अलिबागपासून रेवदंड्याकडे जाणारा रस्ता हा मंदिरांनी भरलेला आणि भारलेला आहे. प्राचीन काळापासून चौल ही मंदिरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की चौलमध्ये पूर्वी ३६० तळी आणि ३६० मंदिरे होती. त्यातील काही मंदिरे नामशेष झाली असली तरी येथील एका मोठ्या पुष्करणीच्या काठावर दिमाखात उभे असलेले ऐतिहासिक व पांडवकालीन रामेश्वर मंदिर भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या मंदिरासमोर असलेल्या पुष्करणीचा विस्तार मोठा आहेच; परंतु त्याहून अधिक विस्तार या मंदिराचा असावा, इतका परिसर या मंदिराने व्यापलेला आहे.
ऐतिहासिक व प्राचीन माहितीनुसार, सध्याच्या चौल परिसरात पूर्वी चंपक म्हणजे चाफ्याची खूप झाडे होती. म्हणून चंपावती नगरी म्हणून हा परिसर प्रचलित होता. इतिहास संशोधक जे. गर्सन डिकुन्हा यांच्या ‘नोट्स ऑन द हिस्टरी अँड अँटिक्विटिज ऑफ चौल अँड बसीन’ या इ.स. १८७६ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात चौलचे प्राचीन चंपावती हे नाव चंपा या राजाच्या नावावरून पडल्याचे म्हटले आहे. या राजाने चंपावती नगरीची मुहूर्तमेढ रोवली, असे या पुस्तकात म्हटले आहे. या शहरास प्राचीन हिंदू चंपावती, ग्रीक सिम्यल्ला, अरब सैमूर, तर प्राचीन मुस्लिम ग्रंथकार चिवेल या नावाने ओळखत असत. इतिहासकारांचे असे मत आहे की चैमुल किंवा चांवुल या नावांचा चौल हा अपभ्रंश असावा. मुंबई जवळच्या कान्हेरी येथे सापडलेल्या एका शिलालेखात इ.स.च्या दुसऱ्या शतकात दोन योद्ध्यांनी ‘चेमुला’ गाव स्थापन केल्याचा उल्लेख आहे. इतिहास संशोधकांच्या मते तेच आजचे चौल गाव आहे.
एका पौराणिक आख्यायिकेनुसार, द्वापारयुगात चंपावती नगरीमध्ये पिठोर राजा राज्य करीत होता. चावा हा त्याचा मंत्री होता. या चावा याने पिठोर राजाची हत्या केली व तो राज्यावर बसला. त्यानेच चंपावतीचे नाव चौल असे ठेवले. चौलच्या परिसरात दोन हजार वर्षांपूर्वीपासून मानवाचे अस्तित्व होते. चौलचा उल्लेख इ.स. ८० ते १५० या काळातील टॉलेमी, आरियन अशा इतिहासकारांच्या पुस्तकातही आढळतो. हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर होते. इ.स. पूर्व ३०० ते इ.स. १७०० या काळात ते सक्रिय होते. संपन्न परिसर व मोक्याचे बंदर असल्यामुळे येथे अनेक देशांतील व्यापाऱ्यांचे येणे जाणे असे. १५०८ मध्ये दहा इजिप्शियन व्यापारी जहाजे इथे आल्याचे उल्लेख सापडतात. त्याकाळी येथे रेशमाचे उत्पादन होत असे व व्यापार चाले. त्याशिवाय येथून तांब्या–पितळेची भांडी, तांदूळ, सुकी मासळी व मीठ जगभर जात असे. येथे झालेल्या उत्खननात मौर्य काळातील मातीची काळी भांडी, सातवाहन काळातील काळी–तांबडी खापरे / भांडी, निजामशाहीतील चिनी मातीची भांडी, बांधकामाचे अवशेष व अनेक प्रकारची नाणी सापडली आहेत. येथे शिलाहार, राष्ट्रकुट, मौर्य, चालुक्य, कदंब, यादव, सिद्दी, तसेच इंग्रजांचा वेळोवेळी अंमल होता. नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत इथे मुस्लिम राजवट होती. इ.स. १३१२ मध्ये माहीमच्या सुलतानाचा पराभव करणारे यादव घराणे हे चौलचे होते. इ.स. १५०८ ते १५५३ मध्ये येथे विजापूरकर आदिलशहाचा अंमल होता. पुढे पोर्तुगीज आले. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही येथे ठिकठिकाणी सापडतात. अन्य एका उल्लेखानुसार अफनासी निकितीन (१४३३ ते १४७२) हा भारतास भेट देणारा पहिला रशियन प्रवासी पंधराव्या शतकात रशियातून समुद्रमार्गे जॉर्जिया, आर्मेनिया, इराण, मस्कत मार्गे प्रवास करून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील
दीव बंदरात उतरला होता व तेथून खंबायतमार्गे तो चौल येथे आला होता. चौलला त्याने चीवील असे म्हटले आहे. (रेवदंड्यात अलीकडे या अफनाशी निकीतन याचे स्मारक उभारले गेले आहे.) चौलच्या बंदरात ८ सप्टेंबर १५२४ रोजी वास्को द गामाचे जहाज लागले होते. मात्र तो चौलच्या भूमीवर उतरला नव्हता, अशीही ऐतिहासिक नोंद आहे.
