छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६४ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया रचला आणि या किल्ल्याच्या उभारणीनंतर येथील किनाऱ्यावरील खेडे हळूहळू एका मोठ्या नगरात रूपांतरित होऊ लागले. हे नगर म्हणजे मालवण. देखणा सागरकिनारा आणि माडांच्या बागांनी मंडित असलेल्या या प्राचीन शहरास इतिहासाबरोबरच धार्मिकतेचाही वारसा आहे. येथील एका भागाचे नावच देऊळवाडा असे आहे. या भागात मालवणचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वराचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. रामेश्वराच्या शेजारी मालवणचे आराध्यदैवत असलेल्या देवनारायणाचेही मंदिर आहे.
मालवण या शहराचा इतिहास असा सांगितला जातो की पूर्वी मालवण ही नांदरूख या गावाची एक छोटी वाडी होती. मेढा आणि देऊळवाडा असे मालवणचे दोन भाग होते. त्यांमधील भूभाग पाण्याखालचा व दलदलीचा होता. मेढा हे तर बेटच होते. ते कळकीच्या बांबूंनी वेढलेले होते. प्रारंभी या भागात शिलाहार, राष्ट्रकुट, कदंब व यादव अशा विविध राजघराण्यांची सत्ता होती. मालवण शहर खऱ्या अर्थाने आकारास आले ते शिवकाळात. शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधल्यानंतर त्या किल्ल्याच्या आश्रयाने व किल्ल्यामुळे वाढलेल्या वर्दळीमुळे मालवण ही बाजाराची पेठ म्हणून आकारास येऊ लागले. येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती होऊ लागली. या गावात पूर्वीपासून सातेरी आणि काळबादेवी यांची मंदिरे होती. मात्र गावास ग्रामदैवत नव्हते. गावात मूळ देवस्थान असावे या धार्मिक आवश्यकतेतून येथे रामेश्वराचे आगमन झाले.
याबाबत कथा अशी की मालवणनजीकच्या कांदळगाव व आचरे येथे रामेश्वराचे स्थान होते. मालवणला मूळ देवस्थान असावे म्हणून ग्रामस्थांनी तत्कालीन रूढीनुसार त्या गावांतील रामेश्वरास विचारणा केली. त्या देवांच्या अवसाराने मालवणमध्ये रामेश्वराच्या स्थापनेस मंजुरी दिली नाही. तेव्हा अणावगावच्या रामेश्वराकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा तेथील रामेश्वराने देवीच्या स्थापनेस मंजुरी दिली. तेव्हा येथे पावणाईची स्थापना करण्यात आली. यानंतर मग देऊळवाडा येथे रामेश्वराची स्थापना करण्यात आली. असे सांगितले जाते की ग्रामदैवत असलेल्या रामेश्वराचे मंदिर, तसेच तेथील देव नारायण, भवानी आणि मारुतीची मंदिरे मालवणमधील तत्कालीन सावकारांनी बांधली. संततीसाठी हे सावकार देवास मंदिर बांधण्याचा नवस करीत असत. त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मंदिर उभारत असत.
मालवणच्या ग्रामदेवतेचे हे मंदिर देऊळवाडा भागात प्रशस्त अशा प्रांगणात उभे आहे. मंदिरासमोर एका उंच चौथऱ्यावर कोकणी पद्धतीच्या दोन आठ स्तरीय दीपमाळा आहेत. त्यांच्यामध्ये तुळशी वृंदावन आहे. चौथऱ्यासमोर लोखंडी स्टँडला अनेक छोट्या–मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. भक्तांनी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवसपूर्ती म्हणून देवालयास या घंटा अर्पण केलेल्या आहेत. या चौथऱ्याच्या मागे काही अंतरावर नगारखान्यासारखी मोठी दुमजली चौकोनी इमारत आहे. उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिराच्या रचनेत प्राचीन नागर स्थापत्यशैलीचा वापर केल्याचे दिसते. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाची बांधणी व त्यावरील छत हे मात्र खास कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर आहे.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारी रुंद कमान आहे व तिच्या बाजूस मयुरांच्या सुंदर प्रतिमा आहेत. ललाटबिंबस्थानी शंकर–पार्वतीच्या मूर्ती आहेत. या मूर्तींमध्ये शंकराच्या मांडीवर बालगणेश बसलेला आहे. सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. बाहेरील स्तंभ कमानींनी जोडलेले आहेत व आतल्या बाजूला अष्टकोनी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. या स्तंभांच्या तरंगहस्तांवर व्याल, गोमुख, शिवपिंड, नाग अशा विविध प्रतिमा कोरलेल्या आहेत. कमळ फुलांच्या उठावशिल्पांनी छत सुशोभित केलेले आहे.
