रामेश्वर मंदिर

कांदळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

कोकण भूमीत निसर्गाने जसे भरभरून सौंदर्य उधळले आहे तसेच इतिहासानेही वेळोवेळी येथील कातळावर आपल्या रेषा ओढल्या आहेत. या कोकणच्या मातीत प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापा उमटल्या आहेत. महाराजांनी बांधलेल्या मोजक्याच किल्ल्यांपैकी एक असलेला सिंधुदुर्ग किल्लाही याच भूमीत आहे. या किल्ल्याच्या सान्निध्यात असलेले व महाराजांनी ज्याची घुमटी बांधली ते कांदळगाव येथील रामेश्वराचे मंदिर हे अनेक भाविकांसोबतच शिवप्रेमींच्याही भक्तीचे व श्रद्धेचे स्थान आहे.

कांदळगाव हे कातवड, खैदा, आडारी, न्हिवे, कोळंब या पूर्वीच्या वाड्यांनी बनलेले आहे. या सर्व वाड्यांचे म्हणजेच कांदळगावचे येथील रामेश्वर हे ग्रामदैवत आहे. असे सांगितले जाते की मोठमोठ्या कांदळाच्या झाडांनी हा भाग वेढलेला असल्याने या गावाचे कांदळगाव हे नाव प्रचलित झाले. एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी या गावातील एका ब्राह्मणाची दुभती गाय घरी दूध देत नसे. त्याने गाईवर पाळत ठेवण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एके दिवशी त्याने पाहिले की त्याची गाय या परिसरातील कांदळवनाने वेढलेल्या एक झुडपात पान्हा सोडत होती. ते दृश्य पाहताच ब्राह्मणाने नोकराला येथील झुडपे काढून ती जागा स्वच्छ करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना तेथे अखंड पाषाणातील शिवपिंडी दिसली. तेव्हापासून ग्रामस्थ या शिवलिंगाची पूजा करू लागले.

या मंदिराबाबतची ऐतिहासिक कथा अशी की इ.स. १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दंडाराजापुरीच्या तोडीस तोड असा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यानुसार २५ नोव्हेंबर १९६४ या दिवशी कुरटे बेटावरील (सध्या असलेली सिंधुदुर्ग किल्ल्याची जागा) मोरयाचा धोंडा येथे विधिवत पूजा करून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘महाराष्ट्राचा इतिहास- मराठा कालखंड – भाग १, शिवकाल’ या डॉ. वि. गो. खोबरेकर यांच्या इतिहासग्रंथानुसार सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी राजे स्वतः मालवणला महिनाभर राहिले होते. या काळात त्यांनी कांदळवन येथील रामेश्वराच्या पिंडीवर घुमटी बांधली. त्याच वेळी त्यांच्या हस्ते मंदिराच्या समोरच्या बाजूस वडाचे रोपटे लावण्यात आले. आज या ठिकाणी रामेश्वराचे प्रशस्त मंदिर उभे आहे व महाराजांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.

कांदळगाव येथील रामेश्वर मंदिराजवळ असलेल्या वाहनतळाला लागून विशाल वटवृक्षाखाली चौथऱ्यावर असलेल्या मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्टित पुतळा आहे. या वटवृक्षाचे रोपण छत्रपतींनी स्वहस्ते केले होते व येथील रामेश्वर मंदिराची स्थापना महाराजांनी केली, असा आशय असलेला फलक येथे लावलेला आहे. या फलकावर अशी आख्यायिका नोंदविली आहे की सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम उभे राहात असताना पश्चिमेकडील तटाचे बांधकाम काही केल्या टिकत नव्हते. त्यावेळी चिंताग्रस्त असलेल्या महाराजांना एके रात्री रामेश्वराने दृष्टान्त दिला. त्यानुसार महाराजांनी कांदळगावच्या रामेश्वराच्या शिवपिंडीवर घुमटी बांधली व त्याची स्मृती म्हणून येथे वडाचे रोपटे लावले. चित्रगुप्त विरचित ‘छत्रपती शिवाजी महाराजांची बखर’ या बखरग्रंथात सिंधुदुर्गाच्या बांधकामात आलेल्या अडचणीच्या प्रसंगाबाबत असे म्हटले आहे की त्यावेळी ‘महाराज चिंतासागरी पडले. पुढे गती कशी करावी म्हणून श्रमी असताना चैत्र शुद्ध पौर्णिमा भृगुवारी मध्यरात्रीस महाराजांचे अंगी श्रीअंबेने संचार करून म्हणू लागली की अरे लेकरा याविषयी चिंता न करणे, तू चित्तात योजिलेले कार्य सिद्धीस पावेल. या विषयी श्री सागराची प्रार्थना करून सिंधू तटाकी दर्भासन घालून तीन उपोषणे केल्यास सागर प्रसन्न होऊन मागे सरेल. हे प्रमाण या विषयी संशय नाही.’ या बखरीत पुढे अशी कथा दिलेली आहे की महाराजांनी तसे उपोषण केल्यानंतर सागर पंधरा हात मागे सरला.