या ऐतिहासिक व प्राचीन चौलमध्ये असलेल्या रामेश्वर मंदिराचा स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये उल्लेख आहे. भारतातील तीन महत्त्वाच्या रामेश्वर मंदिरांपैकी हे एक असल्याचे सांगितले जाते. यातील पहिले रामेश्वर मंदिर हे तामिळनाडूत व दुसरे कारवारात आहे. येथील मंदिर हे परिसरात पूर्वी नांदणाऱ्या समृद्धीची साक्ष देते. एका मोठ्या पुष्करणीच्या काठावर वसलेल्या या मंदिराची रचना एखादा पेशवेकालीन वाडा भासावा अशी आहे. हे मंदिर बाराव्या वा तेराव्या शतकातील असावे, असे सांगितले जाते. मंदिराभोवतीच्या सीमाभिंतीत असलेल्या प्रवेशकमानीतून मंदिराच्या परिसरात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराला लागून येथे एक गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरातील गणेशाची मूर्ती अडीच फूट उंचीची आहे. चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या उजवीकडील दोन्ही हातांमध्ये व डावीकडील एका हातात शस्त्रे आहेत, तर डावीकडील दुसऱ्या हातात लाडू आहेत. सोंडेच्या दोन्ही बाजूला तुटलेले दात आहेत. रामेश्वराच्या दर्शनाला आल्यानंतर येथील पुष्करणीत पाय धुऊन या गणेशाचे दर्शन घेऊन मग रामेश्वराचे दर्शन करण्याची प्रथा आहे. गणपती मूर्तीच्या शेजारी संगमरवरी दत्तमूर्ती आहे.
दुमजली असलेल्या या मंदिरातील वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सभामंडपातून पायऱ्या असलेला प्राचीन लाकडी जिना आहे. येथील सज्जातून मंदिरासमोर असलेला तलाव, नंदीमंडप व आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर अनेक रिकाम्या खोल्या आहेत. पूर्वीच्या काळी येथील पुजाऱ्यांना राहण्यासाठी त्या बांधल्या असाव्यात, असे सांगितले जाते. पूर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा गाभारा चौकोनी आहे. त्याच्या मध्यभागी काहीशी उंच पितळी पत्र्याने मढवलेली चौकोनी शाळुंका आहे. या शाळुंकेच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नाही. येथे एका चौकोनी खड्ड्यात स्वयंभू शिवलिंग आहे. याबाबत पौराणिक आख्यायिका अशी की कैलासावर शंकर–पार्वती सारीपाट खेळत असताना त्यात शंकराचा पराभव झाला. तेव्हा पार्वती हसल्याने शंकर तेथून रूसून कृष्णा–वेण्णेच्या संगमावर येऊन राहिले. त्यानंतर तेथून ते भार्गवक्षेत्री म्हणजेच कोकणात आले. त्यांना शोधत पार्वती तेथे गेली; परंतु त्या पूर्वीच शंकराने चंपावतीस प्रस्थान ठेवले होते. चंपावतीस त्यांनी बराच काळ वास्तव्य केले. त्यावेळी हे लिंग येथे निर्माण झाले.
रामेश्वर मंदिराच्या आवारात चार मोठ्या दीपमाळा आहेत. त्यापैकी मंदिराच्या समोरील नंदीची दीपमाळ ही विसाजीपंत सुभेदार यांनी, बैरागी गणपतीजवळ असलेली दुसरी दीपमाळ इ.स. १७८४ मध्ये लाडो भावजी प्रभू ताम्हाणे यांनी व तुळशी वृंदावनाजवळ असलेली तिसरी दीपमाळ इ.स. १६६९ मध्ये बांधलेली आहे, तर येथील पुष्करणी व चौथी दीपमाळ ही रेवदंडा येथील बाळाजी लोहार यांनी बांधल्याची नोंद आहे. या दीपमाळांसमोर असलेल्या उंच नंदीमंडपात नंदीची भलीमोठी मूर्ती आहे. जमिनीपासून उंचावर असलेल्या या नंदीमंडपात जाण्यासाठी चार पायऱ्या आहेत. हा नंदी रंगीत दिसत असला तरी तो अखंड काळ्या पाषाणात घडविलेला आहे. नंदीमंडप व मुख्य मंदिर यामध्ये तुळशी वृंदावन आहे. दर्शनमंडप, खुला सभामंडप, मुख्य सभामंडप, मुख्य गर्भगृह व दोन उपगर्भगृहे अशी मंदिराची रचना आहे.
