देवळ्यांत शिवलिंगांचे उठावशिल्प आहे. या प्रांगणात रवळनाथ मंदिर, देवचारीवडा मंदिर, पूर्वतर खांबा मंदिर, जैन आकारी ब्राह्मण मंदिर, मारुती व गजान्त लक्ष्मी मंदिरे आहेत. प्रांगणात एका बाजूस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी व्यासपीठ व त्यासमोर प्रेक्षकांना बसण्यासाठी मोकळी जागा आहे. या प्रांगणातील हनुमान मंदिर, आकारी ब्राह्मण मंदिर येथून पुढे येताच रामेश्वर मंदिराच्या आवारभिंतीतील प्रवेश कमान आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रामेश्वर मंदिराची रचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक एका चौथऱ्यावर पाच थरांचे चार व सात थरांचे एक अशा पाच दीपस्तंभांची मालिका आहे. त्याच्या शेजारी काही अंतर सोडून एका चौथऱ्यावर छोटा स्तंभ आहे व त्याच्या तळाशी नंदीची प्राचीन दगडी मूर्ती व स्थानिक देवतेचा पाषाण आहे.
मंदिर उंच जगतीवर असल्याने मुखमंडपातील तीन पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. मुखमंडपावर वरच्या बाजूस वज्रपीठावर आसनस्थ गणेशाची मूर्ती आहे. पाश, अंकुश, मोदक धारण केलेली व एक हात अभय मुद्रेत असलेली अशी ही सुमारे पाच फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती आहे. प्रवेशद्वारावरील स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेले आहेत.
सभामंडपात नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. मधल्या दोन रांगांत प्रत्येकी पाच स्तंभ आहेत, तर बाजूच्या दोन रांगा प्रत्येकी सात स्तंभांच्या आहेत. कोकणी स्थापत्य शैलीनुसार सभामंडपाच्या मध्यभागी असलेली जमीन काही इंच खोलगट आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपास बाजूने कक्षासने आहेत. येथील स्तंभांवर शीर्षस्थानी महादेव, विष्णू, मारुती, नंदी, कीर्तिमुख आदी शिल्पे कोरलेली आहेत व खांबावर खालच्या बाजूस कमळ फुलांची नक्षी आहे. येथील सर्व स्तंभ हे एकमेकांना नक्षीदार महिरपी कमानींनी जोडलेले आहेत. सभामंडपातील छत हे गजपृष्ठाकार आहे. येथील प्रवेशद्वाराकडील भिंतीवर तांडव नृत्य करणाऱ्या शिवाचे मोठे उठावशिल्प आहे. अंतराळाकडील भिंतीवर छताच्या लगत कैलास पर्वतावर बसलेले शिव-पार्वती, गणपती, नारद, कार्तिकेय, राजबक्ष, नंदी व सिंह यांची सुंदर उठावशिल्पे आहेत.
तेथून त्यापुढे असलेल्या दोन नक्षीदार स्तंभांतील द्वारातून अंतराळात प्रवेश होतो. या स्तंभांच्या दोन्ही बाजूस शंख, चक्र, गदा व पाश धारण केलेल्या चतुर्भुज द्वारपाल मूर्ती आहेत. अंतराळाच्या द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी शेषशायी विष्णूचे उठावशिल्प कोरलेले आहे. या शिल्पामध्ये शेषावर पहुडलेला विष्णू, त्याच्या नाभीतून उगवलेल्या कमळातील ब्रह्मदेव आणि पायाशी लक्ष्मी आहे. यातील लक्ष्मीची वेशभूषा व केशरचना ही मराठी पद्धतीची आहे, हे विशेष. या चौकटीच्या वरच्या बाजूस गजानन आणि रिद्धी-सिद्धी यांच्या कोरीव मूर्ती आहेत. त्याच्याही वरच्या भागात भिंतीवर मोठे कीर्तिमुख आहे.
अंतराळात एका बाजूला लाकडी पालखी आहे. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहासमोरील भाग हा स्टीलचे गज लावून बंदिस्त केलेला आहे. त्यात काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहातील दर्शनी भिंतीवर डाव्या बाजूला महिषासुरमर्दिनी रूपातील काळंबा देवी व विठ्ठल-रखुमाई आणि उजव्या बाजूस गणपती व वीरभद्र यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी अखंड काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे.
या मंदिराचे छत अतिशय देखणे आणि वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सुशोभित आहे. मुखमंडपाच्या छतावर रांगेत पाच कळस आहेत. सभामंडपाचे छत तीन भागांत आहे. मधला पट्टा गजपृष्ठ आकारात आहे व त्यावर १८ कळस रांगेत आहेत. त्यातील पहिला, नववा व अठरावा कळस काहीसा मोठा आहे. छताच्या मधल्या भागाला जोडून डाव्या व उजव्या बाजूस सरळ उतरते छत आहे. गर्भगृहावर चौकोनी उरूशृंगी पद्धतीचे शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. कळसाला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. या कळसाच्या दोन्ही बाजूंस मुख्य शिखरापेक्षा लहान शिखरे व त्यावर कळस आहेत.
या मंदिरात महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्री, दसरा, रामनवमी आदी उत्सव साजरे केले जातात. प्रतिवर्षी ११ मे या दिवशी मंदिर वर्धापन दिनानिमित्त येथे मोठी यात्रा असते. या दिवशी महाअभिषेक लघुरुद्र आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दिवसभर भजन, कीर्तन, दशावतारी नाटक, महाभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात जाणे येथे महिलांसाठी निषिद्ध आहे. मात्र वैकुंठ चतुदर्शीला सूर्योदयापूर्वी स्नान करून, नव्या वस्रानिशी पहाटे ३ ते ५ या वेळेत गाभाऱ्यात जाऊन महिलांना देवदर्शन घेता येते.
१९३० मध्ये महात्मा गांधींनी पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या मिठबावची आणखी एक ओळख म्हणजे हे मराठीतील ख्यातकीर्त कवी पु. शि. रेगे यांचे गाव आहे. ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांसाठी मिठबावचा समुद्रकिनारा सुप्रसिद्ध आहे.