अंतराळाच्या दर्शनीभिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस मोठी देवकोष्टके आहेत. त्यात शैव द्वारपालांची सुबक शिल्पे आहेत. ही शिल्पे त्रिभंग म्हणजे तीन ठिकाणी बाक असलेली व भरतनाट्यम् मधील कुंचित पादभेद प्रकारची पदमुद्रा असलेली आहेत. अलंकारांनी सुशोभित असलेल्या या द्वारपालांच्या हातात त्रिशूल, डमरू, सर्प आणि गदा आहेत व मस्तकी मुकुट, कपाळी त्रिपुंड आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर मंदिर शिखराची शिल्पाकृती आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस नंदी आहेत. अंतराळातील स्तंभ बुटके, चौरसाकृती व रुंदीने मोठे आहेत. ते कमानींनी जोडलेले आहेत. अंतराळाचे छत हे गजपृष्ठाकार आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर शिल्पांकित केलेली बारा राशींची बारा चित्रे. अंतराळात एका बाजूस देवाची पालखी ठेवलेली आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस देवकोष्टकात कृष्णपाषाणातील वीरभद्राची, तर डाव्या बाजूस गणेश व विष्णूची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. त्याच्या वरच्या बाजूस तांडवनृत्य करणाऱ्या नटराजाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूस कमलकलिका हातात घेऊन उभी असलेली पार्वती व खाली मृदंगवादन करतानाची तुंबर मूर्ती आहे. गर्भगृहात भूतलावर रामेश्वराची पाषाणाची पिंडी व त्यामागे उंच चौथऱ्यावर महादेवाची प्रतिमा आहे.
या मंदिराजवळच देव नारायणाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची रचनाही कोकणी पद्धतीचा उतरत्या छपराचा सभामंडप, अंतराळ आणि अंतराळात गर्भगृह अशा पद्धतीची आहे. गर्भगृहावर खालच्या बाजूस अष्टकोनी आणि वर निमुळते होत गेलेले शिखर आणि त्यावर आमलक व कळस आहे.
मंदिराचा सभामंडप खुल्या पद्धतीचा आहे. त्यास लोखंडी जाळीचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोर एक उंच दंडगोलाकार शिळा आहे. सभामंडप प्रशस्त आहे. त्याच्या बाहेरच्या व आतल्या दोन्ही बाजूंनी सहा–सहा गोलाकार स्तंभांच्या रांगा आहेत. येथून तीन पायऱ्या उंचावर मंदिराचे अंतराळ आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस भिंतीत देवकोष्टके आहेत. त्यात उजव्या बाजूस मारुती, गणपती, तर डाव्या बाजूस नारायण पादुका आणि सूर्यनारायण यांच्या मूर्ती आहेत. वराहमिहिराच्या ‘बृहतसंहिता‘ या ग्रंथांमध्ये देवांच्या मूर्ती कशा तयार कराव्यात, त्यांचा आकार, उंची, लक्षणे व लांच्छने आदी तपशील दिलेला आहे. त्यात सूर्यमूर्तीबद्दल ‘नासाललाटजंघोरूगण्डवक्षांसि चोन्नतानि रवेः । कुर्यादुदीच्यवेषं गूढं पादादुरो यावत् ।।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ सूर्याच्या प्रतिमेची नासिका, ललाट, जंघा, ऊर, कपाळ आणि ऊरस्थल उंच बनवावे. तसेच उत्तर दिशेस राहणाऱ्या लोकांच्या वेशाप्रमाणे सूर्याच्या प्रतिमेचा वेश असावा. पायापासून छातीपर्यंत प्रतिमा वस्त्रांकित असावी. येथील सूर्यमूर्ती मात्र याहून वेगळी आहे. येथे सूर्यदेवाच्या मस्तकी मुकुट व कमरेच्या वरचा भाग उघडा आहे, हे विशेष.
मंदिराच्या गर्भगृहात संगमरवरी पीठावर देव नारायणाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे ही मूर्ती समभंग व द्विभूज आहे. तिच्या एका हातात अमृतपात्र, तर दुसऱ्या हातात कमंडलू आहे. मूर्तीच्या पायाशी गरुड व हनुमंताच्या मूर्ती आहेत. या मंदिराजवळच पावणाई व भावई देवी यांची मंदिरे आहेत. पावणाई देवीचे मंदिर जुन्या स्वरूपाचे आहे, तर भावई देवीच्या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आहे.
रामेश्वर व देव नारायण मंदिरात दीपावली उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी ग्रामदैवत रामेश्वर–नारायणाचा पालखी सोहळा साजरा केला जातो. या पालखीस दुपारी प्रारंभ होतो. गावकर, मानकरी रामेश्वरासमोर श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडते. आडवण येथील सातेरी, वायरी येथील भूतनाथ मंदिरास पालखी भेट देते. नंतर समुद्रमार्गे मोरयाचा धोंडा, देवदांडेश्वर, काळबाई मंदिर, जोशी मांड यांनाही भेट देते. बाजारपेठेतील रामेश्वर मांड येथे पालखी दर्शनासाठी ठेवली जाते. नंतर रात्री उशिरा ती बाजारपेठ, देऊळवाडा मार्गे मंदिरात येते. या सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित असतात. या मंदिरात अन्य सणही भक्तिभावाने साजरे केले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेस मंदिरात दिव्यांची आरास केली जाते.