काहीशा उंचावर असलेल्या या मंदिराच्या खुल्या सभामंडपात जाण्यासाठी मुखमंडपातून पाच पायऱ्या आहेत. सभामंडपातील छत आणि स्तंभ हे लाकडी कोरीव कामांनी सजलेले आहेत. प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगीजकालीन पितळी घंटा आहे. चौल ही नगरी अनेक वर्षे पोर्तुगीजांच्या अमलाखाली असल्याने त्याच्या खाणाखुणा या मंदिरातही दिसतात. या सभामंडपात मंदिराच्या दर्शनी भिंतीवर विविध संत व देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. खुल्या सभामंडपातून मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. या प्रशस्त मंदिराचा मुख्य सभामंडप लाकडी बांधणीचा व दुमजली आहे. या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या प्रतिमा व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. या मंदिराचा लाकडी दरवाजा हा एखाद्या किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे भासतो.
हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. वायुविजनासाठी येथे काही गवाक्ष आहेत. येथील स्तंभ हे एकमेकांशी कमानीकार आकाराने जोडलेले आहेत. सभामंडपातील लाकडी कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील स्तंभांवर विविध व्यालप्रतिमा कोरलेल्या दिसतात.
सभामंडपाच्या उजव्या व डाव्या बाजूला उपगर्भगृहे आहेत. त्यामध्ये उजव्या बाजूला शिवशंकर व विष्णू यांच्या मूर्ती, तर डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. येथेच ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेली तीन कुंडे आहेत. विष्णू मूर्तीसमोर पर्जन्यकुंड, गणपतीसमोर वायुकुंड, तर मुख्य गर्भगृहासमोर अग्निकुंड आहे. अग्नी किंवा वायूसंदर्भात आपदा आल्यानंतर ती उघडण्यात येत असावीत. पर्जन्यकुंड मात्र अनेकदा उघडल्याच्या नोंदी आहेत. त्या संदर्भातला पहिला दाखला इ.स. १६५३ चा आहे. १७३१ मध्ये पाऊस लांबल्याने येसाजी आंग्रे यांनी पर्जन्यकुंड उघडले होते. त्यानंतर लगेचच पाऊस सुरू झाल्याचे सांगतात. असाच प्रकार त्यानंतर अनेकदा झाला. १७९०, १८५७, १८७६ व १८९९ या वर्षांत पर्जन्यकुंड उघडण्यात आले होते. सगळ्यात अलीकडे म्हणजे १९४२ साली हे कुंड शेवटचे उघडले होते.
या मंदिराच्या गर्भगृहाचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे. असे सांगितले जाते की येथील गर्भगृह हेच प्राचीन मुख्य मंदिर आहे. त्यानंतरच्या काळात हे मंदिर मध्यभागी ठेऊन भोवताली त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. पूर्वी हे मंदिर समुद्राच्या काठावर होते. आज ते गावाच्या मध्यभागी आहे. हळूहळू समुद्र मागे सरकला, असे सांगितले जाते. दर वर्षी पाऊस चांगला व्हावा, यासाठी पिंडीवर संततधार धरली जाते. ऑगस्टपर्यंत पाऊस पडला नाही, तर मात्र या मंदिरातील पर्जन्यकुंड उघडले जाते. महाशिवरात्रीला येथे एक दिवसाची यात्रा असते. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची गर्दी असते. त्रिपुरारी पौर्णिमेलाही येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी संपूर्ण मंदिर व परिसरात विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. तेव्हा दिव्यांनी उजळलेल्या संपूर्ण मंदिराचे प्रतिबिंब मंदिरासमोर असलेल्या पुष्करणीत पाहता येते.
मुख्य मंदिराशिवाय या मंदिराच्या आवारात हनुमान मंदिर, विठ्ठल–रुख्मिणी मंदिर आहे. मंदिराला खेटून असलेल्या एका मोठ्या पाषाणात येथे नऊ शिवलिंगे आहेत व उर्वरित तीन जागा रिक्त आहेत. त्यामुळे हा पाषाण म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतीक आहे, असे समजले जाते. या शिवलिंगांशेजारी देवीमातेचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात एक विहीर, तसेच काही समाध्या व वीरगळ आहेत.