येथे महाराजांनी लावलेल्या वटवृक्षाच्या व मंदिराच्या मध्ये रस्ता आहे. रस्त्यापलीकडे उजव्या बाजूस रवळनाथाचे मंदिर आहे व तेथून पुढे काही अंतरावर मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारालगत डाव्या बाजूस लहानशा मंदिरात गणेश व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या मंदिराभोवती सीमाभिंत आहे. प्रांगणात उजव्या बाजूस चौथऱ्यावर दोन अष्टकोनी दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे.

रामेश्वर मंदिर हे उंच जगतीवर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. २००२ साली केलेल्या नूतनीकरण व जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. प्रांगणातून चार पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात प्रत्येकी सहा स्तंभांच्या चार रांगा आहेत. हे स्तंभ खालच्या बाजूने चौकोनी व रुंद आहेत, तर वरील भागात अष्टकोनी आहेत. कोकणी स्थापत्य शैलीनुसार मधल्या स्तंभांमधील जमीन काही इंच खोलगट आहे व त्यात मध्यभागी यज्ञकुंड आहे. सभामंडपातून अंतराळात प्रवेश करताना पायऱ्यांच्या उजव्या बाजूस पालखीचा ओटा आहे. अंतराळात डाव्या बाजूस पाच तरंगदेवता व दुसऱ्या बाजूला उत्सव काळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे. अंतराळातील अष्टकोनी स्तंभांवर लाकडी तरंगहस्त आहेत व त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. अंतराळातून गर्भगृहास प्रदक्षिणेचा मार्ग आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीची काळ्या पाषाणातील कोरीव मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर उजवीकडे गणेश मूर्ती व डावीकडे देवीची मूर्ती आहे. देवी मूर्तीच्या एका हातात दंड, दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात त्रिशूल व चौथ्या हातात अमृतपात्र आहे. देवीच्या पायाजवळ डाव्या बाजूस अश्व व उजव्या बाजूस सेविका (शक्ती ) आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी रामेश्वराची पिंडी आहे.

मंदिराच्या अंतराळ व गर्भगृहावर शिखरे आहेत. अंतराळावर असलेले शिखर चार थरांचे आहे. खालील तीन दंडगोलाकार थरांवर स्तंभ, चक्र व कमळ फुलांची नक्षी आहेत. वरील थर घुमटाकार आहेत व त्यावर उभ्या धारांची नक्षी व कमळपुष्प आहेत. त्यावर आमलक व त्यावर सुवर्ण कळस आहे. गर्भगृहावरील शिखराचे खालील चार थर अष्टकोनी आहेत व त्यावर स्तंभ, चक्र, कमळ फुलांची नक्षी आहे. पाचवा थर गोलाकार आहे व त्यावर घुमट आहे. घुमटावर आमलक व त्यावरही सुवर्ण कळस आहे. हे दोन सुवर्ण कळस करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी २००२ रोजी बसविण्यात आले आहेत.

मंदिराच्या प्रांगणात गोड्या पाण्याची प्राचीन विहीर आहे. येथे काही वीरगळ व स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होतात. चैत्र पाडवा ते रामनवमी हा नऊ दिवसांचा चैत्रोत्सव, दर महिन्याची वद्य त्रयोदशी, श्रावणी सोमवार, शारदीय नवरात्रोत्सव, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा तसेच दर तीन वर्षांतून डाळपस्वारी व रामेश्वर पंचायतन देवतांची सिंधुदुर्ग किल्ला स्वारी हे विशेष उत्सव साजरे केले जातात. कोकणातील गावऱ्हाटीनुसार डाळप म्हणजे सीमासंरक्षक देवांचा शांतवन विधी व ग्रामदेवतेचा मानकऱ्यांच्या घरांना भेटीचा विधी होय. या उत्सवात रामेश्वर देवाची मिरवणूक काढून गावातील सर्व देवतांशी त्याची भेट घडविली जाते. यावेळी ग्रामस्थांकडून देवाला समस्या सांगितल्या जातात.

उत्सवांच्यावेळी महाअभिषेक, लघुरुद्र, महापूजा, पालखी सोहळा, तसेच भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, दशावतारी नाटक व महाप्रसाद आदींचे आयोजन केले जाते. जागृत व नवसाला पावणारा देव असल्याने हजारो भाविक वार्षिक उत्सवास हजेरी लावतात. या मंदिर परिसरात भावई, राणेवंशाची कुलस्वामिनी, देवी सातेरी, परब कुलवंशाची कुलदेवता, बाराचा पुर्वस व मायेचा पुर्वस अशी मंदिरे आहेत.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून ६ किमी, तर कसालपासून ३१ किमी अंतरावर
  • कुडाळ, मालवण, कसाल येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दू. ०२३६५ २४२६६८
Back To Home